अध्याय ४१ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीकृष्णपरमात्मने नमः ।
श्रीगोविंदा दाविंगोश्री । अनुलोमें तव नामगजरीं । सप्रेम गातां गोव्यापारीं । प्रकटे निर्धारी तव धाम ॥१॥
येथ मंत्रार्थ मंत्र फळ । तिन्ही मिळोनि अभेद अमळ । सच्चित्सुखधन विलासबहळ । नुधवे हळहळ द्वैताची ॥२॥
श्रीचे रुचिरपणें रुचि । केवळ आवडी इंद्रियांची । विषयभ्रमें भ्रमे प्रपंचीं । एर्‍हवीं साची चित्प्रभा ॥३॥
मागील गोडी नेणोनि पुढें । विषयार्थ जीवचैतन्य वेडें । तें तव नामाच्या जीयडे । होय उघडें चिन्मात्र ॥४॥
एवं चिन्मात्रैकप्रभा । प्रपंचीं निष्प्रपंचशोभा । गोविंदनामाच्या वालभा । माजी गोगर्भा प्रकाशी ॥५॥
मग ते विलोमें परतोनि मूळा । सेवी सन्मात्र स्वसोहळा । जैसी सबाह्य गोडी गुळा । तेंवि शोभला तो संच ॥६॥
आंत बाहीर अभेद गगन । गगना ज्यामाजी सांठवण । मोडूनि गेलिया त्रिपुटीभान । सच्चिद्धन गोविंद ॥७॥  
अनुलोम विलोम ओतप्रोत । अन्वय व्यतिरेक प्रवृत्त निवृत्त । इत्यादिवाक्यांचा मथितार्थ । भ्रमोपशांत सन्मयता ॥८॥
ह्या सद्गुरु निजात्मरमणा । अखंड अभेद प्रणाम चरणा । भेदें भजतां सगुणें सगुणां । अखंडपणा अविसंच ॥९॥
भजनामाजी त्रिपुटी सार । कायिक वाचिक मानसपर । तो हा माझा वाग्व्यापार । ग्रंथाकार परिचर्या ॥१०॥
सद्गुर्वाज्ञासूत्रावरून । दशमस्कंधाचें व्याख्यान । चाळिसाव्यांत अक्रूरस्तवन । केलें विवरण यथामति ॥११॥
आतां एकोत्तरचाळिसा । माजी वृत्तांत आहे ऐसा । मथुरा प्रवेशतां जगदीशा । रजक नाशा पावेल ॥१२॥
पुढें वायका माल्यकारा । संतोषोनि देईल वरा । विभवें विलोकील निज नगरा । नगरनागरा हरि पाहती ॥१३॥
ये अध्यायीं इतुकी कथा । सप्रेमभावें परिसिजे श्रोतां । श्रवणें निरसी भवभयव्यथा । परमपुरुषार्था प्रकाशी ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP