अध्याय ३८ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ममाद्यामंगलं नष्ट्म फलवांश्चैव मे भवः । यन्नमस्ये भगवतो योगिध्येयांघ्रिपंकजम् ॥६॥

भगवत्प्राप्तीचें कारण । जें मज भगवत्प्रेमा पूर्ण । उदेला तेव्हांचि अकल्याण । भंगोनि कल्याण उदेलें ॥६८॥
भगवप्रेमाची प्रवृत्ति । तेचि अमंगळाची हंती । आजि ते बहुवस उदेली चित्तीं । अमंगळशांति तद्योगें ॥६९॥
माझें जन्म आजि सफळ । ऐसा निश्चय जाला अढळ । ज्या कारणास्तव तो घननीळ । भक्तवत्सल वंदीन ॥७०॥
योगीश्वरां जे चूडामणि । तेही पदाब्ज पूजिती ध्यानीं । ते मी प्रत्यक्ष पाहोन नयनीं । साष्टांग मूर्ध्नि वंदीन ॥७१॥
ज्याचिया चरणरजाचे प्राप्ती । पंकजभव भव सकाम चित्तीं । सनकादि तपश्चर्या करिती । ध्यानीं हरिमूर्ति पहावया ॥७२॥
आजि कंसाच्या निदेशमात्रें । ते मी प्रत्यक्ष पाहीन नेत्रें । कंस उपकार वर्णी वक्त्रें । स्फुरती गात्रें हरिप्रेमें ॥७३॥

कंसो बताऽद्याकृत मेऽत्यनुग्रहं द्रक्ष्येंऽघ्रिपद्मं प्रहितोऽमुना हरेः ।
कृतावतारस्य दुरत्ययं तमः पूर्वेऽतरन्यन्नखमंदलत्विषा ॥७॥

बत शब्दार्थें आश्चर्य परम । मानूनि म्हणे हा कंस विषम । तो मजला कल्पद्रुम । हरिपदप्रेमफळदानें ॥७४॥
कंसें अनुग्रह केला मज । जे आणावयासि गरुडध्वज । प्रेरिलों यास्तव अधोक्षज । पाहोनि पदाब्ज वंदीन ॥७५॥
जो कां केवळ परब्रह्म । तो हा श्रीकृष्ण पुरुषोत्तम । साधुरक्षक वधूनि अधम । स्थापक धर्म अवतरला ॥७६॥
कंसाज्ञेवरूनि त्याचे । आजि पदाब्ज मी पाहीन साचे । जिहीं पूर्वीं बहु भक्तांचें । अंधतमिस्र निरसिलें ॥७७॥
अंबरीषादि राजर्षिवृंद । आश्रयूनि जें चरणारविंद । तामस दुरत्यय अगाध । तो भवसिंदु निस्तरले ॥७८॥
अज्ञानतमाब्धि भव हा निबिड । तेथ हरिपदनखमार्तंड । तत्प्रकाशें तरले सुघड । अल्पही अवघड न मनूनी ॥७९॥
ते मी आजि कंसकाजें । पाहीन भगवत्पदांबुजें । कृपा केली अधोक्षजें । येर्‍हवीं नुमजे हरिगरिमा ॥८०॥

यदर्चितं ब्रह्मभवादिभिः सुरैः श्रिया च देव्या मुनिभिः ससात्वतैः ।
गोचारणायानुचरैश्चरद्वने यद्गोपिकानां कुचकुंकुमांकितम् ॥८॥

हरिपदगरिमा कोणेपरी । जेथींची अचिंत्य गुणसामग्री । वर्णूं न शकेचि वागीश्वरी । मां केवि ते इतरीं उमाणिजे ॥८१॥
ऐश्वर्यसत्तायोगवरिष्ठ । म्हणोनि कंजज नीलकंठ । सदैव अर्चूनि हरिपदपीठ । नमिती मुकुटसंघृष्टि ॥८२॥
आदि शब्दें तो ईश्वर । ज्याचे विधिहर गुणावतार । तोही न पवे ऐश्वर्यपार । म्हणोनि तत्पर पदभजनीं ॥८३॥
असो हे ऐश्वर्याची गरिमा । परी सौभाग्यविभागें आगळी रमा । तेही लंपट हरिपदपद्मा । लावण्यमहिमा विसरूनि ॥८४॥
क्षीराब्धिमथनीं सुरवरकोटि । विधिहरादि लक्षूनि दृष्टिं । हरिपदकमळीं घालूनि मिठी । येरें करंटीं उपेक्षिलीं ॥८५॥
निलयललनाललामलास्या । लक्षूनि लालस लिगटती तोषा । सांडूनि कैवल्य सुखाची आशा । भवदुर्दशाभिभूत ॥८६॥
कांताकनकादि निकेतनीं । कमनीयत्व कौशल्यगुणीं । ग्रथित ग्रस्तांच्या देखोनि श्रेणी । निर्मुक्त मुनि तत्त्यागें ॥८७॥
श्रीसौभाग्या देऊनि पाठी । सदन सुंदरी सुवर्णकोटी । निगड क्ष्वेड बडिश पोटीं । मानून हठी निष्टले ॥८८॥
ऐसे भवरसरतिविरक्त । मुनिजन सज्जन सात्वत भक्त । तेही होऊनि पदाब्जनिरत । परमपुरुषार्थ साधिला ॥८९॥
अपवर्गार्थ सात्वत मुनि । रंगले ज्याचिये श्रीपदभजनीं । त्याची प्राप्ति सामान्य जनीं । लाहिजे कोठूनि जरी म्हणिजे ॥९०॥
राजा दुर्गम दुर्गांतरीं । द्वास्थ पार्षद वेत्रधारी । उद्भट भटसंघ गोप्तारीं । केंवि पामरीं तो भजिजे ॥९१॥
मृगयायात्रायानीं वनीम । सर्वां सुलभ नृप दर्शनीं । म्हणाल तरि तो तेही स्थानीं । पार्षदगणीं अभिगुप्त ॥९२॥
राजा अल्पक मानवकोटीं । तत्प्राप्तीची दुर्लभ गोठी । मा ज्यातें नमिती विधि हर मुकुटीं । त्याची भेटी केंवि घडे ॥९३॥
तरी हा केवळ जगज्जीवन । परम कृपाळु श्रीभगवान । सवें घेऊनि अनुचरगण । धेनुरक्षणकार्यार्थ ॥९४॥
भूतमात्राच्या कारुण्यें । चरणीं न घालूनि पादत्राणें । गोगोपनार्थ विचरे वनें । अंतःकरणें कळवळुनी ॥९५॥
तेथ चरणस्पर्शासाठीं । मोक्ष पावतीकोट्यानुकोटी । नाहीं कोण्हाही आडकाठी । कृपाळु पोटीं सर्वज्ञ ॥९६॥
कित्तेक दर्शनें संस्पर्शनें । स्मरणें क्रीडनें अवलोकनें । अनुचिंतनें संभाषणें । ध्यानें नमनें उद्धरती ॥९७॥
अनंत तपांची सामग्री । जिहीं अच्छिद्र बांधिली पदरीं । ते येथ तृणादिदेहधारी । हरि उद्धरी पदस्पर्शें ॥९८॥
शास्त्रपरिभाषाप्रसिद्धि । कर्माचरणें चित्तशुद्धि । जालिया होय ज्ञानोपलब्धि । हरिसन्निधि तैं जोडे ॥९९॥
तैसा येथें दुर्घट काहीं । साधनांचा पांगडा नाहीं । हरिपदप्रेमा उदेल्या देहीं । सुलभ सर्वांही सर्वत्र ॥१००॥
कोण गोपींचीं कर्माचरणें । कीं वेदसास्त्राध्ययनें पठनें । योगाभ्यसनें पुरश्चरणें । अपरोक्षज्ञानें त्यां कैंचीं ॥१॥
निःसीम अनन्य प्रेमा देहीं । अवंचकभावें अनुरत पायीं । विरत जाणोनि देहीं गेहीं । देहीं विदेही त्या स्मरवी ॥२॥
कुंजसदनीं यमुनापुलिनीं । वृंदावनीं गोवर्द्धनीं । सुलभ गोपींतें अनुदिनीं । हरिपदनलिनीं कुचघृष्टि ॥३॥
एवं स्वर्चित विधिहरप्रमुखीं । लक्ष्मी ज्याच्या भजनें सुखी । मुनिजन सात्वत उपासकीं । ओक्षकामुकीं जें सेव्य ॥४॥
जे पद वयस्यानुचरगणीं । मिश्र फिरती वृंदाविपिनीं । अनुकंपार्थ गोचारणीं । ते आजि नयनीं पाहीन ॥१०५॥
गोपीकुचकुंकुमपंकिल । तळवां सामुद्रसुचिह्नमेळ । अघहर जेथें गंगाजळ । त्रिजगन्मंगळ संभवलें ॥६॥
ऐसें ज्याचें पादारविंद । तो आजि पाहीन मी गोविंद । उजवे जाती कुरंगवृंद । फलितार्थ विशद हा त्याचा ॥७॥
हरि अवतरला दैत्यदलना । तो आजि गोचर होईल नयना । सुंदर अवयव आणुनि ध्याना । करी चिंतना तें ऐका ॥८॥

द्रक्ष्यामि नूनं सुकपोलनासिकं स्मितावलोकारुणकंजलोचनम् ।
मुखं मुकुंदस्य गुडालकावृतं प्रदक्षिणं मे प्रचरंति वै मृगाः ॥९॥

कृष्णमृगांचिया पंक्ति । प्रादक्षिण्यें शकुन देती । बहुतेक आजी कृष्णमूर्ति । शुभसंकेतीं देखेन ॥९॥
त्या कृष्णाचें सुंदर मुख । अरुणापांग सरळ नासिक । आकर्णनयन केशर तिलक । स्मितभा मृगांक लाजवी ॥११०॥
कुंडलमंडित गंडयुगळ । गुडालक म्हणजे कुटिल कुंतळ । सुभगलावण्यलक्ष्मी बहळ । तें मुखकमळ पाहीन मी ॥११॥
ऐसे संकल्प करूनि पोटीं । असंभावना परती लोटी । हृदयपल्लवीं शकुनगांठी । बांधोनि गोठी हे बोले ॥१२॥

अप्यद्य विष्णोर्मनुजत्वमीयुषो भारावताराय भुवो निजेच्छया ।
लावण्यधाम्नो भवितोपलंभनं मह्यं न न स्यात्फलमंजसा दृशः ॥१०॥

ऐसें चिंतूनि कृष्णवदन । नावरे प्रेमाचें अवतरण । पुनरपि साकल्यें चिंतन । करी सद्गुणसमवेत ॥१३॥
निजजनाचे इच्छेकरून । मनुष्यवेष अवलंबून । विष्णु म्हणिजे व्यापक पूर्ण । त्याचें दर्शन लाहीन मी ॥१४॥
कोण्या कारणें मनुष्य होणें । तरी भूभार फेडावयाचि कारणें । अखिल लावण्या मिरवणें । आश्रय होऊनि निज तेजें ॥११५॥
जया तेजाचा कवडसा । पवाड होय विश्वाभासा । निवाड त्याचिया लावण्यरसा । कोणा सौरस करावया ॥१६॥
ज्याची चित्प्रभा चराचरीं । लावण्यरसाची माधुरी । रंगें रोचक गोगोचरीं । तो वैखरी केंवि वदवे ॥१७॥
त्या विष्णूचें लावण्यरूप । आजि पाहीन मी सकृप । सकळ होईल हा संकल्प । तैं भाग्य अमूप नेत्रांचें ॥१८॥
ऐसें न घडे काय म्हणून । अवश्य घडेल हा निश्चय पूर्ण । तरीच होती मज शुभ शकुन । वृथा अनुमान कां कल्पूं ॥१९॥
तस्मात् न घडे ऐसें नव्हे । होईल हा निश्चय जीवें । करितां पुढती शंका शिवे । विवेकविभवें ते निरसी ॥१२०॥
तें चौ श्लोकांचें कुलक । श्लोकत्रयें शंकापंक । निरसूनि तोष दर्शनात्मक । चौथा श्लोक उपपादी ॥२१॥
तरी ते शंका म्हणाल कैसी । कर्तृत्वभोक्तृत्वादि आवेशीं । कृष्णीं प्रवृत्ति आम्हांचि ऐसी । तैं विष्णुत्व त्यासी केंवि घडे ॥२२॥
इये शंकेच्या निरसनीं । विवरण वदली अक्रूरवाणी । शुकें घातली नृपाकर्णीं । ते घ्या श्रवणीं अवधानें ॥२३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP