अध्याय ५३ वा - श्लोक ४६ ते ५०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अद्भिर्गंधाक्षतैर्धूपैर्वासःस्रड्माल्यभूषणैः ।
नानोपहारबलिभिः प्रदीपावलिभिः पृथक् ॥४६॥

षोडशोपचारीं पूजा । करिती झाली भीमकात्मजा । विधि सांगती द्विजभाजा । गरुडध्वजप्राप्तीसी ॥१२॥
वस्त्रें अलंकार सुमनें । नाना उपहार बळिदानें । दीपावळी नीरांजनें । सावधानें अर्पिलीं ॥१३॥
कृष्ण धरूनि मानसीं । पूजी द्विजपत्न्यांसी । जें जें बोलिलें विधीसीं । तें तें त्यांसी दिधलें ॥१४॥

विप्रस्त्रियः पतिमतीस्तथा तैः समपूजयत् । लवणापूपताम्बूलकंठसूत्रफलेक्षुभिः ॥४७॥

निंबें नारिंगें नारिकेळें । अपूप लाडु अमृतफळें । इक्षुदंड आंबे केळें । सुवासिनींसी दीधलीं ॥२१५॥
मुक्ताफळेंसीं आभरणें । सौभाग्यद्रव्यें कंठाभरणें । हळदी जिरें लवण धणे । दिधलीं बाणें नारींसी ॥१६॥

तस्यै स्त्रियस्ताः प्रद्दुः शेषं युयुजुराशिषः ।
ताभ्यो देव्यै नमश्चक्रे शेषां च जगृहे वधूः ॥४८॥

रुक्मिणीतें द्विजपत्न्यांहीं । शेषसौभाग्यद्रव्यीं तिहीं । अर्चूनि आशीर्वचनें पाहीं । अभीष्टसिद्ध्यर्थ योजिलीं ॥१७॥
मग रुक्मिणीनें त्या ब्राह्मणी । नमिल्या मस्तक ठेवूनि चरणीं । शेषप्रसाद स्वीकारूनि । स्तविली भवानी तें ऐका ॥१८॥

मुनिव्रतमथ त्यक्त्वा निश्चक्रामांबिकागृहात् ।
प्रगृह्य पाणिना भृत्यां रत्नमुद्रोपशोभिना ॥४९॥

होती नीलोत्पलांची माळा । ते घातली जगदंबेच्या गळां । वर देईं वो घनसांवळा । उचित काळा आजिच्या ॥१९॥
म्हणोनि विसर्जिलें मौन । करूं आदरिलें स्तवन । मना मागें ठेवूनि मन । सावधान स्तवनासी ॥२२०॥
जय जय वो अव्यक्तव्यक्ति । जय जय वो विश्वस्फूर्ति । जय जय वो अमूर्तमूर्ति । चिच्छाक्ति चिन्मात्रें ॥२१॥
जय जय वो जगदंबे । जय जय वो आरंभरंभास्तंभे । जय जय सौभाग्यशोभनशोभे । स्वयें स्वयंभें कुमारी ॥२२॥
जय जय वो अनादि । नाकळसी मनोबुद्धि । देवो देवी इहीं शब्दीं । तूं त्रिशुद्धि नांदसी ॥२३॥
शिवा तुझेनि शिवपण । जीवा तुझेनि जीवपण । देवा तुझेनि देवपण । निकारण तूं माये ॥२४॥
तुझेनि शब्दादिकां शोभा । तुझेनि नभत्व आलें नभा । तूंचि मूळ प्राणरंभा । विश्वकदंबा जीवन तूं ॥२२५॥
तुझी उघडलिया दृष्टि । नांदों लागे सकळ कृपासृष्टि । तुवां उपेक्षिलियापाठीं । देवाही नुठी देवपणा ॥२६॥
ॐ पुण्या सुमुहूर्ती । लग्न लावणें तुझ्या हातीं । मज नोवरा श्रीपति । समूळ कीर्ति तूं माये ॥२७॥
ऐसा सुकृतिवाद करितां । कंठींची माळा आली हाता । येचि माळेनें कृष्णनाथा । वरीन आतां निर्धारें ॥२८॥
महाप्रसाद जी सर्वथा । म्हणोनि चरणीं ठेविला माथा । आशीर्वाद देती समस्ता । पतिव्रता द्विजपत्न्या ॥२९॥
येणें उह्लासें सुंदरीं । वरूं निघे कृष्णवरीं । स्वानुभवाची किंकरी । तीतें करीं धरूनि ॥२३०॥
भीमकीसौंदर्य अमूप जिचेनि जगा नामरूप । तिच्या लावण्याचे दीप । मुख्य स्वरूप केंवि वर्णूं ॥३१॥
जीतें सृजूं न शके चतुरानन । कृष्ण स्वभावें स्वरूपपूर्ण । तिच्या स्वरूपाचें लक्षण । एका जनार्दन करीतसे ॥३२॥

इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवरएकाकारटीकायामंबिकापूजनं नाम षष्ठप्रसंगः ॥६॥ श्रीकृष्णाय० ॥

कृष्णभेटीलागिं देखा । नवविधभक्तीसी आवांका । तैशा नवरत्नमुद्रिका । भीमककन्यका लेयिलीसे ॥३३॥

तां देवमायामिव वीरमोहिनीं सुमध्यमां कुंडलमंडिताननाम् ।
श्यामां नितंबार्पितरत्नमेखलां व्यंजत्स्तनीं कुंतलशंकितेक्षणाम् ॥५०॥

सकळसौंदर्याची खाणी । बरवेपण जीपासूनि । स्वरूपरूपाची जनने । वीरीं रुक्मिणी देखिली ॥३४॥
सुरनरपन्नगांच्या ठायीं । हिंडतां सौंदर्या विश्रांति नाहीं । म्हणोनि धाविन्नलें लवलाहीं । भीमकीदेहीं विश्रान्ति ॥२३५॥
भीमकीकृष्णा आलिंगन । तेणें सौंदर्या समाधान । त्रिलोकीचें बरवेपण । भीमकीपासीं धांविन्नलें ॥३६॥
ऐकोनि जिचिया सौंदर्यासी । वेध लागला श्रीकृष्णासी । ते भीमकी वर्णावी कैसी । सीमा रूपासि न करवे ॥३७॥
नाहीं स्रष्ट्यानें सृजिली । कृष्णप्रभावें रूपासि आली । बरवेपणा शीग चढली । साकारली सौंदर्यें ॥३८॥
गगन शून्यत्वा उबगलें । कृष्णभेटीसी उदित झालें । भीमकीमस्तकासि आलें । नीलालकीं शोभत ॥३९॥
मस्तकींचे नीळ कुंतळ । तेंचि नभ अतिसुनीळ । तळीं मुखचंद्र निर्मळ । भीमकीमुखीं उगवला ॥२४०॥
चंद्र क्षीण कृष्णपक्षीं । म्हणे हा पूर्वील माझा बंधु कीं । म्हणूनि कळवळली भीमकी । तो निजमुखीं धरियेला ॥४१॥
भीमकीपमुख निष्कलंक । क्षयातीत पूर्णशशाङ्क । कृष्णप्राप्तीसी मयंक । भीमकीमुखीं संचरला ॥४२॥
चंद्रपूर्ण पूर्णिमा एकी । येर्‍हवीं क्षयवृद्धि त्या इहलोकीं । तो सदा संपूर्ण भीमकीमुखीं । निजात्मसुखीं परिपूर्ण ॥४३॥
चंद्रमंडलामागें पुढें । जैसे तारागणाचे वेढे । जैसीं मोतीलग तानवडें । दोहींकडे झळकती ॥४४॥
कृष्णवेधें वेधली खरी । म्हणोनि विसरली ते भंवरी । भवरीया कृष्णमायेच्या करीं । ये अवसरीं तें नाहीं ॥२४५॥
भीमकी थोरकपाळाची । कृष्णदैवें ते दैवाची । निडळीं कृष्णप्रभा श्यामतेची । तोचि कस्तूरी मळवट ॥४६॥
चंद्रबिंबीं श्यामरेखा । तैसा कस्तूरीमळवट देखा । भोंवया रेखिल्या कृष्णरेखा । अतिसुरेखा व्यंकटा ॥४७॥
कृष्ण पहावया जगजेठी । भोंवई सांडिली व्यंकटी । कृष्णीं मिनलिया दृष्टि । सहज गांठी सुटेल ॥४८॥
कृष्णरंगें जें सुरंग । अहेवपण तेणें अभंग । तेंचि कुंकुम पैं चांग । मुखचंद्रीं चंद्रमा ॥४९॥
नभीं इंद्रधनुष्यरेखा । तैसी भांगीं सिंदूररेखा । भुलवावया यदुनायका । मोहिनीमुखा पूजियेलें ॥२५०॥
ना ते सरस्वतीबोधीं । आली कृष्णभेटीलगीं । जीव शिव हासळिया दोहीं भागीं । मुक्तलगीं तटस्था ॥५१॥
जैसीं नक्षत्रें नभोमंडळीं । तैसी मुक्तमोतियांची जाळी । लेयिली असे भीमकबळी । तेणें वेह्लाळी शोभतसे ॥५२॥
त्याहीवरी भक्तिपरा । झळकत नवरत्नांचा खरा । खुणावीतसे सुरनरा । भजा यदुवीरा निजभावें ॥५३॥
दृश्य देखतां शिणले नयन । धणीचें घ्यावया कृष्णदर्शन । एकत्र होऊनि देखणेपण । भीमकीलोचनासि पैं आलें ॥५४॥
पहावया घनसांवळा । कृष्णश्यामता आली बुबुळा । आसाविली दोहीं डोळां । सबाह्यपणें देखणें ॥२५५॥
कृष्ण देखावया निधान । नयनीं सूदलें अंजन । सोगयाचें सलंबपण । कटाक्ष बाणपिसे ॥५६॥
भीमकीकटाक्षाच्या घायीं । मदन मूर्च्छित पाडिला ठायीं । सुरनरांचा पाड कायी । निधडा पाहीं श्रीकृष्ण ॥५७॥
मुख मुख्य शोभनिक । श्लेष्मागमनें शिणलें नासिक । भीमकीमुखा येऊनि देख । नाका पैं चढलें ॥५८॥
कृष्णसुवासआवडी । तेणें नाकासि लागली गोडी । दोन्ही नाकपुडिया बुडी । दिधली दडी वसंतें ॥५९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP