को भवान्परया लक्ष्म्या रोचतेऽद्भुतदर्शनः । कथं जुगुप्सितामेतां गतिं वा प्रापितोऽवशः ॥११॥

परालक्ष्मी जे उत्कृष्टशोभा । तयेकरूनि उजळिसी नभा । स्वतेजें झांकूनि मार्तंडबिंबा । कोण तूं उभा रोचिष्मान् ॥७४॥
ऐसें अद्भुत तव दर्शन । आणि हें कुत्सितकर्म कोण । जेणें सर्पयोनि परमहीन । पावविलासी विधितन्त्र ॥७५॥
होऊनि कुत्सित कर्माधीन । अधोगतीचें कारण कोण । ऐसें ऐकोनि भगवद्वचन । करी निरूपण तो सर्प ॥७६॥

सर्प उवाच :- अहं विद्याधरः कश्चित्सुदर्शन इति श्रुतः । श्रिया स्वरूपसम्पत्त्या विमानेनाचरन्दिशाः ॥१२॥

सर्प म्हणे श्रीपुरुषोत्तमा । विद्याधर मी सुदर्शननामा । कोण्ही एक प्रसिद्धकर्मा । त्रिजगीं गरिमा विख्यात ॥७७॥
रूपलावण्यश्रीसम्पन्न । सर्व समृद्धि ऐश्वर्य पूर्ण । स्वेच्छा विमानीं बैसोन गगन । दिग्मंडळीं संचरतां ॥७८॥

ॠषीन्विरूपानंगिरसः प्राहसं रूपदर्पितः । तैरिमां प्रापितो योनिं प्रलब्धैः स्वेन पाप्मना ॥१३॥

फिरतां बैसोनि विमानीं । देखिले तपस्वी आंगिरसमुनि । अतिकर्कश अनुष्ठानीं । शरीरें वाळोनि कृश झालीं ॥७९॥
जटा पिंगट वळल्या केशीं । धूसर बुभुक्षु ऐसी । आपुल्या लावण्यमदवर्गेंशीं । म्यां तयांसि उपहासिलें ॥८०॥
ऊर्ध्वरेते तपस्वी थोर । ऐसा न करूनि विचार । भीड न धरूनि वारंवार । उच्च उच्चतर हांसिलों ॥८१॥
उपहासव्यंग्योक्तिहेलनें । ऐकोनि मुनिवर क्षोभले मनें । माझिया ऐशा पापाचरणें । शापवचन बोलिले ॥८२॥
मुखें गोड मागेण दृष्ट । ते नर वृश्चिकाहूनि कनिष्ठ । करिती सम्मुखचि फुपाट । ते पापिष्ठ सर्परूपी ॥८३॥    
न साहोनि परमहिमान । भुंकती ते केवळ श्वान । गर्वें न करिती अभ्युत्थान । ते रासभसमान धश्चोट ॥८४॥
देखोनि भल्यांची प्रतिष्ठा । वांकुल्या दावूनि करिती चेष्टा । भल्यावरी आरोप करिती खोटा । ते मर्कटसमयोनि ॥८५॥
भीड सांडोनि म्यां उपहासिलें । यास्तव अजगर होणें पडिलें । माझें पातक मज कळलें । नीचयोनिप्रदानें ॥८६॥
यालागि भल्यांचा अतिक्रम । गर्वें करिती दुष्ट अधम । ते ते भोगिती अंधतम । दुष्टयोनि पावोनि ॥८७॥
परंतु माझा भाग्योदय । म्हणोनि मुनींचा समुदाय । परम कारुण्यें मातृप्राय । शापमोक्षणीं कळवळिला ॥८८॥

शापो मेऽनुग्रहायैव कुतस्तैः करुणात्मभिः । यदहं लोकगुरुणा पदास्पृष्टो हताशुभः ॥१४॥

ऋषिसमर्थीं दिधला शाप । मज तो अनुग्रहकारणरूप । जेंवि अवचट करीरविटप । फळला कल्पद्रुमरूपें ॥८९॥
केवळ करुणेचे सागर । शांतिक्षमेचे गिरिवर । आंगिरसमुनि परम उदार । केला उद्धार शापुनी ॥९०॥
ज्यांच्या शापकृपादृष्टि । विश्वगुरूची चरणस्पृष्टि । मी लाधलों दिव्यांगयष्टि । कल्मषसृष्टि भंगोनी ॥९१॥
ज्याच्या शापास्तव हे प्राप्ति । त्रिजगद्गुरूची दर्शनावाप्ति । लाहोनि झाली अघनिवृत्ति । आतां श्रीपति अवधारीं ॥९२॥

तं त्वाऽहं भवभीतानां प्रपन्नानां भयापहम् । आपृच्छे शापनिर्मुक्तः पादस्पर्शादमीवहन् ॥१५॥

जन्ममरणादिदुःखप्रचुर । तो हा दुस्तर भवसागर । जेथ बुडाले चराचर । लहान थोर तळमळिती ॥९३॥
ऐशा प्राणियां भवभयभीतां । तव श्रीचरणीं शरणागतां । भवविरक्तां तव पदनिरतां । भवभयहर्त्ता तूं त्यांचें ॥९४॥
तरी ऐकें गा एनसशमना । दुःखदुर्योनिनाशना । आम्हांसि अपुल्या जावया भुवना । देईं अनुज्ञा कृपेनें ॥९५॥
तुझिया पादस्पर्शें स्वामी । शापनिर्मुक्त झालों पैं मी । श्रीमूर्ति राहो हृदयपद्मीं । पुन्हा हे ऊर्मी मज न बाधो ॥९६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP