अध्याय ४७ वा - श्लोक ६६ ते ६९

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


मनसो वृत्तयो नः स्युः कृश्णपादांबुजाश्रयाः । वाचोऽभिधायिनीर्नाम्नां कायस्तत्प्रह्वणादिषु ॥६६॥

बल्लव म्हणती उद्धवराया । आमुच्या मनोवृत्ति अवघिया । कृष्णपादांबुजाश्रया । करीं कां सदया हरिवरें ॥५८॥
कृष्णनामें आमुच्या वाणी । नित्य रंगोत हरिकीर्तनीं । कृष्णभावें भगवद्भजनीं । तनु अर्चनीं विलसतु या ॥५९॥
याहूनि उद्धवा आमुच्या चित्तीं । अभीष्टप्रार्थना जे तुजप्रति । तेही सेवेसि करितों विनति । सुस्निग्धवृत्ती अवधारीं ॥७६०॥

कर्मभिर्भ्राम्यमाणानां यत्र क्कापीश्वरेच्छया । मंगलाचरितैर्दानै रतिर्नः कृष्ण ईश्वरे ॥६७॥

विविधा कर्मीं भ्रमतां आम्हां । ईश्वरेच्छेनें सात्वतोत्तमा । कोठें तरी आमुचा प्रेमा । कृष्ण परमात्मा आलिंगो ॥६१॥
विविधा कल्याणरूपाचरणीं । तीर्थीं व्रतीं तपीं दानीं । आमुचा अनुराग कृष्णचरणीं । वसो निर्वाणीं मेळविता ॥६२॥
कृष्णावेगळा परमेश्वर । आम्ही न मनूं हा निर्धार । कृष्णीं निरत अभ्यंतर । असो हा वर मागतसों ॥६३॥
ऐसा उद्धव परोपरी । प्रार्थूनियां नम्रोत्तरीं । बोळविला तो मथुरापुरीं । कोणे परी प्रवेशला ॥६४॥

एवं सभाजितो गोपैः क्रुष्णभक्त्या नराधिप । उद्धवः पुनरागच्छन्मथुरां कृष्णपालिताम् ॥६८॥

शुक म्हणे गा कुरुनरपति । नंदादिवल्लवीं समस्तीं । उद्धव पूजूनि श्रीकृष्णभक्ती । मथुरेप्रति वोळविला ॥७६५॥
रथ चालिला घडघडाट । केतु झलके लखलखाट । मागें बल्लव पाहती वाट । करिती बोभाट हरिस्मरणें ॥६६॥
उद्धव परतोनि घालवी वसनें । देखूनि बल्लवीं केलीं नमनें । परस्परीं विपरीत गमनें । पूर्वपश्चिमें आदरिलीं ॥६७॥
उद्धव आठवी कृष्णकथा । यशोदानंदाची अवस्था । गोपगोपींची विरहव्यथा । क्रमिलें पथा तत्स्मरणें ॥६८॥
परतूनि आला मथुरपुरीं । येता देखोनि नागरीं । सर्व गर्जती जयजयकारीं । स्मरती वैखरी बळकृष्णा ॥६९॥
मथुरापालक कृष्णनाथ । तेणें प्रजाजन सनाथ । अर्थ स्वार्थ आणि परमार्थ । चार्‍ही पुरुषार्थ वोळगती ॥७७०॥
ऋद्धि सिद्धि राबती घरीं । वीथी झाडिती मुक्ति चार्‍ही । स्वयीं विश्वश्री कामारी । सौभाग्यथोरी कोण वदे ॥७१॥
सुरवर सर्वत्र किंकर । काळ कृतांत घरटीकार । सूर्य सूचवी घटिकायंत्र । कर्म स्वतंत्र हरिआज्ञा ॥७२॥
रामकृष्णादिनामगजरीं । सर्वविघ्नांची बोहरी । जार चोर दुराचारी । मथुराराष्ट्रीं नाढळती ॥७३॥
दंड छत्रीं आतपत्रीं । सुमना बंधनें सुमनहारीं । त्रास दुंदुभिताडनप्रहारी । जैत्यहारीं बुद्धिबळीं ॥७४॥
घरोघरीं हरिकीर्तनें । सर्वां वदनीं नामस्मरणें । अतिथि गोविप्रपूजनें । परोपकरणें प्रिय सर्वां ॥७७५॥
ऐसी कृष्णें पाळिली मथुरा । उद्धव प्रवेशला सत्वरा । यान निरोपूनि मंदुरा । राजमंदिरा पातला ॥७६॥

कृष्णाय प्रणिपत्याऽह भक्त्युद्रेकं व्रजौकसाम् । वसुदेवाय रामाय राज्ञे चोपायनान्यदात् ॥६९॥

उग्रसेनातें जुहारून । नमिले वसुदेवरामकृष्ण । सर्वसदस्यां अभिवंदन । नम्रमौळें पैं केलें ॥७७॥
उपायनमिसें आणिला कर । नृपा अर्पिला तो समग्र । नानापदार्थ अळंकार । पृथगाकार अर्पिले ॥७८॥
वसनाभरणें वसुदेवासी । नंदें दिधलीं मित्रत्वेंसीं । पुत्रभावें बळरामासी । नानावस्तु अर्पिलिया ॥७९॥
यज्ञूदेनेनं देवकीप्रति । सौभाग्यद्रव्यें दिधली प्रीति । आनेक वस्तु नृपसंपत्ति । त्या त्या निगुती पावविल्या ॥७८०॥
स्वमुखें व्रजींची कथूनि वार्ता । आज्ञा घेऊनि उठिला त्वरिता । खुणावूनियां कृष्णनाथा । मग एकांता पातले ॥८१॥
नमूनि कृष्णपपदारविंद । सम्मुख बैसवूनि मुकंद । विरहोत्कंठितबल्लवीवृंद - । कृतसंवाद निरूपिला ॥८२॥
व्रजौकसांचा भक्त्युद्रेक । नंदयशोदेचा शोक । संवगडियांचें वियोगदुःख । ऐकोनि नावेद हरि विरमे ॥८३॥
मग परिमार्जूनियां नयन । उद्धवातें विसर्जून । भक्तवत्सल श्रीभगवान । द्रवे कारुण्यें हृत्कमळीं ॥८४॥
भक्तभावार्थें बांधलल हरि । भक्तानिमित्त अवतार धरी । भक्तपरतंत्र मुरारि । झुरे अंतरीं तत्प्रेमें ॥७८५॥
कुरुनरचकोरसुधाकरा । ऐकें परीक्षिति भूवरा । जो कां दुर्लभ मुनिसुरअसुरां । तो सोपारा भक्तांसी ॥८६॥
श्रुतींसी ज्याचा न लगे शोध । तयासै भक्तीं लाविलल वेध । प्रेमळ विरहें करी खेद । ऐसा अगाध भक्तिमहिमा ॥८७॥
यूगयागीं न लभे तपीं । भक्तिप्रेमें ते वस्तु सोपी । साध्य न करी तो नर पापी । अनेक कल्पीं भवदुःखी ॥८८॥
ऐसें रायासी सांगोनि शुक । पुढील कथेचा विवेक । हृदयीं विवरी तो नावेक । श्रोतीं सम्यक पारिसावा ॥८९॥
सैरंध्रीचें मनोरथ । आधीं साधूनि मुख्य कार्यार्थ । पुरवीन ऐसें श्रीकृष्णनाथ । वदला यथार्थ तें करील ॥७९०॥
त्यानंतरें अक्रूरसदना । जाऊनियां यादवराणा । अक्रूरा देऊनि समाधाना । धाडील हस्तिनापुरासी ॥९१॥
इतुकी कथा वक्ष्यमाण । श्रोतीं सादर कीजे श्रवण । कलिकल्मषनिर्दलन । स्वयें श्रीकृष्ण कैंपक्षी ॥९२॥
एकाजनार्दनश्रीमंत - । सादनीं सेवक श्रीकृष्णनाथ । भक्तिप्रेमाचा वृत्तांत । दावी समर्थ कळिकाळीं ॥९३॥
एकनाथाचें कृपापात्र । चिदानंद अनन्य छात्र । त्तेणें स्वानंद स्वतंत्र । आत्मतंत्र प्रबोधिला ॥९४॥
स्वनंदकृपेचें गौरव । तो सद्गुरु गोविंदराव । तेणें भरिला दयार्णव । पादप्रभवसुधाजळें ॥७९५॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र संख्यामित । परमहंसांचा एकांत । शुकप्रणीत श्रुतिसार ॥९६॥
दशमस्कंध परमहस्य । भगवल्लीलासुधारस । अध्याय सप्तचत्वारिंश । उद्धव मथुरेस पातला ॥७९७॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां भ्रमरगीतगोपीप्रबोध्नोद्धवमथुराभिगमनं नाम सप्तचात्वारिंशत्तमोऽ‍ध्यायः ॥४७॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओव्या ॥७९७॥ श्लोक ॥६९॥ एवं संख्या ॥८६६॥ ( सत्तेचाळिसावा अध्याय मिळून ओवी संख्या २१७५६ )

सत्तेचाळिसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP