तयोर्निरीक्षितो राजंस्तन्नाथं प्रमदाजनम् । क्रोशंतं कालयामास दिश्युदीच्यामशंकितः ॥२६॥

रामकृष्णांची न धरूनि शंका । निजमरणाचा न मनी धोका । गीतमोहिता व्रजबायका । कृष्णासन्मुखा संत्रासी ॥५८॥
त्याच्या भयें त्रासल्या युवति । दीर्घस्वरें आक्रंदती । बळेंचि उत्तरदिशेप्रति । पिटीं दुर्मति शंखचूड ॥५९॥

क्रोशंतं रामकृष्णेति विलोक्य स्वपरिग्रहम् । यथा गा दस्युना ग्रस्ता भ्रातरावन्धावताम् ॥२७॥

धांव धांव गा संकर्षणा । महाबलिष्ठा प्रलंबमथना । वधूगण आक्रोश करितां करुणा । रामकृष्णा जाकळी ॥१६०॥
रामकृष्णा धांवें पावें । ऐशा बल्लवी घेती नांवें । जैसी धेनु दीर्घ रावें । व्याघ्रें धरितां आक्रंदे ॥६१॥
अवंचक सर्वस्वें मत्पर । जाणोनि केला अंगीकार । तो स्वपरिग्रह गोपीनिकर । पाहोनि श्रीधर कोपला ॥६२॥
परिसोनि त्यांचें आक्रंदित । आणि शंखचूडाचें दुष्टाचरित । रामकृष्ण बंधु त्वरित । धांवते जाले त्यामागें ॥६३॥

मा भैष्टेत्यभयारावौ शालहस्तौ तरस्विनौ । आसेदतुस्तं तरसा त्वरितं गुह्यकाधमम् ॥२८॥

नाभी नाभी प्रमदागणा । अभय देती समस्तां ललनां । ताल उपडूनि दीर्घस्वना । गर्जूनि दोघे धांवती ॥६४॥
गुह्यकांमाजि अधम मूढ । मर्तुकाम जो शंखचूड । त्यातें वधावया वेगाड । धांवती सदृढ प्रतापें ॥१६५॥

स वीक्ष्य तावनुप्राप्तौ कालमृत्यू इवोद्विजन् । विसृज्य स्त्रीजनं मूढः प्राद्रवज्जीवितेच्छ्या ॥२९॥

रामकृष्ण लागले पाठीं । जेंवि काळमृत्यूशीं पडली गांठी । देखोनि गुह्यक भयभीत पोटीं । मानी संकटीं आतुडलों ॥६६॥
भयें सांडोनि स्त्रीसमुदाय । पळतां वेगडी वळती पाय । लक्षूनि जीवितरक्षणोपाय । पळता होय तेथूनी ॥६७॥
स्मृति हारपोनि जाला मूढ । यास्तव व्योमगति झाली गूढ । भूतळीं पडतां शंखचूड । दिसे उजेड शिरोरत्नें ॥६८॥
गुह्यकापासूनि स्त्रीसमुदाय । सोडवूनियां यादवराय । रक्षण ठेवूनि रोहिणीतनया । धांवता होय त्यामागें ॥६९॥

तमन्वधावद्गोविंदो यत्र यत्र स धावति । जिहीर्षुस्तच्छिरोरत्नं तस्थौ रक्षन्स्र्त्रियो बलः ॥३०॥

स्त्रीरक्षणीं बळभद्र बळी । सुदृढ राहिला विक्रमशाली । शंखचूडाचा सरत्नमौळि । धांवे वनमाळी हरणार्थ ॥१७०॥
जीवितरक्षणाचिये चाडे । गुह्यक धांवे जिकडे जिकडे । शिरोरत्नार्थ तिकडे तिकडे । कृष्ण वावडें साटोपें ॥७१॥
घ्यावया हेममृगाचा प्राण । जैसा धांवे राघवबाण । तैसा गुह्यकामागें कृष्ण । धांए निर्वाण द्यावया ॥७२॥

अविदूर इवाभ्येत्य शिरस्तस्य दुरात्मनः । जहार मुष्टिनैवांग सहचूडमणिं विभुः ॥३१॥

अंग म्हणिजे कोमलवचनें । कौरवभूपा मुनिवर म्हणे । दुरात्मयाचा मस्तक कृष्णें । चूडारत्नें सह हरिला ॥७३॥
अविदूर म्हणिजे दुरी ना जवळी । पाठीं धांवोनि श्रीवनमाळी । मुष्टी कवळूनि सरत्नमौळि । तोडूनि तत्काळीं घेतला ॥७४॥
जैसें कोमळ तुंबिनीफळ । मुष्टी कवळूनि तोडी कृषीवळ । तैसें सरत्न गुह्यकमौळ । धावूनि कृष्णें तोडिलें ॥१७५॥
सरत्नमौळ कृष्णाहातीं । गुह्यककबंध पडलें क्षितीं । शंखचूडा उत्तमगति । वोपी श्रीपति कृपेनें ॥७६॥
कृष्णहस्तें पावला निधन । यालागिं चुकलें जन्ममरण । अक्षय वरूनि सायुज्यसदन । वित्तपगण उद्धरला ॥७७॥

शंखचूडं निहत्यैवं मणिमादाय भास्वरम् । अग्रजायाददत्प्रीत्या पश्यन्तीनां च योषिताम् ॥३२॥

एवं वधूनि गुह्यकातें । त्याचे मौळी जें रत्न होतें । प्रभे लोपवी भास्करातें । तें स्वहस्तें हरि हरी ॥७८॥
गोपी सकंपा गुह्यकभयें । तयांतें रत्न दावूनि स्वयें । अग्रजाहातीं वोपिता होय । तो अभिप्राय अवधारा ॥७९॥
शंखचूड येऊनि पुढती । त्रासील सकाम क्रूरवृत्ति । गोपी हृदयीं हे शंका वाहती । तिची निवृत्ति करावया ॥१८०॥
शंखचूडाचा मौलमणि । तिहीं पाहतां आपुले नयनीं । गुह्यकभयाची कणकणी । हृदयांहूनि निरसली ॥८१॥
रक्षूनि अग्रजाची मर्यादा । मणिअर्पणें स्नेहवादा । वर्धवितां तो परमानंदा । पावोनि मुकुंदा आलिंगी ॥८२॥
तिये आलिंगनमेळीं । त्रिजग सच्चित्सुखकल्लोळीं । विबुध विमानीं पिटिती टाळी । पुष्पें मोकळीं वर्षती ॥८३॥
ऐसिया रासरसिका रजनी । व्रतस्था कात्यायनीपूजनीं । याचिल्या यमुनानिमज्जनीं । हरितोषणीं गोपींहीं ॥८४॥
त्या गोपींच्या वरदऋणा । फेडावया त्रैलोक्यराणा । जैसजैसी त्यांची कामना । त्या त्या खुणा अनुसरे पैं ॥१८५॥
सुदर्शना स्वर्गावाप्ति । शंखचूडातें सायुज्यमुक्ति । गोपी पावल्या स्वानंदतृप्ति । रामश्रीपति संतुष्ट ॥८६॥
पुढें परम रसाळ कथा । मानिनी मानसीं मनसिजव्यथा । पावोनि हरिगुण वदती मिथा । ते कुरुनाथा अवधारीं ॥८७॥
एकनाथ भक्तपति । चिदानंदाख्य वेणुगीतीं । स्वानंदरूपा गोपयुवति । गोविंदवेधें वेधल्या ॥८८॥
त्या गोपींचा समरसभाव । हर्षें कोंदला दयार्णव । श्रवणें मननें सुस्नात सर्व । हें पर्व अपूर्व श्रोतयां ॥८९॥
तें हें श्रीमद्भागवत । अष्टादश सहस्र गणित । परमहंसीं रमिजे जेथ । स्कंध विख्यात दशम हा ॥१९०॥
श्रीशुकपरीक्षितिसंवाद । उत्तररासक्रीडाभेद । सुदर्शनशंखचूडाख्यान विशद । अध्याय प्रसिद्ध चौतिसावा ॥१९१॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायामंबिकावनयात्रासुदर्शनविद्याधरशंखचूडगुह्यकधनदानुचरोभयोद्धरणं नाम चतुस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥३२॥ टीका ओव्या ॥१९१॥ एवं संख्या ॥२२३॥ ( चौतिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १६५६६ )

चौतिसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP