इंद्र नस्त्वाभिषेक्ष्यामो ब्रह्मणा चोदिता वयम् । अवतीर्णोऽसि विश्वात्मन् भूमेर्भारापनुत्तये ॥२१॥

आम्हां प्रेरिलें ब्रह्मदेवें । कीं इंद्रत्व तुजला द्यावें । तुवां लोकत्रय आघवें । संरक्षावें निजसत्ता ॥६९॥
आमुचा इंद्र पुरंदर । म्हणसी परी तो परम क्रूर । करावयासि गोसंहार । अतिनिष्ठुर प्रवर्तला ॥२७०॥
पुरे त्याचें इंद्रपण । मारितां न शिणे गोब्राह्मण । दधीचीचें केलें हनन । ऐसा निर्घृण निर्लज्ज ॥७१॥
व्याघ्र जैसा पशुपाळक । अजाअविकाअवनीं वृक । तैसा हाही सुरनायक । संरक्षक त्रिजगाचा ॥७२॥
यालागीं तूं इंद्र होईं । स्वानंद वरीं लोकत्रयीं । म्हणसी जरी मज योग्यता नाहीं । कीं मानवदेही म्हणोनी ॥७३॥
देवेंद्र तो देवयोनि । म्हणोनि मिरवे अमरभुवनीं । आम्ही गौळियें राहूं वनीं । कें मजलागुनी इंद्रत्व ॥७४॥
तरी ऐसें न म्हणें जनार्दना । तूं विश्वाच्या संरक्षणा । भूमिभाराच्या अपनयना । मर्त्यभुवना आलासी ॥२७५॥
जन्मलासि यादवकुळीं । लीलानाट्यें म्हणविसी गौळी । विधिहरप्रमुख सुरांचे मौळीं । तूं वनमाळी अभिपूज्य ॥७६॥
तूं इंद्राचा परम इंद्र । ईश्वराचा परमेश्वर । विधिहर सुरवर सर्वेश्वर । तुझा पार नेणती ॥७७॥
म्हणसी ईश्वराहूनि मी पूज्य । ऐसें रहस्य कळलें तुज । तरी इंद्रपदींचें सामान्य काज । कां पां मज निरूपिसी ॥७८॥
तरी तूं समर्थ सर्वेश्वर । विधिहर सुरवर सचराचर । यांचे पालनीं पटुतर । जाणोनि आधार वांछितसों ॥७९॥
तूं विश्वरूपी विश्वात्मक । जाणसी सर्वांचें सुखदुःख । भूभार उतरूनि सम्यक । रक्षिसी निष्टंक त्रिलोकी ॥२८०॥
भूभार उतरावया कारणें । तुवां यदुकुळीं अवतरणें । जाणोनियां हे रहस्यखुणे । मत्प्रार्थने स्वीकारीं ॥८१॥
ऐसा प्रार्थूनि श्रीपति । मान्य करविली विनीतविनति । पुढें सुरभि काय करिती । जाली तें श्रोतीं परिसिजे ॥८२॥

श्रीशुक उवाच - एवं कृष्णमुपामंत्र्य सुरभिः पयसाऽऽत्मनः । जलैश्चाकाशगंगाया ऐरावतकरोद्धृतैः ॥२२॥

भारतभूपमाळिकामेरु । परमजिज्ञासु विचारचतुर । हरिगुणश्रवणीं अतिसादर । कुरुनरेंद्र परीक्षिति ॥८३॥
तयासि म्हणे बादरायणि । ब्रह्मयाचे आज्ञेवरूनी । सुरभि अभिषेकी चक्रपाणी । तें तूं श्रवणीं परियेसीं ॥८४॥
कृष्णासि करूनि विनीत विनति । कामधेनूनें परम निगुती । अभिषेकावयालागीं गोपति । केली आयति संकल्पें ॥२८५॥
सुधर्मादि ब्रह्मसभा । हारपती जयेच्या प्रभा । चिद्रत्नजडिताची स्वयंभा । सभा सुप्रभा निर्मिली ॥८६॥
सभेमाजि चौदा भुवनें । मुकुलित कार्येंशीं कारणें । निजाधिकारें वोळगणें । उपचारार्पणें वोळगती ॥८७॥
सन्नद्ध सर्वही संमृद्धि । घेऊनि राबती ऋद्धिसिद्धि । तेथ महर्षि यथाविधि । निगमप्रबोधीं सादर ॥८८॥
चिंतामणीच्या वेदिका । नभ गर्भौनि अमृतपुलिका । कल्पद्रुमाच्या वाटिका । सुखवर्धका श्रवताती ॥८९॥
जीवकाव्यांहूनि तेजाळ । वितानमणींचे बंबाळ । पूर्णचंद्राहूनि शीतल । व्योअमदुकूल सुखकरी ॥२९०॥
तया मंडपा मध्यभागीं । सिंहासन विचित्र रंगीं । नाना रत्नांची झगमगी । किरणीं भंगी भास्कराभा ॥९१॥
तया सिंहासनावरी मवाळ । मृदोळी हंसगल्लोत्थ मृदुल । तेथ बैसवूनि गोपाळ । संभार सकळ स्थापिले ॥९२॥
पिशाचगणीं परिवारून । स्वयें पातला त्रिलोचन । श्रीकृष्णाचें अभिषेचन । प्रीती करून पहावया ॥९३॥
अष्टभैरव सावधान । अष्टदिग्भागीं संस्थापून । दुर्गाकार पिशाचसैन्य । घरटीकार वेताळ ॥९४॥
गणपति दुर्गा क्षेत्रपाळ । अधिदेहळी गणमंडळ । कनकवेत्रपाणि सकळ । विघ्नकल्लोळ भंगिती ॥२९५॥
श्रीकृष्णाच्या नामस्मरणें । भंगोनि जाती महा विघ्नें । कल्याणभरित समस्त भुवनें । अभिषेचनें कृष्णाच्या ॥९६॥
शूल रोवूनि सभांगणीं । सादर तिष्ठे शूलपाणि । तेथ इतरां कोण गणीं । दास्याचरणीं सुरवरां ॥९७॥
कालभैरव उन्मत्त रुरु । कोळकपाळी भीषण अपर । बटुक रक्तांग आपदुद्धार । आणि भट्कार दशदिशीं ॥९८॥
आपलालिया पिशाचगणीं । सालंकृत सहयोगिनी । सायुध मंडित निजाभरणीं । तिष्ठती स्थानीं आपुलाले ॥९९॥
भैरवापाठीं गुल्मांतरीं । नंद सुनंद पूर्व द्वारीं । दक्षिणद्वारींचे अधिकारी । चंड प्रचंड सुभट ॥३००॥
बळ प्रबळ पश्चिम भागीं । सावध सन्नद्ध सर्वांगीं । भद्र सुभद्र उत्तरमार्गीं । विष्णुनियोगीं तिष्ठती ॥१॥
विष्णुचक्र तदंतरीं । निमेषमात्रें सहस्रवरी । मंडपाभंवतीं घरटी करी । सहस्रधारीं लखलखित ॥२॥
ऐसिये सभामंडपस्थानीं । सुरभि आत्मपयें करूनी । इंद्र गंगाजळ आणूनी । आकाशवाहिनीसंभूत ॥३॥
ऐरावतकरोद्धृत । श्रीकृष्णातें अभिषेचित । तेथील वृत्तांत समस्त । ऐकें स्वस्थ भूपति ॥४॥
ब्रह्मयाचे प्रेरणेवरून । श्रीकृष्णातें अभिषेचन । तेणें इंद्र मनीं उद्विग्न । लज्जायमान वक्तृत्वीं ॥३०५॥
पूर्वापराधें संकुचित । कृष्णस्तवनें कांहीं स्वस्थ । तंव उद्योग देखे विधिप्रणीत । निजपदोपहतसंभ्रम हा ॥६॥
श्रीकृष्णाची अचिंत्य शक्ति । अगाधैश्वर्याची स्थिति । लक्षूनि मानी आपुल्या चित्तीं । स्वपदोपहति वोढवली ॥७॥
हें देखोनि देवर्षिगणीं । आश्वासूनि भिदुरपाणि । रहस्य कथूनि त्याचिये कर्णीं । चिंतेपासूनि सोडविला ॥८॥

इंद्रः सुरर्षिभिः साकं नोदितो देवमातृभिः । अभ्यषिंचत दाशार्हं गोविंद इति चाभ्यधात् ॥२३॥

देवमाता देवर्षि अदिति । इंद्रासि बोधिती एकांतीं । वृथा म्हणविसी विबुधपति । अबुध निश्चिती तूं एक ॥९॥
आजि ब्रह्मांडभांडोदरीं । परमामृताची आनंदलहरी । भोगीत असतां सचराचरीं । तूं कां अंतरीं सचिंत ॥३१०॥
ब्रह्मयाचे आज्ञेवरून । इंद्रपदीं अभिषेचन । कृष्णासि करिती हें देखोन । सचिंत मन जरी तुझें ॥११॥
तरी तूं ऐकें इयेविशीं । ब्रह्मादिलोक रक्षावयासी । आश्रय अखिल ब्रह्मांडासी । जाणोनि कृष्णासि अभिषेचीं ॥१२॥
अमरेंद्र दहनेंद्र शमनेंद्र । राक्षसेंद्र यादवेंद्र । पवनेंद्र धनेंद्र रौद्रेंद्र । ब्रह्मेंद्रादि अखिल जे ॥१३॥
ऐसा सर्वेंद्रांचे शिरीं । ब्रह्मयाचे आज्ञेवरी । कृष्ण अभिषेचितां सुरीं । तूं कां अंतरीं सचिंत ॥१४॥
येथ विधीच्या निदेशमात्रें । सचेत सुरवरांचीं गात्रें । कामधेनूनें संकल्पसूत्रें । चमत्कारें निर्मिलीं ॥३१५॥
यालागीं सत्वर सावध होयीं । कृष्णाभिषेकाभ्युदयीं । सर्वकार्यें ठायींच्या ठायीं । विनयतेशीं विनियोजीं ॥१६॥
तैसाचि निर्मूनि अमरपति । झणें स्थापिल्या अमरावती । तूं तो पामर अल्पमति । केंवि विपत्ति निस्तरसी ॥१७॥
ऐसा देवर्षिगणां सहित । देवमातरीं अमरनाथ । बोधितां झाला विषादरहित । सावध स्वस्थ हरिभजनीं ॥१८॥
इंद्रें प्रेरितां अमरगण । दुंदुभिघोषें भरलें गगन । छत्रें चामरें आतपत्राण । सूर्यकिरण लाजविती ॥१९॥
विचित्रवाजंत्रांच्या ध्वनि । गंधर्व गाती तानमानीं । अप्सरांच्या सुनर्तनीं । ताल धरिती किन्नरी ॥३२०॥
सांडूनियां पूर्वबळि । सिद्धार्थ विखरूनियां स्थळीं । दिव्यदीपांच्या बंबाळीं । अंशुमाळी तटस्थ ॥२१॥
नवरत्नांच्या रंगवल्ली । सर्वतोभद्रें स्वस्तिकें वेली । सरस्वतीच्या करकौशल्यीं । विविधें रेखिलीं सर्वत्र ॥२२॥
सुस्नात आणि शुचिमंत । सुरगुरूशीं अमरनाथ । संभार अवलोकुनी समस्त । मूळमंत्रें प्रोक्षिलें ॥२३॥
गुरुत्रयातें अभिवंदून । गणपति भैरव संस्थापून । द्वारदेवता संमानून । अभिषेचन आदरिलें ॥२४॥
दिव्यकिलशामृतपूर्ण । समयीं देता झाला वरुण । वामभागीं संक्रंदन । स्थापिता झाला साधार ॥३२५॥
दक्षिणभागीं पूजापात्रें । संस्थापिलीं यथासूत्रें । पृष्ठभागीं सकृन्मात्रें । करक्षालना स्थापिलें ॥२६॥
मुकुर चामर छत्र व्यजनें । रत्नादि विविध नीरांजनें । अनेक सुमंगळ विविधभाजनें । दिग्विभागीं स्थापिलीं ॥२७॥
पृष्ठ आणि पार्श्व दोन्ही । हे सिंहासनाचे विभाग तीन्ही । तेथ द्रव्यांची आसदनी । ते सज्जनीं परिसिजे ॥२८॥
हेमरत्नांचे षोडशकुंभ । यथोक्तद्रव्यें भरूनि शुभ । बिल्वफळेंशीं दिव्यप्रभ । पृष्ठीं स्वयंभ स्थापिले ॥२९॥
षोडशमृत्तिका दक्षिणपार्श्वीं । पंचगव्यें उत्तरपार्श्वीं । या मागेंचि पृथग्द्रव्यीं । द्वितीय पंक्ति मांडिल्या ॥३३०॥
सर्वौषधि सर्व फळें । सर्व बीजें सर्व दळें । सर्व पल्लव पुष्पें कमळें । अनुक्रममाळे स्थापिलीं ॥३१॥
भेरी मृदंग पणव शंख । ढक्का पटह तौर्यत्रिक । तंत वितंत कांसोळिक । बिरुदें घोष निगमाचे ॥३२॥
महर्षिप्रमुख सन्निधानीं । स्वस्तिवाचन सन्मानूनीं । शांतिपाठ आशीर्वचनीं । अक्षता मूर्ध्नी टाकिती ॥३३॥
न्यासविधि सारूनि श्रेष्ठ । आधारादि पूजिनि पीठ । श्रीकृष्ण करूनि उपविष्ट । पादपूजा आदरिली ॥३४॥
औटकोटितीर्थजळीं । पूर्णकलश अंशुमाळी । स्वकरें वोती इंद्र क्षाळी । पदपल्लव कृष्णाचे ॥३३५॥
चंद्रें धौत श्वेत वसन । अर्पितां इंद्रें पुसिले चरण । हृदयीं नयनीं मुकुटीं धरून । संस्थापिले आसनीं ॥३६॥
श्वेतगंध रत्नपात्रीं । सादर अर्पणीं धरित्री । इंद्र श्रीकृष्णचरणावरी । लेपन करी जयघोषें ॥३७॥
परिमळद्रव्यें अश्विनीकुमार । समर्पिती बहुप्रकार । चरणांवरी उधळितां शक्र । सुगंधधूसर नभ जालें ॥३८॥
गगनें आणिलीं अनेक सुमनें । वसंतें अर्पिलीं सादरपणें । श्रीकृष्णचरणीं संक्रंदनें । सूक्तपठनें अर्पिलीं ॥३९॥
बिल्वपत्रें तुळसीदळें । विविध रत्नें मुक्ताफळें । त्वष्ट्टनिर्मितें सोज्वळें । वांकी वाळे नूपुरें ॥३४०॥
पादांगुळिये चरणकमळीं । तोडरादि बिरुदावळि । अहंदशांगधूप जाळी । नाहं उजळी चित्प्रभा ॥४१॥
नैवेद्यपात्रें षड्रसपूर्णें । आणूनि प्रविष्ट केलीं वरुणें । शक्रें प्राणावदानपठनें । कृष्णचरणीं अर्पिलीं ॥४२॥
कल्पद्रुमें आणिलीं फळें । चंद्रें तांबूल त्रयोदशमेळें । निधि दक्षिणे उदीचीपाळें । प्रविष्ट केले हरिचरणीं ॥४३॥
इंद्रें अर्पूनि हें समस्त । नीराजनीं सावचित । चिद्रत्नदीप मंगलभरित । नीराजित जयघोषें ॥४४॥
महर्षिविशुद्धमानसकमळीं । अनर्घ्यरत्नीं मुक्ताफळीं । भरूनि पूर्णपुष्पांजलि । हरिपदयुगळीं अर्पिती ॥३४५॥
दुंदुभिवाजंत्रांचे गजर । वैताळिकांए वीर्योच्चार । महर्षींचे मंत्रस्वर । जयजयकार अमरांचे ॥४६॥
एवं पुष्पांजळि अर्पण । करूनि केलें प्रदक्षिण । स्तुतिस्तवन क्षमापन । अभिवादनपूर्वक ॥४७॥
पादपूजनानंतर । षोडशमृत्तिकासंस्कार । पट्टाभिषेकीं प्रशस्ततर । ते निगमानुसार आदरिले ॥४८॥
पर्वताग्रमृत्तिका मेरु । घेऊनि अर्पणीं सादरु । कृष्णमस्तकीं अमरगुरु । करी संस्कारु तद्योगें ॥४९॥
बल्मीकमृत्तिका शेष अर्पी । कृष्णाकरणीं सुरगुरु लेपी विष्णु वैकुंठभुवनींची वोपी । गुरु विलेपी हरिवदनीं ॥३५०॥
शक्रें स्वभुवनींचीं वसुमती । समर्पिली गुरूचे हातीं । तेणें श्रीकृष्णकंठाप्रति । यथानिगुती चर्चिली ॥५१॥
पारमेष्ठ्यराज्यांगनींची । मृत्तिका कृष्णा हृदयीं चर्ची । तैसीच ऐरावतदंतींची । दक्षिणभुजीं लेपिली ॥५२॥
यज्ञवाराहदंतोद्धृता । वामभुजीं चर्चिली त्वरिता । मानसादिसरोवरभूता । पृष्ठीभागीं लेपिली ॥५३॥
प्रयागादि सांगमी मृदा । उदरीं चर्चिली श्रीमुकुंदा । अमरतटिनीउभयतटदा । उभयपार्श्वी लेपिली ॥५४॥
अप्सरांगणभवा माती । रंभा अर्पी गुरूच्या हातीं । कृष्णचरणीं आणि हस्तीं । वाचस्पती विलेपी ॥२५५॥
पोरोवसागरींचा जळेश्वरु । वोपितां सर्वांगीं चर्ची गुरु । पश्चिम सागरजा सत्वर । पश्चिमांगीं चर्चिली ॥५६॥
दक्षिणोत्तर उदधिभवा । उभयपार्श्वीं श्रीकेशवा । अर्पिली आणि मखसंभवा । विलेपिली सर्वांगीं ॥५७॥
पंचगव्यें आसादिलीं । कामधेनूनें तियें अर्पिलीं । तिहीं करूनि अभिषेचिली । मूर्ति सांवळी कृष्णाची ॥५८॥
पद्मगर्भींचें हंसोदक । चकोरनेत्रज कुमुदोदक । सोमकांतींचें चंद्रोदक । वर्षोश्मोदक चतुर्थ ॥५९॥
नागलोकींचें भोगामृत । दिव्यक्षीराब्धिमथनोद्भूत । सोमबिंबींचें सोमामृत । परमामृत कृपेचें ॥२६०॥
घ्रुत दुग्ध दधि माहेय । इत्यादि गव्य चतुष्टय । माहेय तें म्हणसी काय । तरी गोश्रृंगतोय सपुच्छ ॥६१॥
पुष्परस पंकजरस । कदलीगर्भज कर्पूररस । मलयजादि सौरभ्यरस । एवं षोडश घट पूर्ण ॥६२॥
एक उदक एक रस । एक गव्य एक पीयूष । चौघे चौघे चारी चारी कलश । चहूंकडूनि सेचिती ॥६३॥
सनकादि चौघे ऊर्ध्वरेते । धरूनि चारी कुंभ हातें । पूर्वेकडूनि श्रीकृष्णातें । अभिषेचिती सुमंत्रीं ॥६४॥
पुलस्त्य पुलह वशिष्ठ अत्रि । दक्षिणभागीं कृष्णगात्रीं । अभिषेचिती मगळमंत्रीं । यथासूत्रीं विध्युक्त ॥३६५॥
कश्यप भरद्वाज अंगिरा भृगु । श्रीकृष्णाचा पश्चिमभाग । दिव्यकलशीं यथासांग । अभिषेचिती शुभसूक्तीं ॥६६॥
विश्वामित्र जगदग्नि क्रतु । गौतम प्रमुख चौघे समर्थ । उत्तरभागीं आनंदभरित । अभिषेचिती कृष्णातें ॥६७॥
लोकालोकींचे लोकपाळ । सुदामा हिरण्यरोमा जे सुशील । शंखपा केतुमान् निर्मल । हरिप्रेम सर्वस्वें ॥६८॥
कर्दममुनीचे नंदन । हे चौंभागीं चौघे जन । कनक रत्नें धान्यें करून । कंजीं भगवान सेचिती ॥६९॥
मंदार नाहाणी सर्वां दळीं । कल्पद्रुम सर्वां फळीं । हरिचंदन पल्लवमेळीं । पुष्पीं सकळीं पारिजत ॥३७०॥
संतान अर्पी सर्वबीजां । त्यानंतरें अधोक्षजा । अभ्यंग देती मुनीच्या भाजा । साध्वी विरजा सुरसरिता ॥७१॥
कस्तूर्यादि उद्वर्तन । करूनि मलापकर्षण । पंचामृतीं दिधलें स्नान । सूक्तपठनपूर्वक ॥७२॥
गंगा यमुना सरस्वती । पुण्यसरितांचिया मूर्ति । शुद्धोदकीं अभिषेचिती । सूक्तें पढती मुनिवर्य ॥७३॥
शक्र बृहस्पति आपण । करिती अंगप्रक्षाळण । कामधेनु स्वपयें स्नपन । करवी विधानपूर्वक ॥७४॥
आकाशगंगासंभव अंभ । भरूनि हेमरत्नांचे कुंभ । स्वकरें धरूनि सुरेंद्रइभ । पद्मनाभ अभिषेची ॥३७५॥
हेमरत्नीं कनकाभिषेक । पुष्पाभिषेक अमृताभिषेक । सारूनि बलिदानें अनेक । विविध द्रव्यें सांडिलीं ॥७६॥
नीराजनीं वाचस्पति । सहित समस्त मुनिवरपंक्ति । अक्षवणें पुरंध्री करिती । महासती पतिव्रता ॥७७॥
पुष्पांजलि समर्पणीं । रत्नपादुका अर्पी धरनि । इंद्रें लेववूनि त्या चरणीं । अंगमार्जनीं सादर ॥७८॥
क्षीरसागरें क्षीरोदक । अर्पूनि फेडिलें आर्द्रांशुक । पूजूनि सिंहासन सम्यक । प्रतिष्ठासूक्तीं प्रतिष्ठिलें ॥७९॥
प्रतिष्ठासूक्तीं वाद्यगजरीं । सुरवरांच्या जयजयकारीं । सुमुहूर्तीं श्रीमुरारि । सिंहासनीं बैसविला ॥३८०॥
अमृतवृष्टि कनकवृष्टि । पुष्पवृष्टि रात्नवृष्टि । सुरवर वर्षोनि पाहती दृष्टी । सुखसंतुशःटी हरिवदन ॥८१॥
अखिलब्रह्मांडपरिपालन । करावयासि सुरसंपूर्ण । कृष्णासि करिती पदाभिषेचन । तेणें त्रिभुवन संतुष्ट ॥८२॥
देऊनि मधुपर्क शुद्धचमन । अग्निधौत पीतवसन । द्वितीय करवुनी प्रावरण । पुन्हा आचमन अर्पिलें ॥८३॥
मग अर्पिलें ब्रह्मसूत्र । न मनूनि अनुपनीत नंदपुत्र । जाणोनि कमलामंगलसूत्र । सर्वोपचार अर्पिती ॥८४॥
आब्रह्मसूचनासूत्रात्मक । चाळक जो कां यदुनायक । ब्रह्मसूत्रार्पणें त्या उदक । देती सम्यक आचमना ॥३८५॥
मुकुटकुंडलें वनमाळा । दिव्य मुद्रिका दशांगुळां । वीरकंकणें कटिमेखळा । केयूरांगदें लेवविलीं ॥८६॥
कंठीं मिरवे कौस्तुभमणि । ज्याचे उपमे भासुर तरनि । श्रीवत्स मिरवे हृदयस्थानीं । कल्याणखाणी द्विजवरद ॥८७॥
इत्यादि अर्पूनि विचित्राभरणां । विश्वकर्म्यानें केलें नमना । कृष्णा देऊनियां आचमना । दिव्य लेपना अर्पिती ॥८८॥
जी सौरभ्यगंधवती । होऊनि वसंता धवळी क्षिति । दिव्य अनुलेपनें श्रीपति । तिलक रेखिती गुरुशक्र ॥८९॥
अक्षता लावूनि माणिक्यरंगीं । दिव्य चंदन लेपिला आंगीं । वैधात्रवनोद्भवादि वेगीं । आलीं प्रसंगीं प्रसूनें ॥३९०॥
इंद्रें कृष्णासि समर्पिलीं । मुकुटीं कंठीं तुरंबिलीं । आपादमाळा विराजली । विविधांफुलीं अवतंस ॥९१॥
सुगंध द्रव्यें शेषभोग्यें । देवां दुर्लभ न्यूनभाग्यें । त्यांतही उत्तम कृष्णयोगें । देखती भाग्यें नासत्य ॥९२॥
इंद्र उधळितां कृष्णावरी । सुगंध भरिला गगनोदरीं । तो अद्यापि सेविजे भ्रमरीं । भ्रमतां अंबरीं अवसंतीं ॥९३॥
क्षीरसागरें वैजयंती । आपाद अर्पिली कृष्णाप्रति । जिच्या प्रकाशें शशीची कांति । म्लान भासती सकळंक ॥९४॥
मणिग्रीव नलकूबर । उभय भागीं चामरधर । अमृतस्रावी चंद्राकार । छत्रधारक जयंत ॥३९५॥
दिव्यौषधींचा निर्यास । वैष्णव दशांग धूपित वास । एकारती श्रीवर्चस । दिव्य पोतास उजळिलें ॥९६॥
विविध रत्नांच्या भाजनीं । अष्टधा पृथक् नीराजनीं । महर्षींच्या सुवासिनी । नीरांजिती कृष्णातें ॥९७॥
देऊनि कृष्णासि आचमन । सौमनस्य सावधान । श्रीकृष्णासि दिधला क्षण । उपवेशनपूर्वक ॥९८॥
मंडपद्वारासि जवनिक । घालूनि वारिले सकळिक । महर्षींचा मंत्रघोक । तोही नावेक थांबविला ॥९९॥
अखंड दंडायमान ध्वनि । दिव्य दुंदुभि गाजतां गगनीं । इंद्रें भ्रूसंकेतें करूनी । त्या ते क्षणीं राहविल्या ॥४००॥
ऐसा निहूळ निश्चळ । श्रीकृष्णाचा नैवेद्यकाळ । बाहेर सनकादि मंजुळ । नामें स्मरती ते काळीं ॥१॥
मांडूनि दिव्य कनकपात्र । उत्तम दिव्यान्नें पवित्र । अन्नपूर्णा यथासूत्र । विपुलहस्तें परिवेषी ॥२॥
लक्ष्मी अमृतकलश पूर्ण । आणूनि करी कृष्णार्पण । विविधरसपात्रें भरून । पाकशासन समर्पीं ॥३॥
अदिति घाली आपोषणा । चित्रशिखंडी मंत्रपठना । कृष्णें करूनियां आचमना । मग भोजना आदरिलें ॥४॥
धरा इंदिरा उभयभागीं । रत्नदंडीं विचित्ररंगीं । कृष्णा वीजिती तत्प्रसंगीं । उभय चामरें घेऊनी ॥४०५॥
कृष्णासि रुचे सप्रेम गोडी । अन्नपूर्णा ते पदार्थ वाढी । पावक पक्कान्नपरवडी । लवडसवडी विस्तारी ॥६॥
धन्वंतरि स्वाद रुचवी । अनुक्रमें पदार्थ सुचवी । कृष्ण जाणे सप्रेम चवी । विविध चोजवी कौशल्यें ॥७॥
मध्यें मध्यें अमृतपान । स्वादु सुगंध शीतल वन । शेवटीं दध्योदनपावन । उत्तरापोषण अर्पिलें ॥८॥
पाचरत्नाचें गंडूषपात्र । वरी झल्लरी जाळंधर । त्यामाजि प्रक्षाळी मुखकर । अर्पी नीर दुश्च्यवन ॥९॥
मुखकरपदशोधनावास । सुरेज्य अर्पी शशिप्रकाश । करोद्वर्तनसौरभ्यास । अश्विनीकुमार अर्पिती ॥४१०॥
कल्पतरूचीं अमोघ फळें । अनुभवस्वादिष्ठ रसाळबहळें । अनेक परीचीं एके वेळे । आखंडलें समर्पिलीं ॥११॥
तांबूल अर्पी ओषधिनाथ । तदुचित त्रयोदशद्रव्यान्वित । कुबेर जाणोनि भ्रूसंकेत । समर्पित दक्षिणा ॥१२॥
मुकुंदकुंदनीलनाम । शंख मकर आणि कूर्म । अनंतपद्म महापद्म । पूर्ण हेमनवनिधि ॥१३॥
ललामांचे रत्नाकर । दक्षिणे अर्पी पुरंदर । उत्तरपूजनीं अलंकार । त्वष्टानिर्मित अर्पिले ॥१४॥
दिव्य पांचही राजवसनें । समर्पिलीं सहस्रनयनें । ज्यांचे प्रभेचें चंडकिरणें । तेज मिरवणें ब्रह्मांडीं ॥४१५॥
मेरुप्रदत्त सिंहासनीं । शेषतूळिका मृदु आस्तरणीं । अनेक सुमनांचिया श्रेणी । शय्या झांकूनि कौशल्यें ॥१६॥
पूर्वपूजेचीं उपकरणें । विसर्जूनि संक्रंदनें । सिद्ध करूनि नीरांजनें । विसर्जिलें जवनिक ॥१७॥
सिंहासनीं आरोहण । करिता झाला मधुसूदन । वाद्यघोषें भरलें गगन । बळि संपूर्ण सांडिल्या ॥१८॥
रत्नखचित अभेद्यवर्मा । अवेग लेववी विश्वकर्मा । क्षीरसागरें अम्लानपद्मा । हस्तपद्मीं अर्पिलें ॥१९॥
अक्षय अमोघ सतूणबाण । शार्ङ्गधनुष्य समीरण । अर्पूनि वंदी श्रीकृष्णचरण । राहे येऊन पार्षदीं ॥४२०॥
शंकरें समर्पिला शूळ । विष्णुसहस्रार तेजाळ । दिव्यशक्ति वोपी अनळ । अमरपाळ निजवज्र ॥२१॥
शमनें स्वदंड अर्पिला । वरुणें पाश समर्पिला । कमंडलु आणि अक्षमाळा । ब्रह्मदेवें निवेदिली ॥२२॥
स्वप्रभेहुनी देदीप्यमान । सूर्यें उभविलें वितान । स्वयें धरून आतपत्राण । पार्षदगणीं ठाकला ॥२३॥
रत्नखचितमुष्टिभाग । कोश विचित्र अतिसुरंग । श्रीकृष्णा तो नंदक खङ्ग । कृतांत अर्पी स्वहस्तें ॥२४॥
अमृतस्रावी अभेद्यचर्म । जें परिजतां परिहरी श्रम । काळें अर्पूनि पुरुषोत्तम । नमस्कारिला सप्रेमें ॥४२५॥
वरुणें अर्पिला पांचजन्य । जो निजघोषें लोपवी घन । दैत्यवनितांचे गर्भ पूर्ण । ज्याच्या घोषें खचताती ॥२६॥
कुबेरें अर्पिली कौमोदकी । जे चित्रिली कनकोदकीं । शत्रुमर्दनीं सुदृढ निकी । देखतां धडकी अरिवर्गा ॥२७॥
जवनशील गगनपंथें । वाढों नेदिती खगपतीतें । सहस्र अश्व नैरृतीनाथें । श्रीकृष्णातें अर्पिले ॥२८॥
तैशींच सर्वीं सनामास्त्रें । कृष्णा अर्पिलीं रहस्यसूत्रें । रथ सन्नद्ध पवनमित्रें । सशस्त्रास्त्रें अर्पिला ॥२९॥
चंद्रें छत्रें चंद्राकार । कनकस्रावी मनोहर । कृष्णासि अर्पिलीं सहस्र । सालंकार दूतेंशीं ॥४३०॥
कामधेनूनें लक्षधेनु । कामदुघा ज्या स्वतुल्य सगुण । वंदूनियां श्रीकृष्णचरण । सालंकृता समर्पिल्या ॥३१॥
शिबिरें वितानें वस्त्रें दुर्गें । महदास्तरणें विविधरंगें । सोपस्करणें सदूत सांगें । वरुणें सवेगें अर्पिलीं ॥३२॥
हेमरत्नांचीं शिबिकायानें । सदूत सालंकृत सवितानें । कृष्णा समर्पिलीं वैश्रवणें । विनीतपणें प्रार्थूनी ॥३३॥
कश्यपें दिधला गरुडध्वज । विजयप्रकाशें तेजःपुंज । अमरनाथें सहस्रगज । जे गजराज लाजविती ॥३४॥
सूर्यें सहस्र श्यामकर्ण । सप्तमुखाहुनी जे जवन । रत्नाभरणीं सपल्याण । केले अर्पण दूतेंशीं ॥४३५॥
रत्नें भरूनि हिमाचल । सहस्र आणूनियां क्रमेळ । यावेगळे पदार्थ बहळ । अर्पी केवळ कृष्णातें ॥३६॥
मणिमय मुरली रत्नवेणु । बर्हिबर्ह वज्रविषाण । कवळयष्टि कंबल कृष्ण । प्रिय म्हणोन हरि अर्पी ॥३७॥
विचित्र धातूंचे अंगराग । गुंजावतंस अतिसुरंग । तरुप्रवाळ सुमनें सुभग । गिरि हिमांग समर्पी ॥३८॥
ऐशा अनेक पदार्थश्रेणी । कृष्णा अर्पिल्या निर्जरगणीं । अवघे जयशब्दें गर्जोनी । लागती चरणीं कृष्णाच्या ॥३९॥
तेतीस देवताकुळें मोठीं । यालागीं म्हणिजे तेतीस कोटि । दशप्रयुतीं गणनागोठी । हे वृथा चावटी अबळांची ॥४४०॥
दिव्यैकादश मध्यैकादश । अप्सु क्षितौ महिनैकादश । एवं अवघे देव त्रिदश । कोटि तेतीस या नांव ॥४१॥
एवं सर्वीं आपुलालीं । कृष्णा ऐश्वर्यें समर्पिलीं । चरणसेवा संप्रार्थिली । विनयभावें बहुयत्नीं ॥४२॥
सहस्र सहस्र नमस्कार । घालूनि म्हणविती किंकर । अष्टवसु वेत्रधार । सेवेसि जुहार निवेदिती ॥४३॥
एवं ब्रह्मांड संपूर्ण । कृष्णचरणा अभिवंदून । निजवोळगें सावधान । आज्ञा वंदून कृष्णाची ॥४४॥
समस्त स्वर्गाचा अभिवेत्ता । जाणोनि निर्जरीं तत्त्वता । गोविंद या नामसंकेता । मुनिसंमतें स्थापिलें ॥४४५॥
धेनुगोप्ता धरणिगोप्ता । करणगोप्ता किरणगोप्ता । वेदगोप्ता वेधागोप्ता । वाङ्मयगोप्ता गोविंद ॥४६॥
एवं अखिलब्रह्मांडगोप्ता । गोइंद्र गोविंद तत्त्वता । दृप्तां मारक बोधक सुप्तां । निववी तप्तां निजनामें ॥४७॥
ऐसा नामनिर्देश सुरीं । करूनि त्रहाटिल्या दिग्गजभेरी । दुंदुभिवाजंत्रांच्या गजरीं । चित्सुखलहरी जग भोगी ॥४८॥
औटकोटितीर्थोदक । स्वकरें आणी ग्रहनायक । महर्षींचा मंत्रघोक । पदजल सम्यक कृष्णाचें ॥४९॥
कामधेनूचें पयसेचन । पवित्र आकाशगंगाजीवन । ऐरावतीनें शुंडेकरून । केलें स्नपन कृष्णातें ॥४५०॥
ते अद्यापि गोवर्धनीं । मानसीगंगा या अभिधानीं । तेथींच्या स्नानें पानें जनीं । कैवल्यभुवनीं समरसिजे ॥५१॥
तें सर्वांतें श्रीकृष्णतीर्थ । देता झाला अमरनाथ । कृष्णाज्ञेनें यथोचित । सुर समस्त पूजिले ॥५२॥
कृष्णकृष्णेति कृष्णेति । जे मज ऐसें नित्यशः स्मरती । नरकापासूनि तयांप्रति । मी श्रीपति उद्धर्ता ॥५३॥
ब्रह्मांडाचा अभ्युदय । अवघें कृष्णावतारकार्य । देऊनि सर्वां ऊर्जित अभय । त्रिजगीं विजय प्रकटिला ॥५४॥
विध्युक्त पूजूनि स्यंदन । विविधबळि समर्पून । कृष्णें केलें आरोहण । जाले सुरगण सन्नद्ध ॥४५५॥
मंडपाबाहीर पूर्वद्वारीं । मुहूर्तें निघतां कैटभारि । पूर्णकलश घेऊनि शिरीं । आल्या पुरंघ्री शकुनार्थ ॥५६॥
विप्रकन्या सवत्सधेनु । सुस्नात सालंकृत द्विजगण । अक्षताकुशपुष्पें घेऊन । स्वस्तिवाचन पढताती ॥५७॥
उद्धृतदधिपयघृतभाजनें । संमुख दर्पणनिदर्शनें । अप्सरांचीं सुनर्तनें । मंगलगायनपूर्वक ॥५८॥
वाजंतांचा मंगल ध्वनि । घाव घातला निशाणीं । स्वस्वभागीं सुरवरगणीं । सेना सज्जूनि आणिल्या ॥५९॥
अग्रभागीं सुरनायक । वरुण पार्ष्णिसंरक्षक । दक्षिणपक्षीं भूतांतक । चाले कृतांत ससैन्य ॥४६०॥
उत्तरपक्षीं अलकापति । सहितस्वसैन्यसंपत्ति । गदामुद्गरशूलशक्ति । वीर गर्जती सावेग ॥६१॥
सुरेंद्राए दक्षिणभागीं । मेषवाहन चतुःश्रॄंगी । स्वसेनेशीं कवची खङ्गी । सिद्ध होऊनि चालिला ॥६२॥
निरृति घेऊनि राक्षसदळ । दिग्विभागें आपुलें स्थळ । रक्षूनि चाले पैं निश्चळ । प्रभुगोपाळ लक्षूनी ॥६३॥
वायव्यकोणीं जवनशील । कुरंगवर्णी तुरंग बहळ । महाविशाळ अनिळदळ । सायुध चपळ चौताळे ॥६४॥
ईशान्यकोणीं ईश्वरसेना । घेऊनि समस्त पिशाचगणा । करिती भयानक गर्जना । शौर्यें कृष्णा सुचविती ॥४६५॥
छत्रें पल्लवध्वजनिशाणें । आतपत्राणें सूर्यपर्णें । रत्नदंडी कुंचे व्यजनें । ढळतां किरणें तळपती ॥६६॥
दाशार्ह म्हणिजे भक्तपति । गोविंदनामाची व्युत्पत्ति । अमरीं विविध केल्या स्तुति । भाट गर्जती जयघोषें ॥६७॥
सेनावलयविराजित । सरथ सायुध रमाकांत । गोवर्धनाद्रिदक्षिणावर्त । परिक्रमित चालिला ॥६८॥
दिग्गजमाथां विशाल भेरी । ठोकितां सर्वत्र निरंतरीं । नादें ब्रह्मांडाभीतरी । स्वानंदलहरी उसळती ॥६९॥
ऐसी करूनि प्रदक्षिणा । येते झाले पूर्वस्थाना । पुन्हा सुरवर सांडूनि याना । श्रीकृष्णचरणा वंदिती ॥४७०॥
यथाशक्ति यथामति । बद्धांजलि करिती स्तुति । चित्ररथादि तुंबुरप्रभृति । सुस्वर गाती गंधर्व ॥७१॥

तत्रागतास्तुंबुरुनारदादयो गंधर्वविद्याधरसिद्धचारणाः ।
जगुर्यशो लोकमलापहं हरेः सुरांगनाः संन्ननृतुर्मुदान्विताः ॥२४॥

वरिष्ठ देवर्षि वैष्णव । नारदमुनि हें त्याचें नांव । नारद तुंबुरु हे गंधर्व । गायक अपूर्व सुरमान्य ॥७२॥
हाहाहूहूपर्वतप्रमुख । कुशल बृहत्सामगायक । रंगीं औडव खांडवप्रमुख । स्वरकौतुकलास्यादि ॥७३॥
तेथ आले जे विद्याधर । चारण गुह्यक सिद्ध किन्नर । किंपुरुषसाध्य पुरःसर । रंगीं श्रीधर तोषविती ॥७४॥
श्रीहरीचीं अमल चरितें । जी श्रवणें पठनें हरिती दुरितें । स्मरणमात्रें करिती सरतें । परिचर्येतें हरिचरणीं ॥४७५॥
ऐसी लोकमलापहंतीं । यशें हरीचीं हरिजन गाती । सुरवनितांच्या अनेक पंक्ति । नृत्यें करिती अमराग्रीं ॥७६॥
प्रम्लोचना नाम अप्सरा । स्वगणें सहित पुरंदरा । रंगीं रंजवी परमचतुरा । तानमानीं नर्तनीं ॥७७॥
अग्निमंडळीं अनुम्लोचा । नृत्या शंकित उर्वशी जीच्या । स्वगणें सहित उच्चावता । दावी नृत्याच्या कौशल्या ॥७८॥
यम अर्यमा चित्रगुप्त । स्वयूथेंशीं पुंजिकानृत्य । पहातां नतनाट्यें विस्मित । रंगीं तटस्थ त्यां केलें ॥७९॥
विश्वाचीं नामें वराप्सरा । स्वगणें सहित नर्तनपरा । निरृति चमूमाजि चतुरा । वर्ष्मविकारा दर्शवी ॥४८०॥
क्रतुस्थला स्वगणें सहित । वरुणापुढें करी नृत्य । चमूसहित प्रतीचीनाथ । रंजवीत वरलास्यें ॥८१॥
पवनवाहिनीमंडळाआंत । पूर्वचिती स्वगणें सहित । हावभाव कटाक्षयुक्त । रंगीं संगीत वोढवी ॥८२॥
कुबेरचक्रीं तिलोत्तमा । स्वर्गांगनांमाजि उत्तमा । गीतनर्तनीं निरसी श्रमा । कांति हेमासम जीची ॥८३॥
नामें अप्सरा जे मोहिनी । स्वसमुदायें परिवारूनी । ईशान रंजवी नर्तनीं । हरिगुणकथनीं कोविदां ॥८४॥
रंभा घृताची उर्वशी । मंजुघोषा आणि सुकेशी । सुरसा तरसा कंदर्पशशी । रंगीं कृष्णासी रंजविती ॥४८५॥
एवं अप्सरासुनर्तनें । नारदादिसामगानें । वैष्णवांचीं हरिकीर्तनें । नामस्मरणें सर्वत्र ॥८६॥

तं तुष्टुवुर्देवनिकायकेतवो व्यवाकिरंश्चाद्भुतपुष्पवृष्टिभिः ।
लोकाः परां निर्वृतिमाप्नुवंस्त्रयो गावस्तदा गामनयन् पयोद्रुताम् ॥२५॥

कृष्णाभिषेचनें समस्त । त्रिलोकी परमानंदभरित । गोविंदनामामृतें तृप्त । त्रितापरहित सुख भोगी ॥८७॥
आनंदसमृद्धिलक्षणें । तिहीं श्लोकीं बारदायणें । कथिलीं परीक्षितीकारणें । सावधमनें तें ऐका ॥८८॥
कृष्णाभिषेक पहावया नयनीं । गगनीं दाटल्या विमानश्रेणी । त्यामाजि श्रेष्ठ जे देवतागणीं । चक्रपाणि ते स्तविती ॥८९॥
निकाय म्हणिजे सुरसमुदाय । त्यांमाजि श्रेष्ठ जे ध्वजप्राय । सहस्र सेनेंत दृश्य होय । केतुन्यायें टळटळित ॥४९०॥
तैसें विमानीं मुख्य मुख्य । पाहोनि कृष्णाभिषेकें कौतुक । अंतरीं दाटलें चित्सुख । स्तविती उत्सुक कृष्णातें ॥९१॥
स्वदेसर्वांगीं पाझरे । नेत्रीं आनंदबाष्प झरे । पुलकरोमांचित शरीरें । सप्रेमभरें कांपती ॥९२॥
शब्द विरोनि गेला वदनीं । सद्गदित कंथस्थानीं । स्वर नुमटती श्वास मूर्ध्नीं - । माजीं रिघोनि कोंदला ॥९३॥
ते जिरविली सत्वावस्था । कृष्णस्वरूपीं जडली आस्था । यालागीं सावध करूनि चित्ता । पाहती तत्त्वता हरिवदन ॥९४॥
आपुलाल्या पुष्पयानीं । बद्धांजलि ठेवूनि मूर्ध्नी । श्रीकृष्णातें स्तविती वदनीं । सरळा वाणी सुरवर्य ॥४९५॥
जयजय पुराणपुरुषोत्तमा । कमलामानसविश्रमधामा । जयजय अचिम्त्यगुणगणग्रामा । जय जगदात्मा जगदीशा ॥९६॥
मन्मथमारकमानससदना । ललनामानसवेधकवदना । शशिकरभंगुरसस्मितरदना । भवगजकदना कलुषारि ॥९७॥
जय जय कलिमळपरिहारका । पदजळपूता जडतारका । निजजनविपक्षसंहारका । रक्षीं नरका पासाव ॥९८॥
ऐशा समस्तसुरवरगणीं । श्रीकृष्णाचे गुणवर्णनीं । प्रेमें ग्रथिल्या सुललित वाणी । अमोघ सुमनीं वर्षती ॥९९॥
नंदनवनीं चैत्रवनीं । मधुकाननीं वारुणवनीं । पिंगलवनीं गुह्यकवनीं । संभव सुमनीं वर्षती ॥५००॥
बिंदुसारसमानसभवें । माध्वीमाधववनसंभवें । ज्यांच्या सुवाएसं विखनसभवें । भ्रमरभावें वेधिजे ॥१॥
उमाविलासविश्रामवन । कमलाकंदर्पकानन । ब्रह्मयाचें वैधातृवन । वर्षती तद्गण तत्सुमनीं ॥२॥
ऐशा अद्भु सुमनवृष्टि । केल्या अमरीं श्रेष्ठश्रेष्ठीं । असंख्य कामधेनूंच्या थाटी । पयें भूपृष्ठीं भिजविली ॥३॥
सहित व्रजींच्या समस्त धेनु । प्रेमें द्रवल्या आनंदोन । मोकळे चार्‍ही स्रवती स्तन । भूति भिजोन पय वाहे ॥४॥
वृष्टिभरें वाहतां जळ । सरिता लोटती तुंबळ । तैसे दुग्धाचे कल्लोळ । वाहती केवळ भूपृष्ठीं ॥५०५॥
आपुला इंद्र झाला कृष्ण । जाणोनि संतुष्ट गोगण । परमानंदें द्रवला पूर्ण । तें व्याख्यान हें केलें ॥६॥
धरादेवी गोरूपिणी । आपुला इम्द्र चक्रपाणि । जाणोनि तोषली अंतःकरणीं । पदार्थश्रेणी प्रसवली ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP