अध्याय ५० वा - श्लोक ५१ ते ५७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सुरद्रुमलतोद्यानविचित्रोपवनान्वितम् । हेमशृंगैर्दिवस्पृग्भिः स्फाटिकाट्टालगोपुरैः ॥५१॥

पुष्पवाटिका प्राकारबद्धा । स्वादूदकाच्या वापिका शुद्धा । विविधारत्नीं कनकनिबद्धा । कबंधें सुधा लाजविती ॥८७॥
अमरद्रुमांचिया हारी । कल्पलतावेष्टित वरी । पत्रीं पुष्पीं फळसंभारीं । रम्यवनश्री शोभविती ॥८८॥
मंदार पार्यातक संतान । कल्पतरु हरिचंदन । पनस निचूळ राजादन । आम्र रसाळ कदंब ॥८९॥
नीप न्यग्रोध करंज । निंबु लकुच तूत तुरंज । जंबु जंबेरी सुरेज । अंजीर अर्जुन उदुंबर ॥४९०॥
अशोकवनें कदलीवनें । अश्वत्थपारिभद्रधात्रीविपिनें । बकुळी पाटलेले चंपकवनें । क्रमुककाननें उच्चतरें ॥९१॥
विशाळ खर्चूरी नारिकेळी । ताल तमाल शाल्मली । बिल्व कपित्थ वर्तुळफळी । मधुक प्लक्ष तिंतिणिका ॥९२॥
रायावळीया आम्लवेतस । शाल्मली शेवें शेपें सुरस । दाडिमी द्राक्षी मंडपघोष । साकोटवृक्ष वनगर्भीं ॥९३॥
भोकरी बदामी करमळी । कारी करवंदी सिताफळी । रामफळाम्च्या सकळ वोळी । प्रियाळ कोळी नृपभोग्या ॥९४॥
जाई जुई मालती लतिका । कुंद मोगरे शतपत्रिका । सहस्रपत्री सेवंतिका । रम्य यूथिका श्वेत पीता ॥४९५॥
ऐसे अनेक तरुवरभार । नागलतिकांचें आगर । इक्षुवाडिया रत्न शुभ्र । कृष्णा विचित्र मृदु सुरसा ॥९६॥
रहाट मोटा पाटथळें । कूप कासार तटाकें अमळें । शुद्ध सरोवरा भरलें जळें । स्थळें निर्मळें ह्रद वापी ॥९७॥
सोज्वळ स्फटिकाच्या बंधनीं । रत्नें जडिलीं खणोखणीं । विचित्र वैडूर्यमणींच्या श्रेणी । गमती तरणी प्रकाशले ॥९८॥
तटाकें वापिका सोपानबद्धा । माजि कमळें विकाशलीं विविधा । रुंजतां रोलंब करिती शब्दा । मोदें आमोदा स्वीकरिती ॥९९॥
चंद्रविकासी तें कैरवें । सूर्यें प्रकाशती राजीवें । जातिविशेषें घेतां नांवें । गिरा मौनावे विस्तारीं ॥५००॥
रातोत्पळें श्वेतोत्पळें । सहस्रपत्रांची गजोत्पळें । इंद्रोत्पळें कुमुदोत्पळें । नीलोत्पळें भ्रमराभें ॥१॥
पीतप्रभाढ्यें कनकोत्पळें । चित्रविचित्रें रत्नोत्पळें । क्कचिन्मुकुलितें कुड्मळें । आमोदबहळें मघमघिती ॥२॥
भृंग द्विरेफ चंचरीक । मधुप शारंग षट्पदप्रमुख । विचित्ररंगीं जातिविशेख । अमर अनेक रुणझुणती ॥३॥
स्थळजळवासी पक्षिनिकर । शुकसारिका चास मयूर । गृध्र कपोतक तित्तिर । चातक श्येन ध्वांक्षादि ॥४॥
चिडिया चिमणिया पारावत । कोकिळा कलविंख बगळे श्वेत । अनेक यातींचे शकुंत । निवती निवांत वनोवनीं ॥५०५॥
शिंगळ गोळांगुळ वानर । याज्ञिक सुकृती निर्जरनिकर्र । द्वारकावनगर्भीं तरुवर । सेविती अपार सुखलाभें ॥६॥
कर्क नक्र शफर मकर । मीन मंडूर ताम्र मद्गुर । कच्छप जलसर्प दर्दुर । क्रीडती सादर जलगर्भीं ॥७॥
दानाढ्य सुकृती तरुवररूपी । निर्जर जलचर जाले आपीं । गंधर्व भ्रमर रमती पुष्पीं । याज्ञिक कपी फळभोक्ते ॥८॥
ऐसीं द्वारकापुरीचीं वनें । विचित्र वनजान्वित जीवनें । त्यांमाजि चैत्य वेदिका भुवनें । देवायतनें मठ मठिका ॥९॥
द्वारें देहळ्या रंगस्थळें । शिल्पकौशल्यें उडती जळें । प्रासादशिखरें ऊर्ध्व विशाळें । ध्वजीं दुकूळें रंगाढ्यें ॥५१०॥
उपनिषदर्थे पक्षिनिकरीं । संवादध्वनि विरावगजरीं । सामगायनें सप्तस्वरीं । कीजे भ्रमरीं मधुमत्तीं ॥११॥
ऐसीं द्वारकेमाजि वनें । सुकृती श्रवणें पाहती नयनें । जनपदांचीं विचित्र भुवनें । महेंद्रसदना लाजविती ॥१२॥
पाये भरिले गुरुत्मरत्नीं । त्यांवरी शक्रोपळमांडणी । वज्रमणींच्या कुंजरश्रेणी । ऐरावतासम गमती ॥१३॥
वल्ली तरुवर कमळहारी । मूळवेदिकांच्या प्राकारीं । मरकतरत्नीं कमठापरी । तोळंबियांच्या बैठका ॥१४॥
इंद्रनीळाचे स्तंभ सरळ । चतुःशाळा बद्ध विशाळ । कमलाकृती माणिक्य उपळ । स्तंभमौळीं उथाळीं ॥५१५॥
चिंतारत्नांचे तुळवट । गोमेदाचे पिधानपाट । कर्बूरकर्दमीं निघोटं । लखलखाट दिनरजनी ॥१६॥
मदलसांवरील ज्या वलभिका । चतुष्कोणा चंद्रशाळिका । चंद्रप्रभेसम स्फाटिका । गमती वापिका जळपूर्णा ॥१७॥
वलभियांवरी भित्तिप्रदेशीं । कुट्टिमें निर्मिलीं अंडजांसी । पक्षी क्रीडती स्वानंदेंसीं । हरिस्मरणेंसी कूजती ॥१८॥
माडियांवरिलिया भूमिका । त्या बोलिजती अट्टाळिका । सर्वत्र खणोखणीं स्फाटिका । दिव्य पताका कलशेंसी ॥१९॥
क्कचिन्मरकतमणींचे स्तंभ । क्कचित् हिरियांचे स्वयंभ । कोठें सूर्यरत्नीं सूर्याभ । क्कचित् अरुणाभ वैद्रुमी ॥५२०॥
पाचरत्नीं पाटांगणें । नीळरत्नीं पाकसदनें । चिंतारत्नीं देवतायतनें । मुक्तमंडप मुक्ताढ्ह्य ॥२१॥
गृहप्राकार अष्ट काष्ठा । मंडित यथावास्तु प्रतिष्ठा । ईशान्यकोणीं एकनिष्ठा । देवसदनें रत्नांचीं ॥२२॥
पूर्वप्रदेश्हीं पश्वादिशाळा । अग्निकोणीं पाकशाळा । याम्ये विस्तीर्ण शयनशाळा । निर्मी अवलीला विश्वकर्मा ॥२३॥
मळोत्सर्गादि नैरृत्यकोणीं । वसनशाळा कृत वारुणी । शस्त्रास्त्रशाळा वायव्यकोणीं । भांडारसदनीं कौवेरी ॥२४॥
राजसंग्रहवस्तुशाळा । त्याही परिसें कुरुभूपाळा । हेमललामघतिका अमळा । हर्म्य सुमौळा कलशाढ्य ॥५२५॥

राजतारकुटैः कोष्ठेर्हेमकुंभैरलंकृतैः । रत्नकूटैर्गृहैर्हैमैर्महामरकतस्थलैः ॥५२॥

राजातारकुटीकरून । कोष्ठशाळांचें अभिधान । पीतलोह जें सुवर्ण । आणि सामान्य रजतादि ॥२६॥
कुंभनामें स्वर्णकलश । शाळाशिखरीं स्वप्रकाश । पद्मरागादि रत्नविशेष । सदनशिखरीं शोभाढ्य ॥२७॥
महामरकत पाटांगणीं । रत्ननिबद्ध सर्वत्र धरणी । सदनीं आंगणीं प्रांगणीं । सभास्थानीं कौशल्यें ॥२८॥
लोहस्थानीं स्वर्णतार । अनर्घ्यरत्नें पाषाणमात्र । विश्वकर्म्याचें क्रियासूत्र । भूमि सर्वत्र पुरगर्भीं ॥२९॥
धेनुमहिषीगोधनशाळा । शकटशाकटीवृषभशाळा । स्यंदनार्ह तुरंगशाळा । रहंवरशाळा विचित्रा ॥५३०॥
अजाअविकेंमेषशाळा । भारवाहकक्रमेळशाळा । पवनजवीना अश्वशाळा । अतिविशाला हयपूर्णा ॥३१॥
पर्नशाळा मठिका मठ । धर्मशाळा पांथिकवाट । शास्त्राध्ययनशाळा श्रेष्ठ । निगमपाथपठनार्थ ॥३२॥
याज्ञिकांच्या यज्ञशाळा । चित्रविचित्र रंगशाळा । शस्त्रास्त्रांच्या संग्रहशाळा । भेषजशाळा रुग्णार्थ ॥३३॥
नटिनीनटकनाट्यशाळा । विचित्र वादकवाद्यशाळा । नर्तकनर्तकीनृत्यशाळा । गायनशाळा गांधर्वी ॥३४॥
यंत्रद्रव्याढ्या यंत्रशाळा । दुर्मददमनीं बंदिशाळा । मृगयोचिता समृद्धिशाळा । कुरंगव्याघ्रशुनकादि ॥५३५॥
शुकसारिकापंजरशाळा । लावकतित्तिरगोळांगुळा । मेषमहिषक्रीडनशाळा । कुंजरशाळा विस्तीर्णा ॥३६॥
राजधान्यांचे संग्रह सर्व । कोशार्थ सदनें दृढ अपूर्व । सौरभ्यशाळा परिमलद्रव्य । नृपोपभोग्य जे ठायीं ॥३७॥
क्षौद्र मैरेय पौष्पज मधु । वारुणी मदिरा आसवें विविध । सुगंततैलें मलयजगंध । जवादि केशर कस्तूरी ॥३८॥
वसनसंग्रहनेपथ्यभुवनें । हेमरत्नांचीं भाजनें । भांडागारें सभास्थानें । नियोगी लेखनें जे ठायीं ॥३९॥
राजतारकुटादिकोष्ठीं । मूळश्लोकार्थ पाहोनि दृष्टी । उपलविलें तें क्षमिजे श्रेष्ठीं । वृथा चावटी न मनोनी ॥५४०॥
बळीच्या द्वारीं वामनमूर्ति । वरदतंतूनें गुंतली होती । कुशमुरमथना भेदूनि क्षिति । आली वरुती त्रैविक्रमी ॥४१॥
कुश मर्दूनि कुशस्थळी । वसवूनि अद्यापि जे राहिली । युगानुयुगीं मोक्षशाळी । द्वारका जाली जीचेनि ॥४२॥
कुशमुरहंता त्रिविक्रम । धर्मस्थापक पुरुषोत्तम । भक्तजनांचा कल्याणकाम । साधुसत्तमसंगोप्ता ॥४३॥
उखामंडळीं सौराष्ट्रदेशीं । धिंगडमल्ल हे आख्या ज्यासी । रणछोडनामें गुर्जरवासी । म्हणती जयासि माधव तो ॥४४॥
एवं माधव पुरुषोत्तम । कल्याण रणछोड त्रिविक्रम । मूर्तिप्म्चक हें उत्तमोत्तम । विधिकृत धाम प्राचीन ॥५४५॥
हरिसंकल्प जलधिजीवनीं । कामलाकार उच्छ्रित धरणी । विश्वकर्म्यानें तिये स्थानीं । केली कांचनी द्वारका ॥४६॥
तिये द्वारके माझारी । त्रिविक्रमादि मूर्ति चारी । स्थापावया त्वष्टा करी । अतिसाजिरीं देवालयें ॥४७॥

वास्तोष्पतीनां च गृहैर्वलभीभिश्च निर्मितम् ।
चातुर्वर्न्यजनाकीर्णं यदुदेवगृहोल्लसत् ॥५३॥

मध्यभागीं भगवाद्भुवन । ईशान्यकोणीं शंकरसदन । अग्निकोणीं गजानन । विद्रुमायतनीं विराजित ॥४८॥
नैरृत्यकोणीं सहस्रकार । माणिक्यरात्नाचें मंदिर । सूर्यकांताचे प्रस्तर । पवळीं प्राकार शोभविती ॥४९॥
एकोना जी त्रैलोक्यजननी । यादवांची कुळस्वामिनी । जिनें होऊनि गगनवाणी । कंसा कांचणी लावियली ॥५५०॥
ते कुळदेवीचें भुवन । वायव्यकोणीं देदीप्यमान । विचित्ररत्नीं निर्मिलें जाण । वनें जीवनें सर्वत्र ॥५१॥
गौरी गणेश नंदी भृंगी । चंडीशादि यथाविभागीं । एवं सर्वत्र देवतालिंगी । पृथगायतनीं गणगणना ॥५२॥
वैष्णव शैव गाणपत्य । सौर सूर्यार्चक समस्त । आगमप्रणीत महाशाक्त । स्वस्वविभागीं विराजती ॥५३॥
सर्वीं सर्वत्र पुष्पाराम । चतुष्पथ वापी अमृतोपम । उपासकांचे नित्य नेम । पुराती काम जे ठायीं ॥५४॥
प्राकार गोपुरें मंडप शिखरें । वलभी विचित्र दामोदरें । जडित शृम्गें उच्चतरें । दीपमाळिकासम गमती ॥५५५॥
शिखरीं शृंगीं ध्वजपताका । सर्वत्र प्रासाद रंगभूमिका । अपूर्व रचना विधिहरप्रमुखां । पाहतां कौतुकास्पद होय ॥५६॥
वास्तोष्पतीचीं गृहें ऐसीं । रम्य निर्मिलीं ईशान्यदेशीं । चहूं वर्णादि जनपदासी । यथावकाशीं निरूपिलीं ॥५७॥
यादवांचीं राजसदनें । पुरटघटितें जडित रत्नें । पूर्वप्रदेशीं देदीप्यमानें । निर्जरसदनें लाजविती ॥५८॥
मुख्य उग्रसेनाचें भुवन । राजमंदिर शोभायमान । अनर्घ्यरत्नीं जडित गहन । शक्रसदनापडिपाडें ॥५९॥
देवकप्रमुख भूपानुज । त्यांचीं सदनें तेजःपुंज । विधाळविस्तीर्ण कलशध्वज । मंडित भूभुजपार्श्वस्थें ॥५६०॥
वसुदेव सानुज वृष्णिवर्ग । नृपसदनाचा उत्तर भाग । अधिष्ठूनि मंदिरें चांग । पद्मरागादि रत्नांचीं ॥६१॥
तत्प्राग्भागीं परम विशाळा । षोड्दशसहस्र सदनशाळा । जेथ वसती त्रैलोक्यपाळा । कलशमाळा नभोगर्भीं ॥६२॥
भगवत्परिवार भाव्य भावी । विधातृआज्ञेच्या गौरवीं । विश्वकर्मा कौतुकें दावी । जेथ आघवीं त्रिजगींचीं ॥६३॥
पट्टमाहिषीसदनें अष्ट । वेष्टित भवतीं सहस्त्रें द्व्यष्ट । अष्टविभूति जेथें स्पष्ट । करिती यथेष्ट परिचर्या ॥६४॥
वृंदावनें ध्वजाशिखरें । रत्नखचितें दामोदरें । सर्वीं सर्वत्र अंतःपुरें । दिव्य मंदिरें समसाम्यें ॥५६५॥
सभास्थानीं प्रतिमंदिरीं । भगवत्क्रीडेची सामग्री । सर्व समृद्धि निर्माण करी । ज्या श्रीहरिउपभोग्या ॥६६॥
मंचक शिविका रत्नयानें । अमूल्य सर्वत्र वित्रित्रासनें । दिव्य डोल्हारे रत्नभाजनें । अनर्ध्य वसनें सुरभोग्यें ॥६७॥
सदनोसदनीं स्थळोस्थळीं । पूर्ण वापिका विशुद्धजळीं । मणिमुक्तादि स्फटिकशिळीं । ससोपाना चतुष्पथा ॥६८॥
ऐसें श्रीकृष्ण वसतिस्थान । तैसेंचि दक्षिणभागीं गहन । परिवारेंसीं संकर्षण । वसावयार्थ निर्मिलें ॥६९॥
ऐसेचि वसुदेव तनय सर्व । वृष्णिभोजांधक माधव । कुकुर सात्वत सहदाशार्ह । अक्रूर उद्धव शतधन्वा ॥५७०॥
एवं सदनें छपन्नकोटी । विश्वकर्म्याची हातवटी । लावण्यशोभा त्रैलोक्यमुकुटीं । रचिली गोमटी द्वारावती ॥७१॥
ऐसें कृत्स्नाद्भुतनगर । करविता जाला जगदीश्वर । जेथींचा विशेष विस्तार । कथितां फणिवर मौनावे ॥७२॥
भगवत्संकल्पमात्रें करून । विश्वकर्म्यानें द्वारकाभुवन । जळधिजठरीं दुर्गम गहन । केलें निर्माण कौशल्यें ॥७३॥
पूर्वीं पट्टभिषेकीं सर्वां । आज्ञापिलें शक्रादिदेवां । तदनुसार ते स्ववैभवा । समर्पिती तें अवधारा ॥७४॥

सुधर्मा पारिजातं च महेंद्रः प्राहिणोद्धरेः ।
यत्र चावस्थितो मर्त्यो मर्त्यधर्मैर्न युज्यते ॥५४॥

जाणोनि भगवत्संकल्पसूचना । परमानंद संक्रंदना । तेणें इच्छूनि स्वकल्याणा । सुधर्मा सभा पाठविली ॥५७५॥
सुधर्मा ऐसें जियेसि नाम । जेथ बैसती अमरोत्तम । स्फुरद्रूप जेथ धर्म । न शिबे अधर्म कैं कोण्हा ॥७६॥
मनुष्यलोकींचे मानव । लाहतां सुधर्मसभेचा ठाव । मनुष्यधर्म सांडिती सर्व । बाणे वैभव अमरांचें ॥७७॥
मर्त्यधर्म पुसाल स्पष्ट । तरी शारीर धर्म जे पुष्टापुष्ट । क्षुधातृषादि प्राणनिष्ठ । तुष्टातुष्ट मनोधर्म ॥७८॥
हर्ष विषाद म्लानि ग्लानि । स्वप्न सुषुप्ति लाभ हानि । वयसा भेद जराजाचणी । जये स्थानीं न स्पर्शें ॥७९॥
सदा मानसें प्रफुल्लमानें । जैसीं सुधासंभवें सरोजवनें । यालागिं सुमनस या अभिधानें । देवां कारणें जन वदती ॥५८०॥
एवं षडूर्मिषड्विकार । मर्त्यधर्म जे दुःखप्रचुर । ते तैं न शिवती शरीर । सुधर्मागार प्रवेशतां ॥८१॥
ऐसी सभा सुधर्मानाम । पारियातक जो कल्पद्रुम । अर्षिता जाला अमरोत्तम । जाणोनि प्रेम कृष्णाचें ॥८२॥
तें आख्यान येईल पुढें । भौमासुराचे हननचाडे । सत्यभामेच्या वालभभिडे । नेईल गरुडें सह स्वर्गा ॥८३॥
येथ सूचिलें वक्ष्यमाण । पुढें प्रसंगें निरूपन । येईल तेव्हां होईल श्रवण । श्रोत्यांलागून जाणविलें ॥८४॥
सुधर्मा आणि पारिजात । इतुका सूचविला संकेत । एवं वैभव निर्जरनाथ । पाठवी समस्त हरिसदना ॥५८५॥
कृष्णस्मरणाचा उच्चार । ऐकोनि पळती यमकिंकर । स्मरणविमुखां भास्करकुमर । दंडी सादर हरिप्रेमें ॥८६॥
एवं दक्षिणदेशिचा नाथ । लोकत्रयीं घरटी देत । भगवद्द्वेष्टे अधर्मनिरत । दंडी संतत निजदंडें ॥८७॥
प्रतीचीपालक पाशपाणि । प्रणतभावें श्रीकृष्णचरणीं । निजैश्वर्यें द्वारकाभुवनीं । भजता जाला तें ऐका ॥८८॥

श्यामैककर्णान्वरुणो हयाञ्शुक्लान्मनोजवान् ।
अष्टौ निधिपतिः कोशांल्लोकपालो निजोदयान् ॥५५॥

व्योमगामी श्वेतवर्ण । श्याममात्र एककर्ण । उच्चैःश्रव्यासम जवीन । ते कृष्णार्पण हय केले ॥८९॥
अश्वरत्नांचें अर्पण । उद्देशार्थ कथिलें जाण । एवं अनेक रत्नें वरुण । करी अर्पण हरिप्रेमें ॥५९०॥
ऐसाचि कुबेर उदक्पति । आपुली ऐश्वर्यसंपत्ति । अर्पिता जाला कृष्णाप्रति । सप्रेमभक्तिपूर्वक पैं ॥९१॥
नील मुकुंद शंख पद्म । महापद्म मत्स्य कूर्म । सोदकादि अष्ट नाम । हेमललाम अष्टनिधि ॥९२॥
अश्श्टनिधि हे कोशस्थानीं । समर्पूनि श्रीकृष्णचरणीं । या वेगळ्या ऐश्वर्यश्रेणी । द्वारकाभुवनीं निक्षेपी ॥९३॥
मुख्य करूनि हे दिक्पाळ । विधिहरप्रभृति सुरवर सकळ । तिहीं पूजिलें हरिपदकमळ । तें प्रांजळ अवधारा ॥९४॥

यद्यद्भगवता दत्तमाधिषत्यं स्वसिद्धये । सर्वं प्रत्यर्पयामासुर्हरौ भूमिगते नृप ॥५६॥

कुरुनरपाळा कौरवपति । ऐशा निर्जरीं स्वसंपत्तिक । कृष्ण अवतरला असतां क्षिती । द्वारावतीमाजि भरिल्या ॥५९५॥
निर्जरां जें जें ज्यां आधिपत्यें । पूर्वीं दिधलीं श्रीभगवंतें । तें तें कल्याणस्वसिद्धीचें । स्वयें कृष्णातें अर्पिती ॥९६॥
कृष्ण प्रविष्ट द्वारकाभुवानीं । उपविष्ट सुधर्मासभासथानीं । तैं निर्जरीं ऐश्वर्यश्रेणी । अर्पूनि चरणीं नत जाले ॥९७॥
हें तों पुढेंच निरूपावें । परंतु कथिता द्वारकाविभवें । शुकें वर्णिलें जें स्वभावें । तें म्यां आघवें उपलविलें ॥९८॥
असो ऐसिया द्वारकानगरीं । बळभद्रेंसिं विवरूनि हरि । कैसी नेली मथुरापुरी । मुनिवैखरी ते ऐका ॥९९॥

तत्र योगप्रभावेन नीत्वा सर्वजनं हरिः । प्रजापालेन रामेण कृष्णः समनुमंत्रितः ॥५७॥

बळभद्रेंसीं एकातमंत्र । कैसा केला तो उद्देशमात्र । पूर्वींच कथिला यथासूत्र । तच्छेषचरित्र अवधारा ॥६००॥
बलभद्रातें म्हणे हरि । द्विपददुर्गम द्वारकापुरी । निर्मिलेल्ले तेथ मथुरानगरी । आजिचे रात्रीएं प्रवेशवीं ॥१॥
योगामायासत्ताबळ्लें । मथुराजनपद कुटुंबें सकळें । द्वारके नेतां कोण्हा न कळे । ऐसिये स्वलीले निरूपिलें ॥२॥
कालायवनासि नोहे विदित । ना मथुरावासियां स्वजना क्लृप्त । बळभद्रेंशीं  मंत्र सुगुप्त । केला एकांत श्रीकृष्णें ॥३॥
द्वारकेमाजि मथुराजन । न कळत संस्थापी नेऊन । तुवां रक्षिजे मथुराभुवन । यवनवंचन करीत मी ॥४॥
यवनासमरीं निरायुध । करितां पलायन प्रसिद्ध । मुचुकुंदक्षोभें त्याचा वध । गुह्यसंवाद हा कथिला ॥६०५॥
तदनुसार मथुरानगरीं । जनपद होते आपुल्या घरीं । योगप्रभावें प्रविष्ट करी । द्वारकेमाझारी विभवेंशीं ॥६॥
यादव नागर जनपद आघवें । द्वारके देखती सुखवैभवें । कृष्णचरित्र न होतां ठावें । म्हणती मात्रे वरपडलों ॥७॥
भवंता दुर्गम रत्नाकर । उत्तुंग दुर्गाचा प्राकार । स्थानें सदनें सुमनोपर । भूभासुर कनकाचीं ॥८॥
म्हणती अभिनव कैसें जालें । रामकृष्ण केउते गेले । यादव समग्र भय पावले । सवेग आले नृपसदना ॥९॥
वसुदेवादि वृष्णिप्रवर । देवक श्वफल्क उद्धवाक्रूर । उग्रसेनासि पुसती मंत्र । कांहीं विचार श्रुत सांगे ॥६१०॥
येरु म्हणे हा श्रीकृष्णमहिमा । तर्कावया असमर्थ ब्रह्मा । तो कें मनुजा अम्हां तुम्हां । इंद्रियग्रामा अवगमे ॥११॥
ऐसें म्हणोनि उताविळ । उग्रसेनेंसिं यदुमंडळ । घरटी देऊनियां तत्काळ । द्वारका सकळ विलोकिती ॥१२॥
हे ब्रह्म्याची सत्यवती । कीं इंद्राची अमरावती । कुबेराची अलकावती । कीं वरुणावती वरुणाची ॥१३॥
रत्नखचितें हेमभुवनें । आश्चर्य मानिती पाहतां नयनें । तंव देखिलीं देवायतनें । तेथ स्वमनें विगुंतलें ॥१४॥
मुनिजन तपस्वी थोर थोर । तेहीं कथिला गुह्य विचार । विश्वकर्म्यानें द्वारकापुर । रचिलें साचार कृष्णाज्ञा ॥६१५॥
तुम्ही नांदा येथ निर्भय । कळिकाळाचें न धरूनि भय । यवन मर्दूनि वसुदेवतनय । वरूनि विजय येतील ॥१६॥
ऐसें ऐकोनियां यादव । जयजयकार करिती सर्व । म्हणती कृष्णाचें लाघव । ब्रह्मादिदेव न तर्किती ॥१७॥
असो द्वारकेची हे मात । मथुरेमाजीं रोहिणीसुत । अल्पप्रजाजनपदेंसहित । दुर्गरक्षित राहिला ॥१८॥
ऐसें कवाड हेळामात्रें । करूनि कृष्णें त्रैलोक्यमित्रें । यवना लावण्य दावी नेत्रें । तें हें श्रोत्रें अवधारा ॥१९॥

निर्जगाम पुरद्वारात्पद्मामाली निरायुध ॥५७॥

पूर्वीं यवनाप्रति नारदें । कथिलें तैसेंचि श्रीमुकुंदें । निजरूप प्रकटिलें विनोदें । सर्व आयुधें सांडूनी ॥६२०॥
वदन लोपवी शशांककोटि । आकर्न नयन विशाळदृष्टि । पद्मफुल्लार माळा कंठीं । आजानुबाहु निरायुध ॥२१॥
मथुरापुरींच्या द्वारांतून । बाहीर निघाला देदीप्यमान । कालयवनाचें पुरलें मान । जाणोनि सर्वत्र संहरणा ॥२२॥
द्वारके नेले मथुरावासी । मथुरे स्थापूनि बळरामासी । बाहीर निघाला हृषीकेशी । इतुके कथेसि निरूपिलें ॥२३॥
पन्नासावा संपला येथ । पुढें कालयवनाचा घात । मुचुकुंदाचा दृगग्निपात । करील वृत्तांत तो ऐका ॥२४॥
श्रीएकनाथान्वयसंभव । गोविंदकृपांशुकपल्लव । पांघरूनियां दयार्णव । कथा अपूर्व निरूपील ॥६२५॥
तेथ सावध होऊनि श्रोतीं । श्रवणमात्रें अमृतवाप्ति । लाहिजे म्हणोनि किंकरावृत्ति । माझी विनति श्रीचरणीं ॥२६॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षितत्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां जरासंधसमरवर्णन कालयवनागमनं मथुरायाद्वारकाया निवेशन च नाम पंचाशत्तमोऽध्यायः ॥५०॥
श्रीकृष्णापर्णमस्तु ॥ श्लोक ॥५७॥ ओव्या ॥६२६॥ एवं संख्या ॥६८३॥ ( पन्नासावा अध्याय मिळून ओवीसंख्या २३४०५ )

अध्याय पन्नासावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP