अध्याय १४ वा - श्लोक २३

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


एकस्त्वमात्मा पुरुषः पुराणः सत्यः स्वयंज्योतिरनंत आद्यः ।
नित्योऽक्षरोऽजस्रसुखो निरंजनः पूर्णोऽद्वयो मुक्त उपाधितोऽमृतः ॥२३॥

ब्रह्मा म्हणे जी तडिदंबरा । या लटकिया भवसागरा । सत्य भासविता तूं खरा । त्या निर्धारा परियेसीं ॥४८॥
तूं एक आत्मा पुराणपुरुष । स्वयंज्योति अजस्त्रतोष । नित्य निरंजन निर्द्रोष । उपाधिविशेषवर्जित ॥४९॥
सत्य स्वप्रकाश अनंत । आद्य अक्षर विकाररहित । अद्वय परिपूर्ण अमृत । शुद्ध शाश्वत सन्मात्र ॥४५०॥
मीच कैसा सत्य म्हणसी । तरी ऐकावें ऋषीकेशी । दृश्य प्रपंच एकदेशी । केवीं तुजशीं सम होय ॥५१॥
प्रपंच जड परिच्छिन्न । विक्षेपगर्भ भ्रमोत्पन्न । कालत्रयीं जो विद्यमान । अपरिच्छिन्न तूं आत्मा ॥५२॥
दृश्य मिथ्या पावे नाश । आत्मा सत्यत्वें अविनाश । प्रकट दिसतां वत्सप्रवेश । केवीं अविनाश मी म्हणसी ॥५३॥
तरी जितुकें विकारवंत भासे । तितुकें दृश्य उपजे नाशे । विकारषट्क तुज न स्पर्शे । म्हणसी कैसें तें ऐक ॥५४॥
तूं सर्वांचा अनादि आदि । म्हणोनि आद्य म्हणिजे वेदीं । यास्तव जन्मादि उपाधि । तुज कोठून कधी कोण म्हणे ॥४५५॥
तूं सर्वांचें कारण । येर कार्य अवघें जाण । म्हणोनि तुज म्हणिजे पुराण । कीं पुरातन पूर्णत्वें ॥५६॥
तरंगा सिंधूचा संभव । जाणावया उपजे हांव । तैसें कार्यरूप भावाभाव । तुझा ठाव नेणती ॥५७॥
तूं पुराण पुरातन । कालत्रयीं सनातन । कार्यापूर्वीं वर्तमान । नित्य नूतन सर्वदा ॥५८॥
प्रकृतीहूनि जो पूर्वीं असे । श्रुति म्हणती त्या पुरुष ऐसें । जन्मादिअस्तित्वनिरासें । तुझें प्रकाशे पुरुषत्व ॥५९॥
गर्भवासीं प्रतीयमान । अस्तित्वविकार तो तेथून । तूं पुराण प्रकृतीहून । विकारविहीन परमात्मा ॥४६०॥
योनिद्वारें जन्मणें पदे । साच ते विकार त्यासीच घडे । तुझी नित्यता जैं न मोडे । तैं कोणीकडे विकार ॥६१॥
लघु जन्मकाळींचें गोत्र । साकार दिसती अवयव मात्र । वृद्धि पावतां अहोरात्र । वर्धते विकार तो म्हणिजे ॥६२॥
तूं तो पूर्ण कालत्रयीं । र्‍हास वृद्धि न पवसी कांहीं । यालागीं वृद्धिविकार तुझ्या ठायीं । कोणें कांहीं देखावा ॥६३॥
देहासि पातलिया तारुण्य । विपरीत मतें हें अभिधान । ठेविती अभिप्राय जाणोन । विकारज्ञ तो ऐका ॥६४॥
तारुण्य वयसा भरल्या आंगीं । काम खवळे पैं सर्वांगीं । मन बावरें सर्वभोगीं । दृष्टि आळंगी नव वनिता ॥४६५॥
स्तनपानाची सांडूनि रुचि । मर्दनावेश आदरी कुचीं । जन्मस्थानीं रमावयाची । हांव विवंची सकाम ॥६६॥
मातेवरी धरी क्षोभ । सकाम कांतेचें वालभ । पित्यासि म्हणे वृद्ध गर्दभ । लोकां सदंभ अभ्यर्ची ॥६७॥
दुग्धपानाची सांडूनि रुचि । कटूतिक्ताम्ल रामठ मरीचि । ऐशीं इंद्रियें अवघींची । होती साचीं विपरीत ॥६८॥
इंद्रियें ऐशी पूर्व आवडी । सांडूनि धरिती विपरीत गोडी । विपरिणमनें ये विकारप्रौढी । उघड नाडी वाढोनी ॥६९॥
तूं सर्वांगें अजस्रसुख । तुझा निर्विकार संतत तोख । ज्याचेनि अनंगा आंगीं हरिख । आदिपुरुष तो तूं कीं ॥४७०॥
आतां अपक्षीय विकार । जरा जर्जर करी शरीर । तूं अक्षय अजरामर । आद्य अक्षर न क्षरसी ॥७१॥
ष्ठावा विकार म्हणिजे अंत । तूं तरी नित्यत्वें अनंत । साही विकार हे प्राकृत । तूं विकाररहित परिपूर्ण ॥७२॥
पूर्णत्वासि हेतुद्वय । जे तूं अनंत अद्वय । देशें काळें अप्रमेय । परिच्छेदवर्जित ॥७३॥
अमुकदिशीं आहे आत्मा । तेथून परिच्छेदावी सीमा । हें कें घडे तुजमाजीं व्योमा । देखों भ्रमा वरपडे ॥७४॥
अंतरहित तूं अनंत । म्हणोनि म्हणिजे तुज अमृत । कैंचा विकारा अवकाश एथ । तूं अद्वैत परब्रह्म ॥४७५॥
अमृतत्वा उपपादून । चतुर्विध कारकेंकरून । क्रियाफळत्व निवारून । वास्तव म्हणून विधि वर्णी ॥७६॥
रचूनि कैवाड वितंड । क्षीराब्धि एवढें दुग्धभांड । मंथूनि काढिलें विषभावंड । राहु द्विखंड ज्या साठीं ॥७७॥
तेंही यज्ञादि कर्में साध्य । तें कर्मही चतुर्विध । आप्य विकार्य संस्कार्य भेद । प्रथम उत्पाद्य चौंमाजीं ॥७८॥
उत्पन केलिया होय साद्य । तें तें बोलिजे उत्पाद्य । घटमठकटपटादि प्रसिद्ध । तूं सर्वाद्य न तैसा ॥७९॥
दिविव्ध आप्यातें जाणिजे । क्रिया आप्यज्ञानें दुजें । दोहींचेंही स्वरूप उमजे । तें ऐकिजे चतुरांहीं ॥४८०॥
उदक आयतेंचि आहे । गमनें गृहणें तें प्राप्त होय । आत्मग्रहण कोणे क्रिये - । माजीं होय विचारा ॥८१॥
आत्मावाप्ति विसर्गें मिथुनें । किंवा घडे गमनागमनें । हातोपातें त्यागादानें । मौनें जल्पनें घडतसे ॥८२॥
आपुलें आस्तिक्य परतें होतें । तें पायें जाऊनि घेतलें हातें । क्रिया आप्य आत्मयातें । तें जाणते सुखें म्हणोत ॥८३॥
सूर्यें आपुल्या करतळा - । माजी भरूनि मृगजळा । हारपलिया स्वमंडळा । पाहोनि डोळां लाभला ॥८४॥
आत्मा क्रियेनें आप्य म्हणतां । विफळ होय ते वक्तृता । आत्मत्वाचा हेतु देता । क्रिया आप्यता निरसली ॥४८५॥
आत्मा संतत सर्वगत । आत्मा सर्वत्र अवाप्त । सर्वग्रासक सर्वातीत । अनादि अनंत तूं आत्मा ॥८६॥
ज्ञानें आप्य कैसा नव्हे । तेंही नावेक परिसावें । करणज्ञानें विषय फावे । तैसा न फवे पैं आत्मा ॥८७॥
शब्द आप्य श्रवणज्ञानें । अंतःकरणवृत्तिगुणें । त्वगिंद्रियें स्पर्शा घेणें । स्वचैतन्यें आंतुला ॥८८॥
नेत्रेंद्रियासि आप्यरूप । बुद्धीचा तो ज्ञानदीप । दृष्टत्वशक्तीचा प्रताप । तेणें प्राप्य अनात्मा ॥८९॥
एवं सर्वहि करणवृत्ति । ज्ञान घडे जें विषयाप्ति । सुषुप्तिकाळीं लया जाती । ते अनाप्ति करणातें ॥४९०॥
आत्मप्रकाशें मनादिकें । होती करणां प्रकाशकें । तैं त्या आप्यें तन्मातृकें । न त्यां ठाउकें निजमूळ ॥९१॥
तूं स्वयंज्योति आत्मदीप । वृत्तिज्ञानें नोहेसि आप्य । सर्वां प्रकाशूनि तूं गोप्य । अससी अगोप्य गोपति ॥९२॥
आतां म्हणों तुज विकृत । जैशा व्रीहि तुषाघात । केलिया होती उपाधिरहित । हें न घडत तुजकडे ॥९३॥
तूं उपाधीपासून मुक्त । अनादि असंग अमृत । म्हणोनि म्हणती तुज अच्युत । जीव शिव होत सोपाधि ॥९४॥
उपाधीच्या अपाकरणें । व्रीहि निस्तरे जन्ममरणें । तेवीं माया अविद्या निरावरणें । अमृत होणें जीव शिवा ॥४९५॥
आतां संस्कार्य म्हणों तुज । तेंही दो प्रकारें बुज । अतिशयाधानें एका वोज । दुजें विरज मळहरणें ॥९६॥
तरी तूं स्वयंभ संपूर्ण । म्हणोनि घडे अतिशयाधान । आणि न घडे मलापकरण । तूं निरंजन म्हणोनी ॥९७॥
एवं षड्विकाररहित । चतुर्विधक्रियातीत । जीवेश्वरोपाधिवर्जित । जो तूं संतत सन्मात्र ॥९८॥
तया प्राकृतामृतापरी । कर्मोपलब्ध नव्हेसि हरि । परमामृत जें निर्विकारी । तूं निर्धारीं तें ब्रह्म ॥९९॥
त्या तुझेनि वास्तवज्ञानें । घडे भवाब्धि निस्तरणें । ऐसें बोलिलें जें द्रुहिणें । तें परिसणें ये श्लोकीं ॥५००॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP