अध्याय ४६ वा - श्लोक ४६ ते ४९

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


उद्गायतीनामरविंदलोचनं व्रजांगनानां दिवमस्पृउशद्ध्वनिः ।
दध्नश्च निर्मंथनशब्दमिश्रितो निरस्यते येन दिशाममंगलम् ॥४६॥

ऐशिया व्रजांगना निर्दोष । गाती उच्चस्वरीं हरियश । मिश्रितदधिनिमर्थनीं घोष । तो ध्वनिविशेष नभ व्यापी ॥१७॥
कमललोचनाप्रति गौळणी । सप्रेम गाती उच्चस्वनीं । माजी मिश्रित मथनध्वनि । फांके गगनीं दशदिशा ॥१८॥
हरियशोध्वनि श्रवणीं पडतां । दशदिशांची अमंलता । हरूनि प्रकटी सुमंगलता । तें नृपनाथा अवधारीं ॥१९॥
मधुरस्वरीं वल्लकी वाजे । तेणें तोषती सुर नर राजे । रासभहेषित गगनीं गाजे । तें धिक्करिजे सर्वत्रीं ॥५२०॥
तैसें विषयार्थ जें गायन । तें तें रासभहेषित जाण । अचेतवल्लकीसमान मान । एकाग्र मन हरिरंगीं ॥२१॥
गायनविद्या सप्तवरीं । अभ्यासिली कळाकुसरी । मन कल्पना विषयीं करी । तैं रासभस्वरी विताळ तें ॥२२॥
अभ्यासरहित सप्रेमभरें । हरियश गातां उच्चस्वरें । चितैकाग्र्‍यें विवर्त विसरे । मंगळ पसरें तद्गाना ॥२३॥
काष्ठवल्लकीसमान तारा । अभ्यास्त गायन सप्तस्वरा । माजी प्रेमाचा उभारा । एकाग्रचित्तें शोभविला ॥२४॥
हरि सर्वात्मा निर्विकार । होतां सप्रेम कीर्तनगजर । कीर्तनीं प्रकटे सत्य साचार । हरिजागर या नांव ॥५२५॥
अभ्यास सप्रेम वरिष्ठ । अभ्यासी कीर्तननिष्ठ । गाती सप्रेमें वैकुंठ । वेधें प्रकट हरि होय ॥२६॥
एवं सप्रेम हरिजागर । प्रेमरहित जे सप्तस्वर । ते उलूकजंबुकसूकरखर । वृथा करकर पोटार्थ ॥२७॥
सप्रेमगानें वेधे वृत्ति । तेणें अमंगळ भेदनिवृत्ति । अभेद मंगळ सर्वां भूतीं । हरिगुणकीर्ति विस्तारी ॥२८॥
एवं दधिमथनाचा ध्वनि । मिश्रित गोपी उद्गायनीं । गाती सप्रेम चक्रपाणि । तैं दिड्मंडळ छेदूनि मंगळ दे ॥२९॥
इत्यादिध्वनींचिया गजरीं । चेइली संपूर्ण व्रजपुरी । शौचवीथींत तंद्रिता नारी । परस्परें गुजबुजिती ॥५३०॥
उद्धवनंदसंवादगती । सरोनि गेली सर्व राती । उषःकाळाची अभिव्यक्ति । केली ग्रंथीं ते कथिली ॥३१॥
प्राची अरुणें सुरंग झाली । कीं त्या कुंकुम रेखीलें भाळीं । उद्धवें स्नान तेचि काळीं । यमुनाजळीं सारिलें ॥३२॥
स्नानसंध्या जपादिनियम । स्तोत्रपाठ रविप्रणाम । प्रातराह्निक करितां याम । यमुनातीरीं लागला ॥३३॥
तंव येरीकडे वर्तली कथा । ते तूं ऐकें धरित्रीनाथा । भास्करमंडळ उदया येतां । व्रजजनवनिता विलोकिती ॥३४॥

भगवत्युदिते सूर्ये नंदद्वारि व्रजौकसः । दृष्ट्वा रथं शातकौम्भं कस्यायमिति चाब्रुवन् ॥४७॥

फांकतांचि सूर्यकरीं । व्रजौकसांच्या नंदद्वारीं । दृष्टी जदलिया रहंवरीं । भवंतीं भंवरी मिळाली ॥५३५॥
जडितरत्नीं कनकरथ । देखोनि व्रजवासी समस्त । म्हणती कोणाचा हो येथ । अकस्मात उदेला ॥३६॥
ऐसा व्रजजन चर्चा करी । तंव त्या गोपी विरहातुरी । वितव्र्क तर्किती परस्परीं । तें अवधारीं कुरुवर्या ॥३७॥

अक्रूर आगतः किं वा यः कंसस्यार्थसाधकः । येन नीतो मधुपुरीं कृष्णः कमललोचनः ॥४८॥

सक्रोध म्हणती अगे पहिला । हा काय अक्रूरचि येथ आला । जो कंसार्थसाधक भला । मथुरे नेला हरि येणें ॥३८॥
कोमलारविंदलोचन । तो मथुरे येणें नेऊनि कृष्ण । केलें कंसकार्यसाधन । पुढती आन करूं आला ॥३९॥

किं साधयिष्यत्यस्माभिर्भर्तुः प्रीतस्य निष्कृतिम् । इति स्त्रीणां वदंतीनामुद्धवोऽगात्कृताह्निकः ॥४९॥

एकी म्हणती कृष्ण नेला । तेणें कंस निर्दाळिला । बर्रवा स्वामिकार्यार्थ केला । आतां आला किमर्थ हा ॥५४०॥
तंव येरी म्हणे हा प्रियतम कंसा । याचा कंसासि भरंवसा । तदुत्तीर्णालागीं आपैसा । पहिल्या ऐसा येथ आला ॥४१॥
येथ येऊनि करील काय । तरी मृतप्राय आमुचे देह । इहीं करूनि साधिता होय । कंसकार्य ये काळीं ॥४२॥
आम्हां मारूनि आमुच्या पिशितीं । पिंड देईल कंसाप्रति । तेणें पावेल तो सद्गति । आला उपकृतिनिस्तरणा ॥४३॥
आमुच्या मांसपिंडदानें । कंसालागीं सद्गति देणें । बहुतेक इतक्याचि कारणें । याचें येणें गमतसे ॥४४॥
ऐशा परस्परें वनिता । विरहें सक्रोध वितर्क करितां । उद्धव त्या समयाआंतौता । आह्निक करूनि पातला ॥५४५॥
तिहीं उद्धव देखतां नयनीं । अक्रूर नव्हे हें कळलें मनीं । उद्धवावयव श्रीशुक वर्णीं । वक्ष्यमाणीं तें ऐका ॥४६॥
सत्तेचाळिसावे अध्यायीं । भ्रमरगीतव्याख्यान पाहीं । तया श्रवणाची नवाई । पवित्रीं हृदयीं सांठविजे ॥४७॥
आदिनारायण निर्गुण । प्रणवांकुरें झाला सगुण । नाभिकमळीं कमलासन । निजनंदन बोधिला ॥४८॥
विधीनें देवर्षि नारद । चतुःश्लोकीं बोधिला विशद । तेनें बोधिला अत्रिवरद । दत्तात्रेय परमात्मा ॥४९॥
म्हणल अत्रि परम श्रेष्ठ । महर्षि आणि ब्रह्मनिष्ठ । तेणें अध्यात्मविद्या स्पष्ट । स्वपुत्रा कां न बोधिली ॥५५०॥
तरी महर्षींतें सृष्टिवर्धना । केली विरंचीनें आज्ञा । कर्माचरणें स्रुजनाभिमाना । पात्र झाले ते सर्व ॥५१॥
तें न चुचेचि दत्तात्रेया । बालोन्मत्तपिशाचचर्या । वर्ततां देखोनि अनसूया । कांतासहित सचिन्त ॥५२॥
तेथ पातला तो देवर्षि । देखोनि आनंद उभयतांसी । गुह्य कथिलें तयांपासीं । मग तो दत्तासी प्रबोधी ॥५३॥
दत्त नोहेचि सृजनीं रत । नारदें केला ब्रह्मनिरत । तेणें ब्रह्मविद्या कळिकाळांत । जनार्दनपंता बोधिली ॥५४॥
एकोपंतीं छात्रदशा । साधूनि केली अभेद शुश्रूषा । जनार्दनकृपेनें ब्रह्मरसा । दत्तप्रसादा साधिलें ॥५५५॥
एकनाथकृपामृत । चिदानंदासि झालें प्राप्त । तेणें स्वान्म्द केला तृप्त । कृपापीयूश वर्शोनी ॥५६॥
स्वानंदाचिये कृपादृष्टीं । गोविंद लाधला ब्रह्मपुष्टि । तेणें कैवल्यरसाची वृष्टि । दयार्नवगर्तेवरी केली ॥५७॥
एवं परंपराक्रमें प्राप्त । तें हें श्रीमद्भागवत । अध्याय षट्चत्वारिंशत । झाला समाप्त ये ठायीं ॥५८॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेंऽ‍ष्टादश साहस्र्‍यां पारमहंस्यां संहित्तायां दशमस्कंधे श्रीशुकपरिक्षित्संवादें हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां कृष्णाज्ञयोद्धवव्रजाभिगमनयशोदानंदप्रबोधनं नाम षट्चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४६॥
श्रीकृर्ष्णापणमस्तु ॥ ओव्या ॥५५८॥ श्लोक ॥४९॥ एवं संख्या ॥६०७॥ ( शेहेचाळिसावा अध्याय मिळून ओवी संख्या २०९५९ )

शेहेचाळिसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP