अध्याय ४७ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


दिष्ट्या पुत्रान्पतीन्देहान्स्वजनान्भवनाति च । हित्वाऽ‍वृणीत यूयं यत्कृष्णाख्यं पुरुषं परम् ॥२६॥

पुत्रासाठीं घेती गळ । पायीं तुडविती इंगळ । व्रतें उपवास स्थळोस्थळ । करिती चिरकाळ बहुनेमें ॥३६०॥
देवद्वारीं घेत्ती धरणें । नागबळी घालिती राहणे । ऐसे यत्न पुत्राकारणें । स्नेहबंधनें प्रसवलिया ॥६१॥
ऐसा पुत्रस्नेह कठिन । दैवबळें तो खंडून । तुम्ही पावलां श्रीकृष्ण । पूर्वसाधनयोगबळें ॥६२॥
पतीपासूनि विषयसुख । इहलोक आणि परत्र देख । संतति संपत्ति सांसारिक । बंध निष्टंक सस्त्रिग्ध ॥६३॥
त्या पतिस्नेहपाशाचा भंग । करूनि पावलां श्रीरंग । पूर्वसुउकृतसाधन सांग । दैव चांग यास्तव हें ॥६४॥
आपला देह असतां बरवा । अधिकारसंसारगौरवा । रूपलावण्यभूषणभावा । सर्व वैभवा मंडन जो ॥३६५॥
त्या देहाचें प्रेम गहन । मुनीश्वरांही न सुटे जाण । तुमच्या पूर्वसुकृतेंकरून । तनुविस्मरण दैवबळें ॥६६॥
माता पिता सासू श्वशुर । भाऊ बहिणी भावे देवर । व्याही जामात सुहृद अपर । मोह दुस्तर पैं यांचा ॥६७॥
लज्जेसाठीं देती प्राण । तया सुहृदवर्गा लंघून । तुम्हीं टाकिला श्रीभगवान । दैव गहन हें तुमचें ॥६८॥
प्राणा पढियंतीं मंदिरें । स्नेहें कवळिलीं अत्यादरें । बांधतां तत्स्नेहाच्या दोरें । तुम्ही सत्वर निष्ठलां ॥६९॥
याचिमाजि घनगोधनें । ऐशीं सप्तविध बंधनें । तुम्हीं छेदूनि निष्ठुरमनें । भगवद्ध्यानें वेधलां ॥३७०॥
जो कां परमपुरुष भगवान । तो हा नंदाचा नंदन । नामें म्हणती ज्या श्रीकृष्ण । तुम्हीं संपूर्ण तो वरिला ॥७१॥
ज्या कारणास्तव कृष्णीं रति । ते पूर्वार्जित दैवसंपात्त्ति । भाग्यें वरिला जगत्पति । मज विश्रांति तद्योगें ॥७२॥

सर्वात्मभावोऽधिकृतो भवतीनामधोक्षजे । विरहेण महाभागा महान्मेऽनुग्रहः कृतः ॥२७॥

पतिपुत्रादि स्वजन धन । यातें आत्मत्वें कवळी मन । सर्वात्मभावे एकवटून । तुम्हीं भगवान वरियेला ॥७३॥
अक्षजज्ञान ज्याहूनि अध । तो अधोक्षज अगाधबोध । त्याच्या ठायीं साधनसिद्ध । एकान्तभक्ति लाधलां ॥७४॥
विरहव्यंगोक्त सुखाची वाजी । प्रसंगें महदनुग्रह आजी । मजवरी संतुष्टोनि श्रीभगवंतें । संदेशनिरूपणाच्या अर्थें ॥३७५॥
अनंतजन्मार्जित सुकृतें । मजवरी संतुष्टोनि श्रीभगवंतें । संदेशनिरूपणच्या अर्थें । मजलागिं येथें पाठविलें ॥७६॥
तुम्ही प्रसंगें विरहवार्ता । मजवरी अनुग्रह केला पुरता । आतां एकांतगोष्टी भर्ता । वदला तत्वता त्या ऐका ॥७७॥

श्रूयतां प्रियसंदेशो भवतीनां सुखावहः । यमादायागतो भद्रा अहं भर्तू रहस्करः ॥२८॥

भद्रा म्हणिजे कल्याणमूर्ति । भगवत्संगमलब्धा सती । तुमचा प्रियतम जो श्रीपति । तेणें मजप्रति प्रेरिलें ॥७८॥
त्याचा एकान्त गुह्य वृत्तांत । तुम्हांसि सुखावह परमामृत । जो मी घेऊनि आलों येथ । देऊनि चित्त तो ऐका ॥७९॥
येथ शंकों नका कांहीं । रहस्य वदतां ऐकतां पाहीं । मजहूनि रहस्यवक्ता नाहीं । म्हणोनि ये ठायीं धाडिलें ॥३८०॥
मी स्वामीचा रहस्यकर । यास्तव मम मुखींचें उत्तर । तें कृष्णोक्तिचि साचार । जाणोनि सादर परिसा हो ॥८१॥

श्रीभगवानुवाच - भवतीनां वियोगो मे न हि सर्वात्मना क्कचित् ।
यथा भूतानि भूतेषु खं वाय्वग्निर्जलं मही ॥
तथाऽ‍हं च मनःप्राणभूतेंद्रियगुणाश्रयः ॥२९॥

व्रजललनांतें शेषशायी । म्हण तुमचा मजसीं कांहीं । विवेकें पाहतां वियोग नाहीं । ऐका तेही विवंचना ॥८२॥
काय म्हणोनि वियोग न घडे । ऐसी शंका करणें घडे । मी सर्वात्मा कोण्या पाडें । हें निवाडें उमजा हो ॥८३॥
जें जें उपादानकारण । याचा तत्कार्येंशीं जाण । वियोग म्हणतां पडे मौन । अभेद म्हणोनि वनिता हो ॥८४॥
हेम आत्मा सर्व नगां । तीय आत्मा सर्व तरंगां । माती आत्मा घटमठलिंगा । तेंवि मी जगा जगदात्मा ॥३८५॥
आत्मा शब्दें बोलिजे देह । तो सर्वात्मा मीच होय । कीं मनोबुद्धिजीवसमूह । चैतन्यविग्रह तद्गत मी ॥८६॥
यदर्थीं दृष्टान्त शुकप्रणीत । भौतिकें जैसीं भूतां आंत । कार्यकारणबोधें स्थित । अनुस्थूत अभिन्नत्वें ॥८७॥
स्थावरजंगमें जें जें भूतें । महाद्भूतें उपादान त्यांतें । कार्यकारणविवेकज्ञाते । ते हे जाणते तत्त्वज्ञ ॥८८॥
चेपूनि पाहतां एक शीत । पक्कापक्क जाणिजे भात । तेंवि हा भूतभौतिकवृत्तान्त । थोडेनि बहुत विवरावा ॥८९॥
वटबीज पाहतां अणुसमान । भूम्याधारें वर्धक जीवन । तेज प्रकाशक परिपाककरण । वायु विस्तीर्ण पाल्हाळ ॥३९०॥
आकाश सच्छिद्र व्यापकत्व गगनाचें । तिर्यकपाल्हाळत्व वायूचें । ऊर्ध्व वाढवणें तेजाचें । जळें मूळाचें अधोगमन ॥९२॥
तेथ जडतां तें पार्थिव । आणि गंधगुण स्वभाव । रसाळ स्वादुत्व टवटव । इत्यादि सर्व तोयगुण ॥९३॥
रूपलाण्यझगमग । तेजें परिणाम परिपाक सांग । शीतोष्णमृदुकठिनभाग । स्पर्शादिलिंग वायूचें ॥९४॥
पोकळ सच्छिद्र म्हणोनि ध्वनि । हा शब्दगुण गगनींहूनि । स्थावरादिभौतिकस्थानीं । अभिन्नपणीं प्रकाशे ॥३९५॥
एवं वटाचा विस्तार । पारंबियांस्तव अपार । त्याचा होतां उपसंहार । निवडे साचार भूतत्वें ॥९६॥
खणूनि समूळ छेदितां वट । असंभाव्य भरती शकट । शोषूनि दाहितां हव्यवाट । मृदंश अवशिष्ट तद्भस्म ॥९७॥
तेणें मूळगर्ताचि भरे । सहसा विशेष होऊनि न थरे । जळांश परिणमे स्नेहाकारें । वैश्वानरें तो शोषे ॥९८॥
वायु क्षोभवी वैश्वानरा । तो निजांशा निवडी धूम्रा । गगन सच्छिद्र अंबरा । मिळतां पदरा न राखे ॥९९॥
याचि प्रकारें चराचरीं । भूतें अभिन्न भौतिकाकारीं । शेखीं उरती उपसंहारीं । निज निर्धारीं निजरूपें ॥४००॥
तेंवि मी सर्वात्मा उपादान । मनोबुद्धिप्राणेंद्रियादि गुण । एतदाश्रय अभिन्न पूर्ण । वियोग म्हणोन न मनावा ॥१॥
अभेदें ऐक्य बोलिलें ऐसें । तथापि कार्यकारणवशें । भेदावाप्ति संचली असे । तरी कायसें एकत्व ॥२॥
कीं सर्वांमाजि अनुगत आत्मा । परि सर्वत्वाची पृथग्गरिमा । ऐसिया द्वैतापत्तिधर्मा । भेदनामा न म्हणावें ॥३॥
ऐसा भेद मानाल जरी । यदर्थीं परिहार बोले हरि । तो ऐकोनि अभ्यंतरीं । व्रजसुंदरीं विवरा हो ॥४॥

आत्मन्येवात्मनात्मानं सृजे हन्म्यनुपालये । आत्ममायानुभावेन भूतेंद्रियगुणात्मना ॥३०॥

तरी सर्व आणि सर्वानुगत । कार्यकारण अभेद नित्य । हाचि उमजेसा वृत्तांत । नावेक स्वस्थ परिसा हो ॥४०५॥
आपुले ठायीं आपणा करून । आपणापेंचि सृजी जाण । आपण आपुलें करी पालन । आत्मोपसंहरण आत्मत्वीं ॥६॥
जैसा एकचि सुप्त पुरुष । अन्यथाबोधें स्वप्नाभास । सृजूनि व्यवहार पालनें तोष । ग्रासी अशेष चेइरा ॥७॥
आत्मा म्हणाल स्वतःसिद्ध नित्य । तेथ कें सृष्टि स्थिति अंत । तरी मनोबुद्धिगुणेंद्रियसंघात । मायाबिंबित प्रकाशी ॥८॥
जेंवि मनेंचि स्वप्न दिसे नासे । तेंवि अविकार आत्मा मायावशें । सृजनावनांत अभेददशे । भेदाचि ऐसें प्रतिपादी ॥९॥
म्हणाल आत्मा निर्विकार । तो जरी मायागुणीं सविकार । तैं त्या गुणदोषसंचार । दिसे साचार झळंबला ॥४१०॥
येही शंकेचा परिहार । ऐका साध्वी हो साचार । आत्मा शुद्ध निर्विकार । गुणादिविकार त्या न शिवे ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP