कः पंडितस्त्वदपरं शरणं समीयाद्भक्तप्रियादृतगिरः सुहृदः कृतज्ञात् ।
सर्वान्ददाति सुहृदो भजतोऽभिकामानात्मानमप्युपचयापचयौ न यस्य ॥२६॥

कोण पंडित पैं शहाणा । तुजहूनि शरण जाईल आना । येथ न्यूनता कोण्या गुणा । प्राकृतां हीनां भजेल ॥२२॥
सत्यसंकल्प तूं ईश्वर । तुझी गिरा सत्य साचार । येर ब्रह्मादि प्रपंचपर । प्रपंच समग्र लटिका कीं ॥२३॥
तूं सर्वस्वें भक्ताधीन । भक्तप्रियतम तव अभिधान । येरां प्राकृतां पदाभिधान । तनुसम्मानालागिं मरती ॥२४॥
सुहृद म्हणिजे सुष्ठुहृदय । तो तुजहूनि कोण सदय । अभेद आत्मा आत्मप्रिय । येर निर्दय गुणक्षुब्ध ॥३२५॥
ब्रह्मा सृजन मात्र करी । केंवि वांचती हें न विचारी । सदयहृदया तव अंतरीं । कारुण्यलहरी त्रिजगाची ॥२६॥
इष्टानिष्ट न मनूनि कांहीं । जीवनदानें सर्वदेहीं । कृपेनें पाळिसी सर्वदाही । न करूनि कांहीं समविषम ॥२७॥
रुद्र तवांश परि निष्ठुर । करितां जीवांचा संहार । हृदयीं न द्रवेचि अणुमात्र । आपपर न विचारी ॥२८॥
येर सुरवर सामान्य कोटी । किमर्थ त्यांची करणें गोठी । भक्तवत्सल तूं जगजेठी । सदय पोटीं सुहृदत्वें ॥२९॥
कृतज्ञ म्हणिजे जाणसी केलें । भविष्य वर्तमान होऊनि गेलें । त्रिकाळींचेंही ज्ञान पहिलें । तुज संचलें सर्वगता ॥३३०॥
ध्रुव जाणोनि निर्विकार । अढळपदीं त्वां केला स्थिर । रुद्रें नेणोनि दिधला वर । तैं भस्मासुर त्वां वधिला ॥३१॥
ब्रह्मा जन्मला तुझे जठरीं । अज्ञ म्हणोनि ओळखी न धरी । वत्साहरणीं त्वां श्रीहरि । येही अवतारीं बोधिला ॥३२॥
विषयविरागें सद्भाविक । वसती निरंजनीं निष्टंक । कायिक वाचिक मानसिक । तव तोषक परिचर्या ॥३३॥
विषयत्यागें तनुकाचरी । गुप्त वसती गिरिकंदरीं । प्रकट कोणी नेणती जरी । तूं त्यां अंतरीं कृतज्ञ ॥३४॥
त्याचे मनोरथ ते किती । ते पुरवूनि मनोरथार्ति । करिसी अखिलकामनापूर्ति । देसी अंतीं आपणातें ॥३३५॥
सुहृद जे कां स्वपादभजक । विषयविरागें अंतर्मुख । त्यांतें अभीष्ट काम सम्यक । देऊनि सेवक तूं होसी ॥३६॥
म्हणसी सुरवरांची ही सेवा । करितां अर्पिती निजगौरवा । परी तें नश्वर न थरे देवा । स्वप्नवैभवा सम हरपे ॥३७॥
तुवां अढळ केला ध्रुव । तो काळाचा न धरी भेव । प्रह्राद दैत्यान्वयसंभव । लाधला गौरव तव भजनें ॥३८॥
स्थलजळदहनीं पवनीं । भूतीं भौतिकीं सगुणीं अगुणीं । प्रह्राद पाहे तुजला नयनीं । तूं त्यालागूनि न विसंवसी ॥३९॥
बत्तीस युगें सार्वभौम । राज्य करितां विरक्त परम । त्याचें अभीष्ट सर्वकाम । तूं निःसीम पुरविता ॥३४०॥
प्रह्रादाचा पौत्र बळि । सुरकार्यार्थ याञ्चाछळीं । बांधोनि घातला पाताळीं । तूं त्याजवळी द्वास्थत्वें ॥४१॥
शक्रपदाचें अवंतणें । अक्षय दिधलें त्या कारणें । म्हणाल शक्रत्व कवण्या गुणें । अक्षत तें म्हणणें ऐका ॥४२॥
ध्रुव प्रह्राद बळि प्रमुत्व । इत्यादि भक्तां अक्षय सुख । ऐसें म्हणाल तरी सम्यक । ऐका नवेक अवधानें ॥४३॥
स्वभावें ब्रह्मांड पावे लय । पलयीं स्वभक्तगणनिर्भय । ते पावती कैवल्यनिलय । आत्मप्रत्ययसुखलाभें ॥४४॥
आत्मानमपि या वाक्यार्थबोधें । आपणा म्हणिजे कैवल्य नुसधें । अंतीं तें ही देसी मोदें । ऐशीं बिरुदें श्रुति गाती ॥३४५॥
यालागीं तुझिया कृपावरदा । उपचयापचय नाहीं कदा । र्‍हासावृद्धि इत्यादिशब्दा । पर्यायार्थीं जाणिजे ॥४६॥
ऐसा समर्थ सुखसंपन्न । तुजहूनि प्राकृत आश्रयी गौण । तैं पंडितपणा धिक्कार पूर्ण । पंडितलेखा न चतुरत्वा ॥४७॥
अमृतसांडुनि मृगजळपाना । धांवे त्याचिया शहाणपणा । तुजहूनि प्राकृता भजे गौणा । त्याचिया तुलना कल्पावी ॥४८॥
असो मूर्खाच्या किमर्थ गोठी । मजवरी करूनि कृपांबुवृष्टि । स्वामी आलासी माझिये भेटी । ते संतुष्टि अवधारीं ॥४९॥

दिष्ट्या जनार्दन भवानिह नः प्रतीतो योगेश्वरैरपि दुरापगतिः सुरेशैः ।
छिंध्याशु नः सुतकलत्रधनाप्तगेहदेहादिमोहरशनां भवदीयमायाम् ॥२७॥

आम्ही अविवेकी संसारग्रस्त । आमुचा कळवळा हृदया आंत । स्वयें होऊनि कृपावंत । आलासि येथ सदनासी ॥३५०॥
ज्या तव नामामृतरसपाना । लेशमात्रही लाहो रसना । म्हणोनि तापस भरले राना । करिती साधना त्वन्निष्ठ ॥५१॥
शिवादि विरक्त स्मशानमठीं । एकनिष्ठ योगी हठी । तयांसि ध्यानीं दुर्लभ भेटी । मां अपरोक्ष दृष्टि कैं लाहती ॥५२॥
कोण्ही तव यशःश्रवणें तुष्ट । एक झाले कीर्तननिष्ठ । एक करिती नामपाठ । घडघडाट अहर्निशीं ॥५३॥
नगरा मानूनियां सगरा । वनीं पदती समअजगरा । अष्टौ प्रहर ज्या उजिगरा । ऐसे निजगिरा तुज भजती ॥५४॥
कित्तेक झाले अर्चनपर । कित्येक फिरती दिगंबर । ऐसे श्रमती निरंतर । भजनाधिकार लहावया ॥३५५॥
सनकादिक ऊर्ध्वरेते । शक्रादिसुकृती शतमखकर्ते । कपिलादि इंद्रियगणसंहर्ते । कैं तद्वार्ते न करिसी तूं ॥५६॥
तो तूं आम्हां अविवेकपरां । हृदयीं स्मरसी करुणाकरा । विशेष येथेंचि आलासि घरा । ममाधिकारा न पाहतां ॥५७॥
महद्भाग्य हें जनार्दना । पात्र झालों अखिल कल्याणा । आतां इतुकी मम प्रार्थना । करुणाघना परिसावी ॥५८॥
कोण्या सुकृतलेशें तुझी । वरद कृपा हे लाधलों आजी । भ्रांतिरूपा बेडी माझी । छेदी सहजीं तव माया ॥५९॥
आशु म्हणिजे शीघ्रतर । मोहरज्जु जे कठोर । ते तव माया दुस्तर । हे जे संसारसुखभ्रांति ॥३६०॥
देहात्मभावें देहममता । तत्सुखार्थ प्रियतम वनिता । तद्भोग घडावया पुरता । सदनआस्था दृढ जाली ॥६१॥
सदनसंग्रह उपसामग्री । धनधान्यांची ममता भारी । पात्रें वस्त्रें शस्त्रें घरीं । परोपरी अभिलाष ॥६२॥
हय रथ कुंजर गाई महिशी । अजा अविकें श्वापदें पक्षी । वृत्ति क्षेत्रें विविधा कृषि । गुप्त भूकुक्षीं धननिचय ॥६३॥
वापी कूप तडाग वळनें । सरितानिरुद्ध ह्रदजीवनें । विविध वाटिका वनोद्यानें । तद्रक्षणें जन विविध ॥६४॥
पुत्र कन्या जामात स्नुषा । बहिणी मेहुणे माउशा । बंधु चुलते गोत्र अशेषा । कवळूनि क्लेशा वरपडणें ॥३६५॥
अजामित्र सुहृदवर्ग । प्रीति लावूनि करिती संग । विषयार्थ करिती युद्धप्रसंग । शत्रु अभंग ते होती ॥६६॥
पदार्थरक्षक मनोनुकूळ । ते जन आप्त होती सकळ । एवं अवघें मोहजाळ । दुस्तर केवळ तव म आया ॥६७॥
इयेतें छेदीं तूं झडकरी । त्वरा कां करितोसि म्हणसी जरी । दुर्लभ तव प्राप्ति श्रीहरि । ये संसारीं ये समयीं ॥६८॥
सुलभ झालासि तूं श्रीपति । म्हणूनि मानूं जरी निश्चिती । तरी तव माया घालूनि बुंथी । हातोहातीं नाडील ॥६९॥
नरसुरपितरां योगिवृंदां । दुर्लभ तव प्राप्ति गोविंदा । मज तुष्टलासि आनंदकंदा । तरी करीं छेदा मायेच्या ॥३७०॥
पुत्रमोहें वसिष्ठ ठकला । देहाभिमानें कौशिक झकला । अहल्यालोभें भूमंडळा । मुनिसुरमेळा स्मर फिरवी ॥७१॥
मोहयोगें देहात्मता । देहयोगें विषयीं आस्था । विषयभोगार्थ गृह धन वनिता । प्रप्म्चममता तद्योगें ॥७२॥
अप्रपत जो जो पदार्थमात्र । तदपेक्षेचें संकल्पसूत्र । वासनेचें खवळी गात्र । काम विचित्र मग वाढे ॥७३॥
जे जे वस्तूचा वियोग । तत्प्राप्तिसाधना नांव योग । प्राप्तवस्तूचा न व्हावा भंग । क्षेम सांग त्या नांव ॥७४॥
ऐसा योगक्षेम वाहतां । जे अनुकूळ होती हिता । त्यांच्या ठायीं प्रेम चित्ता । राग तत्वतां तो म्हणिजे ॥३७५॥
प्रतिकूळत्वें विषयरोध । करिती त्यांवरी उपजे क्रोध । द्वेष म्हणिजे जो विरुद्ध । वोपी खेद परोपरी ॥७६॥
प्रिय वस्तूचा वाढे लोभ । बाह्यलौकिकीं खवळे दंभ । विषयअप्राप्तीचा क्षोभ । करी स्वयंभ द्वेषातें ॥७७॥
भोग्यवस्तूचा लोभ धरी । तव ते नाशे काळांतरीं । तेणें उपजे शोकलहरी । ते भवपूरीं बुडवितसे ॥७८॥
जिवलगांचीं कवळूनि मढीं । रडे बोंबली कपाळ फोडी । ऐशा शोकार्नवीं दे बुडी । परी कोण ते जोडी न विचारी ॥७९॥
न्यून पाहती पिशुनवर्ग । त्यांसि मत्सर चाळी सांग । अष्टधा मदाचा प्रसंग । करी अभंग अभिमान ॥३८०॥
ऐसी दुस्तर हे तव माया । सत्वर छेदीं करुणानिलया । अनन्यभावें प्रणत पायां । वाङ्मनकाया अर्पूनि ॥८१॥
दैवें जोडल्या कैवल्यपति । तरी हे मागावी संपत्ति । मनोग्राह्य सुख याचिती । ते दुर्मति तुज कथिले ॥८२॥
असो अक्रोरें ऐसिया परी । कृष्ण पूजूनि यथोपचारीं । पद मर्दितां मधुरोत्तरीं । भावें श्रीहरि तोषविला ॥८३॥

इत्यर्चितः संस्तुतश्च भक्तेन भगवान्हरिः । अक्रूरं सस्मितं प्राह गीर्भिः सम्मोहयन्निव ॥२८॥

अनन्यभावें अक्रूर शरण । न मगे वनिता सुत धन धान्य । वृत्तिक्षेत्र सुहृद स्वजन । देहादिकल्याण नापेक्षी ॥८४॥
इत्यादिवैभवें प्राकृत म्हंती । अक्रूर बंधनें मानी चित्तीं । आमुष्मिक जे भोगप्रतीति । तेही भ्रांति हरिमाया ॥३८५॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न हरि । विस्मित होऊनि मनी विवरी । अक्रूरसंपन्नतेची थोरी । मजही वैखरी वदवेना ॥८६॥
वैभव म्हणती ज्या सुरवर। तें हा मानी बंधनागार । परमात्मा मी षड्गुणधर । तेंही सादर हा न मगे ॥८७॥
इहामुष्मिकममतावेडी । प्रार्थूनि म्हणे हे कृपेनें तोडीं । उभयभोगीं अनावडी । आंगीं धडधडी वैराग्य ॥८८॥
मोहरशना जे मम माया । प्रार्थी तीतें छेदावया । न मगत साधिलें कैवल्यनिलया । सीमा चारुर्या न करवे ॥८९॥
इहामुत्रार्थ कळला मृषा । सहज बाणली विरक्तिदशा । छेदितां मायामोहपाशा । हरली निशाभवभ्राति ॥३९०॥
मोहमायेचा करितां छेद । तेव्हांचि तुटोनि गेला भेद । अक्षयकैवल्यपरमानंद । लाहे अमंद न मगोनि ॥९१॥
धन्य अक्रूर विपश्चित । धन्य अक्रूर भवविरक्त । धन्य अक्रूर पूर्णभक्त । निष्काम श्रीमंत यशस्वी ॥९२॥
सदयहृदय परमोदार । याचें ऐश्वर्य मजहूनि थोर । ऐसें विवरूनि जगदीश्वर । बोले मधुर तयासीं ॥९३॥
सम्यक म्हणिजे बरव्या परी । नेमस्त समर्याद उत्तरीं । अक्रूरातें प्रार्थी हरि । परादिवैखरीकरूनियां ॥९४॥
तें बोलणें म्हणों काय । कीं तनुमनमोहकचि होय । दष्टीसूनि अवतारकार्य । हरिचातुर्य तें ऐका ॥३९५॥

श्रीभगवानुवाच - त्वन्नो गुरुः पितृव्यश्च श्लाघ्यो बंधुश्च नित्यदा ।
वयं तु रक्ष्याः पोष्याश्च अनुकंप्याः प्रजा हि वः ॥२९॥

अचिंत्यानंतगुणपरिपूर्ण । तो अक्रूराचें करी स्तवन । म्हणे तूं आमचा गुरु सघृण । पितृव्यपनसंबंधें ॥९६॥
वसुदेवदेवकीजनकजननी । तिहीं टाकिले बृहद्वनीं । जातमात्रांच्या जीवनीं । नाहीं ग्लानि त्यां चित्तीं ॥९७॥
केशिअरिष्टप्रमुख दुष्ट । बाहुबळें म्यां केले पिष्ट । हें कळोनिही कृपाविष्ट । ममाभीष्ट वांछिसी तूं ॥९८॥
म्हणे कंस या लेंकुरा मारी । ऐसा कळवळा तव अंतरीं । विनीत होऊनियां ईश्वरीं । अभय निर्धारीं वांछिसी ॥९९॥
ऐसा गुरु तूं आमचा । गोत्रसंबंधें चुलता साचा । लोकीं म्हणतां महत्त्वाचा । श्लाघ्यत्वाचा हा महिमा ॥४००॥  
गोत्रविभाग दायादपणीं । बंधुत्वही तुज लागूनी । परी तूं नित्यसुखाचा दानी । देहाभिमानी न होसी ॥१॥
आम्ही कृपेचीं भाजनें । पोष्यें लेकुरें अज्ञानें । तुम्ही सर्वस्वें रक्षण करणें । प्रजा जाणोनि आपुलिया ॥२॥
आम्ही लेकुरेंचि साचार । परी येरही संसारग्रस्त जे नर । त्याही तुमचाच आधार । तो प्रकार अवधरा ॥३॥

भवद्विधा महाभागा निषेव्या अर्हसत्तमाः । श्रेयस्कामैर्नृभिर्नित्यं देवाः स्वार्था न साधवः ॥३०॥

आपुलें कल्याण इच्छिती पोटीं । ऐसे श्रेयस्काम जे सृष्टीं । मौळें स्पर्शोनि पादपीठीं । नमिजे मुकुटीं तिहीं तुम्हां ॥४॥
सज्जनांमाजि सज्जनतम । अर्ह म्हणिजे पूज्यपरम । नसेवितयांचे पुरविती काम । कल्पद्रुम तुम्हां ऐसे ॥४०५॥
तुम्हा ऐशांच्या निषेवणें । मनुजीं अभीष्ट फळ पावणें । नित्य सेवितां सुनिष्ठ मनें । सकळ कल्यानें नर लाहती ॥६॥
म्हणाल देवता सेव्य मनुजां । प्रसिद्ध जानती जनपद प्रजा । येथ साधूंची किमर्थ पूजा । तरी हे वोजा अवधारीं ॥७॥
देव इच्छिती आपुला स्वार्थ । नेणती भजकाचा परमार्थ । दीन दयान साधु समर्थ । द्रवती परा हृत्कमळीं ॥८॥
देव रडोनि मागती नवस । यात्रा न करितां देत्ती क्लेश । कुळधर्मलोपें ठेवूनि दोष । करिती विघ्नांस बहुसाल ॥९॥
एक क्षोह्भें डोळे धरिती । एक वांकुडीं तोंडें करिती । एक विस्फोटादि नायटे लुती । भक्ता अर्पिती महारोग ॥४१०॥
नवसयात्राकुलधर्मांसी । रौधतां विघ्नें करितो ऐसीं । भक्तीं भजतां उपचारेंसीं । विघ्नें प्रयासीं अनावर त्यां ॥११॥
अवचित कांटा मोडतां वाटे । देव क्षोभला तेथेंचि प्रकटे । लोकीं बोलती उफराटे । हे लज्जा न वाटे देवासी ॥१२॥
म्हणती देव लागला पायां । पायां लागूनि मागतो खाया । तेव्हां देवत्व गेले वांयां । आदरी क्षया भक्ताच्या ॥१३॥
अडक्याचिया गुळासाठीं । तिडका उठवी भक्तापोटीं । भक्तिणीची धरी घांटी । पोरें संकटीं हुंबरवी ॥१४॥
महाद्वारींचा जेंवि महार । टुकडा न पवतां होय क्रूर । येतां जातां वारंवार । करी करकर निरोधें ॥४१५॥
राजनियोगीं जिये ठायीं । म्हणे तेणेंचि मार्गें जाई । न्यून पूर्ण सांगोनि कांहीं । घाली अपायीं तत्काळ ॥१६॥
एवं तुकड्यासाठीं रडती । प्रसन्न होऊनि काय देती । असो क्षुद्र देवांची गति । म्हणाल सुरपति सेवावा ॥१७॥
तोही करितां यज्ञ दान । ब्रह्मचर्यादि तपःसाधन । क्षुद्र लक्षूनि करी विघ्न । परी तोषोन द्रवेना ॥१८॥
पंचमहायज्ञ नित्य । निष्ठापूर्व श्रौतस्मार्त । आचरतां कामनारहित । सुरवर समस्त भय वाहती ॥१९॥
निष्काम सत्कर्मानुष्ठानें । होती चित्तमलक्षालनें । उदया येतां वास्तव ज्ञानें । विरक्त होणें यजमानीं ॥४२०॥
यजमान सुरवराचे पशु । ते जैं लाहती ज्ञानप्रकाशु । इहामुत्रार्थ जाणोनि फोस । होती उदास भवस्वर्गीं ॥२१॥
तैं ते नेदिती आम्हां बळी । म्हणोनि निष्काम भजनकाळीं । विघ्नें कीजे अमरपाळीं । बिरुदावळी बांधोनी ॥२२॥
सकाम यजमान घेती पदें । म्हणोनि त्यांसि चाळिती द्वंद्वें । बळी भक्षूनि देती अपदें । कर्मठा खेदें जाचिती ॥२३॥
शुकच्छलनार्थ धाडिती रंभा । क्रोधें जमदग्नि आणिला क्षोभा । श्वान करूनि केल उभा । कौशिक कामें कविसदनीं ॥२४॥
नहुषा केलें अधःपतन । कपिलक्षोभें सगरदहन । शिबिरुक्मांगदांचें कथन । जाणे त्रिभुवन सुरमहिमा ॥४२५॥
एवं स्वार्था रडती देव । त्यांसि भजकांची कैंची कींव । यालागिं दयाळु साधव । परार्थ स्वमेव कळवळिती ॥२६॥
आर्तभूत दीन प्राणी । त्यांतें देखतां द्रवती मनीं । करिती अनार्त्त अनुग्रहूनी । ईश्वरभजनीं नियोजिती ॥२७॥
साधु विसरोनि अपकार । करिती कृपेनें उपकार । न विचारितां लहान थोर । देती आधिकार स्वपदाचा ॥२८॥
ध्रुवासि देखोनि अनाथ दीन । कृपेनें सनाथ केला पूर्ण । मग त्या तुष्टोनि श्रीभगवान । अढळ करोनि स्थापिला ॥२९॥
कयाधू बंदी धरिली सुरीं । प्रह्राद असतां तिचे उदरीं । जाकळितां शोकलहरी । साधु अंतरीं कळवळिला ॥४३०॥
सर्वात्मकत्वें निर्वैरता । बोधूनि अनुग्रह केला पुरता । प्रह्राद तेणेंचि झाला सरता । मिरवे माथां अमरांचे ॥३१॥
वाल्मीकि तस्कर जो परिपंथी । ज्यासि देखोनि लपती श्रुति । त्यासि सज्जनीं धरूनि हातीं । छेदूनि संसृति मुनि केला ॥३२॥
तत्कृत शतकोटि रामायण । श्रवणें पठनें त्रिजगदुद्धरण । ऐसे कृपाळु सज्जन । केंवि सुरगण त्या तुळती ॥३३॥
गणिका केवळ अघसंवदणी । तारूं न शके सधन कोणी । तेही कृपेनें सज्जनीं । युक्ति योजूनि उद्धरिली ॥३४॥
म्हणाल श्रेष्ठ तपोधन । आम्ही यदुकुळीं सामान्य । तरी अबाधित ज्यांचें ज्ञान । तेचि सज्जन सुरपूज्य ॥४३५॥
साक्षात् तुष्टल्या लक्ष्मीपति । जे मागती नितांतभक्ति । इहामुत्रार्थी विरक्ति । मोहनिवृत्तिपूर्वक ॥३६॥
ते नर सनकादिकांचे तुळणे । गौण न मनिजे आधुनिकपनें । ऐसें बोलोनि नारायणें । पुन्हा लक्षणें कथीतसे ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP