अध्याय ५० वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सुपर्र्णतालध्वजचिह्नितौ रथावलक्षयंत्यो हरिरामयोर्मृधे ।
स्त्रियः पुराट्टालकहर्म्यगोपुरं समाश्रिताः संमुमुहुः शुचाऽर्दिताः ॥२१॥

अतिअल्पतरसेनाभारीं । वेष्टित बलराम श्रीमुरारी । निघोनि मथुरापुरीबाहेरी । मागधासमरीं जैं गेले ॥२१५॥
मागें सशंक पुरजन सकळ । संग्राम पाहती उतावीळ । मागधें वेष्टितां कृष्ण सबळ । चिंता प्रबळ सर्वांसी ॥१६॥
मथुरापुरींचिया नागरा । कित्तेक चढल्या पुरगोपुरा । एकी वेंघूनि प्रासादशिखरा । सादर समरा विलोकिती ॥१७॥
एकी माडिया वलघल्या । एकी उच्चभिंती चढल्या । एकी देवालयें वेंघल्या । पाहों लागल्या हरिसमरीं ॥१८॥
सुपर्नतालध्वजचिन्हित । रामकृष्णांचे लोपतां रथ । तेणे तयासि मोहावर्त । शोके आकांत त्या करिती ॥१९॥
सेनेसगट कृष्णरामा । मागधें जिंकूनि संग्रामा । जीत धरिले किंवा वर्ष्मा । छेदूनि समरीं पाडिले ॥२२०॥
पदातिहयगजरथ सकेतु । एकही न दिसे सैन्या आंतु । यदुपुरींचा पुरला अंतु । करिती आकांतु पुरगर्भीं ॥२१॥
एक म्हणती लावण्यमूर्ति । एक स्मरती प्रतापशक्ति । एक म्हणती पुरल्या गणती । न चले अंतीं ऐश्वर्य ॥२२॥
हरिहरांची पुरल्या वेळा । प्रताप वरपडा होय काळा । विजयें वरिलें मागधा खळा । करील अवकळा मथुरेची ॥२३॥
नगरीमाजीं हाहाकार । म्हणती क्षोभला जगदीश्वर । ऐसें जाणोनि स्वजनांतर । प्रकटे श्रीधर तें ऐका ॥२४॥

हरिः परानीकपयोमुचां मुहुः शिलीमुखात्युल्बणवर्षपीडितम् ।
स्वसैन्यमालोक्य सुर्रासुरार्चितं व्यस्फूर्जयच्छार्ङ्गशरासनोत्तमम् ॥२२॥

कृष्ण पाहे जंव पर दळें । क्षोभलीं जैसीं मेघपटळें । वारंवार वृष्टि उमाळे । वर्षती तुंबळें शरधारीं ॥२२५॥
सेना जैसे सजळ घन । जलबिंदुवत् बहळ बाण । देखोनि शरवृष्टि उल्बण । व्याकुळ स्वसैन्य तद्योगें ॥२२६॥
लोकत्रयीं विजयवंत्त । स्वसैन्य सुरासुरपूजित । उद्धव अक्रूर रोहिणीसुत । अमर समस्त नररूपें ॥२७॥
परसेनेच्या तीक्ष्ण बाणीं । स्वसैन्य संकोचित देखोनि । शार्ङ्गकार्मुकोत्तम घेऊनि । टणत्कारिलें श्रीकृष्णें ॥२८॥
असुरनिर्जारीं समुद्रमथन्नीं । जें पूजिलें साधुवचनीं । कोदंडोत्तम शार्ङ्गपाणि । वाहूनि शिंजिनी स्फाळिलें ॥२९॥
ऐकोनि शार्ङ्गध्वनिगर्जना । सरसावली यादवसेना । प्रतापें मागधायूथगणा । पाचारिती परस्परें ॥२३०॥
अग्रभागीं संकर्षण । उद्धवें आवरिली दक्षिण । वामभागीं अक्रूर गहन । मारी सैन्य मागधाचें ॥३१॥
देवश्रवस देवभाग । वसुदेवाचा बंधुवर्ग । तिहीं रक्षूनि पार्ष्णिभाग । करिती भंग परसैन्या ॥३२॥
गद सारण दुर्मद विपुळ । ध्रुवप्रमुख रोहिणी बाळ । अग्निकोणींचें मागधदळ । मारिती तुंबळ प्रतापें ॥३३॥
सुभद्र भद्र भद्रवाह । पौरवीतनय वासुदेव । ईशान्यदिग्भागीं हे सर्व । दाविती लाघव शौर्याचें ॥३४॥
नंदउपनंद शूरक्रुतक । मदिराजठरींचे वसुदेवतोक । नैरृत्यकोणींचें मागध कटक । भंगिती अंतकसमसाम्य ॥२३५॥
भद्रेपोटीं केशिनी एक । वसुदेवाचा प्रियबाळक । महारथी जो वीरनायक । पावनीं सन्मुख रिपु भंगी ॥३६॥
हस्तहेमांगदप्रमुख सर्व । रोचनाजठरींचे वासुदेव । मुरुवल्कादिक इळाभव । समरपातवपटुतर जे ॥३७॥
देवकीच्या सख्या बहिणी । धृतदेवादि साहीजणी । त्यांचे पुत्र चौरंगणीं । विपुष्टादिक हरिनिकटीं ॥३८॥
ऐसे माधव महावीर । ऐकोनि शार्ङ्गटणत्कार । मागधसैन्या करिती मार । हर्षें श्रीधर शर सज्जी ॥३९॥

गृह्णान्निषंगादथ संदधच्छरान्विकृष्य मुंचन्शितबानपूगान् ।
निघ्नन्रथान्कुंजरवाजिपत्तीन्निरंतरं यद्वदलातचक्रम् ॥२३॥

यानंतरें देवकीतनय । निशीत बाणांचे समुच्चय । निषंगापासूनि घेऊनि लाहे । सज्जिता होय कार्मुकीं ॥२४०॥
आकर्ण ओढूनि शार्ङ्गचाप । एक संधानें बाण अमूप । कृष्णें सोडितां काळाग्निकल्प । सांडिती दर्प महारथी ॥४१॥
मनपवनादिकीं लाघवें । कौशल्य कृष्णापें शिकावें । त्या कृष्णाच्या संधानजवें । उपमा पावे कैं कोण ॥४२॥
लघुलाघवें चमत्कारें । अमूप बाण एकसरें । प्राक्प्रत्यग्दक्षणोत्तरें । अधोर्ध्व शरें व्यापिलें ॥४३॥
जेथूनि शार्ङ्ग बसविलें मुष्टी । तेथूनि निरंतर मार्गणवृष्टि । होतां सैन्या केली आटी । सुभतकोटी आटिले ॥४४॥
रथी सारथी तुरंगमा । बाणीं छेदूनि करशिरपद्मा । सवेग उसळूनि जाती व्योमा । वीरविक्रमा न धरिती ॥२४५॥
केतु कूबर चक्रें अक्ष । खंडूनि रहंवर लक्षेंलक्ष । पडती त्यांची गणना दक्ष । करितां मुख्य लक्षेना ॥४६॥
कुंजरसादि अंकुशधर । पार्ष्णिग्राहादि महावीर । तुटोनि पडती करपदशिर । पर्वताकार रणरंगीं ॥४७॥
रणपंडित राउतराणे । खंडती कृष्णाच्या मार्गणें । गगना उडोनि जाती वदनें । पावती पतनें उडुगणवत् ॥४८॥
पदातियांचीं तुटती मौळें । पडती भूतळीं कोथळे । श्रीकृष्णाच्या करचापल्यें । बळें परदळें निर्दळिलीं ॥४९॥
दशदिग्भागीं देऊनि भवरी । शरसंधाना करितां शौरी । कार्मुक अलातचक्रापरी । देखिजे वीरीं सभंवतें ॥२५०॥
अलात म्हणिजे जळतभितें । जिवें भवंडितां सभोंवतें । कंकणाकार अभंग आइतें । दिसे ध्वांतें तेजस्वी ॥५१॥
तैसेंचि शार्ङ्ग निरंतर । दशदिग्भागीं कमलावर । शरीं वर्षतां फिरती कर । अलातचक्रसम म्हणती ॥५२॥
कोलती फिरवितां गरगर । भासे अखंड चक्राकार । तेंवि शार्ङ्गीं सज्जूनि शर । सोडी यदुवीर सर्वत्र ॥५३॥
श्रीकृष्णाच्या बाणघातीं । सैन्यें पडलीं सभोंवतीं । तें संक्षेपें रायाप्रती । वर्णी भारती शुकाची ॥५४॥

निर्भिन्नकुंभाः करिणो निपेतुरनेकशोऽश्वाः शरवृक्णकंधराः ।
रथा हताश्वध्वजसूतनायकाः पदातयश्र्छिन्नभुजोरुकंधराः ॥२४॥

बाणीं भेदूनि कुंभस्थळें । रणीं पाडिलीं कुंजरदळें । तोडिलीं अश्वांचीं शिसाळें । वीरकोथळे शिररहित ॥२५५॥
रथी पडिले रणरंगणीं । सारथि भेदले निर्वाणबाणीं । अश्वमुंडे खंडूनि धरणीं । ध्वज भंगूनि रथ पडिले ॥५६॥
जीवट पदातियांचा भार । निकर्कें करिती शस्त्रमार । प्रास पट्टिश परिघ तोमर । शक्ति मुद्गर प्रेरिती ॥५७॥
भिंडिपाळाचे फुटती तडक । शूळसाधनें दाविती एक । खङ्गखेटकधर अनेक । यंत्रीं पावक योजिती ॥५८॥
कृष्णमार्गणीं ख्याति केली । पदातिमौळें छेदूनि नेलीं । कबंधें नाचती भूमंडळीं । शस्त्रें करतळीं परजूनी ॥५९॥
आपुलें पारकें ऐसें न कळे । कबंधें भिडती आवेशबळें । तुटती एकाचीं करतळें । छिन्न कोथळे जठरांचे ॥२६०॥
तुटोनि पदल्या जानु जंघा । बाणीं खंडिलें सर्वांगा । सरों न शकती पुढां मागां । पावलीं भंगा पायदळें ॥६१॥
शार्ङ्गजामुक्तमार्गणीं । कृष्णहस्तीं सुटतां रणीं । रणा आणिल्या वीरश्रेणी । रक्तें धरणी बंबाळ ॥६२॥
पडलीं हयगजवीरप्रेतें । नद्या तुंबळल्याअ त्यांचेनि रक्तें । त्या संक्षेपें परीक्षितीतें । कथिल्या मुनिसुतें तें ऐका ॥६३॥

संच्छिद्यमानद्विपदेभवाजिनामंगप्रसूताः शतशोऽसृगापगाः ।
भुजाऽहयः पूरुषशीर्षकच्छपा हतद्विपद्वीपहयग्रहाकुलाः ॥२५॥

ठायीं ठायीं नारगततुरग । पश्वादिप्रेतें पडलीं अनेग । तत्क्षतसंभवरुधिरओघ । भीकर सुरंग रक्तनद्या ॥६४॥
शतानुशत वाहती रणीं । रक्तनद्यांचीं रूपकभरणीं । समूळ नरभुज जैसे फणी । रक्तजीवनी वाहताती ॥२६५॥
पुरुषमौळें कच्छप गमती । कुंजरप्रेतें द्वीपाकृति । अश्वकलेवरें ग्राह भासती । मकरनक्रासमसाम्य ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP