सृजस्यथो लुंपसि पासि विश्वं रजस्तमःसत्त्वगुणैः स्वशक्तिभिः ।
न बध्यसे तद्गुणकर्मभिर्वा ज्ञानात्मनस्ते क्क च बंधहेतुः ॥२१॥

क्रियाद्रव्यज्ञानशक्ति । या स्वशक्तीकरूनि त्रिगुणांप्रति । क्षोभवूनि कार्यप्रवृत्ति । आणिसी व्यक्ति पृथक्त्वें ॥३९॥
क्रियाशक्ति क्षोभवून । रूपा आनिसी रजें द्रुहिण । तेव्हां करिसी विश्वसृजन । तें विस्तीर्ण गुणकार्य ॥२४०॥
ज्ञानशक्तीचा करूनि क्षोभ । सत्वादि रूढ पद्मनाभ । पालनकार्याचा अवलंब । करी स्वयंभ गुणकार्य ॥४१॥
द्रव्यशक्तीची क्षोभक दशा । करी समग्र सृष्टिनाशा । तमोगुणात्मक महेशा । प्रवर्त्तवूनि स्वकार्यीं ॥४२॥
गुणाभिमानी तीन्ही देव । ते तुझेचि अंशप्रभव । न संडिती तव अनुभाव । यालागिं माव न बधी त्यां ॥४३॥
पूर्वसृष्टीची हे गोठी । पुढें कर्मानुसार सृष्टि । धाता यथापूर्व परिपाटीं । मुख्य चावटी श्रुतींची ॥४४॥
कल्पांतीं जैं होय प्रळय । तेव्हां सृष्टि पावे लय । सकर्मजीवांचा समुदाय । लीन होय अव्यक्तीं ॥२४५॥
सृजनकाळीं पुढती तेचि । कर्मानुरूप सृष्टि रची । यास्तव मुक्तता जीवांची । कर्मापासूनि आसेना ॥४६॥
तव चिंतनें हरिहरधाता । नित्य निर्मुक्त गुणीं वर्ततां । त्या तुज गुणकर्मीं बद्धता । कोण तो वक्ता कल्पील ॥४७॥
गुणसाक्षी तूं गुणीं बद्ध । ऐसें बोलणेंचि अबद्ध । मा जें गौणकर्म प्रबुद्ध । तें कें निबद्ध करूं शके ॥४८॥
बंधत्रयासि कारण । एक अविद्याची मुख्य जाण । तें कोठेंही तुजलागून । प्रतीयमान असेना ॥४९॥
स्थूळसूक्ष्मकारण तनु । त्रिविध अविद्याबंधन । सत्त्वरजतमवृत्यावरण । गौणबंधन त्रिधा हें ॥२५०॥
संचित प्रारब्ध क्रियमाण । ऐसें त्रिविध कर्मबंधन । तिहीं बंधांचें अधिष्ठान । मुख्य कारण अविद्या ॥५१॥
अविद्या म्हणिजे अज्ञान जड । तूं ज्ञानात्मा चैतन्य अजड । तमा न गिळवे मार्तंड । तो पडिपाड तव बंधा ॥५२॥
ज्ञानशक्ति जे का माया । समर्थ नोहे आवरावया । अनावरा जी मायाश्रया । निरामया अमायिका ॥५३॥
असो तुझी हे बंधशंका । ज्यास्तव जीवासही बंध लटिका । अविद्योपाधिक भासे लोकां । वस्तुता देखा असेना ॥५४॥

देहाद्युपाधेरनिरूपितत्वाद्भवो न साक्षान्न भिदाऽऽत्मनः स्यात् ।
अतो न बंधस्तव नैव मोक्षः स्यातां निकामस्त्वयि नोऽविवेकः ॥२२॥

आत्मप्रत्यया आवरण । बहुधा प्रपंचविक्षेपस्फुरण । ऐसी अविद्योपाधि जाण । करी बंधन देहरूपें ॥२५५॥
जागृति स्वप्न विक्षेप द्विधा । मूर्च्छा निद्रा लयांची अभिधा । उभयप्रत्यय तुरीय शब्दा । महाकारण या अभिधानें ॥५६॥
ऐसी चतुर्धा देहभेद । अविद्योपाधि जो हा विशद । यास्तव जीवासि बोलिजे बंध । येर्‍हवीं शुद्ध चिन्मय तो ॥५७॥
सादेपंधरें किडाळीं पडे । तैं ते किडाळ ऐसेंचि आवडे । पुटीं शोधन जेव्हां घडे । तेव्हां निवडे निजरूपें ॥५८॥
असतां किडाळाचिये संगती । पंधरेपणा हानि नव्हती । तेंवि जीवा अविद्याभ्रांति । बंधनावपति साच करी ॥५९॥
गुरुवेदांतवाक्यपुटें । झडतां अविद्याभ्रमांचीं किटें । वास्तव आत्मत्व जीवा प्रकटे । कीं नूतन भेटे हें विवरा ॥२६०॥
एवं देहादि उपाधिमुळें । जीव जन्मला ऐसें कळे । देह चेष्टतां विषयमेळें । कर्म पुंजाळे शुभाशुभ ॥६१॥
देहयोगें षड्विकार । प्रायश्चित्तादि सदाचार । अधमोत्तम कर्म मिश्र । हा भेद विचित्र देहयोगें ॥६२॥
देहयोगें शत्रु मित्र । आप्त स्वजन स्वकुळ गोत्र । सुखदुःखादि इहामुत्र । हा भेद सर्वत्र सोपाधि ॥६३॥
उपाधिनाशें जीवासि कांहीं । साक्षाद्वस्तुता भेदचि नाहीं । मा तो भेद तुझ्या ठायीं । कोणें कहीं कल्पावा ॥६४॥
भेदाभावीं आत्मा एक । होतां अपरोक्ष्बसद्विवेक । जीवत्वाचा तैं कें अंक । आत्मा सम्यक वास्तव तूं ॥२६५॥
जरी मज बंध नाहीं म्हणसी । तेव्हां मोक्ष्ब प्रतिपादिसी । बंधाभावें मी मोक्षासी । पात्र झालों कीं ना रे ॥६६॥
मोक्ष अंगीकारिसी जरी । तरी तूं अक्रूरा अवधार्रीं । बंधावेगळी मोक्षा उरी । कोणे परी मज सांग ॥६७॥
वंध्यापुत्र जन्मला नाहीं । तो मला हें साच काई । मरण साच होतां पाहीं । तैं जन्मही साचचि ॥६८॥
तैसा मोक्ष म्हणसी मज । तेव्हां बंधही लागला सहज । तरी हें शंकापरिहारगुज । स्वामी बुझ श्लोकार्द्धें ॥६९॥
मायानियंता मायातीते । मायागुणीं अनंतवृत । मायाकार्य अविद्या तेथ । नोहे समर्थ किमुत पैं ॥२७०॥
जेथ अविद्यासंभव नाहीं । तत्कृत बंध तो मग काई । बंध नसतां मोक्ष पाहीं । मूर्ख तोही मानीना ॥७१॥
तस्मात् अविद्यागुणकर्म । हेचि त्रिविध बंध परम । स्वसंवेद्य तूं पुरुषोत्तम । पूर्णकाम परमात्मा ॥७२॥
तस्मात् बंधमोक्षातीत । अक्षय अव्यय तूं अनंत । जरी तूं शंका करिसी येथ । केंवि मी व्रजांत बांधलों ॥७३॥
यशोदेनें गोकंठपाशें । उखळीं बांधिलें शिक्षामिषें । गोरसचौर्यकर्मवशें । निर्मुक्त कैसें तूं वदसी ॥७४॥
तैंहूनि दामोदर हें नांव । लहान थोर ऐकती सर्व । आणि यमुनाह्रदीं जें वास्तव । मुक्तगौरव देखिलें ॥२७५॥
एवं बधमोक्ष माझ्या ठायीं । देखोनि कैसा म्हणसी नाहीं । तरी हा आमुचा अविवेक पाहीं । तुझ्या ठायीं प्रतिपादी ॥७६॥
अभ्रपटळें आवृत नयन । सूर्य झांकला म्हणती जन । तेंवि आम्ही विवेकशून्य । मोक्षबंधन तुज कल्पूं ॥७७॥
ऐसें म्हणोनि श्वफल्कतनय । पुन्हा शंकेचा लक्षूनि ठाय । विज्ञापना करिता होय । कैसी काय ते ऐका ॥७८॥
बंध मोक्ष माझ्या ठायीं । अविवेकदृष्टि वास्तव नाहीं । तव अवतारचरित्र जें जें काहीं । तें तें सर्व हो तद्वत् कीं ॥७९॥
शुक्तीवरी रजतारोप । भास्करकिरणीं कल्पित आप । तैसे अवतार आणि प्रताप । हा कल्पित जल्प अविद्यक कीं ॥२८०॥
तरी हें न म्हणावें श्रीहरि । तव लीला हे जगदुद्धारी । ईतें म्हणता मृगांबुलहरी । मम वैखरी शून्य नव्हे ॥८१॥
बाळ मातेचे अवयव आन । चोखी स्तनही तयांचि समान । म्हणतां वक्त्याचें करपलें ज्ञान । बालपोषण स्तनपानें ॥८२॥
तेंवि हा जगत्कल्याणार्थ । तव प्रणीत जो निगमपथ । तो भंगिती जैं उत्पत्थ । तैं तूं तेथ अवतरसी ॥८३॥
दों श्लोकीं हें निरूपण । करी अक्रूर अनन्यशरण । तें परीस तूं विचक्षण । भाषाव्याख्यान हरिवरद ॥८४॥

त्वयोदितोऽयं जगतो हिताय यदा यदा वेदपथः पुराणः ।
बाध्येत पाखंडपथैरसद्भिस्तदा भवान्सत्तगुणं बिभर्ति ॥२३॥

अखिल जगाच्या कल्याणार्थ । तव कृत जो हा आम्नायपथ । पुरानमहर्षिप्रतिपादित सर्व पुरुषार्थ ज्यामाजी ॥२८५॥
पाखंडपथ जे असद्रूप । तिहीं करितां श्रुतिपथलोप । तैं अवतरसी सप्रताप । कीर्ति अमूप विस्तारिसी ॥८६॥
जे जे काळीं श्रुतिपथग्लानि । होतां त्रासिजे तन्निष्ठ जनीं । तेव्हां तेव्हां कळवळोनी । तद्रक्षणीं अवतरसी ॥८७॥
सत्वगुणाच्या घेऊनि बुंथी । प्रकटूनियां अवतारपंक्ति । विस्तारिसी अमोघकीर्ति । जे अघहतीं त्रिजगाची ॥८८॥
जैसी तुझी अवतारमाला । तत्कृत अमोघ गुणगणलीला । गातां ऐकतां तव जनमेळा । भजळ हेळा उल्लंघी ॥८९॥
तो तूं आतां कमलारंग । दुष्पथीं करितां श्रुतिपथभंग । देखोनि स्वजनग्लानिप्रसंग । घेतला अवग तो ऐका ॥२९०॥

स त्वं प्रभोऽद्य वसुदेवगृहेऽवतीर्णः स्वांशेन भारममनेतुमिहासि भूमेः ।
अक्षौहिणीशतवधेन सुरेतरांशराज्ञाममुष्य च कुलस्य यशो वितन्वन् ॥२४॥

द्वापारांतीं कलीच्या उदयीं । प्रभो समर्था ऐसिये समयीं । अवतरलासि वसुदेवगेहीं । निजांशअहिसमवेत ॥९१॥
अवतरोनियां करणें काय । तरी असुरांश जे मनुष्यप्राय । अनेक अक्षौहिणीसमुदाय । पावे भू भय तद्भारें ॥९२॥
घेऊनि निजांश बळ निजगडा । भूभाराचा करावया झाडा । स्वजन पावावया सुरवाडा । आणि पवाडा स्वकुळाचा ॥९३॥
इतुकीं कार्यें साधनार्थ । दुष्टा अक्षौहिणी अनेकशत । समरीं करूनि त्यांचा घात । भूभार समस्त उतरिसी ॥९४॥
स्वकुळ करिसी यशोमंडित । लीलाचरणें त्रिजगत्पूत । गुणकीर्तनीं तरती भक्त । तो तव समर्थ अवतार ॥२९५॥
धन्य देखती वर्तमान । गाती ऐकती भविष्यमाण । ते पावती सुखनिर्वाण । हें महिमान श्रुति गाती ॥९६॥
असो तयाचा भाग्यमहिमा । ज्यास्तव वर्णितां तोषे ब्रह्मा । तो आलासि आमुचिया सद्मा । आश्रमधर्मा साफल्य ॥९७॥
तवागमनें कृतार्थ झालों । तीं श्लोकीं हें आदरीं बोलों । तेंवीचि म्हणे मी हरिखेलों । लागला डोलों तच्छंदें ॥९८॥
ममागमनीं अभीष्ट काय । म्हनसी तरी तो अभिप्राय । ऐकें म्हणोनि कथिता होय । तें नृपा मुनिवर्य निरूपी ॥९९॥

अद्येश नो वसतयः खलु भूरिभागा यः सर्वदेवपितृभूतनृवेदमूर्तिः ।
यत्पदशौचसलिलं त्रिजगत्पुनाति स त्वं जगद्गुरुरधोक्षज याः प्रविष्ठ ॥२५॥

ईश म्हणोनि संबोधन । ईश्वरेश्वर तूं ऐश्वर्यपूर्ण । आजि माझ्या वसती धन्य । केल्या येऊन निजचरणें ॥३००॥
ममागमनें सभाग्यवसती । कैशा म्हणसी जरी श्रीपति । तरी निश्चयें मम भारती । करी विज्ञप्ति ते ऐक ॥१॥
सर्व देवांचा तूं देव । त्रिजग अवघें तव अवयव । भूतें पितर आणि मानव । सवेदप्रणव तव मूर्ति ॥२॥
एवं पंचमहा जे क्रतु । त्यांमाजी चराचर समस्त । तो तूं ईश्वर मूर्तिमंत । ज्या वसतींत प्रविष्ट ॥३॥
म्हणोनि जितुकीं तपोवनें । निगमप्रणीतें पुण्यस्थानें । न येती मम वसतीचे तुळणे । अंतःकरणें जाणतसें ॥४॥
प्रयागराज तीर्थराव । जेथें त्रिवेणिमाधव । तो तूं प्रविष्ट देवाधिदेव । हें भाग्य अपूर्व वसतीचें ॥३०५॥
ज्या तव पादशौचसलिलें । जगत्त्रयाचीं हरती शमलें । जाणोनि शंकरें मुकुटीं धरिलें । पुष्पमाले समसाम्य ॥६॥
कालांतरें सगरांप्रति । कपिलशापें अधोगति । करावया तन्निष्कृति । स्तविला पशुपति भगीरथें ॥७॥
त्रिपूर्वजांच्या अनुष्ठानें । संतोषोनि गौरीरमणें । तव पदप्रक्षालनजीवनें । शतांशमानें बोळविला ॥८॥
शतांश म्हणिजे अनंतवाची । त्रिजगीं प्रसिद्धि सुरगंगेची । भूतळीं भगीरथयत्नें तेचि । भागीरथी अघहंत्री ॥९॥
तिचे वोघ झाले सप्त । सीतानामक प्रयागीं प्राप्त । यास्तव प्रयाग तीर्थनाथ । त्रिजगीं ख्यात यश मिरवी ॥३१०॥
ते तव चरणीं संपूर्ण गंगा । चरणस्पर्शें वसती चांगा । यास्तव म्हणिजती भूयिष्ठभागा । तुल्य प्रयागा केंवि करूं ॥११॥
त्रिजगज्जनक जो कां ब्रह्मा । नाभिकमळीं तो पावला जन्मा । यास्तव जगद्गुरु या नामा । पुरुषोत्तमा तूं पात्र ॥१२॥
येर्‍हवीं नामरूपातीत । मायानियंता श्रीअनंत । जाणोनि अधोक्षजसंकेत । स्तवी निश्चित श्वाफल्कि ॥१३॥
विष्णु म्हणिजे अंतःकरण । चंद्रमा तो केवळ मन । बुद्धि म्हणिजे कमलासन । नारायण चित्ताख्य ॥१४॥
अहंकार तो गिरिजारंग । इत्यादि समष्टि अक्षवर्ग । तज्जनित जो ज्ञानमार्ग । तुजहूनि प्रसंग अध त्याचा ॥३१५॥
तुजहूनि अध अक्षज ज्ञान । यास्तव अधोक्षज संबोधन । अक्रूर म्हणे तूं ब्रह्म पूर्ण । वसति धन्य तव योगें ॥१६॥
येथ श्रोते शंका करिती । ब्रह्म सनातन सर्वां भूतीं । प्रविष्ट ऐसी अक्रूरोक्ति । सभाग्य वसति केंवि म्हणे ॥१७॥
तरी ये शंकेचा परिहार । साक्षात् पदाचा निर्धार । करूनि बोलिला अक्रूर । तोही विचार परिसा हो ॥१८॥
जैसी सजळ सर्वत्र धरणी । परी जळअलाभें मरती प्राणी । अपरोक्ष होतां सुखाची श्रेणी । भोगिजे जनीं जळ योगें ॥१९॥
तेंवि तूं साक्षात् अधोक्षज । यमुनाह्रदीं जगद्वीज । देखिलासि तो आजि सहज । वसती पदरज कृतपूत ॥३२०॥
तो तूं साक्षात् कैवल्यदानी । कृपामृतें वोरसोनी । मनोरथ पूर्ण तवागमनीं । बोले तोषोनि तें ऐका ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP