श्रीशुक उवाच :- गोप्यः कृष्णे वनः याते तमनुद्रुतचेतसः । कृष्णलीलाः प्रगायंत्यो निन्युर्दुःखेन वासरान् ॥१॥

कृष्ण गेला असतां वना । सानुरागा तद्गतमना । करिती तल्लीलागायना । बल्लवललना विरहिणी ॥२१॥
विरहदुःखाचे वासर । युगाहूनही भासती थोर । करिती तद्दुःखा परिहार । लीला सादर वर्णूनी ॥२२॥

गोप्य ऊचु :- वामबाहुकृतवामकपोलो वल्गितभ्रुरधरार्पितवेणुम् ।
कोमलांगुलिभिराश्रितमार्गं गोप्य ईरयति यत्र मुकुंदः ॥२॥

गोपी गोपींतें म्हणे वो सखिये । श्रीकृष्ण जेव्हां वेणु वाहे । तेव्हां अद्भुत कौतुक काय । वर्त्तलें होय तें ऐका ॥२३॥
वेणु वाजवी जनार्दन । तें कृष्णाचें कमनीय ध्यान । ठाणमाण गुणलावण्य । मनें कवळूनि वर्णिती ॥२४॥
शक्रोपलमयसुनीलकांति । वदनीं राकावदनद्युति । नयन नीरजप्रत्राकृति । कोमलमूर्ति कंदर्पी ॥२५॥
वामबाहुमूळीं संलग्न । वामकपोल करूनि पूर्ण । कुंचित अधरीं वेणुधमन । भ्रूचालन सविलास ॥२६॥
दक्षिणभागीं उभय करीं । कोमलांगुलीं उभय रंध्रीं । गायनमार्गें सप्तस्वरीं । जेव्हां मुरारि वाजवी ॥२७॥

व्योमयानवनिताः सह सिद्धैर्विस्मितास्तदुपधार्य सलज्जाः ।
काममार्गणसमर्पितचित्ताः कश्मलं ययुरपस्मृतनीव्यः ॥३॥

तेव्हां निर्जर सिद्ध विमानयानीं । कृष्णलीला पाहतां नयनीं । सिद्धवनिता अंकासनीं । होत्या कवळूनि स्वपतींसी ॥२८॥
स्वपतींचिया अंकासनीं । वेणूवादन ऐकोनि श्रवणीं । विस्मित होतांचि अंतःकरणीं । काममार्गणीं भेदल्या ॥२९॥
स्मरशरघातें व्याकुळ मनें । स्मरणधर्मा मुकल्या तेणें । मोह पावल्या तेंचि चिह्नें । कीं नेणती वसनें गळालीं ॥३०॥
परमसत्रपा सिद्धांगना । परि परिसोनि वेणुक्कणना । काममार्गणें मोहितमना । विगलितवसना न स्मरती ॥३१॥
स्वकांतांकीं निर्जर कांता । परिसोनि कृष्णवेणुक्कणिता । स्मरमार्गणें मोहितचिता । मा आम्ही तद्भुक्ता विरहिणी ॥३२॥
कृष्णविलासें क्रमिल्या रजनी । त्यांचा विसर न पडे मनीं । आतां तद्विरहें विरहिणी । केंवि साजणी दिन कंठूं ॥३३॥
हें ऐकोनि इतरा युवति । कृष्णवेणूची अद्भुत शक्ति । पश्वादि मृगें मोहितें होतीं । म्हणती सखियातें तें ऐका ॥३४॥

हंत चित्रमबलाः शृणुतेदं हारहास उरसि स्थिरविद्युत् ।
नंदसूनुरयमार्त्तजनानां नर्मदो यर्हि कूजितवेणुः ॥४॥

अवो हा नंदाचा नंदन । जेव्हां करी वेणुवादन । ज्याचेनि दुःखाविष्ट जन । कौतुकापन्न होतसे ॥३५॥
वेणु योजूनि अधरपुटीं । वामांग वक्षोर्ध हनुवटीं । टेकूनि तिर्यक् तरळदृष्टि । चंचळ भ्रुकुटी सविभ्रमा ॥३६॥
तंव ते वदनेंदूची कांति । आणि हृदयींची हारद्युति । ऐक्यभावें पुंजाळती । हास्यदीप्तिसमसाम्यें ॥३७॥
मुक्ताफळादि रत्नहार । कीं सुपुष्पीं कुंदमंदार । लावण्यलक्ष्मी चपळाकार । मुखभामिश्र स्थिर उरसि ॥३८॥
श्रीधरप्रणीत अर्थविशेष । हारासारिखें शोभे हास्य । कीं हारावरी स्मितप्रकाश । तो हारहास श्रीकृष्ण ॥३९॥
ऐसा नंदसूनु गोविंद । आर्त्तजनां आनंदकंद । वेणुवादनें विनोदप्रद । होय विशद जे काळीं ॥४०॥
म्हणाल दुःखार्त्त ते कोण । जे भवदुःखार्णवीं निमग्न । क्षुधातृषादि जरामरण । संचितरुग्ण सर्वदा ॥४१॥
ऐसियातें हीं वेणुक्कणनें । दुःख विसरवी विनोददानें । आनंदप्रचुर त्यांचीं मनें । प्रसन्ननयनें ते पाहती ॥४२॥
तिये काळीं पश्वादि मृगें । चित्सुखावाप्ति लाहतीं आंगें । त्यांचे देहीम उमटतीं लिंगें । तियेंही प्रसंगें अवधारा ॥४३॥

वृंदशो व्रजवृषा मृगगावो वेणुवाद्यहृतचेतस आरात् ।
दंतदष्टकवला धृतकर्णा निद्रित लिखितचित्रमिवाऽसन् ॥५॥

एवळ ज्ञानविहीन पशु । ज्यांचा नंदव्रजीं निवासु । धेनु वृषभ मृगें अशेष । ते पावती तोष वेणुरवें ॥४४॥
जोडतां विशेष निम्नभाग । जलही सांडी पुढील वोघ । कीं मिष्टान्नलाभें मानूनि उबग । करिती त्याग कदन्ना ॥४५॥
तस्करा जोडतां यथेष्ट कनक । घेतल्या धातु टाकी आणिक । तेंवि चित्सुखलाभें मृगादिक । होती विमुख निजविषया ॥४६॥
वृषभ धेनु चित्रापरी - विविधमृगयाति कांतारीं । ठायीं ठायीं पृथगाकारीं । समाधिशेजारीं सुखसुप्त ॥४७॥
गोवृषमृगा दिकांचे वृंद । जेत जे जे होते विशद । श्रवणीं पडतां वेणुनाद । जाले स्तब्ध ते तैसे ॥४८॥
म्हणाल स्तब्धता कोण्या गुणें । तरी वेणुवादनें त्यांचीं मनें । हरूनि केलीं प्रत्यक्प्रवणें । तें स्मितलक्षणें अवधारा ॥४९॥
अनाहत वेणूच्या वादनें । वेधितां उपवनें दहनें जीवनें । तिष्ठती चेष्टाविहीनें । सहितत्रिभुवनें उपरमिजे ॥५०॥
वेणुवाद्यें स्मृतीचें हरण । करितां मृगपशूंचे प्रुथक् गण । लिखितचित्रासमान । वेणुक्कणनें पैं करितां ॥५१॥
कृष्णापासूनि होते दूर । तिर्यक् तमोयोनि प्रचुर । वर्जितवर्णाश्रमाचार । ते झाले स्थिर ध्वनिवेधें ॥५२॥
तेणें थकली विषयवृत्ति । कवळ चर्वितां उभयदंतीं । हालों विसरल्या दंतपंक्ति । नेत्रपातीं उन्मळित ॥५३॥
शृंगें स्पर्शिलीं पुच्छाग्रीं । उत्तंभित कर्णहारी । योनिपरत्वें तनुसामग्री । तत्तत्प्रकारीं ताटस्थ्य ॥५४॥
भुलल्या अज्ञान तिर्यग्योनि । मां आम्ही तों तद्भुक्ता विरहिणी । कृष्णें अनुभविल्या त्या रजनी । केंवि साजणी न स्मरों ॥५५॥
हें ऐकोनि अपरा गोपी । म्हणती श्रीकृष्णाचे रूपीं । सचेतांची तों गोष्टी सोपी । परी सरिता आपीं स्मरमूर्च्छा ॥५६॥
कैसें कृष्णाचें तें रूप । देखोनि सरितांतें कंदर्प । व्यापिता झाला तो संक्षेप । नृपातें अल्प मुनि जल्पे ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP