TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

श्लोक ११ ते १५
य ईक्षिताऽहंरहितोऽप्यसत्सतोः स्वतेजसाऽपास्ततमोभिदाभ्रमः ।
स्वमाययात्मन्नचितैस्तदीक्षयाप्राणाक्षधीभिः सदनेष्वभीयते ॥११॥

जर्‍ही प्राकृत दिसे कृष्ण । तर्‍ही तो प्रकृतिधर्मविहीन । शुभाशुभकार्यकारण । अहंताशून्यही अवलोकी ॥२४॥
देहाहंता नसतां एक । कर्तृत्व भोक्तृत्व हर्ष शोक । कोणे ठायीं भेद कळंक । भासोनि पंक माजवी ॥१२५॥
म्हणाल अहंता ते काय । तरी अवघा आवरणें आत्मप्रत्यय । झांकतां विक्षेप करी उदय । भेदासि ठाय त्यामाजी ॥२६॥
एकला एकांतीं शयन करी । जागृति प्रत्यय सुषुप्ति आवरी । विक्षेपस्वप्नभ्रमांतें प्रसरी । तैं भेद उभारी सुखदुःखा ॥२७॥
तेथ क्षणिकें विषयाभासें । सुखदुःखादि पूर्वाध्यासें । भोगितां हर्षें शोकें त्रासें । एवं ऐसें स्वाज्ञान ॥२८॥
अविद्यावरण म्हणिजे तम । विक्षेप तो भेदोद्गम । विषयाभास केवळ भ्रम । देह अहंमम दृढावी ॥२९॥
तो कर्तृत्वभोक्तृत्वाभिनिवेश । घालूनि सुखदुःखांचे पाश । जागवूनियां षड्वैरियांस । रात्रिदिवस जाचवी ॥१३०॥
कृष्णीं अपास्त हे अवघेचि । म्हणोनि ऊर्मी अहंतेची । नुठे यास्तव आनंदाची । नित्योपलब्धि प्रकाशे ॥३१॥
म्हणाल कृष्णही देहधारी । तमादि भ्रम त्या कां नावरी । तरी स्वतेजसा या पदावरी । जाणिजे चतुरीं निर्भ्रमता ॥३२॥
नित्य स्वरूपसाक्षात्कार । स्वप्रत्यय जैं अनावर । तैं त्या कोठूनि पडेल विसर । केंवि तमांकुर विरूढेल ॥३३॥
जेथ तमाचें आवरण नाहीं । तेथ विक्षेप कैंचा काई । विक्षेपें विण भेद पाहीं । कोणा कहीं उपजेल ॥३४॥
भेदेंविण कर्त्ता भोक्ता । या अभिनिवेशें देहाहंता । केंवि भ्रमवील नित्यतृप्ता । चैतन्यनाथा श्रीकृष्णा ॥१३५॥
म्हणाल हें जरी कृष्णीं न घडे । तरी गोपींसी कैसा क्रीडे । संगोपूनि निज संवगडे । दैत्य गाढे निर्दाळी ॥३६॥
तरी आत्मनि म्हणिजे आपुले ठायीं । आपुल्या ईक्षणसत्ता पाही । आपुले मायेच्या प्रवाहीं । रची सर्वही संकल्पें ॥३७॥
धी बोलिजे कर्तृकरणा । प्राण म्हणिजे चेष्टाकरणा । ज्ञानाकर्मात्मका संज्ञा । अक्ष ऐसी जाणावी ॥३८॥
इत्यादि करणीं सावयव । स्वसत्ता निर्मूनि विविध जीव । अभेदबोधें वासुदेव । क्रीडे स्वमेव ऐश्वर्यें ॥३९॥
लतापिहितकुंजसदनीं । विचित्रलीला कर्माचरणीं । आसक्त भाविजे मुग्धीं जनीं । परी जाणती ज्ञानी अनासक्त ॥१४०॥
जो ज्या उत्कट चिंतितार्थ । तो त्या प्रत्ययगोचर होत । तैसा आभिमुख्यें भासत । कर्मासक्तवत् श्रीकृष्ण ॥४१॥
एवं आम्हां समान कृष्ण । देही नोहे हा निश्चय पूर्ण । कर्तृत्वभोक्तृत्वाभिनिवेशशून्य । हा पूर्णचैतन्य परमात्मा ॥४२॥
ऐसी शंकेची निवृत्ति । करूनि पुनः विवरी चित्तीं । जे नित्यतृप्ता लीला आचरिती । केंवि प्रवृत्ति म्हणावी ॥४३॥
तरी जगदुद्धाराचि कारणें । पूर्ण स्वजनांच्या कारण्यें । अनुग्रहार्थ लीलाचरणें । करी तीं श्रवणें परिसावीं ॥४४॥

यस्याखिलामीवहभिः सुमंगलैर्वाचो विमिश्रागुनकर्मजन्मभिः ।
प्राणंति शुभंति पुनंति वै जगद्यास्तद्विरक्ताः शवशोभना मताः ॥१२॥

ज्याचे जन्मकर्मगुण । तिहीं करूनि मिश्र व्याख्यान । ज्याच्या वाणी करिती कथन । जगत्कल्याण त्या वाणी ॥१४५॥
पूर्णपणासि न पडे तुटी । अव्ययत्वाची न सुटे गांठी । न पचतांचि गर्भघटीं । योनिसंकटीं न कोंडतां ॥४६॥
ऐसीं अयोनिसंभवजन्में । कारुण्यगुणादि अनंत नामें । वाणी वर्णिती ज्या सप्रेमें । अगाह कर्में यशोंऽकितें ॥४७॥
ज्याच्या जन्मकर्मगुणीं । अमीवें म्हणिजे पातकश्रेणी । श्रवणमात्रें त्यांची धुणी । करी दिनमनि जेंवि तमा ॥४८॥
सकळ पातकां होतां भंग । क्षाळला अमंगळ प्रसंग । यास्तव मंगळवृद्धि सांग । पिके अव्यंग ते ठायीं ॥४९॥
गुणकर्मादिविमिश्रा वाणी । अमृतरूपा जगज्जीवनीं । प्राणंति या पदव्याख्यानीं । नपा शुकमुनि बोलिला ॥१५०॥
तव कथामृत ऐसें । गोपीगीतीं गाईलें असे । तेंचि अक्रूरें निजमानसें । चिंतनमिस्सें विवरिलें ॥५१॥
त्रिजगल्लक्ष्मीचें शोभन । जन्मकर्मगुणांचें कथन । आणि पवित्रा गंगेहून । गुणकीर्तनमय वाणी ॥५२॥
ऐसिया आणी त्रिजगाप्रति । प्राणंति म्हणिजे जीवविती । शुभंति म्हणिजे शोभविती । बोलिजे पुनंति पावनता ॥५३॥
एवं जन्मकर्मगुणविमिश्रा । वाणी निखिल चराचरा । जीववी शोभवी आणि निष्पापकरा । मंगलप्रचुरा पुण्यदा ॥५४॥
अमृतरूपा मंदाकिनी । लक्ष्मीशोभना रविनंदिनी । सरस्वती ते विश्वपावनी । एवं त्रिवेणी हरिकीर्ति ॥१५५॥
तीर्थीं व्रतीं तपीं दानीं । पुरश्चरणीं यज्ञविधानीं । चर्तुविध पुरुषार्थांची खाणी । तें फळ कीर्तनीं अक्षय ॥५६॥
विविधा कर्मीं पृथक् फळें । पुण्यक्षयें होतीं विकळें । हरिकीर्तनीं जोडती सकळें । तीं न होतीं विकळें कल्पांतीं ॥५७॥
जन्मकर्मगुणमिश्रिता । ऐसीया वाणींत नाहीं कथा । तिया वाणी चातुर्यभरिता । लावण्ययुक्ता शवरूपा ॥५८॥
भगवद्गुणीं ज्या विमुखा वाणी । अशुभफळांच्या केवळ खाणी । वैदिकीं लौकिकीं सूक्तपठनीं । कदा कल्याणी न फळती ॥५९॥
हरिगुणविमुखीं आशीर्वाद । दिधल्या होती अशुभप्रद । रजस्वलेचें सोवळें शुद्ध । जेंवि अशुभफळदानी ॥१६०॥
शव अपवित्र जेंवि श्मशानीं । कीं जीतचि बाळरंडा । कामिनी । हरिगुणविमुखा चातुर्यखाणी परी त्या वाणी शवरूपा ॥६१॥
श्मशानीं शवासनीं अभिचार । जारनमारणादि साबरमंत्र । साधूनि होती पापापात्र । तेंवि अपवित्र फळदात्या ॥६२॥
शव उपयोग साबरागमीं । तेंवि बाळरंडा ही पूज्य वामीं । परी ते योग्यता नरकधामीं । पूज्या पूजकां पाचक ॥६३॥
साहित्य अळंकार नाटकें । संगीत शृंगाररस कौतुकें । हो का काव्यव्याकरणप्रमुखें । लावण्यरोचकें वाणीचीं ॥६४॥
हो का श्रुतिप्रवीणा वाणी । मीमांसादि अनुष्ठानीं । परी ज्या विमुखा भगवद्गुणीं । त्या शव म्हणोनि अशुभदा ॥१६५॥
अशुभें त्यांचीं कर्मफळें । म्हणोनि पचविती गर्भखोळे । जन्ममृत्यूचे उमाळे । दुःखें बहळें भोगविती ॥६६॥
शास्त्राभ्यासें लावण्यभरिता । परी शवासमान ज्या हरिगुणरहिता । त्या वाणींतें सादर श्रोता । प्रेतान्नभोक्ता तो जाणा ॥६७॥
वेदवरिष्ठ जर्‍ही झाला । तरी तो शरण हरिगुणांला । कर्मसांगतासिद्धि वदला । विष्णुस्मरणें सर्वत्र ॥६८॥
शव नासोनि सुटे घाणी । तैसिया हरिगुणविमुखा वाणी । निंद्य अपवित्र दुर्गुणी । नरकश्रेणीफलरूपा ॥६९॥
बालरंडा रूपसंपन्ना । नट लेवूनिया आभरणा । पाहे स्मितवक्त्रें दर्पणा । तैं पुंश्चली चिह्नां प्रकटी कीं ॥१७०॥
तनुतारुण्यें लावण्यपुष्टि । तों ते मन्मथें होय कष्टी । परपुरुषाचे मैथुनघृष्टी । अघसंकटीं कुळ बुडवी ॥७१॥
बालरंडेसी रजोदर्शन । होतां संस्कार करी कोण । असंस्कारी सर्वाचरण । प्रेतासमान जितातें ॥७२॥
बालरंडा लावण्ययुवति । सालंकृता ही भेटल्या पंथीं । अशुभसूचक कार्यघाती । भले मानिती अपशकुन ॥७३॥
बालरंडेच्या हातींचा पाक । शुचिष्मंत विधिपूर्वक । तथापि हव्यकव्यात्मक । भोजनीं कुंभपाक न चुकती ॥७४॥
बालरंडेचें सोवळेपण । तें प्रेतसंपर्का समान । पिता बंधु आप्त स्वजन । ममता धरून कालविती ॥१७५॥
शास्त्रीं निंद्य परि ममता न सुटे । यालागिं सोवळें तिचेंचि मोठें । ब्राह्मणस्पर्शें तें उफराटें । सचैल करी शुद्धत्वें ॥७६॥
रजोदर्शनीं संस्कारवंता । पुरुषभुक्ता वैधव्यप्राप्ता । सदोषा नसती विरक्ता असतां । बालरंडे सम त्या पैं ॥७७॥
सुपुत्रवंता वैधव्यप्राप्ता । पुत्रयोगें त्यां कर्मार्हता । दोष नाहीं त्यांचिया माथां । सौभाग्यभरिता जाणाव्या ॥७८॥
पिताचि आपण गर्भवासी । परिणमोनि जन्म पावे कुसीं । उपनयनीं तो स्वकर्मासी । पुत्रापासीं निक्षेपी ॥७९॥
अधिकार करूनि श्रौतीं स्मार्तीं । स्वपन्ती देऊनि पुत्राहातीं । कर्मसंन्यासें होय यति । तैं कर्मच्युति त्यां नाहीं ॥१८०॥
भर्तार पुत्ररूपें कुसीं । म्हणोनि वैधव्य नाहीं तिसी । एवं प्रेतत्व बालरंडेसी । उत्क्रांतदर्शी मुनि वदती ॥८१॥
प्रैषोच्चारपूर्वक आतुर । अथवा विद्वद्यतीश्वर । त्याचें प्रेतही परम पवित्र । अशौचसंचार त्या नाहीं ॥८२॥
परंतु हरिगुणविमुखा वाणी । त्या प्रेतापरीस अशौचखाणी । घेतां श्रवणीं पठनीं मननीं । अकल्याणीं नांदविती ॥८३॥
बालरंडा जर्‍ही असंस्कारीं । वैराग्ययुक्ता निरहंकारी । हरिगुणकीर्ति पढे वैखरी । तरी धन्य संसारीं पावन ते ॥८४॥
न वंचूनियां तनु मन प्राण । अमत्सरत्वें हरिगुणभजन । नीचकर्मीं निरभिमान । उल्हास पूर्ण हृकमळीं ॥१८५॥
जितेंद्रियत्वें हरिगुनपठन । भर्ताररूपी श्रीभगवान । हृदयीं ठसावतां संपूर्ण । बाळरंडापण मग कैंचें ॥८६॥
भर्ता भगवान रुचला मनीं । हरिगुणपठनीं रंगली वाणी । शरीर रंगलें हरिगुरुभजनीं । तैं सुकृतखाणी ते होय ॥८७॥
तिचें पदजल वंदिती सुर । विधिहर होती आज्ञाधर । सप्रेम हरिगुणवाग्व्यापार । जाणोनि श्रीधर संगोपी ॥८८॥
तैं अशुभें तितुकीं शुभदें होतीं । महापातकें क्षया जाती । हरिगुणपठनीं ऐसी शक्ति । जे न पढती ते प्रेत ॥८९॥
निंद्य कुंटिनी अपवित्र । पक्षीपालनीं नामोच्चार । करितां पावली तमसःपर । वैकुंठपुर अक्षय ॥१९०॥
पिंगला नामें केवळ गणिका । हरिगुणपठनें अक्षय सुखा । पावली ते तुज कुरुकुलतिलका । पुढिले स्कंधीं कथिजेल ॥९१॥
जर्‍ही तो प्राणी आचारभ्रष्ट । परि भवीं विरक्त एकनिष्ठ । वाचेसि करितां हरिगुणपाठ । पावे वैकुंठ अनायासें ॥९२॥
अजामिळाच्या पातकराशि । कीं जें घडलें वाल्मीकासी । तें पूर्वीं म्यां तुजपासीं । नाममहिमेंशीं निरोपिलें ॥९३॥
एवं हरिगुणपठनापुढें । ब्रह्मांडभरीही पातक उडे । पावन हरिगुण जो नर न पढे । तो जितचि मढें अपवित्र ॥९४॥
तस्मात् हरिगुणविमुखा वाणी । सालंकृता रसाळपणीं । बालरंडा त्या व्यभिचारिणी । प्रेताहिहूनि अपवित्रा ॥१९५॥
ज्या ज्या विरक्ता हरिगुणपठनीं । त्या शवशोभना संमता वाणी । या पदाचे स्फुट व्याख्यानीं । दूषण बुधजनीं न मनावें ॥९६॥
ऐसें ज्याचें मंगल यश । तोचि हा यदुकुळीं आदिपुरुष । कां अवगला पशुपवेश । हृषीकेश तें ऐका ॥९७॥

स चावतीर्णः किल सात्वतान्वये स्वसेतुपालामरवर्यशर्मकृत् ।
यशो वितन्वन्व्रज आस्त ईश्वरो गायंति देवा यदशेषमंगलम् ॥१३॥

भगवन्निर्मित स्वधर्मसेतु । वर्णाश्रमादि जे कर्मतंतु । तद्रुक्षक जे अमरनाथु । त्यां सुखहेतु अवतरला ॥९८॥
अमरवर्या जो सुखसाग्र । स्वयें व्रजपुरीं तो ईश्वर । करूनि दैत्यांचा संहार । कीर्ति अपार विस्तारी ॥९९॥
पीयूषबाह्य जैसे अमर । अखिल तेजस्वी भास्कर । तैसें अशेष मंगलकर । यश पवित्र जयाचें ॥२००॥
अशेष मंगल निर्जर गाती । ज्याची पावन यशःसंपत्ति । त्रिजगदुद्धरणीं अगाध कीर्ति । तो श्रीपति व्रजवासी ॥१॥
बहुतेक त्याचें मज दर्शन । होईल ऐसें भावूनि पूर्ण । अक्रूर आपणा मानी धन्य । तें निरूपण अवधारा ॥२॥

तं त्वद्य नूनं महतां गतिं गुरुं त्रैलोक्यकांतं दृशिमन्महोत्सवम् ।
रूपं दधानं श्रिय ईप्सितास्पदं द्रक्ष्ये ममासन्नुषसः सुदर्शनाः ॥१४॥

ब्रह्मांडभुवनींचें लावण्य । एकात्मता पावलें पूर्ण । दृष्टिमंतांसि महोत्सवकरण । ज्याचें दर्शन बहुभाग्य ॥३॥
महान म्हणिजे विधिहरप्रमुख । ज्यांतें वंदिती अखिल लोक । त्यांसही गतिप्रद जो देख । म्हणोनि पदांक ते वाहती ॥४॥
अज्ञानसुषुप्तिप्रलयावस्था । फेडूनि तामसी अहंता । पूर्णात्मत्व प्रकाशितां । तो महंतां गतिप्रद ॥२०५॥
जागररूपा जे उत्पत्ति । ते निरसूनि विक्षेपभ्रांति । काढूनि रजोगुणाची बुंथी । पूर्णात्मस्थितिप्रापक जो ॥६॥
सनकादि ऊर्ध्वरेते व्रती । ज्याचे स्वरूपीं त्यांची गति । म्हणोनि शोभे गुरुत्वशक्ति । त्रिजगोत्पत्तिस्थितिनाशी ॥७॥
त्रिजगदुद्धर्ता जो गुरुवर । अखिल लावण्य एकाकार । नेत्रवंतासि उत्साहकर । रूप सुंदर देखोनि ॥८॥
इंदिरेनें एकांतइच्छे । नुरसुरविधिहर केलीं तुच्छें । तें रू धरूनि गोगोपवत्सें । रक्षी स्वेच्छें तें सम जो कां ॥९॥
त्या कृष्णाचें आजि दर्शन । बहुतेक भाग्यें मी लाहीन । किमर्थ म्हणों तरी शुभप्रद शकुन । प्रभाते पासून होताती ॥२१०॥
उषसीं करितां आत्मचिंतन । लविन्नला दक्षिण नयन । दक्षिण बाहु करी स्फुरण । सुप्रसन्न हृत्कमळ ॥११॥
सुस्नात सलंकृत हास्यवदन । प्रभाते भेटले ब्राह्मण । सपुत्र सुवासिनींचा गण । सौभाग्यमंडित भेटला ॥१२॥
धेनु सवत्सा स्नुतस्तनी । प्रफुल्ल कुसुमेंसी माळिणी । दधिदुग्धेंसीं व्रजगौळिणी । प्रयाणारंभीं भेटल्या ॥१३॥
उषःकाळीं सुष्ठु चिह्नीं । शुभसूचका जाल्या रजनी । आजि हरिपद देखेन नयनीं । निश्चय शकुनी दृढ केला ॥१४॥
पादाब्जदर्शनानंतरें । नमनोत्साह सप्रेमभरें । आधींच कल्पी चित्तें आतुरें । तिये उत्तरें परिसावीं ॥२१५॥

अथावरूढः सपदीशयो रथात्प्रधानपुंसोश्चरणं स्वलब्धये ।
धिया घृतं योगिभिरप्यहं ध्रुवं नमस्य आभ्यां च सखीन्वनौकसः ॥१५॥

हरिपद देखिल्यानंतर । रथापासूनि अतिसत्वर । उडी टाकूनि दण्डाकार । लोटीन शरीर भूभागीं ॥१६॥
प्रधान म्हणिजे श्रेषपुरुष । रामकृष्ण गोपाळवेश । नटले ईश्वर जाणोनि त्यांस । नमीन सावकाश तत्क्षणीं ॥१७॥
ज्यांचें चरणपंकज मुनि । आत्मप्राप्ति अभिलाषुनी । प्रज्ञाबळें कवळिती ध्यानीं । योगसाधनीं बहुयत्नें ॥१८॥
आजि मी त्यांच्या चरणांसहित । तत्सन्निधि गोप समस्त । त्यांतें नमीन आनंदभरित । होईन कृतार्थ तल्लाभें ॥१९॥
श्रीपद ऐसें नमिल्यावरी । अनुग्रह करील कैसा हरि । तेंही अक्रूर हृदयीं विवरी । शुकवैखरी तें वर्णी ॥२२०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-05-06T03:36:47.3530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

collagenous fibre

 • Zool. कोलॅजिनी तंतु 
RANDOM WORD

Did you know?

जेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.