TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

आरंभ
श्रीकृष्णजगद्गुरुवे नमः ।
नमो मौननिरततरणि । अनुलोमविलोम द्विधा पठनीं । अन्वयव्यतिरेक प्रबोधुनी । सायुज्यदानी गुरुराया ॥१॥
नमो या वाक्यार्थाची शक्ति । यथार्थ बाणली जयाप्रति । हरिहरब्रह्मादि त्या सेविती । धरूनि व्यक्ति अजस्र ॥२॥
नमोवाक्याची वदतां महिमा । मौनमुद्रा निखिल निगमा । विस्तार लिहितां न पुरे क्षमा । हें जाणे रमावर हरही ॥३॥
नम्य एकचि श्रीगुरुनाथ । नमन तद्गौरवा प्रकटित । तेंचि शक्तिरूप विख्यात । विभवें प्रसवत तत्सत्ता ॥४॥
जेंवि लोहाग्ररहित शूळ । धनुष्यें विण शर निष्फळ । तेंवि नमनेंविण नम्य प्रांजळ । नये केवळ उपयोगा ॥५॥
प्रातिपदिक मात्र नांव । विभक्तियोगें लिंगसंभव । तेथ नमनें भक्तिगौरव । प्रकट होय अगाध ॥६॥
नमनें त्याग बोलिजे यागीं । सत्तावारणदानप्रसंगीं । आत्मनिवेदन प्रणतां लागीं । नमनमात्रें संपादे ॥७॥
नमोमात्रें क्रोध मरे । नमोमात्रें काम पुरे । नमोमात्रें स्नेह भरे । अभेदबोधें सर्वत्र ॥८॥
नमनें अनेकापराधक्षमा । नमनें क्षालन विगुणकर्मा । नमन प्रापक कैवल्यधामा । नमन प्रेमा शोभवी ॥९॥
नमनें दुष्ट होती इष्ट । नमनें निष्पाप पापिष्ट । नमनें देवता अभीष्ट । नमनें संतुष्ट । सर्वात्मा ॥१०॥
नमनें गुरुशिष्यांचा प्रेमा । प्रकृतिपुरुषा नमनें महिमा । नृपामात्यगौरवगरिमा । नमनधर्मामाजिवडी ॥११॥
नमनें स्वामिसेवकभाव । नमन मिरवी भक्तदेव । नमन शक्तीचें लाघव । लाहे गौरव अनायासें ॥१२॥
अच्युत नारायण अनंत । इत्यादि नामें सामर्थ्यवंत । नमःपूर्वक चतुर्थ्यंत । जपतां सफळित संकल्प ॥१३॥
अग्निजाया कवच अस्त्र । म्हणाल इत्यादि पल्लवीं मंत्र । तरी नमनपर्याय हे सर्वत्र । वषट्कारद्विठादि ॥१४॥
मध्यभागीं असतां राव । अग्र पश्चात उभय पार्श्व । विभागें सैनिक वाहती नांव । परी ते सर्व नृपगोप्ते ॥१५॥
नमन म्हणाल किमात्मक । तें सेव्यसेवकभावसूचक । तेथ अक्षरांचा विवेक । भाषा अनेक पालटती ॥१६॥
विविध गुणकार्यानुरूप । योनिभेदेंही अमूप । नमस्काराचे अनुकल्प । ते हे अल्पजल्पना ॥१७॥
नमन संभवे शपथस्थानीं । नमन प्रतिज्ञाप्रशंसनीं । नमन उपेक्षानिषेधनीं । नमन शासनीं स्मारक ॥१८॥
नमन न संभवे जे ठायीं । तें अंधतम अज्ञान पाहीं । गाढवमूढपाषाणदेहीं । नम्यनमनराहित्यें ॥१९॥
नम्य येकचि श्रीगुरुनाथ । ऐसा बोलोनियां परमार्थ । पुन्हा प्रतिपादिले किमर्थ । नम्यनमक अनेकधा ॥२०॥
परस्परें करिती नमन । तैं नम्यनमक अवघेचि जन । तरी ये शंकेचें निरसन । सावधान अवधारा ॥२१॥
भूप असतां कुंजरावरी । गजप हडपी चामरधारी । कुंजरेंसी तैं नमस्कारी । अमात्यादि जन अवघा ॥२२॥
ते जन नमिती लक्षूनि भूपा । न ते किंकरा गजां गजपां । हयरथशिबिकानौकारूपा । यानीं महिपातें नमन ॥२३॥
तैसा सर्वांचिये शिरीं । दक्षिणामूर्ति सहस्रारीं । सद्गुरुनाथ साम्राज्य करी । जनव्यवहारीं त्या नमन ॥२४॥
जन वंदिती परस्परीं । तेथ सद्गुरु दोघां शिरीं । कोण कोणा नमस्कारी । म्हणाल हें जरी उमजेना ॥२५॥
तरी भद्रासस्नीं असतां राव । मुद्रेमाजि स्थापूनि नांव । लहान थोर नियोग सर्व । मुद्रापत्रें प्रवर्तवी ॥२६॥
तेथ राजा असे सर्वांशिरीं । परी लाघव गौरव यथाधिकारीं । नियोगीं नमिती परस्परीं । तेंवि व्यवहारीं श्रुतिशिक्षा ॥२७॥
एवं नमन सद्गुरुनाथा । येर प्राकृत प्रवृत्तिगाथा । प्रवर्तन जें व्यवहारार्था । ते तव सत्ता सर्वत्र ॥२८॥
मौन संज्ञा निगमगुह्य । तव पद सर्व गुह्यां आश्रय । तेथ निरत जो प्रणतनिचय । तूं चित्सूर्य बोधक त्यां ॥२९॥
सूर्य नवग्रहांचा पति । उदयें प्रकाशी जागृति । बोधी तन्मातृकप्रवृत्ति । जेणें संसृति सर्वत्र ॥३०॥
सद्गुरु गृहपाशविमोचक । त्रिविधावस्थाग्रासक । आत्मरूपप्रकाशक । सायुज्यदायक भवहंता ॥३१॥
पित्याचा पुत्र पुत्राचा पिता । म्हणतां अनुलोमविलोमता । व्यतिरेकान्वयें सद्गुरु भजतां । एकवाक्यता घडे तैसी ॥३२॥
काकाचा जामात जामाताचा काका । म्हणतां एकवाक्यते चुका । तेंवि प्राकृतां भज्यभजकां । अन्वयव्यतिरेकां अनोळखी ॥३३॥
तस्मात् उपक्रमोपसंहार । सद्गुरुभजकां चित्सुखसार । सर्वीं सर्वत्र नमस्कार । तो साचार गुरुचरणीं ॥३४॥
यास्तव गणेश शारदा गुरुवर । कुळदेवता श्रोते चतुर । साधुसज्जन मुनीश्वर । पृथगाकार न नमीं मी ॥३५॥
मुखीं घालितां अन्नजीवन । सर्व अवयवां आप्यायन । तेंवि वंदितां सद्गुरुचरण । तोषे त्रिभुवन आत्मत्वें ॥३६॥
तेणें तोष पसायदानें । सद्गुरुनाथें दिधलें सूचने । जें आरब्धग्रंथनिरूपणें । तोषवी मनें श्रोत्यांचीं ॥३७॥
आज्ञा लाहोनि दयार्णव । म्हणे ये अध्यायीं वासुदेव । वधील केशिव्योमदानव । आणि परिसेल स्तव नारदाचा ॥३८॥
कंसें धाडिला केशी व्रजा । तेणें हरीसी कवणें वोजा । युद्ध केलें आणि मुनिराजा । अधोक्षजा स्तवी कैसा ॥३९॥
कैसा वधिला व्योमासुर । इतुके कथेचा विस्तार । श्रवणीं होऊनि सादर । अध्याय समग्र परिसावा ॥४०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-05-05T04:20:13.6800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नाकाक नत्तु जड्डु न्हयि, वटाक मिश्यो जड न्हयि

  • (गो.) नाकाला नथ जड होत नाहीं आणि ओठाला मिशा जड होत नाहींत. स्वतःचेच कोणाला जड नसते. 
RANDOM WORD

Did you know?

जानवे म्हणजे नेमके काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site