अध्याय ५० वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एवं सप्तदशकृत्वस्तावत्यक्षौहिणीबलः । युयुधे मागधो राजा यदुभिः कृष्णपालितैः ॥४१॥

तंव येरीकडे जरासंध । पराभवाचा मानूनि खेद । यादवेंसीं दीर्घ विरोध । धरिला प्रसिद्ध प्रतापें ॥७९॥
पुन्हा प्रतापें वीरश्रेणी । महाबळिष्ठ पूर्विलाहूनी । सेना तेवीस अक्षौहिणी । केली धांवणी मथुरेवरी ॥३८०॥
हाहाकार मथुराप्रांतीं । गुरें वासुरें आक्रंदती । माता लेंकुरें नोळखती । महाविपत्ती पलायनें ॥८१॥
म्हणती भोग न सरे कैसा । शत्रु प्रतापी मागधा ऐसा । कृष्णें जैंहूनि मारिलें कंसा । तैंहूनि देशा भय आलें ॥८२॥
उभ्यां अन्न खाती लोक । परचक्रभयाची धुकधुक । म्हणती करावा कोण विवेक । महा अटक वोडवलें ॥८३॥
दुरी देखूनि मागधभार । जनपद करिती हाहाकार । पळाती लंघिती गिरिकंदर । मथुरापुर आश्रयिती ॥८४॥
हाक ऐकोनि यादव प्रबळ । वर वाळती उतावीळ । पदखळोनि मागधदळ । हलकालोळ करिताती ॥३८५॥
पहिल्यावरी राममुरारि । सज्ज होऊनि यादवभारीं । मागधदळाची बोवरी । करूनि समरीं जयवंत ॥८६॥
जरासंधासि जीवदान । देऊनि सोडिती निस्तेजून । म्हणती वाहसी पुरुषचिह्न । तरी दावीं वदन पुरुषार्थें ॥८७॥
या वचनाचें शल्य हृदयीं । बैसतां पेटे विषादखाई । तेणें अभिमानें लवलाहीं । पडे प्रवाहीं यत्नाच्या ॥८८॥
पुन्हा तेवीस अक्षौहिणी । प्रतापी प्रचंड वीरश्रेणी । घेऊनि मथुरेवरी धांवणी । करी क्षोभोनि विजयार्थ ॥८९॥
ऐसाचि प्रतिवस्तरीं मेळा । तेवीस अक्षौहिणी दळा । घेऊनि मागध सतरा वेळा । यदुकुलनिर्दळणा ॥३९०॥
कृष्णें पाळिले यादववीर । करितां तिहींसीं प्रतिसमर । होतां सैन्याचा संहार । पळे स्वगात्र घेऊनि ॥९१॥


अक्षिण्वंस्त्तद्बलं सर्वं वृष्णयः कृष्णतेजसाः ।
हतेषु स्वेप्यनीकेषु त्यक्तोऽयादरिभिर्नृपः ॥४२॥

कृष्णतेजें सतीजिष्ठ । वृष्णिवीर महाबळिष्ट । तिहीं मागधसेना दुष्ट । क्षया यथेष्ट पावविली ॥९२॥
भूमंडळींचे महावीर । महाप्रतापी ऐश्वर्यधर । त्यांतें आणूनि मागधेश्वर । करवी संहार हरिहस्तीं ॥९३॥
सोयरे धायरे परम आप्त । इष्टमित्र वीर श्रीमंत । ते ते आणूनियां समस्त । केले शांत मथुरेसी ॥९४॥
प्रतिसंग्रामीं सेनाभरणीं । मरती तेवीस अक्षौहिणी । ऐसेंचि सतरा समरांगणीं । केली धरणी निर्वीर ॥३९५॥
पुन्हा अठराविये वेळे । संग्रामार्थ मागधपलें । सज्ज संग्रहितां प्रबळ दळें । अपूर्व वर्तलें तें ऐका ॥९६॥

अष्टादशमसंग्राम आगामिनि तदंतरा ।
नारदप्रेषितो वीरो यवनः प्रत्यदृश्यत ॥४३॥

अठराविया संग्रामासी । मागध उद्युक्त अभिमानेंशी । सैन्यें मेळवी प्रयत्नेंसीं । रामकृष्णांसि जिणावया ॥९७॥
होणार अठरावा संग्राम । तव मधेंच कांहीं अपूर्व कर्म । यादवांवरी म्लेच्छाधम । मुनिसत्तमें पाठविला ॥९८॥
हे ऐकोनि श्रोतयांप्रति । श्रवणीं शंका उपजे चित्तीं । नारदें क ऐसें यवनाप्रति । यदुहननार्थीं क्षोभविलें ॥९९॥
ये शंकेचिया निरसना । पुरणान्तरींची घेऊनि सूचना । निरूपिजेल ते अन्यथा नमना । मम प्रार्थना हे इतुकी ॥४००॥
कोणे एके सुभवासरीं । नारद प्रवेशला यवनपुरीं । यदनें पूजिला सर्वोपचारीं । स्तवनोत्तरीं गौरविली ॥१॥
नारद देखोनि कालयवन । म्हणे हा कोणाचा नंदन । महाप्रतापी शौर्य गहन । दिसे तीक्ष्ण तेजस्वी ॥२॥
तयासि सांगे यवनराजा । म्हणे माझी हे क्षेत्रजप्रजा । गर्गप्रसादें लाधली वोजा । कनिष्ठ  भाजा काळी हे ॥३॥
ऐसें निरूपी राजा यवन । ऐकोनि नारद म्हणे धन्य । तंव कालयवनें धरूनि चरण । करी प्रार्थन नारदातें ॥४॥
म्हणे समरंगीं भीडे मजसीं । ऐसा वीर कवणे देशीं । विदित असे सर्वज्ञासी । तो मजपासीं सांगावा ॥४०५॥
ऐकोनि नारद हांसिला पोटीं । म्हणे तुज तुल्यवीर न दिसे सृष्टि । देवकीवसुदेवांच्या पोटीं । एक जगजेठी यदुवर्य ॥६॥
यादवांचें ऐकोनि नांव । कालयवना नावरे हांव । घृतावदानें वैश्वदेव । तेंवि स्वमेव प्रज्वळला ॥७॥
पुसे कृष्णाचीं इंगितें । चिह्नें कौशल्यें अभ्यस्तें । समराम्गणें अत्यद्भुतें । कैं कोणाशीं त्या घडलीं ॥८॥
धनुर्विद्या कीं मल्लविद्या । किंवा समर्थ द्वंद्वयुद्धा । धरी निर्वाणीं कोणा आयुधा । स्वरूप वदा मज त्याचें ॥९॥
ऐकोनि वदे नारदमुनि । मेघश्याम पीतवसनी । पद्ममाळा पद्मलोचनी । समरांगणीं निरायुध ॥४१०॥
मल्लयुद्ध करूं जाणे । द्वंद्वयुद्धाचीं लक्षणें । समरांगणीं पलायनें । करितां कोणें नावरिजे ॥११॥
मोकळा हातीं शस्त्रघातीं । ऐकोनि क्षोभे म्लेच्छ दुर्मति । नारदें पुसोनि यवनाप्रति । मानसगति निघाला ॥१२॥
येऊनि भेटला श्रीकृष्णासी । म्लेच्छोद्योग कथिला त्यासी । ऐकोनि कृष्णें निजमानसीं । महाविघ्नासि मानिलें ॥१३॥
येरीकडे राजा यवन । ऐकोनि नारदाचें वचन । पुत्रा देऊनि राज्यासन । प्रवेशे वन वैराग्यें ॥१४॥
त्यावरी कालयवन भूप । जिंकोनि प्रतापी वरिष्ठ नृप । यदुकुलदलनार्थ साटोप । खटाटोप सैन्याचा ॥४१५॥
सहितसेनाप्रधान । तीन कोटि म्लेच्छसैन्य । धरूनि प्रचंड आंगवण । मथुरा येऊनि रोधिली ॥१६॥

रुरोध मथुरामेत्य तिसृभिर्म्लेच्छकोटिभिः ।
नृलोके चाप्रतिद्वंद्वो यदून्मत्वाऽऽत्मसंमितान् ॥४४॥

मनुष्यलोकीं अप्रतिभट । आपणा मानूनि वीरभाट । यादव आपणा तुल्य बळिष्ठ । जाणोनि पापिष्ठ क्षोभला ॥१७॥
तीन कोटि म्लेच्छसैन्य । सवें घेऊनि कालयवन । येऊनि प्रतापें मथुराभुवन । रोधिता जाला चहूंकडूनी ॥१८॥
मथुरेभोंवते म्लेच्छनिकर । दुर्गलागी करिती क्रूर । अग्नियंत्रांचे महामार । बाणीं अपार वर्षती ॥१९॥
सिंहनाद आस्फोटनें । मलाम्लेच्छांचीं गर्जनें । मथुरेभोंवतीं वनोपवनें । करिती खंडनें दहनादि ॥४२०॥
हाहाकार करिती सर्व । प्रलयावर्त्तीं पशु मानव । म्हणती कां पां वासुदेव । म्लेच्छदानव न वधी हा ॥२१॥
म्लेच्छभयें त्रासले लोक । समरा न निघे यदुनायक । नगरीं नरनारींचा शोक । तैं स्मरजनक काय करी ॥२२॥

तं दृष्ट्वाऽचिंतयत्कृष्णः संकर्षणसहायवान् ।
अहो यदूनां वृजिनं प्रपतं ह्युभयतो महत् ॥४५॥

तें देखोनि म्लेच्छबल । आणि नगरींचा हळकालोळ । परनिरोधें लोक विकळ । देखोनि घननीळ मनीं चिंती ॥२३॥
संकर्षणसहायवंत । करिती उभयतां एकांत । म्हणती यादवां अकस्मात । विघ्न अद्भुत वोडवलें ॥२४॥
अहो ऐसिया खेदेंकरून । हृदयामाजि रसरसून । महासंकट दोहीं कडून । म्हणती विघ्न अनुल्लंघ्य ॥४२५॥
दोहींकडूनि संकट कैसें । कृष्णें विवरूनि स्वमानसें । अग्रजातें कथिलें जैसें । तें तूं परिसें परीक्षिति ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP