अध्याय ३८ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - अक्रूरोऽपि च तां रात्रिं मधुपुर्यां महामतिः । उषित्वा रथमास्ताय प्रययौ नंदगोकुलम् ॥१॥

शुक म्हणे गा महाप्राज्ञा । अक्रूरें घेऊनि कंसाज्ञा । येऊनि आपुलिया सदना । व्रतें हरिदिना लोटिलें ॥२५॥
ते रात्रीं क्रमूनि मथुरापुरी । महातेजस्वी अक्रूर क्षत्री । प्रभाते आरूढोनि रथावरी । जैसा तमोरि उदया ये ॥२६॥
तैसा प्रतापी द्युतिमंत । अक्रूर परम भागवत । रथेंसहित क्रमी पंथ । जावया त्वरित नंदव्रजा ॥२७॥
तंव येरीकडे जनार्दना । नारदें केली विज्ञापना । कीं उद्या करिसी कंसहनना । मल्लवारणासमवेत ॥२८॥
भविष्यार्थ समीप मुनि । कथूनि गेलिया चक्रपाणि । मथुराप्रवेशीं कंसहननीं । आवेश मनीं उथलला ॥२९॥
काम खवळे नवयौवनीं । क्रोध कुरपे रिपुवल्गनीं । कीं गजयूथा समीप अवलोकुनी । मृगेंद्र मनीं आवेशे ॥३०॥
कीं समीप जाणोनि प्रळयकाळ । महामृत्यु ग्रसनशील । तेंवि उद्युक्त घननीळ । कंसादिखळदळनार्थ ॥३१॥
जो कृष्णाचा मनोरथ । तो हा मूर्त अक्रूररथ । प्रेरिला होत्साता उद्युक्त । क्रमी पंथ तें ऐका ॥३२॥

गच्छन्पथि महाभागो भगवत्यंबुजेक्षणे । भक्तिं परामुपगत एवमेतदचिंतयत् ॥२॥

ऐकें राया कुरुभूषणा । नंदव्रजाप्रति करितां गमना । परमोत्साह अक्रूरमना । जाला कोणा प्रकारींचा ॥३३॥
अभेदभजनभाग्यें सभाग्य । यास्तव अक्रूर महाभाग । भगवच्चरणीं भक्तियोग । त्यातें अभंग प्रकटला ॥३४॥
हें निरूपण विवेकें खोले । मानसीं पाहिजे अवलोकिलें । चतुरांलागिं विनीत बोलें । अल्प सूचिलें जात असे ॥३५॥
परा म्हणिजे उत्कृष्ट भक्ति । परब्रह्मात्मक जे रति । म्हणाल उदेली अक्रूराप्रति । तें हें श्रोतीं न म्हणावें ॥३६॥
अथवा पूर्ण परमेश्वर । तत्पदभजनप्रेमादर । म्हणाल पावला तो अक्रूर । परी हा विचार न म्हणावा ॥३७॥
केवळ श्रीकृष्ण परब्रह्म । पूर्ण चैतन्य आत्माराम । तत्पदभजनीं उत्कृष्ट प्रेम । उदेलें निःसीम तें त्यातें ॥३८॥
व्याघ्रवत्स अविकपाळें । पाळिले मंडलकाच्या मेळें । स्वकुळज्ञानें यथा काळें । जेंवि तें मिळे स्वपक्षीं ॥३९॥
तेंवि भूभारहरणकाम । अवतरला जैं पुरुषोत्तम । तेव्हां स्वपक्षपराक्रम । अंशरूपें हा प्रकटिला ॥४०॥
ते हे अक्रूरादि यादव । आणि नंदादि पशुप सर्व । यांचा अभेदप्रादुर्भाव । प्रसंगें भाव प्रकटती ॥४१॥
रिक्त तडागीं लवणदुर्ग । लाहोनि मातला दस्युवर्ग । तदर्थ प्रावृटीं कदनप्रसंग । नृपें सांग आदरिला ॥४२॥
भंवते नृपदळाचे पाळे । दस्यु न गणितीच दुर्गबळें । वार्षिकी सरोवर भरतां जळें । दुरही मिळे तत्पक्षीं ॥४३॥
तैं दस्यूचा खचला पाया । तो न्याय घडला कंसराया । रामकृष्णांच्या हननकार्या । अक्रूर उपाया प्रयोजिला ॥४४॥
त्यासि चालतां गोकुळपथीं । हृदयीं आठवली कृष्णमूर्ति । प्रकट जाली अभेदभक्ति । मुनिगगनोक्ति विश्वासें ॥४५॥
आठवा देवकीचे पोटीं । ऐसी संदिग्ध गगनगोठी । नारदें कथितां नंदवाटीं । भरवसा पोटीं दृढ झाला ॥४६॥
तया कृष्णा अंबजेक्षणा । चिंतूनि तच्चरणीं दृढभावना । अभेदप्रेमें जडली जाणा । करी चिंतना तत्तोषें ॥४७॥
उदया येतां प्रसूतिकाला । पान्हा प्रकटे स्तनमंडळा । तेंवि जैं कंसाची मरणवेळा । तैं प्रेमा उदेला अक्रूरा ॥४८॥
मग तो तेणें प्रेमरसें । तिंबलेनि निजमानसें । चिंतिता जाला तें पर्येसें । मुनि म्हणतसे कुरुवर्या ॥४९॥

किं मयाचरितं भद्रं किं तप्तं परमं तपः । किं वाऽथाप्यर्हते दत्तं यद्द्रक्ष्याम्यद्य केशवम् ॥३॥

चालतां व्रजपुरपथें रथ । अक्रूरा पोटीं मनोरथ । म्हणे मी पूर्वीं कल्याणभरित । किमाचरित आचरलों ॥५०॥
काय सुकृत माझिये गांठीं । जेणें आजि मी केशवा दृष्टीं । पाहेन म्हणोनि आनंद पोटीं । सुखसंतुष्टीं उथलला ॥५१॥
तपश्चर्या अतिदारुण । निष्काम तपिन्नलों मी पूर्ण । तेणें अखिलमंगलायतन । तो श्रीकृष्ण देखेन मी ॥५२॥
किंवा वाटतें मज बहुतेक । स्वधर्मार्जित गो भू कनक । सत्पात्रीं सम्मानपूर्वक । दानें अनेक मज घडलीं ॥५३॥
यथायोग्य यथापात्रीं । यथोक्त देशकाळीं पवित्रीं । यथेष्ट द्रव्यें यथासूत्रीं । यथाधिकारें समर्पिलीं ॥५४॥
तया सुकृताचिया राशि । सफळ आलिया उदयाशीं । तेणें भाग्यें केशवासी । नेत्रसारसीं देखेन ॥५५॥
पुढतीं शंकित विवरी मनीं । अनधिकारिया मजलागुनी । परम दुर्लभ चक्रपाणि । काय म्हणोनि तें तर्की ॥५६॥

ममैतद्दुर्लभं मन्य उत्तमश्लोकदर्शनम् । विषयात्मनो यथा ब्रह्मकीर्तनं शूद्रजन्मनः ॥४॥

पांचभौतिक देहात्ममति । कंस तो हा खळ दुर्मति । मी तयाचा आज्ञावर्ती । पापमूर्ति सबाह्य ॥५७॥
निर्दय कुटिल निरपत्रप । सदैव वर्ततां तयासमीप । तेणें घडला कल्पषलेप । नुमजे अल्प आत्महित ॥५८॥
यास्तव उत्तमश्लोकदर्शन । परम दुर्लभ मजलागुन । जैसें वृषला श्रुतिव्याख्यान । मानी मम मन तद्वत हें ॥५९॥
विरक्तां होय ब्रह्मप्रतिष्ठा । जेंवि ते दुर्लभ विषयनिष्ठा । तेंवि अघटित मज पापिष्ठा । भेटीं वरिष्ठा कृष्णाची ॥६०॥
ऐसी दुर्लभ श्रीकृष्णभेटी । कोठूनि माझिये अदृष्टीं । ऐसी अप्राप्ति बैसतां पाठीं । तंव स्मरली गोठी प्राप्तीची ॥६१॥

मैषं ममाधमस्यापि स्यादेवाच्युतदर्शनम् । ह्रियमाणः कालनद्या क्कचित्तरति कश्चन ॥५॥

पूर्वोक्त असंभावने बाध । करी संभावना अनुवाद । तो मानसीं एवंविध । विवरी प्रबुद्ध अक्रूर ॥६२॥
हरिदर्शनीं असंभावना । म्हणे वृथा हे स्फुरली मना । मजसारिख्याही अधमा दीना । हरिदर्शनावाप्ति घडे ॥६३॥
कोण्या प्रकारें म्हणाल ऐसें । तरी तृणतुष नदीप्रवाहासरिसें । बळेंचि परपार पावें जैसें । अयोग्य अनायासें एकादें ॥६४॥
सर्वत्र तृणें नदी लंघिती । ऐसें न बोलवेचि व्याप्ति । नाहीं न म्हणवेचि निश्चिति । एकें देखिजेनि उल्लंघितां ॥६५॥
तेंवि काळाचा बळात्कार । तेथें कर्मानिल प्रेरणापर । सुरनरतिर्यकां भ्रमणकर । कोण्ही दुस्तर लंघिती ॥६६॥
तयां क्कचित्जीवांमाजी । कृष्णदर्शन मजही आजि । घडेल ऐसें हृदयांभोजीं । भावूनि पूजी हरि ध्यानीं ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP