पतिसुतान्वयभ्रातृबांधवानतिविलंघ्य तेऽन्त्यच्युतागताः ।
गतिविदस्तवोद्गीतमोहिताः कितव योषितः कस्त्यजेन्निशि ॥१६॥
सुतपती कुळें बंधु लंघुनी । तुज निमित्त रे पातलों वनीं ।
गति अभिज्ञ तो गीतसंभ्रमीं । कपटि कां वधू टाकिता तमीं ॥१६॥ हरिदया०

गोपी म्हणती भो अच्युत । ज्यातें तव पद झाले प्राप्त । तो जन पुन्हा नव्हे च्युत । आब्रह्म भुवनांत जेंवि होय ॥३८॥
आम्ही संप्राप्त ते तव पद । आणि वियोगें हा देसी खेद । म्हणसी कांहीं अधिकारभेद । तरी तूं विशद अवधारीं ॥३९॥
देहाभिमानेंशीं त्यजिले पति । सहित धनसदनादि संपत्ति । पुत्रममता धरूनि चित्तीं । गोत्राप्रति उबगलों ॥२४०॥
बंधु स्वजन सहोदर । देवर भावे सासु श्वशुर । करूनि सर्वांचा अव्हेर । वृत्ति क्षेत्र उपेक्षिलें ॥४१॥
सांडूनि सर्वही अभिमान । उल्लंघूनि विधिविधान । आम्हीं सेविले तुझे चरण । अच्युत जाणोन विश्वासें ॥४२॥
येथूनि आम्ही च्यवलों जरी । तैं अच्युतत्त्वाची कवण थोरी । पूर्वापर हें कथिजे जरी । तरी तूं श्रीहरि सर्वज्ञ ॥४३॥
कैसें आमुचें पूर्वाचरण । भक्ति विरक्ति सप्रेमभजन । चरणां सन्निध आगमन । तूं गति अभिज्ञ जाणसी ॥४४॥
म्हणसी कां पां उदास झालां । किमर्थ मत्पदा शरण आलां । यदर्थीं तुवाचि वेध केला । तोही कथिला जातसे ॥२४५॥
गीतजाणत्या तुझिया गीतें । उत्कृष्ट बोधें वेधिलीं चित्तें । तेणें सांडूनि प्रपंचातें । आम्हीं वनातें सेविलें ॥४६॥
बृहदारण्यीं श्रुतिगायन । कीं वृन्दावनींचें वेणुगान । तेणें वेधलें आमुचें मन । मग तव चरण आश्रयिलें ॥४७॥
गीतवेत्त्या आम्ही नारी । उद्गीत म्हणिजे सर्वां उपरि । विवरूनि विरक्तीची थोरी । आम्ही संसारीं विरमलों ॥४८॥
ब्रह्मादिस्थावरान्त विषय । गीतें केले वान्तप्राय । यास्तव धरूनि तव पदसोय । वरिले पाय सप्रेमीं ॥४९॥
ऐशिया आम्ही पदैकनिरता । अनन्यशरणा व्रजयोषिता । दुर्घटें लंघूनि पदसंप्राप्ता । निशि संमता कोण त्यजी ॥२५०॥
अरे कपट्या कितवा शठा । पुरता मायावी तूं कुरठा । जाणोनि वनिता पदलम्पटा । तूं उफराटा उपेक्षिसी ॥५१॥
शरत्काळींची सचन्द्र रजनी । एकांत सुपुष्पित काननीं । सुंदरी चतुरा वशवर्तिनी । त्यां तुजविण कोण्ही न टकिती ॥५२॥
विषयविरक्त आत्माराम । तो तूं एकचि निष्कामकाम । येर कोण्ही वधूसंगम । स्ववश सकाम न टकिती ॥५३॥
तरी मज जाणोनि उदास । कासया धरितां माझी आस । ऐसें म्हणसी तरी रहस्य । आमुचें अशेष अवधारीं ॥५४॥
पूर्णकाम तूं निजात्मरमण । म्हणोनि निःसंग उदासीन । जासी विरहिणी उपेक्षून । आमुचें मरण न चुके कीं ॥२५५॥
तव गानवेधें विरहज्वर । तेणें व्यापिलें अभ्यंतर । त्वद्दर्शनें त्यां उपचार । भेषजसार रतिलास्य ॥५६॥
पुन्हा वियोग पांचवा झाला । तेणें देहभान समूळ गेला । विरहज्वरें क्षोभ केला । धुंडूं वैद्याला स्मररुग्णा ॥५७॥
तरी सद्वैद्या सदय होईं । स्मरतप्तातें रतिरस देईं । मृता जीववूनि सुकृत घेईं । स्वयशनवाई हे मिरवीं ॥५८॥
हृद्रोगाचें विकारकथन । आणि चिकित्सामृताचें जें स्थान । वदती श्लोकद्वयें करून । तें व्याख्यान अवधारा ॥५९॥

रहसि संविदं हृच्छयोदयं प्रहसिताननं प्रेमवीक्षणम् ।
बृहदुरः श्रियो वीक्ष्य धाम ते मुहुरतिस्पृहा मुह्यते मनः ॥१७॥
पीडितकाम एकांतमंदिरीं । स्मितविलोकनें तृप्त सुंदरी ।
उरविशालभा लक्षुनी मना । कवळिजे असी होय वासना ॥१७॥ हरिदया०

तुझिया विलासरसिका उक्ति । चाटु चटुल संकेतरीति । हृदयीं आठवितां एकांतीं । क्षोभे चित्तीं कंदर्प ॥२६०॥
तेव्हां तुझें हास्यवदन । सविलास कटाक्ष मन्मथबाण । विंधूनि वेधिसी तनुमनप्राण । तें सप्रेमवीक्षण आठवे ॥६१॥
मलयजचर्चित बाहुयुगळ । सालंकृत सुपीन सरळ । उर विशाळ लक्ष्मीबहळ । उदर वर्तुळ तनुमध्य ॥६२॥
इत्यादि समस्त अवयवस्मृति । आलिंगनार्थ क्षोभे वृत्ति । वारंवार स्पृहा चित्तीं । मोहावर्त्तीं मन भ्रमवी ॥६३॥
बळें विसर पाडितां न पडे । मूर्ति सालंकृत दृष्टीपुढें । दिसतां सुरतीं हांव वाढे । कवळूं आवडे सप्रेमें ॥६४॥

व्रजवनौकसां व्यक्तिरंग ते वृजिनहंत्र्यलं विश्वमंगलम् ।
त्यज मनाक्क नस्त्वत्स्पृहात्मनां स्वजनाहृद्रुजां यन्निषूजनम् ॥१८॥
व्रजजना तुझी मूर्ति सौख्यदा । सकळ संकटें भंगि आपदा ।
कृपणता त्यजीं दाविं मन्मथें । स्वरत जाळिलों भंगिं ते व्यथे ॥१८॥ हरिदया०

व्रजवनीं जयांचीं निकेते । व्रजवनौकस म्हणिजे त्यांतें । तयां समस्तां प्राणियांतें । प्रियतम वर्ते तव व्यक्ति ॥२६५॥
कोमलामंत्रणें म्हणती अंग । तुझी व्यत्कि हे लावण्यसुभग । व्रजजनवृजिना करी भंग । कृपापांगमोक्षणें ॥६६॥
सर्व प्रकारें मंगलरूपा । तुझी व्यक्ति हे मन्मथबापा । विशेष आम्हांवरी अनुकंपा । करूनि कंदर्पा परिहरीं ॥६७॥
हे तव व्यक्ति विश्वमंगल । आम्हां हृच्छय अमंगल । जाळी क्षोभोनि विरहानळ । तो त्वां शीतळ कराव ॥६८॥
आमुच्या मानसा माझारी । आलिंगनाची स्पृहा भारी । म्हणोनि कार्पण्य परतें करीं । अल्पही धरीं परती ते ॥६९॥
आतां कार्पण्य न करूनि कांही । ईषन्मात्रही कृपेनें पाहीं । हृच्छयरोग आमुचे हृदयीं । भेषज देईं तच्छमना ॥२७०॥
दुर्धर हृच्छय जेणें नाशे । तुजपाशीं तें औषध असे । देऊं जाणसी परमरहस्यें । व्रीडाविशेषें वदों न शकों ॥७१॥
कथिला सनिदान हृच्छयोदय । तच्छमनाचा जो उपाय । भेषजप्रयोगसाधनकर्य । गूढ अभिप्राय सूचिला ॥७२॥
औत्सुक्यें हे वदल्या गोठी । तंव गमला कृष्णचि पातला निकटीं । वोरसें रुदन स्फुंदन कंठीं । सप्रेम पोटीं भयभीता ॥७३॥
भयें कवळूनियां बोलती । प्रियतम कारुण्य काकुलती । ते गोपींची सप्रेम उक्ति । परिसे नृपति शुक सांगे ॥७४॥

यत्ते सुजात चरणांबुरुहं स्तनेषु भीताः शनैः प्रिय दधीमहि कर्कशेषु ।
तेनाटवीमटसि तद्व्यथते न किंस्वित्कूर्पादिभिर्भ्रमति धीर्भवदायुषां नः ॥१९॥
तव पदांबुजें चूचुकावरी । हळुच ठेवितां भीतसों हरि ।
फिरसि काननें त्या पदीं कसा । क्षतभयें बहू जीव हा पिसा ॥१९॥ हरिदया०

प्रियतमा तुझीं सुकुमार पदें । उपमे असाम्य तुळितां कुमुदें । स्तनीं मर्दितां मानसमोदें । भरतां खेदें झळंबतसों ॥२७५॥
आंगीं नववयसेचा भर । तेणें आमुचे कुच कठोर । तव पद कुमुदाहूनि सुकुमार । मर्दितां अपार भय मानूं ॥७६॥
हळुहळु स्तनमंडळीं । मवाळ पदतळ श्रीवनमाळी । स्पर्शूनि भोगूं सुखनवाळी । मर्दनकाळीं श्रमभीता ॥७७॥
काननें फिरसेसे तया चरणें । नांगीकारूनि पादत्राणें । कृपाळुपणें पशुरक्षणें । पूर्ण्यकारुण्यें जगदीशा ॥७८॥
तेव्हां कंतक चुंबिती चरणीं । खडे रुतती कठोर धरणी । क्षतवेदना तिखटां तृणीं । हें अंतःकरणीं भय आम्हां ॥७९॥
कांटे खडे तृणांकुर । ठेंचा लागती कठोर । फांटे वोरबडती निबर । धांवतां सत्वर गोपृष्ठीं ॥२८०॥
सम विषम पाऊल पडे । कोठें अवचके कोठें खडे । सर्प विंचुवादि रगडतां किडे । स्पर्शें रोकडे श्रमक्र जे ॥८१॥
ऐशा अनेक वेदना । होत असतीच तुझिया चरणा । विहारभरें तूं न धरिसी गणना । परी आमुच्या मना जाकळिती ॥८२॥
तुझिया चरणांतें गवसणी । जीवाप्राणांची चक्रपाणि । करूनि सचिंत अंतःकरणीं । आम्ही सदनीं दिन कंठूं ॥८३॥
सायंकाळीं अक्षत चरण । देखतां आयुष्याभिवर्धन । जैसें मत्स्यातें जीवन । तवावलोकन तेंवि आम्हां ॥८४॥
प्रभातेपासून सायंकाळ । वनीं फिरसी अवघा वेळ । आमुची बुद्धि भ्रमें व्याकुळ । आयुष्य केवळ तूं आमुचें ॥२८५॥
ऐसिया गोपी कृष्णात्मका । विरहें पावोनि परम दुःखा । न लभोनियां यदुनायका । युगसम घटिका लोटिती ॥८६॥
एवं अध्यायसमाप्ति । गोपिका विरहें सखेद रुदती । हें ऐकोनि सूचिलें श्रोतीं । त्यां येथ श्रीपति भेटविजे ॥८७॥
तरी अध्यायीं वक्ष्यमाण । परीक्षितीतें शुक भगवान । म्हणे राया यापरी जाण । करिती रुदन गोपिका ॥८८॥

श्रीशुक उवाच :- इति गोप्यः प्रगायंत्यः प्रलपंत्यश्च चित्रधा ।
रुरुदुः सुस्वरं राजन्कृष्णदर्शनलालसाः ॥२०॥
हरिगुणा अशा गाति सुंदरी । विलपती वनीं त्या परोपरी ।
रडति गोपिका सुस्वरें धिटा । हरिविलोकना लागिं लंपटा ॥२०॥ हरिदया०

ऐशा गोपी हरिगुणगान । करितां स्मरतां भगवद्ध्यान । स्फुंदन विलाप मांडिलें रुदन । कृष्णदर्शन वांछूनी ॥८९॥
अनुभूत हरिगुण सुस्वर गाती । विरहें सखेद त्या विलपती । कृष्णदर्शना लालसवृत्ति । सांगे भूपती शुकयोगी ॥२९०॥
ऐशा बहुधा शोकाकुळा । जाणोनि कृपेचा कोंवळा । करुणा आली त्या घननीळा । प्रकट झाला त्यामाजी ॥९१॥

तासामाविरभूच्छौरिः स्मयमानमुखांबुजः ।
पीतांबरधरः स्रग्वी साक्षान्मन्मथमन्मथः ॥२१॥
प्रकट जाहला त्यांमध्यें हरी । हसित ईक्षिल्या गोपसुंदरी ।
वसन पीवळें माळ साजिरी । स्मरचि तो दयासिंधुवैखरी ॥२१॥ हरिदया०

जो कां शूरसेनाचा नातु । शौरिनामें श्रीअनंतु । वदनांबुजें हास्य करितु । गोपीआंतु प्रकटला ॥९२॥
नवघनभासुरसोज्वळकांति । कंठीं मिरवी वैजयंती । किरीटकुंडलांची दीप्ति । कुंटलमंडितगंडयुगीं ॥९३॥
माथां मयूरबर्हस्तबक । मृगमदकुंकुममिश्रिततिलक । तरळ अपांग सरळ नासिक । कुंदरदन शशिवदन ॥९४॥
प्रवाळाधर मंदस्मित । आजानुबाहु भूषान्वित । नववनमाळाकौस्तुभयुक्त । मुरलीमंडित करकमळ ॥२९५॥
विद्युद्भासुर पीतांबर । मेखळे क्षुद्रघंटिकागजर । चरणीं बिरुदांचा तोडर । वांकी नूपुर रुणझुणती ॥९६॥
मन्मथ मोही नारीनर । त्यामन्मथासही मोहकर । ऐसा सुंदर सालंकार । देखिला श्रीधर गोपींहीं ॥९७॥
कृष्णदर्शनें परमोत्साहो । गोपी पावल्या तो अध्यावो । ऐकावया सावध राहो । सभाग्य समुदावो श्रोत्यांचा ॥९८॥
अखिलात्मा जो एकनाथ । चक्रवर्ती भेदरहित । अहंशत्रु सेनेसहित । मर्दूनि मिरवत सुखासनीं ॥९९॥
श्रवणसुखाचें अन्नसत्र । मुमुक्षुश्रोत्यांलागिं स्वतंत्र । चिदानंदाचें वाढितां पात्र । स्वानंद सर्वत्र भोगिती ॥३००॥
गोविंदाच्या नामस्मरणें । होय भवभणगां पारणें । श्रवणसुखाच्या अगाधपणें । दयार्णव होणें मग तेहीं ॥१॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र संहितागणित । परमहंसाचा एकांत । शुक समर्थ निरूपी ॥२॥
श्रोता परीक्षिति सावध । त्यामाजि हा दशमस्कंध । गोपीगीत कथिलें विशद । जें श्रवणें मोक्षद श्रोतयां ॥३॥
द्यार्णवाची हे विनवणी । न्यून पूर्ण ग्रंथश्रवणीं । आढळेल ते संपादूनी । शब्द शोधूनि सांवरिजे ॥४॥
मीं जें वदलों बाळपणें । जीर्ण जाणोनि वृद्धगणने । मानाल तरी उभयचिह्नें । समसमानें झांकावीं ॥३०५॥
बाळ चिवडी विष्ठामूत्र । नग्न झांकलें नेणे गात्र । तेथ मातेचे सदय नेत्र । ते सर्वही सांवरिती ॥६॥
तैसेंच जाणा वृद्धपण । अनावर मळमूत्रांचें क्षरण । देखतां शरीर उघडें नग्न । सदय सज्जन जवंकिती ॥७॥
एवं दोहींपरी माझी । विनति संतांचे समाजीं । न्यून पूर्ण ग्रंथीची वाजी । तुमचे माथां मी नेणें ॥८॥
मी अकिंचन देऊं काय । भावें तुमए वंदिले पाय । सांभाळावें जननीन्यायें । सदयहृदय मज बाळा ॥९॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां गोपीगीतकथनं नामैकत्रिंशत्तमोऽध्यायः ॥३१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूल श्लोक ॥२१॥ भाषा श्लोक ॥२१॥ ओवीसंख्या ॥३०९॥ एवं संख्या ॥३५१॥ ( एकतिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १५६१८ )

एकतिसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP