अध्याय ३८ वा - श्लोक २६ ते २७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तद्दर्शनाह्लादविवृद्धसंभ्रमः प्रेम्णोर्ध्वरोमाऽश्रुकलाकुलेक्षणः ।
रथादवस्कंद्य स तेष्वचेष्टत प्रभोरमून्यंघ्रिरजांस्यहो इति ॥२६॥

अहो या पदाचें व्याख्यान । परमाश्चर्यें म्हणे धन्य । जे कां दुर्लभ भगवच्चरण । ते म्यां सचिह्न देखिले ॥७॥
ज्यासि दुर्लभ वराटिका । त्यासि निधान जोडल्या देखा । गगन न पुरे त्याचिया हरिखा । त्याहूनि श्वाफल्का उत्साह ॥८॥
भगतच्चरणदर्शनानंद । तेणें संभ्रम वाढला अगाध । तीं चिह्नें ऐका विशद । नृपा कोविद शुक सांगे ॥९॥
सप्रेम भरतें भरलें आंगीं । रोमा थरकल्या सर्वांगीं । बाष्पांबुकळा लागवेगीं । स्तिमितापांगीं डळमळिती ॥३१०॥
रोमांचमूळीं उमटले पुलक । शरीरीं पाझरे स्वेदोदक । सकंपश्वासा जालें अटक । सात्त्विकाष्टक प्रकटलें ॥११॥
तयां संभ्रमा सरिसा पाहीं । रथावरूनि लोटला मही । कृष्णपाउलें दोहीं बाहीं । कवळी हृदयीं औत्सुक्यें ॥१२॥
हे प्रभूचे अंघ्रिकण । म्हणूनि तनूचें उतरी लोण । कवळूनि घाली लोटांगण । परम धन्य भव मानी ॥१३॥
मध्यपीठ श्रीकृष्णांघ्रि । श्रीविद्या ते राजेश्वरी । आवरणदेवता गोपगोखुरीं । नमस्कारी सप्रेमें ॥१४॥
आजि कृष्णांघ्रिरजांच्या ठायीं । स्नान जालें मज पुण्यांहीं । यज्ञावभृथें जितुकीं कांहीं । घडलीं स्वदेहीं मानितसे ॥३१५॥
कृष्णांघ्रिरेणूंमाजि लुंठन । किमर्थ केलें म्हणाल पूर्ण । तरी प्रेमसंभ्रमाचें अवतरण । फळाभिस्मरण करूं नेदी ॥१६॥

देहंभृतामियानर्थो हित्वा दंभं शुचम् । संदेशाद्यो हरोर्लिंगदर्शनश्रवणादिभिः ॥२७॥

प्राणी देहातें जे धरित । त्या देहवंतांचा मुख्य पुरुषार्थ । हाचि उत्कृष्ट ऐसें कथित । शुक समर्थ नृपातें ॥१७॥
तो हा कोणता पुरुषार्थ । जो अक्रूरा साधला येथ । तो साकल्यें वाखाणिजेत । चतुरीं स्वस्थ परिसावा ॥१८॥
सांडूनि दंभभयादि शोक । भगवत्प्रेमा अंतर्मुख । कंससंदेशपूर्वक । श्वफल्कतोक जो भोगी ॥१९॥
तरी अक्रूरें कैसें टाकिलें भय । कैसा दंभ टाकिला होय । शोकत्यागाचा अभिप्राय । यथान्वयें परिसा हो ॥३२०॥
नंदादि व्रजींचे प्रजानन । त्यांसि करूं जातों मी शासन । तें राजसत्ता ऐश्वर्यचिह्न । त्यागिलें संपूर्ण हरिप्रेमें ॥२१॥
ऐसा कथिला दंभत्याग । आतां परिसा भयाचें लिंग । अक्रूरें त्यागिलें तो प्रसंग । यथासांग कथिजेल ॥२२॥
मी अक्रूर कंसदूत । माझें कुटुंब मथुरेआंत । साधावया कंसकृत्य । व्रजा निश्चित धाडिलों ॥२३॥
परमगुह्य आत्मिकपणें । कंसें कथिलें मजकारणें । तदर्थ व्रजा माझें जाणें । हें निर्भयपणें विसरला ॥२४॥
मी कृष्णासि झालों शरण । हें कंसासि होतां श्रवण । तैं कुटुंबें सहित माझें मरण । हें भय संपूर्ण त्यागिलें ॥३२५॥
व्यसनीं पडलें यादवकुळ । त्याचा कैपक्षी घननीळ । त्यातें वधील कंस खळ । तैं दुःख केवळ सर्वांसी ॥२६॥
रामकृष्णां वधिल्या पाठीं । देवकीवासुदेवांतें निवटी । उग्रसेनाची छेदील घांटी । आणि यादवकोटी मारील ॥२७॥
तेव्हां माझे जिवलग आप्त । कंस मारील ते समस्त । तैं मज जाकळी शोकावर्त । ऐसें हृदयांत न धरिलें ॥२८॥
अथवा कृष्णासि जालों शरण । ऐसें कंसासि होतां श्रवण । माझिया कुटुंबालागिं दुर्जन । तीव्रशासन तैं करील ॥२९॥
निरपराध स्त्रिया लेंकुरें । दुर्जनाच्या तीव्र प्रहारें । दुःख पावती या शोकांकुरें । नाहीं अंतरें शिवतला ॥३३०॥
वृत्तान्तपूर्वक कंसाज्ञा । संदेश ऐसी तयेसि संज्ञा । तो संदेश ऐकतां अक्रूरमना । भगवद्भावना उपजली ॥३१॥
सांडूनि भय शोक आणि दंभ । कवळिला केवळ पद्मनाभ । तदनुप्रेमें मानसक्षोभ । अनन्य वालभ जें कथिलें ॥३२॥
संदेश पडतां श्रवनपुटीं । विसरला सदंभभयशोकगोठी । भगवत्प्रेमा उथलला पोटीं । शुकें वाक्पुटीं तो कथिला ॥३३॥
माझें आजि जन्म धन्य । कंससंदेशें करून । मी देखेन भगच्चरण । उल्हास पूर्ण हा भरला ॥३४॥
तेणें उल्हासभरित चित्तें । गृहीं क्रमूनि ते रात्रीतें । प्रभाते चालिला व्रजपुरातें । ध्यानभक्तीतें अनुभवित ॥३३५॥
म्हणे काय म्यां सुकृत केलें । सर्वस्व सत्पात्रीं अर्पिलें । कीं तपश्चर्यें संपादिलें । जें हरिपाउलें देखेन मी ॥३६॥
परम दुर्लभ जो संसारीं । तो मी कंसआज्ञेवरी । शूद्र श्रुतीतें अनधिकारी । तो ही श्रीहरि देखेन ॥३७॥
पुनरपि म्हणे हेंही नव्हे । मज कां हरिदर्शन न व्हावें । जरी मी अधम तथापि व्हावें । अच्युतदर्शन मजलागीं ॥६८॥
कालनदीच्या प्रवाहीं । तृणासमान जीव पाहीं । बळें वाहवितां न वचती काई । कोण्ही तर्‍हीही परपारा ॥३९॥
भगवद्दर्शनासि अवरोध - । कारक अमंगल अघसंबंध । तो नाशोनि सजन्म शुद्ध । जालों प्रसिद्ध हरिनमना ॥३४०॥
कंसें मजवरी अनुग्रह केला । कीं हा नियोग सांगीतला । तेणें देखोन हरिपाउलां । ज्या भजतां लंघिता भव संतीं ॥४१॥
विधि हर सुर मा सात्वत मुनि । अर्चिती जया पदां लागुनी । गोचारणार्थ वृंदावनीं । गोपींच्या स्तनीं लांछित जे ॥४२॥
त्या कृष्णाचें सस्मित ध्यान । आजि भाग्यें देखती नयन । कीं जे होती मज शुभ शकुन । प्रादक्षिण्यें मृग जाती ॥४३॥
जाणोनि निजजनांची आर्ति । भूभारहरणा लावण्यमूर्ति । तो कृष्ण देखेन मनुष्याकृति । तैं सफळ संपत्ति नयनांची ॥४४॥
जरी धरिला मनुष्यदेह । तरी ज्या नातळे अहंमोह । स्वप्रकाशज्ञानप्रवाह । लीलानुग्रहविग्रही ॥३४५॥
प्राकृत मानिती त्या देहधारी । परी तो निर्गुण निर्विकारी । स्वधर्मसंस्थापनेवारी । लीलावतारी युगीं युगीं ॥४६॥
तें जन्मकर्मगुणचरित्र । वाचा सुमंगल वर्णिती मिश्र । त्यां जीवविती शोभविती आणि पवित्र । करिती सर्वत्र त्रिजगातें ॥४७॥
भगवज्जन्मकर्मगुणवर्जिता । येर शृंगारचातुर्यभरिता । जरी जाल्या कविसंमता । तर्‍ही त्या प्रेतासम वाणी ॥४८॥
तो हा अवतरला यदुकुळीं । धर्मसंस्थापक भूमंडळीं । तेचि ज्याची यशनव्हाळी । अमरावळी गाताती ॥४९॥
त्यातें आजि देखेन दृष्टीं । ज्याचें लावण्य त्रिजगां मुकुटीं । सुप्रभाते शकुनगांठी । म्यां हृत्पटीं बांधिली ॥३५०॥
तथापि ऐसा देखिल्यावरी । उडी घालीन मी धरित्री । सधेनु सानुग नमस्कारीं । योगेश्वरीं जो पूज्य ॥५१॥
दंडप्राण चरणांवरी । पतित देखोनि मातें हरि । अभयहस्त ठेवील शिरीं । जो भय हरी शरणांचें ॥५२॥
जो हस्त बळीनें त्रिजगद्दानीं । कीं शक्रें पूजिला शतमखयजनीं । कीं गोपींहीं श्रमापहरणीं । रासनर्तनीं आळंगिला ॥५३॥
ऐसा हस्त माझे शिरीं । ठेवूनि परमात्मा अंतरीं । कांहीं विषम भावा न धरी । न मनी वैरिदूत मज ॥५४॥
दंडप्राय नमिल्या वरी । कृतांजलि मज देखोनि हरि । कृपादृष्टां अमृतधारीं । तैं अनघ शरीरीं सुख वाटे ॥३५५॥
जरी मज मानूनि वृद्ध वडील । बाहु पसरूनि आळंगील । तरी तीर्थमयचि मज करील । बंध हरील कर्मांचा ॥५६॥
लब्धप्रमाण अंगसंग । कृतांजलि समाहितांग । देखोनि पुसेल मज श्रीर्म्ग । बापा म्हणोनि गौरवें ॥५७॥
तेव्हां धन्य माझें जन्म । कीं मज संतुष्ट पुरुषोत्तम । ज्यातें नादरी मेघश्याम । परम अधम तेंचि जिणें ॥५८॥
भगवंताच्या आदरा हेतु । नोहे सोयरा स्वजन आप्तु । द्वेष्य उदास ना मध्यस्तु । कीं तो सर्वगत सर्वात्मा ॥५९॥
तथापि भक्तप्रेमानुसार । फळे जैसे सुरतरुवर । तैसा कृष्ण निर्विकार । मित्रामित्र तद्भावें ॥३६०॥
असो मातें कृष्णाग्रज । कृतांजलि धरूनि सहज । सत्कारील मानूनि पूज्य । तैं मी भोज नाचेन ॥६१॥
कंससंदेशापासून । ऐसे संकल्प विवरी मन । विवशतनुभावें प्रयाण । सूर्यास्तमानपर्यंत ॥६२॥
बाह्यतनुभाव विसरला । नेणे कैसा मार्ग क्रमिला । रथें करूनि व्रजा गेला । तंव बोधिला हरिबोधें ॥६३॥
भूमीं उमटले कृष्णचरण । ध्वजवज्रांकुशादि सुचिह्न । देखोनि घातलें लोटांगण । भरला पूर्ण सत्त्वाष्टकें ॥६४॥
भगवत्प्रेमें तनुमनभाव । विसरला दंभशोकभेव । परमपुरुषार्थ याचें नांव । हें श्रेष्ठगौरव देहवंता ॥३६५॥
म्हणोनि देहातें जे धरिती । हाचि पुरुषार्थ तयांप्रति । जे अक्रूरा ऐशी भगवद्रति । देहविस्मृती माजी घडे ॥६६॥
देहवंतां हे दुर्लभ प्राप्ति । जे भवविस्मरणें भगवद्रति । शुकें कथूनियां रायाप्रति । कथा पुढती आदरिली ॥६७॥
भूमीवरी उमटले चरण । अक्रूरें ते अभिवंदून । पुढें झालें हरिदर्शन । तें निरूपण अवधारा ॥६८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP