अध्याय ४७ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


काचिन्मधुकरं दृष्ट्वा ध्यायन्ती कृष्णसंगमम् । प्रियप्रस्थापितं दूतं कल्पायित्वेदमब्रवीत् ॥११॥

उद्धवीं देऊनि दौत्यदृष्टि । भ्रमरमिसें व्यंग्यगोष्टी । कृष्णसंगम चिंतूनि पोटीं । बोले गोरटी व्रजललना ॥१७॥
कृष्णसंगम ध्यात असतां कोणीएक भ्रमर अवचिता । देखोनि म्हणे गा दूत तत्त्वता । प्राणप्रियें पाठविला ॥१८॥
ममांतरींचा विषयशीण । निरसूनि करावया प्रसन्न । मधुकररूपी दूत कल्पून । बोले वचन तें ऐका ॥१९॥

गोप्युवाच - मधुप कितवबंधो मा स्पृशांघ्रिं सपत्न्याः कुचविलुलितमालाकुंकुमश्मश्रुभिर्नः ।
वहतु मधुपतिस्तन्मानिनीनां प्रसादं यदुसदसि विडंब्यं यस्य दूतस्त्वमीदृक् ॥१२॥

अरे मधुपा म्हणे ते वधू । केवाळ कपटियाचा तूं बंधु । तुझा स्पर्शही निषिद्धु । आमुचें पद न नमीं तूं ॥१२०॥
माझिये प्रसन्नतेलागूनी । माथां ठेवूं पाहसी चरणीं । तरी हे अनर्ह तुमची करणी । आम्हांलागूनि अश्लाघ्य ॥२१॥
किमर्थ अश्लाघ्य ऐसें म्हणसी । तरी तूं कृष्णाचा सहवासी । वनमालेच्या आमोदरसीं । सदा लुंटसी त्यासरिसा ॥२२॥
कृष्णातुल्य तुझी कांति । हा निश्चय आमुच्या चित्तीं । आजि विपरीत चिह्नावाप्ति । तें मजप्रति जाणविलें ॥२३॥
कृष्ण गेला मथुरापुरीं । तेथील नागरा नव सुंदरी । तेहीं भोगिला मुरारि । चातुर्यकुसरीं स्मरलास्यें ॥२४॥
कोणें कथिलें तुम्हांपासीं । हें जरी कांहीं आम्हां पुससी । तरी तें तुझिये प्रतीतीसी । साक्षी देसी तूं येथें ॥१२५॥
कैसी साक्ष म्हणसी जरी । तरी आमुचे संवतिचिये उरीं । गाढालिंगन देतां हरि । माळा माझारी कुचुंबली ॥२६॥
कुंकुम माखलेलं संवतीकुचां । सुमनां लेपलें वनमाळेच्या । तुवां स्वादितां आमोदा तिच्या । लोहींवरुचा स्मश्रूतें ॥२७॥
तयावरून कळलें आम्हां । कीं तूं कृष्णदूत दौत्यकामा । विनवावया आलासि आम्हां । पादपद्मा नमूं पाहसी ॥२८॥
तरी तूं आतां तेथेंच जाय । त्या संवतीचे वंदीं पाय । त्याचीच प्रसन्नता होय । त्या उपायें विनवीं कां ॥२९॥
आमुचे प्रसन्नतेवीण । काय तयासि कारण । जाऊनि त्याचेचि धरीं चरण । करीं प्रसन्न कृष्णा त्या ॥१३०॥
कृष्ण त्यांचाचि प्रसाद लाहो । आणि त्यांचाचि हो कां नाहो । यादवसभेचा समुदाय पाहो । हें लाघव सोंगाचें ॥३१॥
सोंग कैसें म्हणसी जरी । दूत ओळखों आम्ही नारी । मा तो यादवसभा चतुरीं । केंवि मुर्रारि न लक्षिजे ॥३२॥
माळा रुळती कुचकुंकुमीं । अंजनांक वदनपद्मीं । दशनक्षतीं अधरलक्ष्मी । कीं सभा ललामीं न लक्षिजे ॥३३॥
ऐसें उपहासासि कारण । यादवसभेसि ज्याचें चिह्न । मागें पुढें थोर लहान । वितर्क जन करी ज्याचे ॥३४॥
जरी तूं म्हणसी कृष्णें काय । तुमचा अपकार केला आहे । तरी कथितों उकलूनि हृदय । परिसता होय सारंगा ॥१३५॥

सकृदधरसुधां स्वां मोहिनीं पाययित्वा सुमनस इव सद्यस्त्यज्यतेऽस्मान्भवादृक् ।
परिचरति कथं तत्पादपद्मं तुज पद्मा ह्यपि बत हृतचेता उत्तमश्लोकजल्पैः ॥१३॥

जैसियां तैसाचि आवडे । समानशीळां मैत्र घडे । तुल्यव्यसना समान कोडें । आनन्न जोडे सौहार्द ॥३६॥
तुजचि सारिखा मुकंद । म्हणोनि दोघांचा मित्रवाद । कैसा म्हणसी तरी तूं विशद । ऐक सावध चंचरीका ॥३७॥
तुवां दुर्मनें सुमनीं रति । धरूनि कार्यापुरती प्रीति । त्याजिसी आभोदसेवनांतीं । पुन्हा परती न करिसी ॥३८॥
अन्य सुमनीं जाऊनि रमसी । गुंजारवें तथेंचि भ्रमसी । पूर्वस्नेहाचिये विषीं । नव्हे मानसीं आठवण ॥३९॥
मधुपा म अधुप तैसाचि हरि । सबाह्य कृष्ण तुझिया परी । आम्हां अधारामृतमाधुरी । एके अवसरीं प्राशविली ॥१४०॥
सप्तस्वरीं वेणुमयी । श्रवणीं पडतां विश्व मोही । तिणें मोहितां देहीं गेहीं । सर्व विषयीं विस्मरण ॥४१॥
मग त्या अधरसुधेच्या पाना । भाळोनि आम्ही भरलों राना । भुलोनि कृष्णाच्या लावण्या । नाना छळणा साहिलें ॥४२॥
वनीं फिरलों पिशाचवत् । विरहें पुलिनीं गाइलें गीत । त्याच्या छंदें केलें नृत्य । अमोघसुरत तैं केला ॥४३॥
अगाध प्रीति आम्हांचिवरी । प्रेमा वाढला परस्परीं । आतां सांडूनि सुमनापरी । गेला मुरारि तुज ऐसा ॥४४॥
मथुरेचिया नवनागरा । भुलला र्त्यांच्या स्मरसंगरा । मार आमुच्या करी मारा । हें श्रीधरा कळेचिना ॥१४५॥
एवढें निष्ठुर ज्याचें चित्त । तो कृतघ्न कृतकायार्थ । मैंद जैसा होऊनि आप्त । करी घात नैर्घृण्यें ॥४६॥
अरे द्विरेफा हें आश्चर्य । खेदें आमुचें फुटतें हृदय । ऐसियाचेही सेविते पाय । पद्म काय म्हणोनियां ॥४७॥
तोही कळला आम्हांसि भाव । उत्तमश्लोक हें ऐकोनि नांव । बहुतेक तिचा भुलला जीव । महानुभावयशःकथनें ॥४८॥
उत्तमश्लोक पुण्यश्लोक । अभेद अव्यय विश्वव्यापक । आनंदकंद जगत्पालक । हा स्तवनघोष श्री भुलवी ॥४९॥
रमा भुलली लटिक्या कथा । हा जरी सर्वांतरात्मा असता । तरी आमुची विरहव्यथा । स्वयें नेणता निजहृदयीं ॥१५०॥
रमा अविचक्षण बापुडी । कीर्ति ऐकोनि जाली वेडी । नेणे याच्या कापट्यखोडी । दिधली बुडी दृढ चरणीं ॥५१॥
तैशा नहों आम्ही ललना । तत्कापट्यचर्याभिज्ञा । पुन्हा न भुलों त्या कृतघ्ना । वृथा वल्गना कां करिसी ॥५२॥

किमिह बहु षडंघ्रे गायसि त्वं यदूनामधिपतिमहगृहणामग्रतो नः पुराणम् ।
विजयसखसखीनां गीयतां तत्प्रसंगः क्षपितकुचरुजस्ते कल्पयतीष्टमिष्टाः ॥१४॥

शुक म्हणे गा कुरुपाळका । स्वभावें गुंजतां चंचरीका । तें ऐकोनि कृतवितर्का । व्रजनायिका बोलती ॥५३॥
आमुचें मोहरावया मन । भ्रमर गातसे कृष्णगुण । ऐसा वित्तर्क मनीं कल्पून । बोलती वचन मधुपेंसीं ॥५४॥
अरे भ्रम किमर्थ येथ । बहुधा गासी यदुवरनाथ । आम्हांसि त्याचे गुण समस्त । पूर्वींच विदित कविवदनें ॥१५५॥
आम्हांपुढें त्याची कथा । तूं गासील तितुकी वृथा । आम्ही जाणतों त्याचिया चरिता । पूर्ववृत्तांता मुळींहुनी ॥५६॥
अगृहाण जे अपरिग्रही । परमहंसादि वेषें पाहीं । ज्यातें बहुधा कवळिती हृदयीं । निर्लज्जदेहीं सर्वदा ॥५७॥
पूर्वीं बहुतीं अनुभविला । पुराणपुरुष हा दादुला । वृथा त्या गुनगणमाळा । न रुचे आम्हांला तव वदनें ॥५८॥
श्रीकृष्ण जो विजयसखा । मथुरेचिया ललना सुमुखा । सांप्रत त्याचिया जाल्या सख्या । तूं या कौतुका गा तेथें ॥५९॥
प्रस्तुत त्या प्रियतम त्यासी । तयांपुढें तूं तद्यश गासी । हरिइष्टा त्या अभीष्टासी । श्रवणतोषीं तुज देती ॥१६०॥
म्हणसी कैशा त्या हरिइष्टा । हृदयीं कवळूनियां वैकुंठा । क्षपिती कुचामया दुष्टा । रतिसंतुष्टा हरिसंगें ॥६१॥
तोही रंगला त्यांचेनि रंगीं । भजलीं परस्परें अंगांगीं । तंव गायनें तत्प्रसंगीं । वोपिती शुभांगी अभीष्टा ॥६२॥
जरी तूं म्हणसी अवो माय । ऐसें बोलणें उदास काय । तुम्हांसि स्मरोनि कृष्णहृदय । व्याकुळ होय स्मरतापें ॥६३॥
तेणें स्वमुखें आज्ञावचनीं । तुम्हांसि विनवावयालागुनी । मज धाडिलें वृंदावनीं । ऐसें वदनीं जरी वदसी ॥६४॥
तरी ऐकें रे अळिउळतिळका । कृष्ण आम्हांसि आहे ठाउका । त्या दुर्लभ तिहीं लोकां । माजि नायिका कवण असे ॥१६५॥

दिवि भुवि च रसायां काः स्त्रियस्तद्दुरापाः कपटरुचिरहासभ्रूविजृंभस्य याः स्युः ।
चरणरज उपास्ते यस्य भूतिर्वयं काअपि च कृपणपक्षे ह्युत्तमश्लोकशब्दः ॥१५॥

स्वर्गमृत्युपाताळभुवनीं । दुष्प्राप वनित्ता त्यालागुनी । ऐसी न लक्षे आमुच्या नयनीं । काय म्हणोनि तें ऐका ॥६६॥
पद्मफुल्लार वदनकमळ । वाचा चंदनाहूनि शीतळ । हृदयीं कर्तरी कातर कुटिळ । हें चिह्नें केवळ धूर्ताचीं ॥६७॥
जळीं गळांतें गिळी मासा । लोभें भाळूनि बडिशामिषा । मग मत्स्यघ्र वोपी क्लेशा । पंचत्वदपशापर्यंत्र ॥६८॥
कीं अंडजां टाकुनि कण । निषाद विश्वासें करी हनन । तैसाचि कितव कामिनीगण । भुलवी वेधून स्मितवक्त्रें ॥६९॥
कपटरूप रुचिरहास । व्यंकट कटाक्ष पैं सविलास । लावण्यरसिका इंगितास । दावूनि वनितांस वश करी ॥१७०॥
हें तों प्रतीत आमच्या देहीं । आणिकांसि पुसणें काई । रमा मोहिली या उपायीं । तेथ पाड काई इतरांचा ॥७१॥
बापुडी नेणे याचिया कपटा । विश्वमोहिनी भुलली नटा । चरण उपासी धरूनि निष्ठा । तेथ आम्ही रानटा केउतिया ॥७२॥
अरे कपट्या चंचरीका । पूर्ण कपटियाच्या सेवका । जाऊनि बोधीं निजनायका । नामविवेका विवरोनी ॥७३॥
यद्यपि ऐसा जर्‍ही कितव । तथापि उत्तमश्लोक नांव । वागवी त्याचा अभिप्राव । कां पां स्वयें विवरीना ॥७४॥
कृपणा दीनावरी अनुकंपा । जैसी माउली कळवळी स्तनपा । तैसा सदय पुरुष तोचि मधुपा । उत्तमश्लोक बोलावा ॥१७५॥
मधुपा जाऊनि कृष्णापासीं । प्रकट गोष्टी बोलें ऐसी । जे उत्तम अभिधानासी । कळंक न लवीं कापट्यें ॥७६॥
इंदिरादि आम्ही ललना । भुललों उत्तमश्लोकाभिधाना । आतां याचिया कितवपणा । जालों अभिज्ञा विरमोनी ॥७७॥
उत्तमश्लोकनामत्रपा । धरूनि कांहीं पूर्व कृपा । अभिवर्द्धवीं ऐसें मधुपा । कंदर्पबापाप्रति बोलें ॥७८॥
ऐशा वितर्कें विरहिणी । भ्रमराप्रति बोलती वचनीं । तंव तो पादांगुष्ठाहुनी । पुढें सरकोनि पातला ॥७९॥
इतुक्यावरूनि विशेष तर्का । करिती जाली व्रजनायिका । तें तूं एकें कुरुवरतिलका । हरिगुणरसिका श्रवणज्ञा ॥१८०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP