अध्याय १४ वा - श्लोक ४६ ते ५०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ततो हसन्हृषीकेशोऽभ्यवहृत्य सहार्भकैः । दर्शयंश्चर्माजगरं न्यवर्तेत वनाद् व्रजम् ॥४६॥

मग श्रीकृष्णें हास्यवदन । करूनि न प्रकटी विंदान । सारूनि गडियांसी भोजन । व्रजाभिगमन आदरिलें ॥८८॥
अघासुराचें जीर्णचर्म । वत्सपां दावूनि मेघश्याम । व्रजप्रवेशाचा संभ्रम । मुनिसत्तम कथितसे ॥८९॥

बर्हप्रसूननवधातुविचित्रितांगः प्रोद्दामवेणुदलशृंगरवत्सवाढ्यः ।
वत्सान् गूणन्ननुगगीतपवित्रकीर्तिर्गोपीदृगुत्सवदृशिः प्रविवेश गोष्ठम् ॥४७॥

मयूरबर्हांचा माथां स्तबक । प्रसूनें तुरुंबिलीं पृथगनेक । विविधधातूंचें रेखिले अंक । शोभाविषेष विचित्र ॥८९०॥
सदळ जाळी पृष्ठभागीं । गगन गर्जे वेणुशृंगीं । नादोत्सवाढ्य श्रीशाङ्गीं । नानारंगीं शोभला ॥९१॥
वत्सें मधुरोक्ति हांकित । स्वकरें पृष्ठि कुरवाळित । परमोत्साहें संबोधित । अनुग्रह करित होत्साता ॥९२॥
विष्णूभोंवते महर्षि । कीं गंधर्व इंद्रापाशीं । तैसे संवगडे श्रीकृष्णाशीं । गाती कीर्ति उत्साहें ॥९३॥
छाया जैशी रूपामागें । तैसे अनुग कृष्णासंगें । पवित्र कीर्ति तत्प्रसंगें । गाऊनि सर्वांगें निवताती ॥९४॥
नित्य नूतन कृष्णक्रीडे । पाहती अनुयायी संवगडे । ते ते कृष्णाचे पवाडे । कृष्णापुढें वर्णिती ॥८९५॥
जे कीर्तीच्या श्रवणमात्रें । पुन्हा मुकिजे संसारयात्रे । तीं तीं कृष्णाचीं चरित्रें । परम पवित्रें वर्णिती ॥९६॥
पूतना केवळ राक्षसी । विश्वासघातिनी कल्मषराशि । तेही गेली सायुज्यासी । ऋषीकेशसंस्पर्शें ॥९७॥
पादस्पर्शें शकटा मुक्ति । पतनें तृणावर्ता शांति । यमलार्जुनाची ऊर्ध्वगति । गडी वर्णिती आनंदें ॥९८॥
ऐसा अनेकपवित्रकीर्ति । अनुगीं गाइला श्रीपति । तो प्रवेशतां व्रजाप्रति । पुढें धांवती गोपिका ॥९९॥
ऐकोनि वेणुविषाणगजर । तर्णकांचे हुंकारमिश्र । श्रवणीं पडतां अतिसत्वर । प्रेमें अंतर उचंबळे ॥९००॥
सुरभिगंधें चंचरीक । कुसुमकानना सन्मुख । धांवती तैशा प्रेमोत्सुक । गोपी हरिमुख पाहती ॥१॥
एक व्रजाबाहिर जाती । एकी दारवठां उभ्या ठाती । एकी प्रांगणीं अपांगप्रांतीं । कृष्ण प्राशिती निजनेत्रीं ॥२॥
गोपीनेत्रांसि उत्साहकर । ज्याचें दर्शन मनोहर । व्रजीं ऐसा तो नंदकुमार । सवत्स सानुचर प्रवेशला ॥३॥
इतुकें कथनाचें कारण । राया ऐकें सावधान । वत्सप वत्सें झाला कृष्ण । तो आजि भिन्न निवडला ॥४॥
वत्सप वत्स होतां कृष्ण । तैं त्या स्वस्वसुतीं प्रेमा गहन । आजि निवडला असतां भिन्न । स्वजन सदन विसरल्या ॥९०५॥
गोपीप्रेमा यथापूर्व । कृष्णीं जडला हें अपूर्व । कृष्णमायेचें लाघव । कथिलें तुज राया ॥६॥

अद्यानेन महाव्यालो यशोदानंदसूनुना । हतोऽविता वयं चास्मादिति बाला व्रजे जगुः ॥४८॥

बालक सांगती व्रजीं मात । महासर्पें आमुचा घात । करितां त्याचाचि करूनि अंत । कृष्णें समस्त रक्षिले ॥७॥
त्या सर्पाचें कलेवर । लांब रुंद सविस्तर । आपणां गिळिलें तो विचार । व्रजीं समग्र मुखीं कथिला ॥८॥
बाळक म्हणती आजि येणें । नंदयशोदानंदनें । अघ मर्दूनि आम्हां प्राणें । त्यांपासून रक्षिलें ॥९॥
नंदनंदनें म्हणती एक । यशोदानंदनें म्हणती आणिक । किंवा यशोदाआनंदक । त्या श्रीकृष्णें रक्षिलों ॥९१०॥
कुमारपणीं अघमोक्षण । तें पौगंडीं व्रजीं कथन । कैसें म्हणूनि केला प्रश्न । तें शंकानिरसन झालें कीं ॥११॥
तंव राजा म्हणे जी व्यासात्मजा । शंका फेडिली बरवे वोजा । परी आणीक एक प्रश्न माझा । तो मुनिराजा समजावा ॥१२॥
तरी पूर्विल्या स्वपुत्रांही परीस । गोगोपींचा स्नेह विशेष । कृष्णीं किमर्थ हा उद्देश । मज अशेष बोधावा ॥१३॥

ब्रह्मन् परोद्भवे कृष्णे इयान्प्रेमा कथं भवेत् । योऽभूतपूर्वस्तोकेषु स्वोद्भवेप्वपि कथ्यताम् ॥४९॥

औरसाहूनि परोद्भवीं । प्रेमा वाढला कवणे भावीं । ऐशी शंका मजलागोनी । ते निरसावी स्वामीनें ॥१४॥
पूर्वील आपुलेही पुत्र असती । त्यांवरी नसेचि ऐशी प्रीति । जे परोद्भवा कृष्णाप्रति । प्रीति करिती गोगोपी ॥९१५॥
ऐकोनि राजाचा हा प्रश्न । वक्ता श्रीशुक सर्वज्ञ । करी नृपाचें समाधान । तें अभिज्ञ परिसोत ॥१६॥

श्रीशुक उवाच - सर्वेषामपि भूतानां नृप स्वात्मैव वल्लभः । इतरेऽपत्यवित्ताद्यास्तद्वल्लभतयैव हि ॥५०॥

आत्मप्रियत्वें सर्व प्रिय । हें बोधावया व्यासतनय । पांचां श्लोकीं हा अभिप्राय । यथान्वय निरोपी ॥१७॥
कृष्ण सर्वांचा आत्माराम । म्हणोनि त्याचे ठायीं वास्तव प्रेम । येर पुत्रादि हेमधाम । यांचें प्रेम तदर्थ ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP