अध्याय ४६ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


कच्चिदंग महाभाग सखा नः शूरनंदनः । आस्ते कुश्ल्यपत्याद्यैर्युक्तो मुक्तः सुहृद्वृतः ॥१६॥

कोमळशब्दें म्हणे अंग । उद्धवा भेटलासि तूं जिवलग । तरी मथुरेचा वृत्तांत चांग । स्वमुखें सांग निवेदीं ॥५९॥
शूरसेनाचा संभव । वृष्णिप्रवर जो वसुदेव । माझा सखा जिवाचा जीव । कुशळगौरव असे कीं ॥१६०॥
महासभाग्य मरिषाकुमर । ज्याचे उदरीं बळश्रीधर । पुत्र होवोनि परमेश्वर । स्वयें साचार अवतरला ॥६१॥
ते बळरामश्रीवनमाळी । गुप्त होते तम गोकुळीं । तंववरी कंस दुष्कृतशाली । यादव छळी निर्बंधें ॥६२॥
वसुदेव देवकी उग्रसेन । यांसि करितां दृढ बंधन । यादवीं केलें पलायन । मथुरा सांडूनि दिगंतीं ॥६३॥
सांप्रत निमाला तो कंस । तेणें निःशल्य यदूचा वंश । कांहींएक वृष्णि नरेश । कुशळ आतां असे कीं ॥६४॥
कंसनिग्रहापासूनि मुक्त । रामकृष्णादि अपत्ययुक्त । सुहृदस्वगोत्रगणमंडित । क्कचित् स्वस्थ असे कीं ॥१६५॥

दिष्ट्य कंसो हतः पापः सानुगः स्वेन पाप्मना । साधूनां धर्मशीलानां यदूनां द्वेष्टि यः सदा ॥१७॥

विचित्र दैवाचा उभारा । समल्लसानुज सहानुचरा । स्वपापें पंचत्व कंसासुरा । निर्भय मथुरापुरा आतां ॥६६॥
यादव साधु स्वधर्मशीळ । त्यांचा द्वेष्टा कंस खळ । तो निमालिया वसुधातळ । झालें निर्मळ मधुपुरही ॥६७॥
आतां आपुलाली पदवी । सुखमय भोगिजे कीं यादवीं । असो हें राजा काय जेंवी । उठवाठेवी किमर्थ हे ॥६८॥
आमुच्या जिवाचें जीवन । तो तेथ आहे श्रीकृष्ण । कांहीं आमुचें करी स्मरण । म्हणोनि प्रश्न करीतसे ॥६९॥

अपि स्मरति नः कृष्णो मातरं सुहृदः सखीन् । गोपान्व्रजं चात्मनाथं गावो वृंदावनं गिरिम् ॥१८॥

आम्ही स्मरतों मेघश्यामा । कांहीं तरी तो स्मरतो आम्हां । कीं मातेच्या सुस्निग्धकर्मा । स्मरोनि नामा कैं घेतो ॥१७०॥
ज्यांसी नर्मोक्ति विनोद । ते कृष्णाचे सखे सुहृद । केव्हां तरी तो बल्लववृंद । स्वमुखें मुकुंद स्मरतसे ॥७१॥
गोप गोरक्षक संवगडे । अनुयायी जे मागें पुढें । कृष्णवियोगें झाले वेडे । कैं त्यां तोंडें स्मरतसे ॥७२॥
केव्हां तरी वृंदावन । स्मरत असेल व्रजभुवन । स्वयें पाळिला जो गोगण । कीं त्यांचें स्मरण होतसे ॥७३॥
व्रजभुवनाचा आपण नाथ । स्वयेंचि म्हणवी कृष्णनाथ । आपणामागें व्रज अनाथ । ऐसी मात कैं स्मरतो ॥७४॥
इंद्रक्षोभाच्या अवसरीं । गोवर्धन जो धरिला करीं । जेथ सदैव धेनु चारी । तो त्या गिरि आठवतो कीं ॥१७५॥
आम्हां आठवे कृष्णगान । आम्हां आठवे कृष्णध्यान । आम्हां आठवे कृष्णवदन । कृष्णभाषण स्मरतसों ॥७६॥

अप्यायास्यति गोविंदः स्वज्नान्सकृदीक्षितुम् । तर्हि द्रक्ष्याम तद्वक्त्रं सुनसं सुस्मितेक्षणम् ॥१९॥

पहावया सुहृद सुजन । एकदां तरी येईल कृष्ण । तरी आमुचे निवती नयन । पाहोनि वदन स्मितयुक्त ॥७७॥
सरळनासिका सुस्मित अपांग । श्रीकृष्णवदन पाहतां सांग । आमुचें निवेल तैं अष्टांग । कृष्णानुराग सकळांसी ॥७८॥
श्रीकृष्णाचें उपकारश्रवण । होतां नंदाचें अंतःकरण । सर्वप्रकारें अभिभूयमान । विवश कथन करी मुखें ॥७९॥

दावाग्नेर्वातवर्षाच वृषसर्पाच्च रक्षिताः । दुरत्ययेभ्यो मृत्युभ्यः कृष्णेन सुमहात्मना ॥२०॥

यमुनापुलिनीं दावानळ । क्षोभोनि जाळितां व्रजजन सकळ । कृष्णें प्राशूनियां तत्काळ । निर्भय केवळ वांचविला ॥१८०॥
तृणावर्तें पीडिला व्रज । गगना नेला अधोक्षज । तो मारूनि पापपुंज । अक्षत व्रज वांचविला ॥८१॥
स्वमानभंगें क्षोभला इंद्र । तैं बाळक उचली जेंवि शिलींध्र । तेंवि गोवर्धनगिरींद्र । यादवेंद्रें उचलिला ॥८२॥
तळीं करूनि निर्भय स्थळ । सप्तरात्र सर्व गोकुळ । रक्षितां देखोनि आखंडळ । ठेवी मौळ हरिचरणीं ॥८३॥
अरिष्टनामा वृषभासुर । क्षोभें भंगितां व्रजपुर । कृष्णें मर्दूनि तो दुष्कर । घोष समग्र सुखी केला ॥८४॥
अघासुरनामा महासर्प । त्रिदशां न साहवे ज्याचा दर्प । तेणें ग्रासितां वत्सें वत्सप । पूतनागरप हरि लक्षी ॥१८५॥
वत्सप मरतां मरती पशुप । वत्सांसाठीं धेनुकळप । ऐसिया काकुळती सकृप । कंदर्पबाप कळवळिला ॥८६॥
मग रिघोनि सर्पावदनीं । प्राण रोधूनि फोडिला मूर्ध्नि । अमृतापांगें वांचवूनी । वत्सें वत्सप काढिले ॥८७॥
दुःखें करूनि शक्य तरतां । तो दुरत्यय महामृत्यु तत्वता । तयापासूनि झाला रक्षिता । विश्वगोप्ता श्रीकृष्ण ॥८८॥
प्रत्यक्ष श्रीकृष्ण महात्मा । विश्वगोप्ता विश्वंतरात्मा । तेणें बहुधा हरूनि विषमा । श्रमापासोनि रक्षिलें ॥८९॥
ऐसे कृष्णाचे उपकार । नंद स्मरे वारंवार । ध्यानस्मरणीं चमत्कार । कथी साचार तो ऐका ॥१९०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP