अध्याय ४७ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


विसृज शिरसि पादं वेद्म्यं चाटुकारैरनुनयविदुषस्तेऽभ्येत्य दौत्यैर्मुकुंदात् ।
स्वकृत इह विसृष्टापत्यपत्यन्यलोका व्यसृजदकृतचेताः किन्नु संधेयमस्मिन् ॥१६॥

क्षमापनार्थ पुढें पुढें । रिघोनि चरण धरिसी चाडे । येणें आमुचें प्रसादन न घडे । वाक्य रोकडें हें मानी ॥८१॥
पद विसर्जूनि परता सर । कासया चरणीं ठेविसी शिर । आम्ही जाणतों तवांतर । तूं तत्पर स्वकार्या ॥८२॥
निर्भर्त्सितां न वचसी मागें । हें लाघव तुजचि जोगें । प्रसादनाचीं जितुकीं आंगें । तें तें श्रीरंगें तुज कथिलीं ॥८३॥
यालागीं तूं प्रार्थनाचतुर । निर्भर्त्सितांही स्वकार्यपर । विनयभावें होसी नम्र । हेंही समग्र जाणतसों ॥८४॥
मुकुंदापासूनि आलासि येथें । तेणें दौत्य शिक्षिलें तूतें । तदनुसार तूं आम्हांतें । निज इंगितें प्रकटिसी ॥१८५॥
चाटु चटुला रसिका वाणी । सलगी करूनि धरिजे पाणि । निर्भर्त्सितां लागिजे चरणीं । हे शिकवणी पैं त्याची ॥८६॥
अनुनयविदुषा तच्छिक्षिता । यालागीं तुझा विश्वास चित्ता । नुपजे तद्वत करिसी घाता । या वृत्तांता शंकतसों ॥८७॥
म्हणसी तुमचा अपराध काय । करूनि गेला यादवराय । तरी हा ऐकें अभिप्राय । उकलूं हृदय तुजपुढें ॥८८॥
अधरमाधुरी वेणुमयी । श्रवणें प्राशिली जिये समयीं । तेव्हांचि वेध लावूनि हृदयीं । प्रपंचविषयीं स्मृति हरिली ॥८९॥
मग हा एकचि आवडला । जीवभाव यासीच जडला । इंद्रियग्राम उद्वस पडला । तेणें विघडला संसार ॥१९०॥
येणें वेधूनि निजात्मवेधें । प्रपंच भंगिला प्रवृत्तिरोधें । आम्ही भाळलों सुरतानंदें । शेखीं मुकुंदें विसर्जिलें ॥९१॥
पति अपत्यें जनानी जनक । स्वजन सोयर आप्तलोक । इष्ट मित्र गोत्र अशेख । त्यजिलीं सम्यक मदर्थ ॥९२॥
मजकारणें इहामुत्र । त्यागूनि जालिया एकाग्र । ऐसें जाणोनियां यदुवीर । जाला निष्ठुर कृतघ्नवत् ॥९३॥
यालागीं तो अनियतचित्त । म्हणतां संदेह असे येथ । ऐसींचि कर्में असंख्यत । स्मरती हृदयांत तें ऐक ॥९४॥

मृगयुरिव कपींद्रं विव्यधे लुब्धधर्मा स्त्रियमकृत विरूपां स्त्रीजितः कामयानाम् ।
बलिमपि बलिमत्त्वाऽवेष्टयद्ध्वांक्षवद्यस्तदलमसितसख्यैर्दुस्त्यजस्तत्कथार्थः ॥१७॥

अरे भ्रमरा निश्चयें जाण । पूर्वींच कृष्णाचें कर्माचरण । हृदयामाजी अनुस्मरण । होतां दारुण भय वाटे ॥१९५॥
पूर्वीं यीणें राघवरूपें । केलीं क्रूरकर्में अमूपें । मधुपा ऐक सांगों तुजपें । नमनीं सोपें स्नेह याचें ॥९६॥
लुब्धकापरी लपोनि येणें । वाळी कपींद्र घेतला प्राणें । वृथा क्रूर हा कार्याविणें । अंतःकरणें द्रवेना ॥९७॥
पारधी मांसभक्षणासाठीं । लपोनि मृगातें वधी कपटी । वाळी मारोनि कोण ते गोष्टी । येणें शेवटीं साधिली ॥९८॥
ऐसा वृथाचि निर्दय क्रूर । कपटि कृतघ्न हा निष्ठुर । कळों नेदी निजांतर । परम कातर कितवेंद्र ॥९९॥
स्त्रियां लेंकुरें याचीं रडती । ऐसा कळवळा न धरी चित्तीं । लपोनि मारिला वानरपति । कोण संपत्ति जडियली ॥२००॥
कोण सुकृत कीं यश कीर्ति । याची कीजे केंवि संगति । स्मरतां ऐसी पूर्वस्थिति । रोमांच येती सर्वांगा ॥१॥
आणिक याची ऐकें गोठी । सीता हरविली पंचवटी । तिच्या विरहें फिरतां सृष्टी । न मनी पोटीं शुभाशुभ ॥२॥
सीता परतंत्र केवळ । स्त्रीजितपणाचें दावी शीळ । आत्माराम हा शब्द विफळ हृदय कुटिळ नैर्घृण्यें ॥३॥
कामसंप्राप्तिसाधनपरा । येणें प्रेरूनि सहोदरा । विटंबिली सकाम दारा । सघ्रानश्रोत्रा छेदूनी ॥४॥
शूर्पणखा ते राक्षसवनिता । विटंबिली स्मर याचितां । ऐसीं याचीं कर्में स्मरतां । उपजे चित्ता घोर भय ॥२०५॥
याहूनि पूर्वीं वामनरूपें । साक्षर देखोनियां साक्षेपें । शुक्रें वर्जितांही बळिनृपें । विविधा कल्पें समर्चिला ॥६॥
त्याचा सेवूनि दत्त बळी । त्रिपादभूदानाच्या छळीं । बलात्कारें बांधोनि बळी । मग पाताळीं घातला ॥७॥
विष्टपापासोनि अधोगति । केली सुतळलोकावाप्ति । अगाध त्याची प्रतापशक्ति । तेणें द्वास्थीं प्रतिष्ठिला ॥८॥
इत्यादि कर्में पुरातनें । याचीं होतां अनुस्मरणें । आंत बाहिर काळा मनें । त्यातें सौजन्यें न भजों रे ॥९॥
तथापि मधुपा ऐसें म्हणसी । विरहें गातां कां दिननिशीं । आम्ही नाठवूं जर्‍ही त्यासी । तद्गुण आम्हांसि बळें स्मरती ॥२१०॥
पिसें उमजोनि पिसेपणा । सांडूनि धरूं पाहे स्मरणा । परी ते दुस्त्यज भ्रांति करणां । भुलवूनि मना बव्रळवी ॥११॥
तेंवि तत्कथारूप अर्थ । दुस्त्यज मानसा तद्गत स्वार्थ । येणें बुडविला उभय स्वार्थ । वृथा किमर्थ प्रार्थिसी ॥१२॥
जर्‍ही आमुच्या कळलें चित्ता । त्रिवर्गाची सफळित लता । उपडोनि सांडीं यांची कथा । तथापि समर्था न हों त्यागीं ॥१३॥
ऐसियासि कीजे काय । भ्रमरा सांगें कांहीं उपाय । विरहिणीचा पाड काय । विदुषसमुदाय भ्रमग्रस्त ॥१४॥

यदनुचरितलीलाकर्नपीयूषविप्रुट्सकृददनविधूतद्वंद्वधर्मा विनष्टाः ।
सपदि गृहकुटुंबं दीनमुत्सृज्य दीना बहव इह विह्म्गा भिक्षुचर्यां चरंति ॥१८॥

ज्या हरीचीं अवतारचरितें । अनुस्मरतां त्या लीला चित्तें । श्रवणामृतें सेवितयांतें । अगाध सुकृतें तो लाभ ॥२१५॥
लीलाश्रववनसुधेची कणिका । एकवारही सेविता रसिका । द्वंद्वधर्मादि कळिमळपंका । धुनी होय तत्काळ ॥१६॥
सूर्योदयीं निरसे तम । कीं स्पर्शमणीच्या संगें हेम । सांडी लोहकाळिमा नाम । द्वंद्वधर्म तेंवि हरती ॥१७॥
लीलाश्रवणामृतकनिकापान । करितां निर्द्वंद्व होती सुज्ञ । अतएव विनष्ट त्या अभिधान । नष्टांसमान नैष्ठुर्यें ॥१८॥
नष्टांसमान म्हणाल कैसे । कुटुंब पावतां दीनदशे । कृपेनें न द्रवती मानसें । तद्दुःखलेशें झळंबोनी ॥१९॥
निर्दय म्हणोनि असत्तुल्य । येर्‍हवीं केवळ वैराग्यशीळ । स्वप्नाभास प्रपंच टवाळ । कुटुंब सकळ त्यासि गमे ॥२२०॥
स्वयें कुटुंबाचिया बिघडें । अन्नवसनांचें सांकडें । भोगविहीन्न जैसें मडें । तैसें कोरडें तनुचव्र्म ॥२१॥  
त्यांसि धरावया डाहाळी । ना बैसावयासि साउली । दीनें बापुडीं भगणें केलीं । लीलाश्रवणें याचेनी ॥२२॥
विहंग भ्रमती नभोमंडळीं । नभ त्याभवतें वरतें तळीं । तैसी जयासि सर्वकाळीं । हरिवेगळी अकिंचनता ॥२३॥
प्राणप्रवृत्तीलागिं द्रुमा । टाकूनि जाणें विहंगमा । तेंवि क्षुत्तृड्भयोपशमा । भिक्षुधर्मा अनुसरणें ॥२४॥
ज्याचेनि लीलाश्रवणामात्रें । भ्रमती ऐसीं विज्ञानपात्रें । ऐसें कळतां आम्ही श्रोतें । ऐकोनि वक्त्रें गातसों ॥२२५॥
निर्दय कृतघ्न तापकर । प्रत्यक्ष कलतांही अंगार । होऊं न शकती जन निष्ठुर । होती सादर तत्संगा ॥२६॥
तैसें लीलालावक याचें । प्रत्यक्ष भ्रमकर कळतां साचें । त्यागूं न शको हें तयाचें । योगसत्तासामर्थ्य ॥२७॥
दुस्त्यज याचें लीलाश्रवण । म्हणोनि भ्रमती होऊनि दीन । त्यागूं शकते जरी सज्जन । तरी संपन्न्न ते असते ॥२८॥
लीलादुस्त्यजत्व निंदून । ऐसें वदलें बल्लवीवदन । तें हें केलें निरूपण । परमार्थकथन तें ऐका ॥२९॥
हरिचरितामृतलीलाकणिका । श्रवणदुर्लभ ब्रह्मादिकां । सुकृती लाहती न फवे आणिकां । जेंवि वनिकां नृपपदवी ॥२३०॥
लीलाकणिकामृतरसपानें । एकवारही मातले मनें । तत्काळ द्वंद्वधर्मादि वृजिनें । जालीं भग्नें निःशेष ॥३१॥
निर्ममनिर्द्वंद्व निरंतर । तत्काळ कुटुंबगृहपरिवार । त्यजिती मानूनि स्वप्नाकार । तुच्छ निःसार फळकट जें ॥३२॥
धीर म्हणिजे व्यवसितमति । दीन म्हणिजे अकिंचन वृत्ति । अपरिग्रही अनिकेतस्थिति । बहुधा भ्रमती परमहंस ॥३३॥
विह्म्गमांमाजि हंसवर । कां जे निवडिती क्षीरनीर । तैसे सारासारविचारचतुर । हंसांसमान परमहंस ॥३४॥
सारासारविवेकज्ञानें । असारप्रपंचा सांडणीं । सारामृतत्व अपरोक्षपणें । लीलाश्रवणें पावले ॥२३५॥
याम्सि दुस्त्यज तत्कथार्थ । त्यांचा हाचि परम पुरुषार्थ । हा त्यागूनि कोण तो स्वार्थ । भवअनर्थ जोडावा ॥३६॥
भ्रमरा तूं जरी बोलसी ऐसें । पूर्वीं एकांतीं हृषीकेशें । काय हेंचि कथिलें नसे । निश्चय वसे तुजपासीं ॥३७॥
तरी येविषीं ऐकें मात । आम्ही मानोनि वचन सत्य । नेणों कपटाचा वृत्तांत । विश्व्वासघातकारक जो ॥३८॥

वयमृतमिव जिह्मव्याहृतं श्रद्दधानाः कुलिकरुतमिवाज्ञाः कृष्णवध्वो हरिण्यः ।
ददृशुरसकृदेततन्नखस्पर्शतीव्रस्मररुज उपमंत्रिन्भण्यतामन्यवार्ता ॥१९॥

अरे उपमंत्री दौत्यचतुरा । न वदें तद्वार्ताउत्तरा । ज्या कारणास्तव त्या विचारा । ऐकें विचारा सांगतसों ॥३९॥
कुलिक म्हणिजे मृगयानिरत । कपटें गाऊनि गोरीगीत । कृष्णमृगांगना कापट्यरहित । मानिती सत्य श्रवणसुधा ॥२४०॥
नेणती निषादहृदयींच्या कपटा । सत्य मानूनि धरिती निष्ठा । तंव अकस्मात देखती कष्टा । बाणीं वोखटा विंधी तैं ॥४१॥
मग त्या सक्षतहृदया वनीं । दुःखें भोगिती कुरंगिणी । याचिप्रकारें आम्ही विरहिणी । विश्वासोनि दुखावलों ॥४२॥
जिह्म म्हणिजे जो कुटिल कृष्ण । सत्य मानूनि तद्भाषण । आम्ही विश्वासलों पूर्ण । स्पृहा धरून तद्रसा ॥४३॥
पारधियाच्या गायनापरी । सत्य मानूनि अभ्य़ंतरीं । विश्वासलो कुरंगनेत्री । कपटकातरी नेणोनी ॥४४॥
तंव निषादें कपतमारें । हरिणी विंधिल्या क्रूरशरें । तैसेंचि आम्हांसि केलें येरें मधुरोत्तरें भुलवूनी ॥२४५॥
विश्वासताम्चि सुखसंगमा । नखखरक्षतें उरोजपद्मम । करूनि प्रदीप्त केलें कामा । पावलों भ्रमा स्मररुग्णा ॥४६॥  
कंदर्पबाणांच्या वेदना । निषादबाणापरिस कठिना । यास्तव न करीं तद्गुनकथना । अन्यवार्ता वद वदनें ॥४७॥
ऐसें म्हणोनि निष्ठुर चित्तें । भ्रमरा झाडूनि टाकिलें हातें । उडोनि गेला मथुरापंथें । पुढती तेथेंचि पातला ॥४८॥
त्यातें देखोनि वदती काय । तो गोपींचा अभिप्राय । परिसावया सावध होय । म्हणे मुनिवर्य कुरुनाथा ॥४९॥

प्रियासख पुनरागाः प्रेयसा प्रेषितः किं वरय किमनुरुंधे माननीयोऽसि मेंऽग ।
नयसि कथमिहास्मान्दुस्त्यजद्वंद्वपार्श्वं सततमुरसि सौम्य श्रीर्वधूः साकमास्ते ॥२०॥

मधुपें जाऊनि मधुपापासीं । आमुची अवस्था सांगूनि त्यासी । पुढती आमुतें न्यावयासी । तत्प्रेषित पातला ॥२५०॥
यया भावना त्या भ्रमरातें । बोलती विरहाकुलितचित्तें । प्राणप्रियाच्या सखया येथें । कीं तेणें तूतें पाठविलें ॥५१॥
आमुचा प्रियतम जो मुरारि । तेणें द्रवोनि अभ्यंतरीं । तुज पाठविलें झडकरी । कोणा विचारीं आलासी ॥५२॥
कोमळ संबोधनें अंग । म्हणती भ्रमरा वृत्तांत सांग । आम्हांसि मान्य तूं परम योग्य । काय श्रीरंग तुज वदला ॥५३॥
कोणे प्राप्तीची इच्छा पोटीं । ते तूं निःशंक सांगें गोठी । ऐशा सम्मानें पावल्या तुष्टि । पुन्हां वाक्पुटीं त्या वदती ॥५४॥
त्यापें आम्हांसि नेसी काय । तरी तूं ऐकें अभिप्राय । आम्ही न सांडितां आपुले ठाय । परी दुस्त्यज होय तन्मिथुन ॥२५५॥
त्याचा द्वंद्वीभाव हृदयीं । आम्हां दुस्त्यज बैसले ठायीं । ऐसियाचे पार्श्वसोयी । कोण्या उपायीं तूं नेसी ॥५६॥
दुरी असतां द्वंद्वचिंतन । दुस्त्यज त्यागूं न शकेमन । मा समीप नेलिया पुढती जाण । गेलिया प्राण न टाकवे ॥५७॥
म्हणसी लौकिकीं स्त्रियांचा संग । करूं न शकें मेघरंग । तरी श्रीनामका वधू चांग । वसवी सांग निज हृदयीं ॥५८॥
श्रीसहवास निरंतरीं । न लजे धरितां हृदयावरीं । त्याचें पार्श्वीं आम्ही नारी । कवणें प्रकारीं न शोभों ॥५९॥
ऐसिया बोलोनि व्यंग्योक्ति । तेणें प्रसन्न केली मति । ऐसें भावूनि आपुल्या चित्तीं । सप्रेम पुसती हरिवृत्त ॥२६०॥
सौम्य म्हणिजे विषादरहित । आमुच्या प्राणप्रियाचा दूत । साधु जाणसी दौत्यकृत्य । मान्य संमत तूं आम्हां ॥६१॥
बत या अव्ययाचा अर्थ । गोपीमानस संतोषभरित । अपि म्हणिजे कांहीं हेत । धरूनि स्मरत हरि आम्हां ॥६२॥
तोचि वृत्तांत सविस्तर । सौम्यनामें बोधूनि भ्रमर । गोपी पुसती तो विचार । श्लोकाधारें परियेसा ॥६३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP