सोऽपि कृष्णोद्यमं ज्ञात्वा भीतः प्राणपरीप्सया । साहाय्ये कृतवर्माणमयाचत स चाव्रवीत् ॥११॥

तोही जाणोनि कृष्णोद्यम । भयें संत्रस्त जाला परम । प्राण वांचवावयाचा काम । धरूनि क्षेम इच्छितसे ॥२॥
शतधन्वा तैं आपुले प्राण । वांचवावयाचे इच्छेकरून । कृतवर्म्याप्रति जाऊन । साह्य हो म्हणोन याचितसे ॥३॥
कृष्ण पवर्तला माझिया घाता । कोण्ही रक्षक न दिसे आतां । तुम्ही करूनियां साह्यता । माझिया जीविता रक्षावें ॥४॥
कृतवर्मा हें ऐकोनि कानीं । शतधन्व्यासि बोले वाणी । ते तूं कौरवचूडामणि । ऐकें श्रवणीं संक्षेपें ॥१०५॥

नाहमीश्वरयोः कुर्यां हेलनं रामकृष्णयोः । को नु क्षेमाय कल्पेत तयोवृंजिनमाचरन् ॥१२॥

ऐकोनि शतधन्व्याचा शब्द । हांसिला कृतवर्मा खदखद । म्हणे तूं कैसा बुद्धिमंद । पाडिलें द्वंद्व कृष्णेंसीं ॥६॥
अरे हे बलभद्र चक्रपाणि । प्रत्यक्ष ईश्वरावतार दोन्ही । ऐसें म्हणों न शके वाणी । जे ईश्वरालागूनि नियंते हे ॥७॥
सागरगर्भीं द्वारकापुर । निर्मूं शके कोण पामर । सुधर्मा अर्पूनि अमरेश्वर । तिष्ठे किंकर होत्साता ॥८॥
शक्ती दंडि खङ्गी पाशी । चापी गदी ईशानेंसीं । आज्ञा वंदूनिया शीर्षीं । नतमौळेंसीं जुहारिती ॥९॥
सुनंदपाणि चक्रपाणि । हे ईश्वराचे ईश्वर दोन्ही । यांची अवज्ञा माझेनी । कायवाड्मनीं न कल्पवे ॥११०॥
यांतें सामान्यता मानून । माझेनि न करवेंचि हेलन । अथवा हो कां आणिखी कोण । जो विरुद्धाचरण करी यांशीं ॥११॥
यांचा करूनियां अपराध । यांसि चालवूनियां विरोध । ऐसा त्रिजगीं कोण प्रबुद्ध । जें कल्याण पसिद्ध पावेल ॥१२॥
तस्मात् यांचे जे अपराधी । तेचि केवळ अभद्रनिधि । दुःखदोषांची समृधि । तिहीं त्रिशुद्धि संग्रहिली ॥१३॥
यालागिं माझेनि ईश्वरांसी । विरोध न करवेचि मानसीं । यांचे प्रताप तूं परियेसीं । देखोनि कैसी तुज भ्रांति ॥१४॥

कंसः सहानुगोऽपीतो यद्द्वेषात्त्याजितः श्रिया । जरासंधः सप्तदशसंयुगान्विरथो गतः ॥१३॥

अरे यांचिया द्वेषास्तव । सानुग कंसा पराभव । ज्यातें नमिती भूभुज सर्व । एवढें वैभव सांडवलें ॥११५॥
प्रत्यक्ष तुवां देखिला नयनीं । सतरा वेळ समराङ्गणीं । मागधाऐसा प्रतापतरणी । विरथ जीवदानीं सोडिला ॥१६॥
मागधाऐसा प्रतापवंत । सतरा वेळ गेला विरथ । लज्जा पावला नृपचक्रांत । हें काय विदित तुज नाहीं ॥१७॥
ऐसियासिं विरुद्धाचरण । सहसा माझेनि न करवें जान । तूंहे तयांसि होयीं शरण । कीं आश्रय आन विचारीं ॥१८॥
कृतवर्म्याची निराश गोठी । ऐकोनि शतधन्व्याचे पोटीं । कल्पना उठती कोट्यानुकोटि । आश्रय सृष्टी नाळोचे ॥१९॥
कृतवर्म्यांनें निराकरिला । मग तो अक्रूरापासीं गेला । तेणें काय त्या विचार कथिला । कौरवपाळा तो परिसें ॥१२०॥

प्रत्याख्यातः स चाक्रूरं पार्ष्णिग्राहमयाचत । सोऽप्याह को विरुध्येत विद्वानीश्वरयोर्बलम् ॥१४॥

शतधन्वा म्हणे अक्रूरातें । पाठीराखा तूं होय मातें । ऐसिये समयीं आश्रयातें । मी याचितों तुजलागीं ॥२१॥
ऐसा याचिला अक्रूर । तोही तैसेंचि उत्तर । बोलिला होऊन विवेकपर । न्यायनिष्ठुर तेणेंसी ॥२२॥
जाणोनि ईश्वराचिया बळातें । कोण जाणता विरोधातें । प्रवर्तेल हें विवरीं चित्तें । मग साह्यतें तूं याचीं ॥२३॥
यांचा प्रताप देखोनि दृष्टी । अद्यापि विरोध धरिसी पोटीं । तथापि ऐकें समूळ गोठी । वास्तव कोटी पैं यांची ॥२४॥

य इदं लीलया विश्वं सृजत्यवति हंति च । चेष्टां विश्वसृजो यस्य न विदुर्मोहिताऽजया ॥१५॥

रामकृष्ण हे भासती भिन्न । परी हे ब्रह्मसनातन । ईश्वरामाजि ईश्वरपण । स्फुरे संपूर्ण यांचेनि ॥१२५॥
जो हें विश्व लीलेंकरून । सृजी पाळी ग्रासी जाण । तो दो रूपें अवतरून । भूभारहरण करूं आला ॥२६॥
ऐसा जो कां विश्वस्रष्टा । लीलाविग्रह हे त्याची चेष्टा । सहसा नुमजे विवेकभ्रष्टां । महापापिष्ठा दुरात्मयां ॥२७॥
काय म्हणोनि नुमजे म्हणसी । तरी अजा माया मोहराशि । पडिले तयेचिये ग्रासीं । अभिमानासी वश जाले ॥२८॥
मायामोहें जाले भ्रमित । देहतादाम्यें विवेकरहित । नश्वर मानूनियां शाश्वत । ईश्वर समर्थ नोळखती ॥२९॥
हातींच्या कंकणा किमर्थ मुकुर । रामकृष्ण हे जगदीश्वर । यांचा प्रतापप्रभाकर । कीं श्रवणगोचर तुज नाहीं ॥१३०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP