अध्याय १४ वा - श्लोक २९ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अथापि ते देव पदांबुजद्वयप्रसादलेशानुगृहीत एव हि ।
जनाति तत्त्वं भगवन्महिम्नो न चान्य एकोऽपि चिरं विचिन्वन् ॥२९॥

यद्यपि ज्ञानें सुलभ मोक्ष । तरी तो न पवतीच मुमुक्ष । जंव नादरिती भक्तिपक्ष । तंव अपरोक्ष दुर्लभ ॥७४॥
न होतां राजयाची राणी । राणीव नोहे कीं लाहणी । तैसा मोक्ष वेगळेपणीं । विभक्तज्ञानी न पवती ॥६७५॥
चिन्मात्रस्वरूप जो तूं स्वयें । त्या तुझे चरणांबुजद्वय । त्याचिया प्रसादलेशानुग्रहें । लाहें सोय तव महिमेची ॥७६॥
व्यतिरेकबोध म्हणिजे ज्ञान । अन्वयबोधा भक्ति अभिधान । अन्वयाबोध तें प्रपंच भान । अबोधज्ञान गाढमूढ ॥७७॥
अबोधपूर्वक अन्यथा बोध । या नांव भवाब्धि अगाध । केवळ व्यतिरेकें या बाध । करितां प्रबुद्ध न तरती ॥७८॥
तेथ अनन्यभक्ति केवळ नौका । आबाळ सुबोधा भाविकां । निस्तरूनि भवाब्धि असिका । निर्वानसुखा पाववी ॥७९॥
केवळ भक्ति तें अभेदज्ञान । ब्रह्मान्वयेंचि अखिलात्मभजन । न स्फुरेचि भेदभान । समाधिव्युत्थानवर्जित ॥६८०॥
सिद्धि नाडिती योगाभ्यास । शास्त्रज्ञानें होती राक्षस । अभेदभक्ति स्वप्रकाश । नित्य निर्दोष सुखरूप ॥८१॥
वासुदेवः सर्वमिति । हे अन्वयात्मक चौथी भक्ति । इयेवांचूनि ज्ञानें मुक्ति । कोणी न पवती व्यतिरेकें ॥८२॥
यो मामेवमसंमूढ । मज सर्वगतातें जाणे दृढ । तोचि सर्वज्ञांमाजि प्रौढ । सर्वभावें रूढ मद्भजनीं ॥८३॥
ऐशा अनेक श्रुति स्मृति । आणि माझी स्वप्रतीति । लोकोत्तर रूढ ख्याति । जे अभेदभक्ति मोक्षद ॥८४॥
पदाब्जप्रसादलेशानुग्रहें । परतत्त्वमहिमा विदित होय । भगवन्महिमेची हे सोय । उमजे अन्वयें तुझेनी ॥६८५॥
ज्ञानयोगें कर्में चवती । ऐसें देखिलें ऐकिलें बहुतीं । परी भक्तिमार्गें पावले च्युति । हें नाहीं श्रुतिस्मृतिपुराणीं ॥८६॥
तुझें सांडूनि हें अन्वयभजन । कोणी चिरकाळ सज्ञान । अतद्व्यावृत्तीकरून । भवनिरसन करितांहि ॥८७॥
शास्त्रविचारें तत्त्व कळे । परी आत्मत्वीं जीवदशा न वळे । अध्यस्त अहंता कैशी गळे । हें वर्म न कळे पंडितां ॥८८॥
चिरकाळ व्यतिरेकविवरण करिती । शेवटीं व्युत्पत्ति अवघी रिती । त्वंपद प्रसन्नज्योति । जंव भवराती निरसीना ॥८९॥
देव म्हणोनि संबोधन । कीं तों स्वभक्ता द्योतमान । होऊनि भवतम अज्ञान । निरसूनि चैतन्य उजळिसी ॥६९०॥
ऐसा भजनभाग्यमहिमा । कैं मी लाहेन म्हणे ब्रह्मा । यदर्थ विनवूनि पुरुषोत्तमा । मागे प्रेमा श्रीचरणीं ॥९१॥

तदस्तु मे नाथ स भूरिभागो भवे‍ऽत्र वाऽन्यत्र तु वा तिरश्चाम् ।
येनाहमेकोऽपि भवज्जनानां भूत्वा निषेवे तव पादपल्लवम् ॥३०॥

ब्रह्मा म्हणे जी देशिकोत्तमा । तो हा भक्तिभाग्यमहिमा । मज असो जी मेघश्यामा । जेणें श्रीपादप्रेमा मी लाहें ॥९२॥
तो तूं प्रेमा म्हणसी कैसा । जो येथ प्रत्यक्ष देखिला जैसा । सुलभ होऊनि अबळां सरिसा । क्रीडसी परेशा ज्या प्रेमें ॥९३॥
सनकादिकां दुर्लभ भेटी । तो तूं बळेंचि झोंबसी कंठीं । स्तन्य मागसी महाहठीं । प्रेमासाठीं गोपीच्या ॥९४॥
ध्यानीं योगियां नाकळसी । तो तूं चोरूनि गोरस खाशी । रमा साशंक पदसेवेसी । तो पृष्ठीं वाहसी संवगडियां ॥६९५॥
तुझिया वक्रभृकुटीपुढें । जळती अनंतकोटिब्रह्मांडें । त्या तुज गोपी मारितां रडें । दाऊनि बापुडें मुख करिसी ॥९६॥
योगयागतपांच्या कोटि । साधितां कैवल्याचिये मुकुटीं । अन्वयभक्ति लाभल्या मिठी । पडें संसाटीं या प्रेमा ॥९७॥
तरी या सप्रेमभाग्यलाभा । मी याचक पद्मनाभा । तुझिया प्रेमळा वालभा - । माजिं उभा मज करीं ॥९८॥
तुझिये उदरीं माझें जन्म । परी हें दुर्लभ मजला प्रेम । तरी येचि जन्मीं माझा काम । उत्तमोत्तम हा पुरवीं ॥९९॥
म्हणसी ब्रह्मा तूं पदाभिमानी । योग्य नव्हेसि सप्रेमभजनीं । तरी मज वोपीं तिर्यग्योनि । अथवा कोणी मनुजादि ॥७००॥
तुझिये अभेदभक्ती पुढें । ब्रह्मपदवी मज नावडे । जैसें शृंगारिलें मढें । तैसें कुडें वैभव हें ॥१॥
याहूनि सामान्य प्राणिमात्र । त्यामाजि देऊनि एक गात्र । तव जनासि पाडूनि मैत्र । करीं पात्र प्रेमाचें ॥२॥
जेणें करूनि तुझिया जना - । माजीं येखादा जनार्दना । होऊनि सेवीं सप्रेम खुणा । तुझिया चरणा तें करीं ॥३॥
तुझेनि प्रेमभावें तुझिया । दासांलागीं दासांचिया । प्रेमें भजें मी ऐशिया । भाग्यलेशा मज देईं ॥४॥
पारमेष्ठ्यादिदेवताजन्मा - । पासूनि भक्तिमंता योनि अधमा । त्याचि उत्तमाहूनि उत्तमोत्तमा । स्तवी ब्रह्मा औत्सुक्यें ॥७०५॥
ब्रह्मादि जन्माहूनि श्रेष्ठ । भक्तिभाग्य परम वरिष्ठ । हें सप्त श्लोकीं वर्णी स्पष्ट । ............... असतां ही ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP