अध्याय ४७ वा - श्लोक ४६ ते ५०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


किमस्माभिर्वनौकोभिरन्याभिर्वा महात्मनः । श्रीपतेराप्तकामस्य क्रियेतार्थः कृतात्मनः ॥४६॥

हें ऐकोनि येरी वनिता । वास्तवबोधें परमार्थता । कृष्ण परमात्मा तत्त्वता । त्या हे वृथा उपयोग ॥२२॥
महान् आत्मा म्हणिजे धीर । षड्गुणैश्वर्यवंत सधर । त्यासि केतुला राज्यभार । कायसा दारपरिग्रह ॥२३॥
जो कां प्रत्यक्ष लक्ष्मीपति । त्या हे केतुली नृपसंपत्ति । आवाप्तकाम आत्मस्थिति । न धरी आसक्ति लक्ष्मीची ॥२४॥
कृतात्मा जो पूर्ण स्वयें । कोण अर्थ त्या साक्षेप होय । वृथा त्यातें आत्मविषयें । कवळितां विरहें संतप्ता ॥५२५॥
तो सर्वत्र अनासक्त । सर्वसाक्षी सर्वातीत । त्याची आशा धरूनि व्यर्थ । विरहें संतप्त होतसां ॥२६॥

परं सौख्यं हि नैराश्यं स्वैरिण्यप्याह पिंगला ।
तज्जानतीनां नः कृष्णे तथाप्याशा दुरत्यथा ॥४७॥

ज्या कारणास्र्तव कृष्णरति । दुर्लभ सनकादिकांप्रति । तद्दुराशा धरूनि चित्तीं । व्याकुळा निश्चिती होतसों ॥२७॥
यास्तव ऐका वो निरुतें । परमसुख नैराश्यापरौतें । नाहीं ऐसें जाणतसां तें । नैराश्य सर्वांतें दुष्कर ॥२८॥
दुष्कर म्हणाल कोणेपरी । तेंही ऐका हो सुंदरी । सर्प लटिका कळल्या दोरी । उचलूनि करीं मग घेती ॥२९॥
दोरी घेतलिया हातीं । सर्पभयाची होय निवृत्ति । तैसी आशा बाधक कळल्या चित्तीं । नैराश्यस्थिति न बाणे ॥५३०॥
करकंकणा दर्पण काई । आम्हां हें कळलें असता बाई । दृढ नैराश्य न धरे देहीं । इतरां काई म्हणावें ॥३१॥
आम्ही जाणतसों पिंगळा । वेश्या स्वैरिणी अमंगळा । नैराश्यसुखाचा सोहळा । भोगूनि सकळांतें वदली ॥३२॥
पिंगळा म्हणाल कोठील कोण । ऐका तयेचें संक्षेप कथन । उद्धवासि बल्लवीगण । अनुवादोन जाणविती ॥३३॥
मिथिला विदेहाची नगरी । पिंगला वेश्या तिये पुरीं । वर्तत असतां स्वैराचारी । तिसी अवसरी हे घडली ॥३४॥
नित्य नूतन पुरुष तरुण । त्यासि दावी तनुलावण्य । कुलटाकौशल्यें भुलवून । स्वभोगदानें धन इच्छी ॥५३५॥
कोणे एके सुदैवदिवशीं । भोगार्थ पुरुष न जोडे तिसी । आशा धरूनि निजमानसीं । पन्यवीथीसी निरखितसे ॥३६॥
ऐसी क्रमिली अर्धरात्री । पुरुषमात्रा खुणावी नेत्रीं । कोण्ही न जोडे सकामगात्री । न पडे श्रोत्रीं तच्चर्चा ॥३७॥
म्हणे वृथा हा श्रृंगार । वृथा सुकले सुमनहार । वृथा उदविलें शयनागार । वृथा उपचार रतियोग्य ॥३८॥
वृथा चालिली आजिची रजनी । पुरुष सधन तरुण शयनीं । आलिंगनीं मजलागुनी । स्मररंगणीं न जोडे ॥३९॥
आतां नराशा निराश जाली । दुराशा दुःखद मनीं उरली । अर्ध रजनी क्रमोनि गेलेले । गळीं मासोळीसम करपे ॥५४०॥
पूर्वभाग्यें तिच्या मनीं । विरक्ति उपजली ते क्षणीं । म्हणे आशा ही पापिणी । दुःखश्रेणी मज वोपी ॥४१॥
ऐसें विवरूनि मानसीं । विटली ग्राम्यजनविषयांसी । दृढनैराश्यें हृदयस्थासी । भजतां स्वसुखासी पावली ॥४२॥
तेणें निष्कृष्टनराशा त्यजिली । दृढनैराश्यें सुख पावली । आम्हांसि ते हे प्रतीति आली । परी न वचे त्यजिली हरि आशा ॥४३॥
यालागीं नैराश्य दुर्लभतर । साधावया मुनीश्वर । शिणती परंतु दुराशा घोर । न कढी बिढार अंतरींचें ॥४४॥
हें ऐकोनि येरी ललना । म्हणती मृगांभा अमृतपाना । साम्य करितां अंतःकरणा । कां शंकाना साध्वी हो ॥५४५॥

क उत्सहेत संत्यक्तुमुत्तमश्लोकसंविदम् । अनिच्छतोऽपि यस्य श्रीरंगान्न च्यवते क्कचित् ॥४८॥

जैशी दुराशा सांसारिक । मुनिसुरमर्त्यां भवदायक । तैसा नोहे उत्तमश्लोक । हा परमपुरुष परमात्मा ॥४६॥
कृष्णसंगाची दुराशा वाढे । तेणें भवभ्रम समूळ मोडे । कृष्णध्यान जैं हृदयीं जडे । तैं अभीष्ट चढे फळ हाता ॥४७॥
कृष्णसुखाची एकांतवार्ता । त्यागावयार्थ उत्साह चित्ता । कोण मानी अभाग्य पुरता । निजात्महंता निर्दैव ॥४८॥
कृष्ण न इच्छी कमलासंग । परी ते न टकी त्याचें अंग । कोणे काळींही वियोग । न करी अव्यंग सुखवासी ॥४९॥
नारदशुकसनकादिक । कंजजहृत्कंजीं पदांक । ध्याती विसरोनि सांसारिक । ललनावेधक तो येथें ॥५५०॥
हृदयीं विसर पाडूं त्याचा । सहसा स्मरण न करूं वाचा । अभिलाष न धरूं तत्संगाचा । स्मारकसाचा परि तो कीं ॥५१॥
स्मारक होय कवण्या गुणें । उद्धवा कथिती तियें लक्षणें । पूर्वीं रक्षिलीं गोधनें । क्रीडाचरणें तें ऐक ॥५२॥

सरिच्छैलवनोद्देशा गावो वेणुरवा इमे । संकर्षनसहायेन कृष्णेनाचरिताः प्रभो ॥४९॥

क्रुष्ण स्ववेधें वेधी प्रबळ । वेधें वेधिलें व्रजमंडळ । कोण्हा आंगीं ऐसें बळ । जे तद्वेध शिथिल करावया ॥५३॥
कृष्णविस्मृति आम्हां पडती । दुःखनिवृत्ति तेणें घडती । परी तें न घडे स्मृति वाढती । कोणे रीती तें ऐका ॥५४॥
तिहीं श्लोकीं स्मृतिवर्धन । श्रीकृष्णाचें लीलाचरण । शुक भूपातें करवी श्रवण । तें व्याख्यान अवधारा ॥५५५॥
यमुनाप्रमुख अनेक सरिता । रोधस्वती कां पुलिनवंता । कृष्णक्रीडेसि यथोचिता । आठव चित्ता त्या देती ॥५६॥
गोवर्धनप्रमुख अचळ । उपात्तभूमि गंडशैल । रोध सानु शिखरें उपळ । तें क्रीडास्थळ हरि स्मरवी ॥५७॥
दरे दरकुट्या गुहा विवरें । प्रस्रवप्रपातजलें निर्झरें । शैलकक्षा द्रुमकोटरें । पाहतां स्मरे हरि हृदयीं ॥५८॥
मधुवन तालवन कुमुदवन । बेलभांडीरमुंजाविपिन । क्षुद्रकानन कामोद्यान । बहुळारण्य हरि स्मरवी ॥५९॥
कदंबद्रोणी बृहद्वन । कृष्णप्रियतम वृंदाविपिन । व्रजीं केलें जें बाल्याचरण । तें तद्ध्यान उद्बोधी ॥५६०॥
तृणावर्त्तप्रपातन । वत्सासुराचें निबर्हण । लीला केलें बकदारण । कृष्णाचरण तें स्मरवी ॥६१॥
पादस्पर्शें भंगिला शकट । पूतनेचा भरिला घोंट । अघासुराचा रोधिला कंठ । स्मरे वैकुंठ तद्योगें ॥६२॥
यमुनाह्रदीं कालियमथन । केशिअरिष्टप्रलंबहनन । व्योमासुराचें केलें दमन । तें तें कारण हरि स्मरणा ॥६३॥
इत्यादि वनोपवनींच्या क्रीडा । गाईगोपाळांमाजिवडां । वेणुवादकां परम सुघडा । माजि पवाडा कृष्णाचा ॥६४॥
सप्तस्वरीं तानमानें । आरोहावरोहरागज्ञानें । षाडवऔडवपरिज्ञानें । वेणुवादनें मन मोही ॥५६५॥
सवें संकर्षण संवगडा । सुबळ स्तोककृष्ण बोबडा । पेंधा श्रीदामा वडजा वेडा । धामा वांकुडा कृष्णसखे ॥६६॥
इत्यादिवयस्यांसमवेत । श्रृंग मोहरी वेत्र धृत । वन्यस्रजाबर्हभूषित । चीर सुपीत कौशेय ॥६७॥
ऐसी क्रीडा वनोपवनीं । अवनीं जीवनीं नंदभुवनीं । घोषवीथी कां वृंदावनीं । सशिशु नवनीतादि हरी ॥६८॥
प्रभो म्हाणोनि उद्धवासी । सर्वज्ञ समर्थ जाणोनि त्यासी । गोपी संबोधिती संतोषीं । म्हणती क्रीडा ऐसी हरि स्मरवी ॥६९॥
देतां घेतां भूषणें लेतां । खातां जेवितां प्राशन करितां । कृष्णक्रीडा आठवे चित्ता । तद्गुणकथा ते स्मरवी ॥५७०॥

पुनः पुनः स्मारयंति नंदगोपसुतं बत । श्रीनिकेतैस्तत्पदकैर्विस्मर्तुं नैव शक्नुमः ॥५०॥

बत आश्चर्यें पुनः पुन्हा । खेदें म्हणती व्रजांगना । नित्य नूतन देती स्मरणा । क्रीडा नाना कृष्णाच्या ॥७१॥
नंदगोपाचा नंदन । दधिदुग्धांचें करी हरण । यशोदे सन्निध बल्लवीगण । करिती येऊन बोभाट ॥७२॥
श्रीवत्सचिह्न वक्षस्थळीं । सुरेख कस्तुरी केशर भाळीं । माथां मयूरपिच्छावाळी । श्रवणयुगळीं कर्णिकारें ॥७३॥
सालंकृत सविभ्रम । क्रीडामंडित मिरवी धाम । सबाह्य प्रकटे मेघश्याम । विस्मृतिधर्म केंवि घडे ॥७४॥
विसरो न शकों कृष्णा । विरहतापें क्षोभे तृष्णा । साहों न शकों वियोगउष्णा । पुसों तत्प्रश्ना गतत्रपा ॥५७५॥
ऐकोनि हरीचा वेणुगीत । परिष्वंगा इच्छी चित्त । ऐकें उद्धवा तो वृत्तांत । लीलाइंगित क्रीडेसी ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP