चलसि यद्व्रजाच्चारयन्पशून्नलिनसुंदरं नाथ ते पदम् ।
शिलतृणांकुरैः सीदतीति नः कलिलतां मनः कांत गच्छति ॥११॥
पशु चरावया नेसि जैं वनीं । पद मृदू तुझे पंकजहुनी ।
तिखट दर्भ हे रूतती झणीं । विकळता भरे आमुचे मनीं ॥११॥ हरिदया०

तुजनिमित्त आमुच्या चित्तीं । उषसि प्रदोषीं वेदना उठती । कोण्या प्रकारें त्या तुजप्रति । ऐकें श्रीपति कथितसों ॥७९॥
भो नाथ हें संबोधन । कीं तुजविण अनाथ प्रमदागण । झाला ऐसें जाणोनि पूर्ण । प्रकटे सघृण होऊनी ॥१८०॥
चारावया गोधनाई । जेव्हां व्रजींहूनि कानना जासी । तैं उषःकाळापासूनि क्लेशीं । निजमानसीं जाचतसों ॥८१॥
तव पदनलिनामळसुंदर । करितां तत्पदीं वनसंचार । यवसपोटरें तृणांकुर । तीक्ष्णतर झणें रुतती ॥८२॥
तेणें वेदना होती पदां । या काकुलती दिवस मुदा । आमुचें चित्त पावे खेदा । सुखप्रदा तुजसाठीं ॥८३॥
तुज तंव आमुचें स्मरण नाहीं । वनीं स्वानंदें चारिसी गाई । परी आम्हां विसर न पडे कांहीं । आपुले हृदयीं झुरतसों ॥८४॥
कीं तव चरणां रुतती खडे । तिखट दर्भांचे अगरडे । मंजर्‍या कणिशादि जर्बडें । झणें वोरबडे म्हणोनि ॥१८५॥
परम सुकुमार तुझे चरण । त्या तळीं आंथरूं आपुला प्राण वदनाभये सखेद सघृण । दिन संपूर्ण क्रमितसों ॥८६॥
चित्त गुंततां तुझे चरणीं । अव्यावस्त कर्माचरणीं । आम्ही संसारीं सासुरवासिनी । भोगूं जाचणी तद्योगें ॥८७॥
सासुसासरें भावे देर । विकळ देखोनि कर्माचार । करिती जाचणी अपार । तें नेणें अंतर तव वेधें ॥८८॥
ते जाचणीहूनि कोटिगुणें । तुझिये चरणीं रुतती तृणें । या काकुळती चित्त शिणे । विश्रांति नेणे अणुमात्र ॥८९॥
उदयापासून अस्तमान - । पर्यंत करितां पदचिंतन । ऐसें सचिंत आमुचें मन । पुनरागमन जंव देखों ॥१९०॥

दिनपरिक्षये नीलकुंतलैर्वनरुहाननं बिभ्रदावृतम् ।
घनरजस्वलं दर्शयन्मुहुर्मनसि नः स्मरं वीर यच्छसि ॥१२॥
उतरतां दिना कुंतलीं घना । परिस गोरजीं व्याप्त आनना ।
घडि घडीं विभो दावुनी अम्हां । मनिं मनोज तूं देसि सत्तमा ॥१२॥ हरिदया०

सर्वां किरणीं अंशुमाळी । परिक्षय पावतां अस्ताचळीं । घेऊनि गोगोपमंडळी । व्रजाजवळी जैं येसी ॥९१॥
कमलासारिखें फुल्लारमान । आम्हांसि दावूनि निजानन । आमुचे हृदयीं मनसिजबाण । अर्पिसी संपूर्ण तद्योगें ॥९२॥
कमलसादृश्य कैसें वदनीं । उपमासाहित्य कथी शुकमुनि । तें परिसिजे विचक्षणीं । हरिगुणश्रवणीं रसिकांहीं ॥९३॥
आनन आवृत नीलकुंतलीं । वनरुह आवृत भ्रमरावळी । वदन धूसर गोरजबहळीं । परागधूळी जलरुह पैं ॥९४॥
निशिदिनीं संकोच विकाश पावे । पंचबाणाच्या मार्गनभावें । यास्तव स्मरक्षोभक जाणावे । निजमार्दवें वनरुह पैं ॥१९५॥
तैसें श्रीमुख वारंवार । दावूनि सप्रेम विलासपर । आमुचे हृदयीं क्षोभवी स्मर । तेणें जर्जर होतसों ॥९६॥
वदनमात्र दावूनि नित्य । आमुचा क्षोभविसी मन्मथ । परंतु देऊनि निजैकांत । मनसिज शांत न करिसी तूं ॥९७॥
ऐसा कपटी तूं तत्त्वतां । आम्ही अनन्य तव पदनिरता । आतां सांडूनि कापट्यता । पुरवी आस्था द्विविध हे ॥९८॥
श्लोकद्वयें द्विविध विनति । गोपी श्रीकृष्णातें करिती । शुक निवेदी परीक्षिती । ते येथ श्रोतीं परिसावी ॥९९॥

प्रणतकामदं पद्मजार्चितं धरणिमंडनं ध्येयमापदि ।
चरणपंकजं शंतमं च ते रमण नः स्तनेष्वर्पयाधिहन् ॥१३॥
शरणतोषकें कंजजार्चितें । अपदि ध्येय जीं भूमिमंडितें ।
सुखतमें तुझीं रम्य पाउलें । स्तनिं धरीं अम्हां सर्व पावलें ॥१३॥ हरिदया०

आधिहरण या संबोधना । करूनि सूचिती विरहशमना । रमणसंबोधनें ललना । पूर्वक्रीडना जाणविती ॥२००॥
भो भो रमणा तव पदपद्म । जेथ कमलेचें सदैव सन्न । स्तनीं ठेवूनि तें शंतम । हृच्छयछद्म छेदावें ॥१॥
जें पदपद्म श्रीपद्मजें । अज्ञानाधिहरणाच्या काजें । भूमि मोजितां वामनें द्विजें । सप्रेमवोजे अर्चिलें ॥२॥
गगनीं झुगारितां पाषाण । जितुका ऊर्ध्व करी गमन । तितुकेंचि पुन्हा पावे पतन । एवं समान सुखदुःख ॥३॥
तैसें इहामुत्र समस्त । समान सुखदुःखांतें देत । जाणोनि झाले जे विरक्त । दुःखातीत व्हावया ॥४॥
तयां प्रणतां अक्षय सुख । निःशेष निरसूनियां दुःख । भजनमात्रें नमनात्मक । जें दायक पदपद्म ॥२०५॥
ऐसें प्रणतपूर्णकाम । कारक जें तव चरणपद्म । आमुचे स्तनीं तें शंतम । ठेवीं प्रियतम भो रमणा ॥६॥
मधुकैटभ मर्दूनि दोन्ही । जे कां मेदोद्भवा मेदिनी । वामनें स्वपदें आच्छादुनी । केली धरणि पवित्र ॥७॥
कीं गयासुराचे मस्तकीं स्थिर । कीं मर्दितां लवणासुर । कीं भस्मा छळितां नर्त्तनपर । पदफुल्लार भू भोगी ॥८॥
कीं अमृत वाढितां समुद्रमथनीं । पदविन्यासें मंडित धरणि । कीं क्षत्रकुळाच्या निर्दळणीं । कर्कश ठाणीं रणरंगीं ॥९॥
किंवा दंडकारण्यीं फिरतां । कीं वत्सें गाई संरक्षितां । हरूनि समस्त दुर्भरव्यथा । धरणिमंडन पद झालें ॥२१०॥
तैसेंच आमुच्या स्तनावरी । पदाब्ज ठेवूनि हृच्छय हरीं । इतुकी प्रार्थना श्रीहरि । अंगीकारें बटकींची ॥११॥
प्राप्त होतां विपत्ति नाना । पदाब्ज ध्याती तन्निरसना । त्यांच्या करिसी विपत्तिहरणा । शंतम चरणां ध्यातांचि ॥१२॥
प्रणतजनांचे कामप्रद । पद्मजें अर्चिले परमवंद्य । धरणिमंडन आनंदकंद । स्तनीं तें सुखद पद ठेवीं ॥१३॥
द्विविध विनति जे बोलिली । त्यांमाजि प्रथम निरूपिली । आतां दुसरी याञ्चा केली । ते परिसिली पाहिजे ॥१४॥

सुरतवर्द्धनं शोकनाशनं स्वरितवेणुना सुष्ठु चुंबितम् ।
इतररागविस्मारणं नृणां वितर वीर नस्तेऽधरामृतम् ॥१४॥
सुरत वाढवी शोक खंडुनी । स्वरितवेणुनें चुंबितेक्षणीं ।
इतर आवडी सांडवी जना । अधरपान तें वोपी चुंबना ॥१४॥ हरिदया०

कामसमरीं अजिंक धीर । म्हणोनि संबोधिती हे वीर । तुझें अधरामृत मधुरतर । तें सत्वर दे आम्हां ॥२१५॥
अधरपानें सुरत वाढे । अरिवर्गेंशीं शोक बुडे । तें अधरामृत आम्हां आवडे । पाजीं रोकडें प्राणेशा ॥१६॥
सप्तस्वरीं तानमानीं । वेणु चुंबी पूरितेक्षणीं । अधरामृतोद्भव मधुर ध्वनि । प्रसरे गगनीं जे काळीं ॥१७॥
सर्वांसि अधरामृताचें पान । फावे होतां वेणुश्रवण । तेणें इहामुष्मिक सुखलावण्य । फिकें जाणोनि विसरवी ॥१८॥
मृत्युलोकींच्या नरांप्रति । दुर्लभ इहामुष्मिक सुखसंपत्ति । वेणुश्रवणीं त्यां घडतां रति । पडे विस्मृति भवभानीं ॥१९॥
मशकापासूनि ब्रह्मावरी । जितुकी विषयसुखाची थोरी । ते विसरवी क्षणाभीतरी । अधरमाधुरी वेणुमयी ॥२२०॥
परमहंस झाले खग । सिद्ध गंधर्व जाले भृंग । अधरसुधाश्रवणानुराग । धरूनि कुरंग मुनि झाले ॥२१॥
ऐसें तुझें अधरामृत । आम्हां देईं रतिसंमत । इतुका जाणवूनि वृत्तांत । कथिती संतत ऐकाग्र्‍य ॥२२॥
जंववरी तुझी न घडे भेटी । असतां साम्राज्यसुखाचे पोटीं । तंव त्या अवघ्या दुःखकोटी । दुर्ल्लभ गोठी स्वसुखाची ॥२३॥
ऐसें जाणोनि वीतराग । सर्वसंगाचा करिती त्याग । अवलंबूनि हंसमार्ग । तव संयोग साधिती ॥२४॥
तैशाचि आम्ही प्रपंचविसरें । तुझ्या ठायीं सप्रेमभरें । फिरतों अनुरागें कांतारें । कीं हें श्रीधरें नेणिजे ॥२२५॥
अनन्यशरण आपणासाठीं । जाणोनि निष्ठुरता हे मोठी । सदया कैसी धरवे पोटीं । अघटित गोठी हे वाटे ॥२६॥
अनन्यशरणत्वाचें कथन । करिती दों श्लोकीं विवरण । त्याचि माजि निष्ठुरपण । विस्मय पावोन शंसिती ॥२७॥

अटति यद्भवाह्नि काननं त्रुटिर्युगायते त्वामपश्यताम् ।
कुटिलकुंतलं श्रीमुखं च ते जड उदीक्षतां पक्ष्मकृद्दृशाम् ॥१५॥
फिरसि तूं हरी काननें दिवा । त्रुटि युगापरी जाय तेधवां ।
मुख निरीक्षितां शापितों विधी । करित पापण्या व्यर्थ मंदधी ॥१५॥ हरिदया०

धेनूमागें वृंदावनीं । प्रभाते जातां चक्रपाणि । तेव्हां त्वन्निष्ठ जे जे प्राणी । त्यांची ग्लानि गणवेना ॥२८॥
तूतें न पाहतां नयनीं । पळार्ध थोर युगाहुनी । लोटतां दाटती दुःखश्रेणी । हृदयें फुटोनि उलताती ॥२९॥
तूतें न पाहतां ऐसे दुःखी । पुढती भाग्यें निशामुखीं । येतां देखोनि प्रेमोत्सुकीं । होती सुखी तें ऐक ॥२३०॥
आकर्णनयनांच्या शेवटीं । भ्रमरभासुरकुंतलदाटी । कंदर्पकार्मुकाकार भृकुटी । स्मरशरसुटी अपांग ॥३१॥
शशिसह अश्विनी नक्षत्र । तैसा वदनसुधाकर । पाहतां उचलले ठाती नेत्र । जेंवि कां चित्र अनिमेष ॥३२॥
पाहतां चिरकाळ न पुरे धणी । तरळतां अल्पही पक्ष्मणी । तेव्हां विरिंचीलागुनी । जड मूढ म्हणोनि दूषिती ॥३३॥
ऊर्ध्व पक्ष्मणीयुक्तनयन । किमर्थ सृजिता झाला द्रुहिण । सादर पाहतां श्रीकृष्णवदन । मध्य व्यवधान करिताती ॥३४॥
सादर पाहतां तृषिता नयना । प्राशूनि हृदयीं आणितां कृष्णा । धणी न पुरेचि सहसा जाणा । सुरकामनापडिपाडें ॥२३५॥
तव मुखनिरीक्षणीं जें सुख । त्यासम न तुकेचि पीयूख । ज्याचे सहोदर केवळ विख । जें कां शतमखक्षयकारी ॥३६॥
ऐशा तव विग्रहासक्ता । आम्ही विरहिणी मन्मथतप्ता । सांडूनि स्वजन माता पिता । आलों अच्युता तुजप्रति ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP