अध्याय ३९ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स्मरन्त्यश्चापराः शौरेरनुरागस्मितेरिताः । हृदिस्पृशश्चित्रपदा गिरः संमुमुहुः स्त्रियः ॥१६॥

शूरसेनाचा जो कां नातु । शौरि तो हा कृष्णनाथु । त्याच्या वाणी हृदयाआंतु । विलासभरित आठविती ॥४॥
अनुराग म्हणिजे प्रेमप्रीति । तत्पूर्वक ज्या मधुरोक्ति । हास्य करूनियां श्रीपति । वदे एकांतीं कांतारीं ॥१०५॥
जिया वाणींचिया श्रवणें । मनें मूर्च्छितें मन्मथबाणें । मनोहारका मनोज्ञा म्हणणें । सुललितपणें रसपुष्टा ॥६॥
जया वाणींच्या व्यापारीं । विचित्रचूर्णिकाप्रचुराक्षरीं । नवरसघटिका पदांच्या हारी । स्मरती नारी मोहिता ॥७॥
आणिक कृष्णाच्या इंगिता । हृदयीं स्मरती स्नेहानुरक्ता । तें तूं परिसें कौरवनाथा । विरहव्यथा गोपींची ॥८॥

गतिं सुललितां चेष्टां स्निग्धहासावलोकनम् । शोकापहानि नर्माणि प्रोद्दामचरितानि च ॥१७॥

श्रीकृष्णाचे पदविन्यास । पाहोनि वेधले राजहंस । विसरोनियां मानसवास । केला सहवास हरिचरणीं ॥९॥
हंस मृगेन्द्र शक्रयान । यांच्या गति जगतीं मान्य । सुललित कृष्णाचें गतिगमन । विस्मित देखोनि ते होती ॥११०॥
पदविन्यासें निवे धरणी । स्पर्शें जंतूतें अमृतधणी । गतिइंगितें लक्षितां मनीं । मन्मथ मानिनी मोहितसे ॥११॥
ऐसी लावण्यसुललित गति । तीतें गोपी हृदयीं स्मरती । विरहदुःखें विह्वळ होती । चित्तें कवळिती कृष्णातें ॥१२॥
चेष्टा म्हणिजे विलासचर्या । संगीतसूत्रें संमत आर्या । स्मरोनि संतप्त होती नार्या । जेवीं अनार्यां भव तावी ॥१३॥
तया चेष्टांचे अंतर्भाव । स्मितावलोकें प्रकटी सर्व । ह्री धी भी श्री शुक गौरव । क्रीडा वैभव सुस्निग्ध ॥१४॥
सलज्जहासावलोकनें । मानिनी मूर्च्छिता मन्मथबाणें । तत्कौशल्यें बुद्धिवर्धनें । चातुर्यखुणे स्मरचर्या ॥११५॥
लब्धसुखासी होय अभाव । तोचि शोकाचा प्रादुर्भाव । ऐसे अनेक भवोद्भव । भोगितां जीव संत्रस्त ॥१६॥
मानसभंगें वियोगभय । अपांगमात्रें द्योतक होय । लावण्यलक्ष्मी मनम्थमाय । उपमा काय रौचर्या ॥१७॥
ऐशिया बहुधा शोकांप्रति । अपहारका हरिनर्मोक्ति । रतिरसातें आणी व्यक्ति । मिथा एकांतीं क्रीडतां ॥१८॥
रासरसिका नर्तनकाळीं । किंवा क्रीडतां यमुनाजळीं । रमतां पुलिनप्रदेशीं मृदुळीं । तदुचित बोलिलीं जीं नर्में ॥१९॥
हरिकरसंस्पर्श निजांगसंधि । स्मरतां कमिनीं विरह बाधी । तेणें मानसीं बाधला आधि । असाध्य व्याधिसमसाम्य ॥१२०॥
उद्दाम कृष्णाचें आचरित । गोपी सम्रती हृदयांत । नरसुरविधिहरही असमर्थ । कृष्णचरितआद्चरणीं ॥२१॥
स्तिमित ठेले खेचरगण । गणकां न गणे रजनीमान । ऐसें उद्दाम कृष्णाचरण । तें त्या स्मरोन वधू रुदती ॥२२॥
श्रीकृष्णाचे सुरतकाळीं । तौर्यत्रिकीं अमरपाळीं । करूनि पुष्पवृष्टि मोकळी । पिटिली टाळी आनंदें ॥२३॥
प्रवाहत्यागें सरिता स्तिमिता । स्थावरजंगमविरहावस्था । खेचरभूचरादिकां समस्तां । रतिसुखास्था श्रीकृष्णीं ॥२४॥
ऐसें चिंतूनि श्रीकृष्णचरित । गोपी हृत्कमळीं संतप्त । वियोगभयें विरहग्रस्त । जाल्या समस्त ते काळीं ॥१२५॥

चिंतयंत्यो मुकुन्दस्य भीता विरहकातराः । समेताः संघशः प्रोचुरश्रुमुख्योऽच्युताशयाः ॥१८॥

कृष्णासंगें जे केली क्रीडा । ते चिंतिती विगतव्रीडा । वियोगविरहदुःखें भ्याडा । एकीपुढीं एक वदती ॥२६॥
थवे मिळूनि ठायीं ठायीं । परस्परें कथिती पाहीं । कृष्णक्रीडेची सुघडाई । स्मरोनि हृदयीं विलपती ॥२७॥
जिहीं अच्युत कवळिला चित्तें । अच्युताशया म्हणिजे त्यातें । नेत्रीं बाष्पांबूचें भरितें । काय पैं तेथें त्या वदती ॥२८॥

गोय ऊचु :- अहो विधातस्तव न क्कचिद्दया संयोज्य मैत्र्या प्रणयेन देहिनः ।
तांश्चाकृतार्थान्वियुनंक्ष्यपार्थकं विक्रीडितं तेऽर्भकचेष्टितं यथा ॥१९॥

संगति योजूनियां कृष्णीं । सवेंचि मांडिली विघडणी । म्हणोनि दुःखें आक्रंदोनी । विधात्यालागोनि बोलती ॥२९॥
अहो वचनें सखेद तया । म्हणती अरे विधातया । कांहींच नाहीं तुजला दया । परम निर्दया बालिशा ॥१३०॥
तुझें कैसें हें मूर्खपण । कृष्णमैत्री संयोजून । प्रणयभावें स्नेहवर्धन । पुन्हा विघडण आदरिलें ॥३१॥
जारप्रेमाचें जें मैत्र । तेथील रहस्य परम विचित्र । दुरावूनि स्वपतिपुत्र । चित्तें स्वतंत्र तन्निष्ठ ॥३२॥
माता पिता बंधु बहिणी । सासू श्वशुर भावे वहिनी । गुह्य न वदवे त्यांलागोनी । जारा कर्णीं तें वदिजे ॥३३॥
व्याही जांवई सोइरे । चुलते मामे आप्त सारे । त्यांतें दुरावूनि अंतरें । गुह्य उत्तरें जारेंसीं ॥३४॥
सामान्य जाराची हे कथा । हा तो केवळ मन्मथजनिता । जारभावें वेधिलें चित्ता । अन्यवार्ता विसरलों ॥१३५॥
कृष्णीं वेधूनि गेलीं चित्तें । प्रिय न वाटे कृष्णापरतें । कृष्णावेगळें स्वहितकर्त्ते । नसे त्रिजगातें धुंडितां ॥३६॥
श्रीकृष्णाचें तोषें मन । तैसें करणें हिताचरण । आमुचें स्वहित जाणोनि कृष्ण । स्वयें आपण संपादी ॥३७॥
कृष्ण जाणों मनींचा भाव । कृष्ण आमुच्या जिवाचा जीव । त्याच्या स्नेहाचें लाघव । कोणा अपूर्व वदवेल ॥३८॥
कृष्णावेगळें आमुचें जिणें । शुष्कतृणरजाहूनिही उणें । श्रीकृष्णाच्या अंगीकरणें । ब्रह्मांड गणने न गणूं पैं ॥३९॥
कृष्णावीण ग्रास न गिळे । कृष्णावीण तृषा न वोळे । कृष्णावीण शरीर न चळे । नेत्र आंधळे हरिविरहें ॥१४०॥
घ्राण परिमळा कृष्णाविण । नेणे त्वगिंद्रिय संस्पर्शन । कृष्णावांचूनि नेणती श्रवण । शब्दीं विवरण अर्थाचें ॥४१॥
शून्य कृष्णावीण संसार । वाटे सर्वत्रही हुर्हुर । अनोळख इंद्रियां उपचार । कृष्णीं अंतर पडतांची ॥४२॥
ऐशा आम्ही कृष्णपरा । स्नेहें मैत्रें प्रेमसुभरा । आतां विघडितां निष्ठुरा । द्राव अंतरा केंवि न ये ॥४३॥
असो आमुची ऐसी कथा । प्राणिमात्रा देहवंता । मैत्र योजूनि पुन्हा विघडितां । करुणा चित्ता न ये तुझिया ॥४४॥
भणगा वाढूनि दिव्यान्नभाणें । पुन्हा जैसें हिरोनि नेणें । तैसें अतृप्ता विघडणी करणें । हें दूषण तव आंगीं ॥१४५॥
बाळ मांडोनि खेळ मोडी । किंवा मैत्री लावोनि विघडी । तैसी तुझी वोखटी खोडी । बोलों उघडी तैं ऐक ॥४६॥

यस्त्वं प्रदर्श्यासितुकुंतलावृतं भुकुन्दवक्त्रं सुकपोलमुन्नसम् ।
शोकापनोदस्मितलेशसुंदरं करोषि पारोक्ष्यमसाधु ते कृतम् ॥२०॥

विधात्या हें तुझें गर्हित कर्म । श्रीकृष्णाचें वदनपद्म । आमुच्या नेत्रांसि करूनि सुगम । पुन्हा दुर्गम करिसी पैं ॥४७॥
कैसें कृष्णाचें वदनकमळ । ऐसा तेथींचा विशेष मेळ । जयावरी विखुरले कृष्णकुन्तल । प्रभा घननीळ लावण्य ॥४८॥
गंडमंडित कुन्तलकांति । तरळ कुन्तल झळकताती । आकर्ण नयन मीनाकृति । उन्नत नासिका मिरवतसे ॥४९॥
लेशमात्र मंदस्मित । चंचल अपांग विलासयुक्त । भ्रूविक्षेपें प्रमदाचित्त । चोरूनि नेत चारुत्वें ॥१५०॥
कोटिक्षणदापतींचें लोण । उतरूनि पाहिजे सुंदरवदन । अनंतजन्मींचा शोकशीण । जाय हारपोनि तत्काळ ॥५१॥
तें हें दावूनि आम्हांप्रति । वियोगें लपविसी कां मागुती । ऐसी तुझी असाधुमति । निर्दय चित्तीं तूं एक ॥५२॥
पुन्हा म्हणती विधातियासी । तूं दत्तापहारी परम दोषी । दत्तापहरण कैसें म्हणसी । तरी तेविषीं अवधारीं ॥५३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP