प्रलंबं घातयित्वोग्रं बलेन बलशालिना । अमोचयद् व्रजपशून् गोपांश्चारण्यवह्नितः ॥११॥

प्रलंबनामा दैत्य कपटी । नटला संवगडियांचे नटीं । रामकृष्णांच्या हननासाठीं । हांव पोटीं धरूनी ॥१००॥
द्वंद्वशः वांटूनि घेतां गडी । प्रलंबबळरामेंशीं जोडी । रामें डाव जिंकोनि प्रौढी । घेतली चढी त्या पृष्ठीं ॥१॥
भांडीरवटाची लंघूनि सीमा । दैत्य घेऊनि चालिला व्योमा । कृष्णें चेतवूनी बळरामा । अंतकधामा पाठविला ॥२॥
बळरामाचा मुष्टिप्रहार । विद्युत्पतनाहूनि क्रूर । लागतां दैत्याचें शरीर । झालें शरीर शतचूर्ण ॥३॥
रामहस्तें प्रलंबहनन । कृष्ण करवी लीलेंकरोन । अद्भुत कर्म हें कैसें कोण । काय म्हणोन विवरावें ॥४॥
गाई गोपाळ व्रजनिवासी । दावानळें जळतां निशीं । कृष्णें प्राशन करूनि त्यासी । समस्तांसि सोडविलें ॥१०५॥
दावानळाचें करूनि पान । सगोपव्रजपशुमोक्षण । एवढें अद्भुत कर्म कोण । ईश्वरेंवीण करूं शके ॥६॥
लेंकुराचेनि हें कैसें होय । ऐसी कोणी न वदे सोय । अपर म्हणती हें केतुलें काय । महदाश्चर्य तें ऐका ॥७॥

आशीविषतमाहींद्रं दमित्वा विमदं ह्रदात् । प्रसह्योद्वास्य यमनां चक्रेऽसौ निर्विषोदकाम् ॥१२॥

विशाळ विषाचा विषधर । कालियनामा महाक्रूर । प्रतापें दमवूनि तो अहींद्र । यमुनेबाहीर काढिला ॥८॥
यमुनाह्रदीं तो विखार । चिरकाळ होता सपरिवार । त्यावरी करूनि बलात्कार । तेथूनि सत्वर दवडिला ॥९॥
विषवर्जित करूनि यमुना । सुसेव्य केली सकळजना । अद्भुतप्रताप कैसा नाना । षड्हायना बाळाचा ॥११०॥
ऐसे मिळूनि गोप समस्त । कृष्णप्रताप अत्यद्भुत । प्रशंसूनि नंदा म्हणत । कृष्ण निश्चित परमात्मा ॥११॥

दुस्त्यजश्चानुरागोऽस्मिन् सर्वेषां नो व्रजौकसाम् । नंद ते तनयेऽस्मासु तस्याप्यौत्पत्तिकः कथम् ॥१३॥

नंदा तव तनयाचे ठायीं । आम्हां व्रजौकसांचा पाहीं । प्रेमा अनावर सर्वदाही । सर्वां देहीं सर्वथा ॥१२॥
ऐकणें स्पर्शनें देखणें । चाखणें अथवा आमोद घेणें । बाह्यविषयक दृश्य गुणें । दुस्त्यज म्हणणें सवींया ॥१३॥
ऐसियाही योगवित्तम । अभ्यासुनी शमदमोपरम । सोडूनि देहाचें तादात्म्य । आत्माराम ते त्यजिती ॥१४॥
ऐसा दुस्त्यज विषयाध्यास । त्यजिती साधूनि योगाभ्यास । परी कृष्णाचा प्रेमपाश । व्रजौकसांस दुस्त्यज ॥११५॥
बाहीरूनि भरिलें जळ । उपसूनि टाकूंये केवळ । परी अंतरझरा जो प्रबळ । तो निर्जळ न करवे ॥१६॥
कृष्ण सबाह्य अभ्यंतरीं । भरूनि अनुराग उभारी । दुस्त्यज प्रेमा कृष्णावरी । त्या आवरी कै कोण ॥१७॥
आम्हां व्रजौकसांच्या ठायीं । अनावर प्रेमा कृष्णाचाही । स्वाभाविकचि कैसा कांहीं । हें कोणाही न चोजवे ॥१८॥
तस्मात्सर्वांचा श्रीकृष्ण आत्मा । ऐसा भाव गमतो आम्हां । मिथ्या दुस्त्यज सबाह्यप्रेमा । अतुलविक्रमा प्रकटी हा ॥१९॥
ऐसे अवघे मिळोनि गोप । नंदापाशीं करिती जल्प । अद्भुत देखिला जो प्रताप । पुढती पशुप तो वदती ॥१२०॥

क्क सप्तहायनो बालः क्क महाद्रिविधारणम् । ततो नो जायते शंका व्रजनाथ तवाऽऽत्मजे ॥१४॥

विस्मयामाजीं आनंदमय । होऊनि म्हणती शंकेसि ठाय । कैसा कोठूनि जाला काय । तो अभिप्राय अवधारीं ॥२१॥
कोणीकडे नंदकुमर । सातां वर्षांचा लघुतर । कोणीकडे हा गिरिवर । महाथोर प्रचंड ॥२२॥
ऐसिया गोवर्धनाचें धरणें । या योग्य नव्हे अघटितपणें । घडलें म्हणोनि आमुच्या मनें । शंका करणें यदर्थीं ॥२३॥
नंदा तवात्मजाचे विषयीं । शंका उपजे आमुचे ठायीं । कीं हा गमे क्षीराब्धिशायी । पशुपालयीं अवतरला ॥२४॥
एतद्विषयीं रहस्य गुज । कांहीं विदित असेल तुज । तें आमुचे श्रवणीं बीज । बोधूनि सहज उमजवीं ॥१२५॥

श्रूयतां मे वचो गोपा व्येतु शंका च वोऽर्भके । एनं कुमारमुद्दिश्य गर्गो मे यदुवाच ह ॥१५॥

ऐकोनि व्रजौकसांची काहणी । नंद आठवी गर्गवाणी । भावी वदला जे कृष्णकरणी । ते ते नयनीं देखतसों ॥२६॥
उपदेशरूप गर्गवचन । तदनुभ्यास कृष्णाचरण । असंभावनामळ सांडून । अंतःकरण विशुद्ध ॥२७॥
असंभावनारहित नंद । स्वलब्ध एवं परमानंद । कृष्णविषयातत्त्वावबोध । बोधनीं प्रबुद्ध तो तेणें ॥२८॥
जेणें चाखिली असे जे चवी । तो दुजयातें गोडी लावी । दधिपयकार्पासधवळिमा जेंवि । नातरी आघवी सम भासे ॥२९॥
युद्ध न देखतां जो नयनीं । परम पटुतर पलायनीं । त्याची संग्रामशौर्यवाणी । अंतःकरणीं ह्रीग्रस्त ॥१३०॥
तैसा नोहे व्रजनायक । जो कां जगज्जनकाचा जनक । तो श्रीकृष्ण म्हणवी तोक । ज्याचा सम्यक सप्रेमें ॥३१॥
तेणें गर्गोक्तिपरिशीलनें । कृष्णकर्मांचीं करितां मननें । पुढें प्रत्यक्ष देखून नयनें । असंभावने निरसिलें ॥३२॥
विगतसंशय नंदसुमति । कृष्णकर्मांच्या भविष्योक्ति । सांगे समस्त गोपांप्रति । गर्गें एकांतीं ज्या कथिल्या ॥३३॥
नंद म्हणतसे समस्त गोपां । सांडूनि शंकेच्या संकल्पा । ऐका गर्गमुनीच्या जल्पा । वदला प्रतापा कृष्णाच्या ॥३४॥
तुम्हीं ममार्भका विषयीं । सहसा शंका न कीजे कांहीं । या कुमारातें लक्षूनि पाहीं । भविष्यनवाई हे वदला ॥१३५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP