अध्याय ३३ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


काचिद्रासपरिश्रांता पार्श्वस्थस्य गदाभृतः । जग्राह बाहुना स्कंध श्लथद्वलयमल्लिका ॥११॥

एवं नृत्यविशेषें कोण्ही । कृष्णें सम्मानिल्या तरुणीं । कोण्ही विशिष्ट मधुसामगानी । कृष्णसम्मानीं संतुष्टा ॥३४॥
कोण्ही संगीततालमानें । कृष्णें गौरविल्या सम्मानें । हावभाग करचालनें । साधुवचनें तोषविल्या ॥१३५॥
 त्या तोषाची पृथक् रीती । कुरुकुळचूडारत्नाप्रति । वशिशःठानहगोत्रसंतति । बादरणि निरूपी ॥३६॥
कोण्ही एक आभीरललान । रासमंडळीं कृतनर्त्तना । परिश्रांता श्रमापहरणा । मधुसूदना सह नृत्यें ॥३७॥
आपला बाहुकृष्णस्कंधीं । निकट असतां पार्श्वसंधि । घेऊनि श्रम निषेधी । परमानंदीं निमग्र ॥३८॥
रासश्रमभरें कंकणें । ढिलावली तीं करनर्त्तनें । मौळमल्लिका कचग्रथनें । मोकळीं झालीं सुटोनी ॥३९॥
कृष्ण एक मजचि पाशीं । मीचि प्रियतम श्रीकृष्णासी । ऐसें मानूनि निजमानसीं । स्वानंदासी ते पावे ॥१४०॥

तत्रैकांऽसगतं बाहुं कृष्णस्योत्पलसौरभम् । चंदनालिप्तमाघ्राय हृष्टरोमा चुचुंब ह ॥१२॥

एकी बल्लवी श्रमहरणार्थ । श्रीकृष्णबाहु निजांसगत । प्रफुल्लोत्पलसुगंधभरित । चंदनचर्चित चुंबितसे ॥४१॥
परमाह्लादें रोमांचित । बाहु हुंगे सप्रेममुदित । कृष्णश्लेषें आनंदभरित । प्रिय मानित हरि आपणां ॥४२॥

कस्याश्चिन्नाट्यविक्षिप्तकुंडलत्विषमंडितम् । गंडं गंडे संदधत्या अदात्तांबूलचर्वितम् ॥१३॥

नाचतां कुंडलें हालती जैसीं । कोण्ही एकीच्या गंडप्रदेशीं । तद्भामंडित स्वगंडेशीं । योजी प्रेमेंशीं हरिगंड ॥४३॥
कुंडलप्रभा गालावरी । तरळ तळपे परस्परीं । तत्संयोगें अंगीकारी । हरिमुखचर्वित तांबूल ॥४४॥
वदन घालूनि हरिवदनांत । तांबूल स्वीकरी तच्चर्वित । तेणें लाभें आनंदभरित । फिकें मानित कैवल्य ॥१४५॥
तया तांबूललाभें म्हणे । प्रियतम मानिलें मजचि कृष्णें । माझिये अवाप्तसुखाचे तुलने । तुळितां ठेंगणे विधिहरही ॥४६॥

नृत्यंती गायंती काचित्कूजन्नूपुरमेखला । पार्श्वस्थाऽच्युतहस्ताब्जं श्रांताऽधात्स्तनयोः शिवम् ॥१४॥

तव आणिखी कोण्ही ललना । नृत्यगायनीं परम निपुणा । तालबद्धपदभूषणां । किंकिणीरसना ध्वनियुक्ता ॥४७॥
गीतनृत्यभूषणगजरीं । तोषोनि सम्मानी श्रीहरि । कृष्णहस्ताब्ज स्वकुचांवरी । धरी सुंदरी शंतम तें ॥४८॥
तेणें म्हणे मजसारिखी । कृष्णासि प्रियतम नाहीं सखी । ऐसिया बोधें परमसुखी । सादर निरखी हरिवक्त्रा ॥४९॥

गोप्योलब्ध्वाऽच्युतं कांतं श्रिय एकांतवल्लभम् । गृहीतकंठ्यस्तद्दोर्भ्यां गायंत्यस्तं विजह्रिरे ॥१५॥

ऐशा समस्त आणिक महिला । रासविलासीं नर्त्तनकुशला । कृष्णसम्मानें सुखसोहळा । लीलाविभ्रमें भोगिती ॥१५०॥
कमलारतिरंगएकांत । तो प्रियतम जोडला कांत । तेणें लाभें गोपी समस्त । आनंदभरित हृत्कमळीं ॥५१॥
दोहीं बाहीं त्याचे कंठीं । कामसंभ्रमें सुदृढ मिठी । घालूनि तच्चरिते वाक्पुटीं । स्वरपरिपाठीं आळविती ॥५२॥
म्हणती रतिरंगलालस धीर । कृष्ण कंदर्पकेलिचतुर । योगिमानस्कुवलयभ्रमर । मन्मथसुंदर मुरहंता ॥५३॥
ऐशा श्रीकृष्णयशगायनीं । रासतांडवमंडितध्वनि । वलयनूपुरकटिकिंकिणी । गजरें कृष्णीं क्रीडती त्या ॥५४॥
ऐसें गोपींसह नर्त्तन । रासरंगीं श्रीभगवान । गायन गंधर्वगण । सिद्धचारणशिक्षार्थ ॥१५५॥
तेथ उत्कट शृंगाररस । देखोनि तयाचें मानस । स्त्रियांसहित मोह विशेष । पावले असतां ते काळीं ॥५६॥
वाद्यगीतवर्जितव्यंग । रासरंगाचा होईल भंग । म्हणोनि स्वसत्ता श्रीरंग । प्रकटी अमोघ ऐश्वर्य ॥५७॥
विराम पावतां गंधर्वपति । अन्य वाद्यादि संपत्ति । कैशा निर्मी श्रीयदुपति । तें परीक्षिती शुक सांगें ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP