नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च । प्रद्युम्नायानिरुद्धाय सात्वतां पतये नमः ॥२१॥

नमो संकर्षणा बलरामा । वासुदेवा पूर्णकामा । प्रद्युम्ना श्रीअनिरुद्धनामा । चतुर्धामा व्यूहरूपा ॥९६॥
प्रद्युम्नानिरुद्ध नसतां आधीं । अक्रूरें स्तवन केलें कधीं । तरी अनादिसिद्ध हे प्रसिद्धि । असे वेदीं व्यूहरूप ॥९७॥
सात्वतशब्दाची व्युत्पत्ति । भक्तपति कीं यावदवति । इत्यादिशब्दें दानपति । स्तवी श्रीपती सप्रेमें ॥९८॥

नमो बुद्धाय शुद्धाय दैत्यदानवमोहिने । म्लेच्छप्रायक्षत्रहंत्रे नमस्ते कल्किरूपिणे ॥२२॥

कल्क्यवतार झाला नाहीं । भावी लोकप्रसिद्धि पाहीं । तैसे बुद्धादि तिये समयीं । अक्रूरें दाहे स्तवियेले ॥९९॥
नमो सदयरूपा बुद्धा । हिंसाविमुखा परमशुद्धा । स्वमुखें करूनि वेदनिंदा । हेतुवादा प्रकटिलें ॥२००॥
कळि होतां प्रवर्तमान । देव ब्राह्मण वेद यज्ञ । यांची सामर्थ्यें जाणोनि क्षीण । दैत्यीं प्रयत्न आदरिला ॥१॥
दैत्य धैर्यें सामर्थ्यवंत । वेदोक्तयज्ञाचरणीं निरत । तत्सुकृतें देवता समस्त । पदच्युत करूं पाहती ॥२॥
म्हणोनि देवांच्या कैवारा निगम निंदूनि युक्तिद्वारा । पाखंडयुक्ति अहिंसापरा । दमुजां असुरां प्रबोधिल्या ॥३॥
मोह पावले दानव दैत्य । तिहीं स्वीकेलें बौद्धमत । पाखंडहेतुयुक्ती समस्त । पथ वेदोक्त निंदूनी ॥४॥
दैत्यदानवांची बुद्धि । मोह पावल्या नुमजे शुद्धि । तिहीं वेदोक्तयज्ञविधि । सांडूनि निषेधीं प्रवर्तले ॥२०५॥
दैत्यीं त्यजितां वेदोक्तपथा । देवीं सांडिली मानसव्यथा । ऐशा साधूनि सुरकार्यार्था । पुन्हा परमार्था प्रतिपादी ॥६॥
वेदनिंदाकरिता जो मी । मम मुख पाहूं नयेचि तुम्हीं । न धरूनि अवज्ञाभयाची ऊर्मी । द्विजीं स्वधर्मीं वर्तावें ॥७॥
विप्रा ऐसी आज्ञा केली । दैत्यां स्वमतें घालोनि भुली । पाखंडपरिचर्या प्रशंसिली । जे कळिकाळीं कळिगरिमा ॥८॥
ऐसिया बुद्धा परमशुद्धा । दैत्यविमोहका प्रसिद्धा । युक्ति प्रकाशूनि विरुद्धा । नमो अविरुद्धा वेदमया ॥९॥
अणि कळिकाळाचिये अंतीं । वेदमार्ग सर्व लोपती । म्लेच्छप्राय क्षत्त्र होती । त्यांची समाप्ति तूं कर्ता ॥२१०॥
त्या कल्किरूपा तुज कारणें । माझीं अनेक साष्टांग नमनें । ऐसी सुस्ति करूनि मनें । करी प्रार्थने मोक्षार्थ ॥११॥
कोण्या बंधें बांधला कोण । मां त्याचें करावें विमोचन । यदर्थीं अक्रूर करी प्रार्थन । तें सज्जन परिसोत ॥१२॥

भगवञ्जीवलोकोऽयं मोहितस्तव मायया । अहंममेत्यसद्ग्राहो भ्राम्यते कर्मवर्त्मसु ॥२३॥

तरी येकदोघांची कायसी गोठी । चराचरात्मक अवघी सृष्टि । तुझे मायेनें मोहिल्या पाठीं । वृथा चावटी सुटिकेची ॥१३॥
ज्ञानें मुक्त झालों म्हणती । परंतु नुगवे प्रपंचगुंती । पडली अहंममताभ्रांति । कर्मपथीं ते भ्रमवी ॥१४॥
लटिका देह लटिकें गेह । दारापुत्रादि लटिका मोह । यांचा धरूनियां आग्रह । करिती रोह अभिमाना ॥२१५॥
आदिअवसान कळल्यवरी । देह मी म्हणोनि अभिमान धरी । देहापूर्वीं कीं आतां उपरी । कोण न विचारी मी ऐसें ॥१६॥
देह कळलिया साद्यंत । आपण सहजचि देहातीत । ऐसे जे कां विचारवंत । तेही भ्रांत तव माया ॥१७॥
कर्म प्राचीन जैसें होय । ते ते मार्गीं भ्रमती देह । धन सुत कांता कोठें राहे । ममता वाहे भ्रमयोगें ॥१८॥
मृदश्मदारुमयमंदिर । करकौशल्यकृतसुंदर । स्थावरभूभागीं तें स्थिर । परि ममता दुर्दह्र तनुभृतां ॥१९॥
प्रारब्ध फिरवी दिगंतरीं । अन्यत्र वसती कृतमंदिरीं । परंतु ममता जे अंतरीं । ते सिंतरी अध्यासें ॥२२०॥
कीट कातिणी मशक मूषक । गो श्वा मत्कुण सर्प वृश्चिक । ऐसे गहाभिमानी अनेक । ते म्हणती मूर्ख मनुजातें ॥२१॥
मानव कृतगेहीं न थरती । वृथा ममता वाहतां मरती । स्त्रिया अन्यत्र व्यभिचारिती । आपण फिरती तद्भरणा ॥२२॥
तैए नव्हो आम्ही जंतु । स्त्रियादि भोगीं भरणरहितु । आपले सदनीं पावों अंतु । वर्तों संतत सहवासें ॥२३॥
आमुचा मार्ग आचरों आम्ही । म्हणोनि अलिप्त कर्माकर्मीं । पाप क्षालूणि या जन्मीं अधमीं । पुण्यधामीं मग विलासों ॥२४॥
ऐसे जंतूहूनि निपटारे । मायामोहें नर निदसुरे । असो त्यांविण काय न सरे । मम गुंफिरें तें ऐक ॥२२५॥

अहं चात्मात्मजागारदारार्थस्वजनादिषु । श्रमामि श्वप्नकल्पेषु मूढः सत्यधिया विभो ॥२४॥

मी अक्रूर हे देहबुद्धि । दारा सुत धन गेह उपाधि । आप्तस्वजनबंधुसुहृदीं । ममता बाधी सर्वत्र ॥२६॥
देहा म्हणती जो अक्रूर । तो देह असावा सुंदर । धीर शूर बळप्रचुर । परम चतुर असावा ॥२७॥
माझे पुत्र मजहूनि बळी । मजहूनि लक्षणें त्यां आगळीं । क्षेम असावें सर्व काळीं । ममता वाहटुळी ते ऐसी ॥२८॥
विजयप्रतापी तनुज अनुज । स्नेहाळ सभाग्य ऐश्वर्यपुंज । सुहृद असावे ऐसे सहज । नाचे भोज ते ममता ॥२९॥
वृत्ति क्षेत्र सदन सधर । दारा असावी परम चतुर । सादर सुंदर मनोहर । अव्यभिचार सुतजननी ॥२३०॥
अर्थसंग्रह असावा विपुल । नित्य नूतन उद्योगकुशल । व्यवसाय धनार्जनीं सफळ । ममताजाळ हें गोवी ॥३१॥
सुत धन वनिता वृत्तिक्षेत्र । आप्त स्वजन गोत्र मित्र । जैसें ज्याचें ब्रह्मसूत्र । तितुकें मात्र त्य अजोडे ॥३२॥
जैसी जोडती त्यांची ममता । त्यांसी न व्हावी विघ्नवार्ता । रात्रिदिवस हे हृदयीं चिंता । ते अच्युता भजों नेदी ॥३३॥
स्वप्नप्राय हा संसार । कळतां नश्वर क्षणभंगुर । तथापि मानूनि अजरामर । सत्य साचार प्रेम धरी ॥३४॥
कनकबीज भक्षिल्या नरा । भुललों हेंही कळे अंतरां । तथापि भवंडी भ्रमाचा भंवरा । तो त्या बाहिरा निघों न शके ॥२३५॥
तेंवि या अविद्याभ्रमाची भुली । अहंममता प्रबळ जाली । तिणें मूढता बुद्धीसि केली । तुजवेगळी ते न फिटे ॥३६॥
प्रभु म्हणिजे तूं समर्थ । अविद्यानाशक बोध यथार्थ । तुज वेगळा जो परमार्थ । विषयस्वार्थ अवघा तो ॥३७॥
कैसें बुद्धीचें मूडत्व । तैं तूं ऐकें सावयव । वास्तवबुद्धि अवास्तव । कवळी माव सुखलोभें ॥३८॥

अनित्यानात्मदुःखेषु विपर्ययमतिर्ह्यहम् । द्वंद्वारामस्तमोविष्टो न जाने त्वात्मनः प्रियम् ॥२५॥

इहलोकींचीं विभवें सकळें । क्षणिकें ऐसें प्रत्यक्ष कळे । नित्य मानिती कर्मफळें । धरिती आगळें तत्प्रेम ॥३९॥
ऐसेंचि आमुष्मिक वोफळ । तें नित्य मानूनि कर्मफळ । इष्टपूर्ताचरणीं कुशळ । प्रेमा विशाळ वाढवी ॥२४०॥
तैसेचि देह दुःखागार । विष्ठामूत्रांचें कोठार । अस्थि चर्म मांस रुधिर । जें अपवित्र दुर्गंधि ॥४१॥
विजातीय जो अनात्मा । तो स्थूळदेह मानूनि आत्मा । अहंबुद्धि निस्सीम प्रेमा । धरी परमात्मा विसरोनी ॥४२॥
दुःखकारण सुत धन निलय । क्षेत्र वनिता सुहृद प्रिय । केवळ दुःखद जो समुदाय । तो सुखमय भाविला ॥४३॥
सुखदुःखात्मक जें द्वंद्व । तें जाणावें करणवृंद । भोगीत तद्द्वारा आनंद । परि झालों विषयांध हें न कळें ॥४४॥
हें व्हावया काय कारण । सबाह्य तमोगुणाचें आवरण । तेणें आवडे यथेष्टाचरण । यास्तव आठवण बुजाली ॥२४५॥
यदर्थीं ऐका उदाहरण । कोणें करून झांके कोण । कोण त्यातें जाय टाकून । तें व्याख्यान अवधारा ॥४६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP