अध्याय ५२ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


भगवानपि गोविंद उपयेमे कुरूद्वह ।
वैदर्भीं भीष्मकसुतां श्चियो मात्रां स्वयंवरे ॥१६॥

शुक म्हणे गा कुरुकुलप्रभवा । कुरुधुरंदर शुभगौरवा । भगवद्विवाह ऐकें बरवा । श्रवणसुदैवा परीक्षिति ॥६॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । जो गोविंद श्रीभगवान । तोही भीमकीपाणिग्रहण । करी आपण कैवाडें ॥७॥
म्हणल भीमकी ते कवण । कैसें केलें पाणिग्रहण । येथ कैवाड कैसें कोण । संक्षेपकथन तें ऐका ॥८॥
विदर्भदेशींचा भीष्मक नृपति । भीमकी त्याची तनया सती । श्रीविद्या जी चित्कालशक्ति । वरी श्रीपति तें ऐका ॥९॥

प्रमथ्य तरसा राज्ञः शाल्वादींश्चैद्यपक्षगान् ।
पश्यतां सर्वलोकानां तार्क्ष्यपुत्रः सुधामिव ॥१७॥

शाल्वपौण्ड्रक जरासंध । प्रतापी योद्धे वीर प्रसिद्ध । यांच्या पक्षपातें चैद्य । करी संबंध विदर्भेंसीं ॥३१०॥
विदर्भकन्येचें स्वयंवर । सन्नद्ध इत्यादि भंवते भार । त्यांमाजि करूनि बलात्कार । हरी यदुवीर वैदर्भी ॥११॥
जैसा खगेंद्र तार्क्ष्यपुत्र । पाहत असतां लोक समग्र । सर्पापासूनि सुधापात्र । हरी श्रीधर तेंवि वधू ॥१२॥
बळिष्ठाचे बसवूनि दांत । मथूनि सचैद्य पक्षपात । वैदर्भी जिंकूनि जगन्नाथ । जाला गृहस्थ कुरुवर्या ॥१३॥
ऐसी ऐकोनि मुनीची वाणी । अतितर आस्था नृपाचे मनीं । सादर बैसवोनियां श्रवणीं । करी विनवणी ते ऐका ॥१४॥
दशमस्कंध वाखाणितां । प्रसंगें रुक्मिणीस्वयंवरकथा । उपायिली ते वर्णूं जातां । धिंवसा चित्ता नुंपलभे ॥३१५॥
म्हणाल येथ कोण विचारु । तरी श्रीएकनाथपरमेष्ठिगुरु । भानुकुळीं अपारभास्करु । अज्ञानतिमिरपरिहर्ता ॥१६॥
सकाळसद्गुणीं परिपूर्ण । प्रतिष्ठानीं अवतरून । कलिमलमग्ना ब्रह्मज्ञान । प्रबोधून उद्धर्ता ॥१७॥
आंगीं वैराग्य धडधडीत । अवलंबूनि भक्तिपंथ । जनार्दनस्वामी सद्गुरुनाथ । सेवूनि परमार्थ साधिला ॥१८॥
अभेदगुर्भजनाची मागी । प्रकट आचरोनि दाविली जगीं । गुरुदास्याच्या ऐश्वर्ययोगीं । समता आंगीं शोभविली ॥१९॥
अद्वैतबोधें एकात्मता । पूर्णपणें बाणली असतां । ते पहावया हरिहरधाता । अवधूतवेषें पातले ॥३२०॥
गूढलिंगी गूढवर्ण । अनाश्रमी उत्पथाचरण । म्लेच्छवाणी प्रभाषण । मानिती जन भय ज्यांचें ॥२१॥
ऐसिया वेषें श्राद्धदिवसीं । ब्राह्मणापूर्वीं छळावयासी । येऊनि याचिती अन्नासी । समता कैसी पहावया ॥२२॥
एकनाथीं अभंग समता । बाणली पूर्ण एकात्मता । हरिहरब्रह्मादिकीं छळितां । विकल्प चित्ता स्पर्शेना ॥२३॥
पात्रें मांडूनि सावकाश । सिद्धान्न अर्पण केलें त्यांस । प्राकृतदृष्टी श्राद्धघ्नदोष । लक्षूनि मानस न झळंबे ॥२४॥
सर्वोपचारीं तोषविले । अनन्यभावें प्रसन्न केले । ऐसिये समयीं ब्राह्मण आले । सुस्नात होऊनि सदनासी ॥३२५॥
तिहीं प्रसंग तो देखिला । म्हणती परमान्याय केला । पितृयज्ञ वृथा गेला । यजमान जाला श्राद्धघ्न ॥२६॥
याचिया आचरणें करून । भ्रष्ट होती कलिकालीन । पुरे यांचें अध्यात्मज्ञान । विष्णु स्मरोन चला वेगीं ॥२७॥
ऐकोनि ब्राह्मणांची वाणी । प्रार्थना करूनि लागला चरणीं । क्षणैक स्वस्थानीं बैसोनी । विनीत विनवणी परिसावी ॥२८॥
प्रमादें घडलें जें अनुचित । त्यासि अनुताप प्रायश्चित्त । अतिथिपूजनप्रकरणीं शक्त । जाणोनि अवधूत तोषविले ॥२९॥
ऐसे यजमान ब्राह्मण । करिती उभयतां भाषण । तव दिव्यरूपें तिघे जण । प्रकट होऊन बैसले ॥३३०॥
ब्रह्मा बहृच ऋगध्ययनीं । विष्णु बृहत्सामगायनीं । अयातयाम यजुषें पठनीं । रुद्राभिमानी प्रवर्तला ॥३१॥
देखोनि ब्राह्मणां पडिलें ठक । म्हणती अद्भुत हें कौतुक । एकनिष्ठा परम मूर्ख । प्राकृत लोक न मनिती ॥३२॥
ब्राह्मणीं नमिले ते अवधूत । तत्काळ जाले तिरोहित । वरदवचनीं एकनाथ । गौरवूनि कृपेनें ॥३३॥
मग सोडोनि ब्रह्मार्पण । संपादिला श्राद्धयज्ञ । करूनि ब्राह्मणसंतर्पण । अनुद्विग्न हृत्कमळीं ॥३४॥
देवत्रयीं कृपावंत । होऊनि शोधिलें ज्याचें वृत्त । पूर्णब्रह्म जें श्रीकृष्णनाथ । सप्रेमभरीं ज्या सेवी ॥३३५॥
यशोदानंदात्मज आवडी । धर्मालयीं उच्छीष्टें काढी । अर्जुनाची धुतलीं घोडीं । येथ कावडी जळ वाहे ॥३६॥
अत्रगंधादि धूपदीप । अर्पणीं सादर नित्य समीप । यावेगळे क्लेश अमूप । करितां अल्प श्रम न मनी ॥३७॥
ऐसा महिमा अगाध ज्याचा । तिहीं रुक्मिणीस्वयंवर वाचा । वाखाणिलें त्या ग्रंथाचा । विचित्र महिमा जग जाणे ॥३८॥
ज्या ग्रंथाचें निरूपणीं । श्रोता वक्ता चक्रपाणि । निमित्तमात्र महाराष्ट्रवाणी । जे अभीष्टदानीं कल्पलता ॥३९॥
भाविक साबडे सामान्य जन । नेणती निगमागमविधान । तिहीं भावें करितां पठन । होती पूर्णमनोरथ ॥३४०॥
पुत्रार्थियां होती पुत्र । लाहती दारार्थी कलत्र । शत्रुभयार्थ पठतां मित्र । शत्रुत्वत्यागें ते होती ॥४१॥
धनार्थियां धनसंप्राप्ति - । कारण उद्योग संपादती । रुग्णीं पढता रोगोपशांति । भयनिवृत्ति भयभीतां ॥४२॥
परमार्थबुद्धि निष्काम पठन । करितां लाहती अपरोक्षज्ञान । अमोघसिद्धीचें आयतन । त्यावरी व्याख्यान केंवि कीजे ॥४३॥
म्हणती व्यासोक्त प्रमाण । तरी येथ अभिमानी श्रीकृष्ण । इत्यादि सामर्थ्य प्रकटूनि पूर्ण । प्रत्यक्षप्रमाण रूढ करी ॥४४॥
श्रीमद्भागवत अठरासहस्र । त्यामाजि दशमस्कंध सार । त्यांतहि रुक्मिणीस्वयंवर । जेथ श्रीधर संनिहित ॥३४५॥
तया प्रभूनें एकनाथा । वदनीं प्रकटूनि वदविली कथा । यावरी श्रोकार्थ वाखाणितां । होय तो वृथा वाग्जल्प ॥४६॥
इत्यादिविचारें करून । रुक्मिणीहरणपाणिग्रहण । पुढती करावया व्याख्यान । मनाचें वदन मौनावे ॥४७॥
हें जाणोनि सर्वज्ञ संत । म्हणती कळला तुझा हेत । यावरी आमुचें अभिप्रेत । तो वृत्तान्त अवधारीं ॥४८॥
श्रीएकनाथान्वयरूपी । आणि सज्जनीं सत्स्वरूपीं । सर्वात्मकत्वें विश्वव्यापी । तव वाग्जल्पीं तो वदवी ॥४९॥
ग्रंथव्याख्यान खंडित नोहे । मर्यादेचा तंतु राहे । ऐसा एक विचार आहे । तो तूं पाहें विवरूनी ॥३५०॥
एकनाथकृत व्याख्यान । मूळश्लोकीं संयोजून । पाठान्तरें असंलग्न। तें तां संलग्न करावें ॥५१॥
ऐसी श्रीप्रभूची आज्ञा । मान्य सज्जनां श्रेष्ठा प्राज्ञा । सहसा न करूं अवज्ञा । पुढें वाग्यज्ञा चालविजे ॥५२॥
ऐसें अज्ञापिलें संतीं । मग ध्याना आणूनि प्रभूचि मूर्ति । प्रार्थनापूर्वक करितां विनति । कृपेनें संवित्ति प्रकाशिली ॥५३॥
मग उघडूनियां नयन । जनीं लक्षूनि जनार्दन । एकात्मता सर्व सज्जन । नमिले पूर्ण सद्भावें ॥५४॥
मूळकथेच्या निरूपणीं । रुक्मिणीहरण बादरायणि । वदला संक्षेपें करूनी । विस्तारप्रश्नीं नृप उदित ॥३५५॥

राजोवाच - भगवान्भीशःमकसुतां रुक्मिणीं रुचिराननाम् ।
राक्षसेन विधानेन उपमेय इति श्रुतम् ॥१८॥

राजा म्हणे गा शुक्राचार्या । षड्गुणसंपना वृष्णिधुर्या । कोण भूपति नेदी तनया । अविहितचर्या कां घडली ॥५६॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । केवळ भगवान तो श्रीकृष्ण । भीमकनृपाचें कन्यारत्न । लावण्यभुवन भीमकी ॥५७॥
अनंतकोटिकंदर्पकळा । पूर्णचंद्रीं जालिया गोळा । रुक्मिणीच्या वदनकमळा । तुकितां कांटाळा गौण गमे ॥५८॥
ऐसिये रुचिराननेप्रति । राक्षसविधानें श्रीपति । वरिता जाला हे तवोक्ति । ऐकोनि चित्तीं स्मय गमला ॥५९॥
राक्षसविधान म्हणसी कवण । युद्धीं बळिष्ठ नृप जिंकून । हठात्कारें कन्याहरण । करूनि लग्न जें कीजे ॥३६०॥
चैद्यपक्षग शाल्वादिक । समरीं मथूनि यदुनायक । रुक्मिणी हरिली ऐसा श्लोक । ऐकोनि साशंक मन जालें ॥६१॥
पूर्वीं ऐसेंचि विश्वतोमुखीं । पुराणवार्ता श्रुत लौकिकीं । विशेषतर वदनें या श्लोकीं । प्रश्नाभिलाखी मति जाली ॥६२॥
तरी हे कथा सविस्तर । सांगा होऊनि कृपापर । तुमच्या वदनचंद्रीं चकोर । ममान्तर सुधाश्रवणीं ॥६३॥
ऐसा नृपाचा प्रथम प्रश्न । येऊन प्रभूचें व्याख्यान । तेथें केलें मंगलाचरण । सकारण तें ऐका ॥६४॥
साद्यंत दशम न विवरितां । रुक्मिणीस्वयंवरमात्रकथा । श्रीप्रभूनें वाखाणितां । मंगलाचरिता हरि नमिला ॥३६५॥
गणेश शारदा कुलदैवत । जनार्दन जगन्मय सद्गुरुनाथ । अभेदएकात्मतेचा तंतु । श्रीएकनाथाथोक्त अवधारा ॥६६॥  
श्रीएकनाथोवाच ।
ॐ नमो जी श्रीकृष्णनाथा । गणेशसरस्वतीनामें धरिता । तूंचि तूं श्रीकुळदेवता । कवणा आतां प्रार्थूं मी ॥६७॥
तूंचि अखिल अवघे जन । सहज गुरु तूं जणार्दन । कृष्णकथेसि लाविसी मन । निजात्मगुण गावया ॥६८॥
ऐकोनि श्रीकृष्णगुणलावण्य । तेणें चित्तवृत्ति वेधली जाण । कर्माकर्मीं अखंडपण । लागलें ध्यान भीमकीसी ॥६९॥

भगवाञ्श्रोतुमिच्चामि कृष्णस्यामिततेजसः ।
यथा मागधशाल्वादीञ्जित्वा कन्यामुपाहरत् ॥१९॥
ब्रह्मन्कृष्णकथाः पुण्या माध्वीर्लोकमलापहाः ।
कोऽनु तृप्येत शृण्वानः श्रुतज्ञो नित्यनूतनाः ॥२०॥

भगवंता शुकाचार्या । आम्हीं इच्छितों परिसावया । श्रीकृष्णाची प्रतापचर्या । सांगोनि हृदया निववावें ॥३७०॥
मागधशाल्वादिकां दृप्तां । जिणोनि जैसी भीष्मकसुता । अमिततेजस्वी जाला हर्ता । सांगे कथा त्या हरिची ॥७१॥
शुकयोगींद्राप्रति । प्रश्न केला परीक्षिति । भीमकीहरण श्रीपति । कायनिमित्त पैं केलें ॥७२॥
कां करितोसि म्हणसी प्रश्न । तरी मी त्यक्तोदक जाण । वदनकथामृतश्रवण । तें जीवन मज तुझें ॥७३॥
विशेष हें कृष्णचरित्र । तुझेनि शुद्धमुखें पवित्र । श्रवण करितां माझें श्रोत्र । अधिकाधिक भुकेलें ॥७४॥
इतर कथा नव्हे फुडी । नित्य नूतन ईची गोडी । सेवूं जाणती आवडी । ते परापर थडी पावले ॥३७५॥
देखोनि प्रश्नाचा आदर । शुक कथेसि जाला सादर । कैसें बोलिला वचन गंभीर । कृपा अपार रायाची ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP