अध्याय ३९ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


यावदवालक्ष्यते केतुर्यावद्रेणू रथस्य च । अनुप्रस्थापितात्मानो लेख्यानीवोपलक्षिताः ॥३६॥

ऐकोनि कृष्णाचा संकेत । चित्तें त्यासंगें प्रस्थित । शरीरें राहिल्या तटस्थ । जैशां अचेत पुतळिया ॥२७॥
चित्तें धाडूनियां कृष्णासंगें । उभ्या ठाकल्या केवळ आंगें । जनपदमांदी मुरडली मागें । रथ सवेगें अंतरतां ॥२८॥
जंववरी केतु दृष्टी दिसे । तंववरी जडलीं तेथें लक्षें । जैसीं योगियांचीं मानसें । स्वरूपसमरसें स्थिरावलीं ॥२९॥
सवेग मार्ग क्रमितां रथु । दृष्टिगोचर नव्हे केतु । तैं त्या धूळी गगनाआंतु । पाहती तटस्थ मुद्रिता ॥३३०॥
लेप्यमूर्ति सालंकारीं । किंवा लिखितचित्रापरी । रेणु लक्षिता अंबरीं । मुद्रा खेचरी जडली त्यां ॥३१॥
चिरकाळें त्या श्वासापरती । होतां चेइली जागृति । मुद्रा सोडोनि पूर्वस्थिति । विरहावर्तीं पडलिया ॥३२॥
सिद्धि न पावतां योगाभ्यास । विघ्नबाहुल्यें पावे भ्रंश । जेंवि तो साधक पावे क्लेश । गोपीमानस तेंवि करपें ॥३३॥
गोपी लक्षें ज्या लक्षिती । त्याची न होतां दर्शनावाप्ति । म्हणाल निष्फळ योगस्थिति । तरी हें श्रोतीं न म्हणावें ॥३४॥
त्यांचें जें कां विरहदुःख । तनुमानसें कृष्णात्मक । भवभ्रमासि करूनि विमुख । कैवल्यसुखप्रद होय ॥३३५॥
गोपींऐसी तन्मयता । इच्छिती सनकादि भवविधाता । त्यांचे क्लेश निष्फळ म्हणतां । वाग्देवता सकंप ॥३६॥
कैशी विरहें तन्मयता । सावधान परिसिजे श्रोतां । कृष्णचेष्टितें स्मरतां गातां । नेणती वनिता उदयास्त ॥३७॥

ता निराशा निववृतुर्गोविन्दविनिवर्तने । विशोका अहनी निन्युर्गायन्त्यः प्रियचेष्टितम् ॥३७॥

कृष्ण न परते गेला दुरी । देखोनि निराशा बल्लवनारी । फिरत्या झाल्या ते अवसरीं । शोकलहरीं वरपडिल्या ॥३८॥
प्रियतमा अद्वया यदुनायका । तच्चेष्टिता मायाकौतुका । विरहें गाती विगतशोका । कीं सशोका होत्सात्या ॥३९॥
कृष्णानुगत्वें आमुच्या चेष्टा । कृष्णवियोगें लागती काष्ठा । कृष्णविरहें पात्र कष्टा । जालों अदृष्टा भोगाव्या ॥३४०॥
कृष्णवेणूचिया ध्वनी । चेतना उपलभे अचेतनीं । स्वानंदभोग अंतःकरणीं । कल्पना मनीं तद्वेधें ॥४१॥
कृष्ण चैतन्यच्छायामात्र । प्रकटी प्रवृत्तिप्रवाहीं गात्र । मां तो प्रत्यक्ष चिन्मात्र । केंवि स्वतंत्र करीना ॥४२॥
तस्मात् प्रवृत्ति निवृत्ति । कृष्णचेष्टा सर्वभूतीं । गोपी त्या त्या स्मरोनि गाती । शोकनिवृत्तीकारणें ॥४३॥
कृष्ण प्राणांचा चेष्टक । कृष्ण मनाचा तुष्टक । कृष्ण कर्मांचा पुष्टक । कृष्ण निष्टंक प्रियप्रेष्ठ ॥४४॥
कृष्णभोगीं भवविराम । कृष्णसंगीं चित्सुखाराम । कृष्ण केवळ पूर्णकाम । आत्माराम जगजात्मा ॥३४५॥
कृष्ण मनाचें मोहन । कृष्ण बुद्धीचें जीवन । कृष्ण केवळ चैतन्यघन । कृष्णें विण केवीं जिणें ॥४६॥
प्रियतम कृष्ण ऐशा गाती । वेधें नेणती दिवस राती । असो गोपींची हे स्थिति । गेला श्रीपति तें ऐका ॥४७॥

भगवानपि संप्राप्तो रामाक्रूरयुतो नृप । रथेन वायुवेगेन कालिंदीमघनाशिनीम् ॥३८॥

सकलैश्वर्यसंपन्न । यालागीं सर्वज्ञ श्रीभगवान । तथापि गोपी उपेक्षून । करी गमन नृपवर्या ॥४८॥
भगवान म्हणिजे ऐश्वर्यवंत । रासविलासीं गोपी समस्त । अनेक होऊनि जेंवि रमवीत । तेंवि कां येथ न जाला ॥४९॥
ऐश्वर्यसम्पन्नही असोन । गोपी सशोका उपेक्षून । विरहवेधें तत्कल्याण । लक्षूनि गमन स्वयें करी ॥३५०॥
ज्याची तुलना न पवे पवन । ऐसा गतिमन्त स्यन्दन । रामाक्रूरश्रीभगवान । करिती गमन तद्वेगें ॥५१॥
त्रिजगदघौघहंत्री यमुना । सवेग येऊनि तिचिया पुलिना । अक्रूर आदरी मध्याह्नस्नाना । कुरुभूषणा तें ऐक ॥५२॥

तत्रोपस्पृश्य पानीयं पीत्वा मृष्टं मणीप्रभम् । वृक्षखण्डमुपव्रज्य सरामो रथमाविशत् ॥३९॥

ते कालिंदी सुकृतजननी । आश्रयूनि तिष्ठती मुनि । उदार क्षमस्वी दृढासनी । समदर्शनी तरुरूपी ॥५३॥
कल्पतरूंतें लाजविती । ऐसी ज्यांची फलसंपत्ति । तया द्रुमांचे छायेप्रति । रामश्रीमप्ति उतरले ॥५४॥
तेथ ठेवूनियां स्यंदन । स्पर्शोनि कालिंदीजीवन । हस्तपाद प्रक्षाळून । केलें आचमन श्रमहारी ॥३५५॥
मुक्ताफलादिरत्नप्रभा । लाजवी ऐसिया रविजाम्भा । प्राशितां रामपद्मनाभा । पथक्लमाभा विरमली ॥५६॥
अगाधत्वें शीतळतर । मृष्ट निर्मळ रत्नाकर । सुखकर सुन्दर श्रेयस्कर । तें यमुनानीर प्राशिलें ॥५७॥
मग जाऊणि वृक्षच्छाये । रथीं बैसते झाले स्वयें । श्रीकृष्ण आणि रोहिणीतनय । किशोरप्राय अवगमती ॥५८॥

अक्रूरस्तावुपामन्त्र्य निवेश्य च रथोपरि । कालिन्द्या ह्रदमागत्य स्नानं विधिवदाचरत् ॥४०॥

वक्तयामाजि चातुर्यराशि । तो शुक सांगे नृपापासीं । अक्रूर सारी आह्निकासी । कोणे विधीसीं तें ऐका ॥५९॥
शत्रु धरोनि नाना व्यक्ति । रामकृष्णांतें देखोनि क्षितीं । झणें कांहीं विघ्न करिते । अक्रूराचित्तीं हे शंका ॥३६०॥
यालागीं बळराम मुरारी । बैसवूनियां रथावरी । अक्रूर त्यांतें विनति करी । जननीपरी स्नेहभरें ॥६१॥
माध्याह्निक विधिविधान । स्नानसंध्या ब्रह्मयज्ञ । जंव मी सारीं जपतर्पण । तुम्ही स्यंदन तंव न टका ॥६२॥
ऐसें तुमचें अभयदान । होतां करीन संध्यास्नान । तथास्तु म्हणे जनार्दन । सहसा स्यन्दन न सोडूं ॥६३॥
ऐसा करूनियां अनुवादु । रामकृष्ण दोघे बन्धु । रथीं बैसवूनियां सावधु । मग प्रबुद्ध चालिला ॥६४॥
पूर्वीं जेथ गोपांप्रति । ब्रह्मलोकाची दर्शनावाप्ति । यमुनाह्रदीं त्या दानपति । निमज्जनार्थीं प्रवेशला ॥३६५॥
हस्तपाद प्रक्षाळून । शौचविधि शुद्धाचमन । यमुनाजीवन अभिवंदून । करी मज्जन तें ऐका ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP