प्रपन्नोऽस्मि महायोगिन्महापुरुष सत्पते । अनुजानीहि मां देव सर्वलोकेश्वरेश्वर ॥१६॥

महायोगी महापुरुष । सज्जनपति लोकेश्वरेश । इत्यादि संबोधनीं तोष । संबोधूनियां करितसे ॥९७॥
भूतभविष्यवर्तमानीं । त्रिकालज्ञ तूं योगाग्रणी । काळत्रयीं जे दुष्टकरणी । तन्निरसनीं प्रपन्न मीं ॥९८॥
प्रकृतिपुर्यांमाजि जे सुप्त । त्यांहि माजि तूं असुप्त गुप्त । प्रकृतिनियंता प्रकृत्यातीत । तो तूं भगवंत महापुरुष ॥९९॥
प्रकृतिपुरीं शयन ज्याचें । पुरुष ऐसें नाम त्याचें । आदिकारण तूं प्रकृतीचें । महापुरुष या हेतु ॥१००॥
तो तूं स्वामी महापुरुष । आम्ही तुझेचि अंश विशेष । आम्हां बाधिजे जैं कलुष । तैं तो दोष तुजलागीं ॥१॥
म्हणसी अनेक प्रतिमंडळें । उपाधियोगें चंचळें समळें । मुख्यमंडळातें नातळे । तेंवि प्रकृतिमळें अलिप्त मी ॥२॥
तरी मुख्यमंडळ जेंवि अलिप्त । तैसें प्रतिमंडळही लेपातीत । बिंबलें असतां उपाधिआंत । असे निर्मुक्त निःसंग ॥३॥
उपाधि अनात्मत्वें जड । अज्ञानप्रचुर गाढमूढ । तीमाजि तुझाचि प्रकाशवाड । समळ निर्मळ अवगमितां ॥४॥
परंतु ज्ञानाच्या वैपरीत्यें । अंगीकारूनि तादात्म्यातें । तद्गतमालिन्यचांचल्यातें । घे निजमाथां अभिमानें ॥१०५॥
महापुरुष या संबोधनें । त्या निजांशा मजकारणें । शकों नेदी विपरीतज्ञानें । प्रकृत्यभिमानेम हें प्रार्थीं ॥६॥
आतां सत्पते हें संबोधन । सदसद्ग्रंथीचें भेदन । करूनि असज्जडनिरसन । सन्मात्र चैतन्यें निवडलें ॥७॥
तयांसि पुढती असन्मळ । स्पर्शों नेदिसी तूं गोपाळ । करूनि आत्मत्वें सांभाळ । प्रणतपाळसंज्ञेनें ॥८॥
म्हणसी लोकलोकांतरीं । ईश्वर असती पृथगाकारीं । ते ते तेथ तेथ अधिकारी । मानवशरीरी मी पशुप ॥९॥
तरी तूं लोकेश्वरांचा ईश । पूर्णैश्वर्यें परेश । तुझा मजवरी कृपालेश । होतां लोकेश न दंडिती ॥११०॥
अनन्यसप्रेमभावें भरित । मज तूं जाणें स्वपादप्रणत । करूनि कृपेनें सनाथ । मोडीं विभक्तपण माझें ॥११॥

ब्रह्मदंडाद्विमुक्तोऽहं सद्यस्तेऽच्युत दर्शनात् । यन्नाम गृह्णन्नखिलान् श्रोतॄनात्मानमेव च ॥
सद्यः पुनाति किं भूयस्तस्य स्पृष्टः पदा हि ते ॥१७॥

ऐकें अच्युता जगत्पति । सद्यचि झाली मज प्रतीति । ब्रह्मदंडाची निर्मुक्ति । दर्शनावाप्तीस्तव तुझिये ॥१२॥
ब्रह्मशाप परम क्रूर । तेणें पावलों योनि घोर । तुझिया दर्शनास्तव सत्वर । झालों साचार निर्मुक्त ॥१३॥
केला भगांकित सुरपति । त्रिजगीं भ्रमविला पशुपति । ऐशी ब्रह्मदंडाची शक्ति । राकापति सलांछन ॥१४॥
यदर्थीं आश्चर्य न लगे करणें । ज्याच्या अच्युत नामस्मरणें । अखिल भवाब्धि निस्तरणें । श्रवणें पठनें अघशांति ॥११५॥
ज्याचें नाम स्मरतां भक्ती । स्मरतां पावे अघनिवृत्ति । पावन करी आपणाप्रति । श्रोते तत्पंक्ति पावन ॥१६॥
ऐसा ज्याचा स्मरणमहिमा । त्या तुझिया श्रीपुरुषोत्तमा । संस्पर्शतां पादपद्मा । कां पां पाप्मा न भंगे ॥१७॥
चरणस्पर्शें ब्रह्मदंड । खंडूनि ऐश्वर्यें ब्रह्मांड । धवळी ऐसा पदमार्तंड । वसो अखंड ममहृदयीं ॥१८॥

इत्यनुज्ञाप्य दाशार्हं परिक्रम्याभिवंद्य च । सुदर्शनो दिवं यातः कृच्छ्रान्नंदश्च मोचितः ॥१८॥

ऐसा प्रार्थूनि वृष्णिप्रवर । आज्ञा लाहोनि विद्याधर । करूनि प्रदक्षिणा नमस्कार । पावला स्वपुर सुदर्शन ॥१९॥
मग सर्पप्रेतमुखांतून । नंद काढिला बळें वोढून । निश्चेष्ट पडिला विसंज्ञ । कृपेनें स्पर्शोन हरि जीववी ॥१२०॥
कृच्छ्रात् म्हणिजे संकटांतून । केलें नंदाचें मोक्षण । विद्याधराचें उद्धरण । देखोनि ऐकोनि गोपगणीं ॥२१॥

निशाम्य कृष्णस्य तदात्मवैभवं व्रजौकसो विस्मितचेतसस्ततः ।
समाप्य तस्मिन्नियमं पुनर्व्रजं नृपाऽययुस्तत्कथयन्त आदृताः ॥१९॥

अचिंत्यैश्वर्यात्मक वैभव । ऐकोनियां बल्लव सर्व । अगाध कृष्णाचें लाघव । विस्मितचित्तें प्रशंसिती ॥२२॥
ऐसी संपलिया रजनी । द्वितीय दिवशीं अंबिकावनीं । यात्राविधान संपादुनी । पुन्हा व्रजभुवनीं प्रवेशती ॥२३॥
व्रजीं जाऊनि सर्वांप्रति । कृष्णमहिमा हा वर्णिती । विद्याधराची शापनिर्मुक्ति । नृपा तुजप्रति जे कथिली ॥२४॥
पूर्वीं विद्याधर उन्मत्त । न गणूनियां ऋषि समर्थ । उपहासितां शापोपहत । कृष्णें तो तेथ उद्धरिला ॥१२५॥
तैसाचि धनदाचा सेवक । उन्मत्त शंखचूड गुह्यक । भंगूनि तयाचा मस्तक । हरी यदुनायक मौळमणि ॥२६॥
ऐका तयाचें आख्यान । श्रोतीं परिसिजे सावधान । दयार्णव करील भाषाकथन । येथ सुदर्शन उद्धरला ॥२७॥
शुक म्हणे गा कुरुमंडना । भगवद्गुणगणमणिभूषणा । स्वेच्छा क्रीडतां रामकृष्णा । बल्लवललनां समवेत ॥२८॥

कदाचिदथ गोविंदो रामश्चाद्भुतविक्रमः । विजहृतुर्वने रात्र्यां मध्यगौ व्रजयोषिताम् ॥२०॥

अंबिकायात्रा संपल्यावरी । कोण्ही एके शुभवासरीं । गोव्रजकामिनींसह कांतारीं । राममुरारी क्रीडती ॥२९॥
शरच्छशांकभासुररजनीं - । माजि माधव सहमानिनी । मन्मथमोदक कुसुमितवनीं । अद्भुतविक्रमीं विहरती ॥१३०॥
ब्रह्मांडश्रेणी वाहती माथां । कीं अनंत अजस्र एकात्मता । अखिल भुवनीं अमोघ सत्ता । ऐसे अद्भुत विक्रमी ॥३१॥
गोव्रज म्हणिजे गौळवाडा । तेथील गोपिका लावण्यसुघडा । तयांमध्यें करिती क्रीडा । सुखसुरवाडा प्रकटुनी ॥३२॥
कैसे सालंकृत सुवेष । कैसा स्निग्ध क्रीडाविशेष । तो तूं परिसें सावकाश । म्हणे नृपास योगींद्र ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP