अध्याय ४५ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीगोविंदपरमात्मने नमः ॥
भावें वंदूं जातां पद । तंव भाव भावना भाव्य विशद । गिळूनि प्रकटिसी स्वानंद । साक्षित्वभेद ग्रासूनी ॥१॥
भाव म्हणिजे आस्तिक्यता । तव पदभजनीं निर्धारितां । पदभजनाची अमोघ सत्ता । प्रकटी तत्त्वता प्रतीति ॥२॥
प्रतीतीचें जें लक्षण । प्रतिबिंब विवर्तरूप जाणोन । मुख्य बिंब अवगम्यमान । प्रतीति जाण या नांव ॥३॥
अंतःकरणींचा चित्प्रकाश । करणद्वारा भावी दृश्य । तये भावनेमाजी अशेष । विषयाभास भासतसे ॥४॥
तेथ अनन्य तव पदभजनें । प्रत्यक्प्रवण होती करणें । तेव्हां निरास भाव्यभावने । अंतःकरणें अनुभवितां ॥५॥
भावितां मात्र अंतःकरण । द्वैतोपरमें होय लीन । तेव्हां साक्षित्वभेदावीण । स्वानंदघन समरसतां ॥६॥
ऐसी अगाध एकात्मता । जोडे तव पदभजननिरतां । पुढती व्युत्थानीं विवर्ता । जरी देखता होईल ॥७॥
तरी तो बाधित विवर्तबोध । करूं न शके विषयीं बद्ध । करणद्वाराही स्वानंद । नित्योपलब्ध निःसीम ॥८॥
सगुणपदभजनाचें ध्यान । ऐसें निरसूनि विषयभान । सबाह्य समाधिव्युत्थान । भ्रमावीण स्फुरों नेदी ॥९॥
सबाह्य झालिया भ्रमातीत । न भासे पृथक्त्वें विवर्त । नित्यमुक्त निजात्मरत । पूर्णामृत परब्रह्म ॥१०॥
इये भजनानंदप्रतीती । माजी सद्गुरु आज्ञापिती । दशमस्कंधाची व्युत्पत्ति । भाषाभारती वाखाणीं ॥११॥
समल्लकंसाच्या निर्याणीं । संपली चतुर्थ एकादशिनी । पुढें नंदादिकांची ग्लानि । चक्रपाणि सांतवी ॥१२॥
एकादशिनी ते पंचम । तये कथेचा अनुक्रम । पंचाध्यायपर्यंत नेम । पूर्वार्ध परम होईल ॥१३॥
उत्तरार्धीं अध्यायषटक । पर्यंत कथिजेल सम्यक । एकादशिनीचें पंचक । श्रोतीं सविवेक परिसावें ॥१४॥
प्रथमीं नंदादिपितृसांत्वन । राज्यीं स्थापूनि उग्रसेन । व्रतबंधादि गुरुसेवन । करूनि साग्रज स्वपुरा ये ॥१५॥
शेचाळिसीं उद्धव व्रजा । धाडूनि बोधवी बल्लवभाजा । नंदयशोदाशोकाग्नितेजा । शमवूनि बोधें निववील ॥१६॥
सत्तेचाळिसांमाजी उद्धव । हरिआज्ञेची अभिप्राव । व्रजांगनांसि बोधूनि सर्व । येईल गौरव लाहूनी ॥१७॥
तया नांव भ्रमरगीत । गोपीउत्प्रेक्षासंकेत । तें व्याख्यान इत्यंभूत । अतंद्रित निरूपीं ॥१८॥
अठ्ठेचाळिसामाजी कुब्जा । वरोत्तीर्णाचिया काजा । स्वयें भोगूनि त्रैलोक्यराजा । अक्रूर गजाह्वया धाडी ॥१९॥
एकोणवन्नासीं अक्रूर । टाकूनियां हस्तिनापुर । पांडवांसि विषमाचार । न्याय निष्ठुर नृपा कथी ॥२०॥
इत्यादि पंचाध्यायीकथनीं । पूर्वार्ध संपवी बादरायणि । तें महाराष्ट्र वाखाणूनी । प्रेमळ श्रवणीं निववावें ॥२१॥
ऐसी गुरुवरप्रेरणा । दयार्णवाच्या अंतःकरणा । होतां सज्जन सादर श्रवणां । करूनि कथना आदरीं ॥२२॥
चव्वेचाळिसीं कंसवध । केलिया नंतरें श्रीगोविंद । पंचेचाळिसीं स्वव्रतबंध । गुरुसांनिध्य संपादी ॥२३॥
तेथ अरणीगर्भसंभव । बादरायणि योगिराव । कथा निरूपी स्वयमेव । जाणोनि भाव नृपाचा ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP