शशंस रामकृष्णाभ्यां धृतराष्ट्रविचेष्टितम् । पांडवान्प्रति कौरव्य यदर्थं प्रेषितः स्वयम् ॥३१॥

कौरव्य ऐसें संबोधन । परीक्षितीस व्यासनंदन । देऊनि म्हणे सावधान । अक्रूरकथन अवधारीं ॥३८॥
रामकृष्णांहीं ज्या कार्यार्थ । हस्तिनापुरा श्वफल्कसुत । प्रेरिला होता तो वृत्तांत । करी विदित साकल्यें ॥३९॥
पांडवांतें प्रतीतरूपें । वर्तत असतां कौरवभूपें । तुमचे आज्ञेच्या संक्षेपें । बोधितां विकल्पें न मनी तो ॥४४०॥
हस्तिनापुरप्रवेशन । कौरवांचें अभ्युत्थान । विदुरपृथेचें गुह्यकथन् । आणि सद्गुण पार्थाचे ॥४१॥
धृतराष्ट्राचें विषमांतर । कौरवांचा कपटाचार । शकुनिकर्णकृतविचार । सविस्तर निवेदिला ॥४२॥
धृतराष्ट्रानें टाकिली साटी । दिधली तेही कथूनि गोठी । रामकृष्णांतें नमूनि मुकुटीं । मौन वाक्पुटीं स्वीकेलें ॥४३॥
हें ऐकोनि प्रधानपुरुष । रामकृष्ण जे नरवरवेष । परस्परें करूनि हास्य । हस्तास मिलविले ॥४४॥
येथूनि अवतारकार्यारंभ । तो हा उदेला कलहकोंभ । आंगीं प्रकटूनि वीरश्रीक्षोभ । स्मश्रु स्वयंभ स्पर्शिलें ॥४४५॥
यावरी बलराममुरारि । तुळिती आयोधनसामग्री । समरीं होती शस्त्रधारी । ते कथा पुढारीं उत्तरार्धीं ॥४६॥
अस्ति प्रपति कंसांगना । जाऊनि स्वतातमागधसदना । विदित करूनि कंसनिधना । वैरभावना वर्धविती ॥४७॥
ते सविस्तर कथा पुढें । श्रोतीं परिसिजे निवाडें । श्रीकृष्णाचे बालक्रीडे । कथूनि पूर्वार्ध संपविलें ॥४८॥
सद्गुर्वाज्ञा अतिसमर्थ । परम कृपाळु एकनाथ । स्म्तीं कथिला परमार्थ स्वार्थ । सफळ येथ तो झाला ॥४९॥
शरीराची शमली व्यथा । ग्रंथव्याख्यानीं वक्तृत्वपथा । शमलशमनीं हरिगुणत्रिपथा । धरिली माथां शिवश्रोतीं ॥४५०॥
श्रीधरस्वामींच्या पदप्रकाशें । सद्गुरुसंताज्ञासौरसें । प्रवर्तलों जे महाराष्ट्रभाषे । ते टीका विशेष हरिवरदा ॥५१॥
अंतेवासी उत्तमश्लोक । झाला पूर्वार्धीं लेखक । वदलें दयार्नवाचें मुख । बुद्धिप्रेरक हरिगुरु तो ॥५२॥
पुढें उत्तरार्धाची टीका । जरी करवणें श्रीनायका । स्वसामर्थ्यें करील देखा । किमर्थ शंका मज येथें ॥५३॥
परंतु जरेनें शरीर क्षीण । देशकालादि विपरीत चिह्न । स्म्तीं करविलें व्याख्यान । तेही निर्वाण पावले ॥५४॥
प्राचीन सज्जन जिवलग सखे । ब्रह्मसायुज्यीं भजले तितुके । त्यांच्या वियोगें वाटे फिकें । जिणें वर्तणें भूभार ॥४५५॥
त्यांच्या स्मरतां गोठी राहटी । विरहावस्था उथळे पोटीं । सगुणसुखाची पडली तुटी । भासे सृष्टि अविराम ॥५६॥
असो यावरी सज्जनमूर्ति । अवतरोनि जे तारिती क्षिती । त्यांचे पदींची वंदूनि माती । सुखविश्रांति भावितसे ॥५७॥
कळिकाळाचा चढतां भर । कांताकनकीं यति सादर । गुरुद्रोही शिष्य विप्र । रंडाजारपरायणा ॥५८॥
वामी कामी कौळाचरणी । जारनमारणप्रयोगकरणी । साबरचेटकादि निर्घृणी । संतसज्जनीं मिरवती ॥५९॥
देखोनि क्षुद्र चमत्कार । कळिकाळींचे दुर्मति नर । त्यांचे ठायीं भक्तितत्पर । शिष्य सादर होत्साते ॥४६०॥
ऐसियांपासोनि तरणोपाय । मोक्षमार्गींची केउती सोय । स्वमति न मिळे त्यां अपाय । करितां अन्याय न मनिती ॥६१॥
असो ऐसिया कळिकाळांत । दहा सहस्र अब्दपर्यंत । कुढावीन निज सात्वत । हें श्रीकांत बिरुद असे ॥६२॥
हाचि भरवसा सद्भाविकां । सत्वसंपन्नां मुमुक्षुलोकां । भक्तनिमित्त श्रीनायका । कलिमलपंका निस्तरणें ॥६३॥
तया हरिगुरूचे अवतार । संत होती जगदाधार । शमदमादि साधनपर । सदाचार निष्काम ॥६४॥
त्रितापरहित सुशीतळ । शरनशरण्य दीनदयाळ । क्लेश साहूनि क्षमाशीण । प्रबोधकुशळ सत्पुरुष ॥४६५॥
त्यांच्या पदरजांची आशा । करूनि लक्षीं दाही दिशा । कोठें सज्जनसगुणवेषा । धरूनि क्लेशा निरसील ॥६६॥
सद्गुरूनें मज सज्जनां । निरविलें ते कैवल्यसदना । गेले यास्तव पदव्याख्याना । हांव न बणे परार्धीं ॥६७॥
यास्तव येथ अळंकार । करावयाचा हा परिहार । उत्तरार्धहि कमलावर । करविता सादर ना न म्हणो ॥६८॥
श्रीएकनाथसाम्राज्यपीठीं । प्रतिष्ठानीं गोदातटीं । चिदानंदाचिये संतुष्टी । स्वानंदपुष्टि त्रिजगा दे ॥६९॥
गोविंदकृपागंगाबोध । हरिगुरुपादोदक अमोघ । निरसी त्रिगुणत्रितापदाघ । क्षाळूनि अघ त्रिजगाचें ॥४७०॥
तो कृपेचा प्रवाह सर्व । लोटूनि भरला दयार्णव । श्रवणें मननें सुस्नात विश्व । पर्व अपूर्व मोक्षद हें ॥७१॥
इये पर्वीं सुस्नात मननें । जिह्नें स्पर्शिती पठनाचमनें । प्राशन करिती सदुक्तश्रवणें । ते निर्वाणें आथिले ॥७२॥
विद्यातपादि सत्ययोनि । व्यापक विष्णु जो अयोनी । तो हा यजिला गिरायज्ञीं । झाला तुष्टोनि श्रीवरद ॥७३॥
हरिगुरुवरदप्रसादसिद्धि । ही प्रार्थना सकामबुद्धी । ग्रंथश्रवणीं दुष्टोपाधि । कोण्हा कधीं न स्फुरतु ॥७४॥
बद्ध मुमुक्षु आणि मुक्त । त्रिविध जनांचा संघात । श्रवणीं बैसतां शुद्धचित्त । अधिकारवंत ते व्हावे ॥४७५॥
हेतुवाद सांडूनियां । सद्भाव उपजो पाखंडियां । श्रवणाधिकार कुतर्कियां । प्रत्यक्ष बाणोनि हो लाभ ॥७६॥
कर्मठांची सकाम बुद्धि । तुटोनि बाणे चित्तशुद्धि । अपरोक्षबोधाच्या संवादीं । अधिकारसिद्धि लाहो कां ॥७७॥
अनन्यप्रेमा सद्गुरुचरणीं । सर्वां उपजो अंतःकरणीं । निंदा द्वेष कोण्हा मनीं । श्रवणमात्रीं न रुचावा ॥७८॥
मोडो खळाची वक्रता । निष्काम सत्कर्मीं हो आस्था । सर्वभूतीं एकात्मता । प्रेम वाढो परस्परें ॥७९॥
कडसणीची अहाच मात । सन्मात्रैक शुद्ध शाश्वत । विश्वाभास तद्विवर्त । मुख्य परमार्थ हा विवळो ॥४८०॥
सच्छब्दें जें सन्मात्र वस्त । तन्मय होऊनि वर्तती स्वस्थ । तयां सज्जनांसि सांघात । होऊनि स्वहित्त सर्वां हो ॥८१॥
दीनानुकंपी समर्थ संत । शुकासारखे अकस्मात । वरदें करोत अधिकारवंत । पढतां ग्रंथ सद्भावें ॥८२॥
ऐसें ऐकोनि प्रार्थन । सद्गुरु मूर्तिमय सज्जन । म्हणती दत्तात्रेयदर्शन । लाहती श्रवणाधिकारी ॥८३॥
अभीष्टकाम सर्व पुरती । ग्रंथश्रवणीं होतां रति । करूनि कलिमलाची शांति । गोप्ता श्रीपति सर्वदा ॥८४॥
ऐसें लाहतां वरदोत्तर । संतीं केला जयजयकार । तथास्तुशब्दाचा निज गजर । श्रोते सुरवर गर्जती ॥४८५॥
गोदावरी दक्षिणतीरीं । पिपीलिनामकक्षेत्रीं । प्रतिष्ठानापासूनि दुरी । ऐंद्राग्निमध्यग त्रिक्रोशीं ॥८६॥
त्रितीय शक शालिवाहन । गताब्द षोडशशत छप्पन्न । आनंदवत्स्रर वद्यश्रावण । जन्माष्टमी रविवार ॥८७॥
रोहिणीनक्षत्र कौलव करण । व्याघातयोग चतुर्थ चरण । प्रथमप्रहरीं ग्रंथलेखन । झालें संपूर्ण पूर्वार्ध ॥८८॥
नाहीं क्षणाचा भरंवसा । ग्रंथ समाप्ति पावेल कैसा । म्हणोनि पूर्वार्धींच ऐसा । अळंकार निरूपिला ॥८९॥
ग्रंथ नव्हे हा कल्पतरु । चिंतारत्नांचा सागरु । भावें इच्छी जे जो नरु । त्यातें श्रीधर पुरवील ॥४९०॥
पूर्णकाम परब्रर्म । पूर्णगुर्वाज्ञेचा नियम । पूर्णभूतीं भगवत्प्रेम । पुरुषोत्तम संतुष्ट ॥४९१॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां कुंतीसांत्वनधृतराष्ट्रबोधनाक्रूरमथुराभिगमनं नामैकोनपंचाशत्तमोऽध्यायः ॥४९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्या ॥४९१॥ श्लोक ॥३१॥ एवं संख्या ॥५२२॥ ( एकोणपन्नासावा अध्याय मिळून ओवी संख्या २२७७९ )

इति पूर्वार्धः समाप्तः ।

एकोणपन्नासावा अध्याय समाप्त ।

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP