सत्त्वं रजस्तम इति भवतः प्रकृतेर्गुणाः । तेषु हि प्राकृताः प्रोता आब्रह्मस्थावरादयः ॥११॥

तुझी शक्ति साम्यप्रकृति । गुणत्रय हें तत्संतति । त्यापासूनि जीवोत्पत्ति । प्राकृत म्हणिजेती ते अवघे ॥५१॥
जितुक्या प्रकृति कार्योपाधि । स्थावरादि ब्रह्मावधि । यथानुक्रमें ते निरवधि । मिलती चिदब्धि तुजमाजी ॥५२॥
जे जे संभवले जेथून । ते ते तेथेंचि होती लीन । एवं प्राकृत जीवसमुच्चय जाण । पुन्हा त्रिगुणीं प्रवेशती ॥५३॥
त्रिगुणगुणसाम्यें माझारी । प्रविष्ट होती श्रीमुरारि । तेही प्रवेशे चित्सागरीं । जैसी लहरी एकवटे ॥५४॥
यथाक्रमें स्वोपाधिलयीं । सर्व सांठवती तुझ्याचि ठायीं । कीं तुवांचि ब्रह्मादि सर्वही प्रकृतिगुणीं संग्रथित ॥१५५॥
ते सर्वही तुजवांचून । पृथग्भासतांही नवह्ती भिन्न । अन्वयबोधें तूं अभिज्ञ । सर्वदेवात्मा सर्वेश ॥५६॥
येथ ऐसें म्हणसी हरि । भासे तव वचनामाझारी । प्रकृतिसंबंध मजही जरी । तरी सर्वांपरी जीव मीही ॥५७॥
सर्वां मजसीं विशेष कोण । ऐसें सहसा देवा न म्हण । विशेष ऐश्वर्य व्यापकपण । निर्लेपलक्षण अवधारीं ॥५८॥

तुभ्यं नमस्तेऽस्त्वविषक्तदृष्टये सर्वात्मने सर्वधियां च साक्षिणे ।
गुणप्रवाहोऽयमविद्यया कृतः प्रवर्तते द्वनृतिर्यगात्मसु ॥१२॥

असो प्रणाम तुजकारणें । विशेष म्हणसी कीं लक्षणें । तो मी कथितों विशेषणें । तें तूं संपूर्ण अवधारीं ॥५९॥
अविषक्तदृष्टि म्हणजेसि काये । अलिप्तबुद्धि तो तूं स्वयें । काय निमित्त म्हणसी जरी हें । तरी सर्वात्मा तूं म्हणोनियां ॥१६०॥
सम विषम दोष गुण । भेद असतां होय दर्शन । कांहीं नसेच तुजवांचून । अभेद म्हणोनि निर्लेप ॥६१॥
अलिप्तबुद्धि ऐसें म्हणसी । तरी बुद्धि वेगळी असे कीं मजसी । ऐसें न म्हणावें हृषीकेशी । तूं बुद्धीशीं द्योतक ॥६२॥
अविद्याभेदभ्रमाक्त जीव । मलिनबुद्धि ते ते सर्व । बुद्धिसाक्षी तूं वासुदेव । न तुज यास्तव बुद्धिलेप ॥६३॥
तरी तो बुद्धिलेप कोणासी । ऐसें स्वामी तूं जरी म्हणसी । तरी जे अविद्याभ्रमाची राशि । ते ज्यापासीं नांदतसे ॥६४॥
त्रिगुणात्मकगुणप्रवाह । अविद्याकामकर्ममय । तदनुसार लाहोनि देह । भ्रमती पाहें भवस्वर्गीं ॥१६५॥
देव मनुष्य तिर्यग्योनि । ते ते ठायीं देह धरूनी । होऊनि तेथींचे अभिमानी । जननीं मरणीं परिभ्रमती ॥६६॥
ऐसे अविद्यागुणप्रवाहें । सुरनरतिर्यग्भ्रमती मोहें । तुज नेणतां ऐसें होये । तो तूं काय त्यां तुल्य ॥६७॥
यास्तव जीवां आणि तुजसीं । ऐसा विशेष तूं श्रीहृषीकेशी । तूं सर्वात्मा चराचरेंसीं । ते गुणमूर्तीसी स्तवितसें ॥६८॥
दों श्लोकीं तें विराटध्यान । स्तवी अक्रूर अवलोकून । शुक नृपेंद्रा करी कथन । तें सज्जन परिसोत ॥६९॥

अग्निर्मुखं तेऽवनिरंघ्रिरीक्षणं सूर्यो नभो नाभिरथो दिशः श्रुतिः ।
द्यौः कं सुरेंद्रास्तव बाहवोऽर्णवाः कुक्षिर्मरुत्प्राणबलं प्रकल्पितम् ॥१३॥
रोमाणि वृक्षौषधयः शिरोरुहा मेधाः परस्यास्थिनखानि तेऽद्रयः ।
निमेषणं रात्र्यहनी प्रजापतिर्मेढ्रस्तु वृष्टिस्तव वीर्यमिप्यते ॥१४॥

देवमनुष्यतिर्यक्प्रमुख । पृथक् पृथक् अनेक लोक । ते ते तव अवयव सम्यक । सर्वात्मक तूं सगुण ॥१७०॥
तेचि अवयव कैसे कोण । मुख्य मुख तो हुताशन । आधार धरणी ते तव चरण । सूर्य लोचन नभ नाभि ॥७१॥
दिशा श्रवण स्वर्ग शिर । सुरेंद्र बाहु कुक्षि सागर । वायु प्राण मरुच्चक्र । बळ समग्र तें तुझें ॥७२॥
तृणादिओषधि वृक्षगुल्म । एवं उद्भिज्ज ते तव रोम । मेघ मूर्धजांचें नाम । कामोद्गम जेथ होय ॥७३॥
तूं परमात्मा परात्पर । मेरुप्रमुख जे गिरिवर । तितुक्या अस्थि तव समग्र । वज्रशिखरें नखशोभा ॥७४॥
उन्मेष निमेष निवसरजनी । प्रजापति तो मेढ्रस्थानीं । मौळीस्थ मेघमाळेचें पाणी । ते वृष्टि होऊनि वीर्य द्रवे ॥१७५॥
ऐसी वर्णूनि विराट तनु । पुन्हा बोले शंका करून । तुझें स्वरूप दृश्यमान । इतुकेंचि म्हणोनि न बोलवे ॥७६॥
एवं सर्वही दृश्य प्रपंच । तुझा अवयवभूत साच । तथापि सविकार हा असाच । कल्पित अहाचें तव रूपीं ॥७७॥

त्वय्यव्ययात्मन्पुरुषे प्रकल्पिता लोकाः सपाला बहुजीवसंकुलाः ।
यथा जलैः संजिहते जलौकसोऽप्युदुंबरे वा मशका मनोमये ॥१५॥

अव्ययात्मा तूं पुरुष एक । तुझ्या ठायीं बहुधा लोक । लोकपाळांसहित देख । जीव अनेक प्रकल्पित ॥७८॥
जलामाजी जलचरकोटी । बहुधा विचरती जलाचे पोटीं । की उंबरामाजील मुरुकुटीं । करिती राहटी बाहुल्यें ॥७९॥
संकल्पांचें जें कां जनन । प्रधानशब्दें तें तव मन । म्हणोनि मनोरूपी श्रीभगवान । तरी तव तनु स्थिर्चरही ॥१८०॥
तुझ्या स्वरूपीं ब्रह्मांडकोटी । भ्रमती ऐसी श्रुतीची गोठी । जळीं जळचरें फळीं मुरकुटीं । तेंवि हीं पोटीं समजावीं ॥८१॥
कोणे उंबरीं कोठें कोण । ये वार्तेचें मशकां शून्य । एवं परमात्मा तूं पूर्ण । अपार म्हणोन नाकळसी ॥८२॥
एवं अनंतब्रह्मांदपति । भजना अशक्य ते तव मूर्ति । यास्तव अवतारकथामृतीं । सज्जन रमती तें ऐक ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP