अध्याय १४ वा - श्लोक ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


पुरेह भूमन्बहवोऽपि योगिनस्त्वदर्पितेहा निजकर्मलब्धया ।
विबुद्ध्य भक्त्यैव कथोपनीतया प्रपेदिरेंऽजोऽच्युत ते गतिं पराम् ॥५॥

भूमन् म्हणिजे सर्वात्मका । अपरिछिन्न विश्वपालका । ब्रह्मा म्हणे भजनविमुखां । ज्ञानसाधकां न लभसी ॥१९०॥
पूर्वीं येचि लोकीं फार । कर्मयोगादि साधनें घोर । करूनि सिणतां योगीश्वर । नाहीं परपार पावले ॥९१॥
योगीश्वरही पावले शीण । तेथें सामान्या पुसे कोण । मग जाणोनि भक्तीचें महिमान । जाहले शरण सप्रेमें ॥९२॥
उष्णें तापल्या कळे छाया । कीं दुष्काळीं निवडे दया । तेंवि आले भजनालया । कष्टोनियां बहु योगी ॥९३॥
मरतां घडे अमृतपान । पुरीं बुडतां नौकाग्रहण । तैसे योगी पावले शीण । त्या श्रीपादभजन जोडलें ॥९४॥
ब्रह्मा म्हणे जी कवळपाणि । केंवि त्या प्रेमा श्रीपादभजनीं । ऐशिये शंकेच्या निरसनीं । माझी वाणी निरूपी ॥१९५॥
ज्ञानसाधनीं पावतां शीण । भाग्यें सत्संग जोडला पूर्ण । तेथें होतां कथाश्रवण । कळलें महिमान चरणांचें ॥९६॥
न होतां अनन्यभावें शरण । सहसा न चुके जन्ममरण । सत्संगें हे खळलें जाण । कथाश्रवणप्रसंगें ॥९७॥
शाखेवरूनि चंद्रापाशीं । पावविती जेंवि दृष्टीसी । तेंवि कथाश्रवणें हृषीकेशी । चरणापाशीं पावविलें ॥९८॥
विषयासक्त होतें मन । स्वर्गांगना स्रक्चंदन । तदभिलाषें कर्माचरण । तें परतोन उमजविलें ॥९९॥
विषोक्त पक्कान्नें रुचिकर । जाणोनि बुभुक्षु भक्षणपर । त्यासि कळल्या अभ्य़ंतर । सांडी आदर तेथींच ॥२००॥
जेणें त्यातें उमजविलें । तेणें मरणौनि परतविलें । अमरणातें भेटविलें । तेंवि हें केलें कथाश्रवणें ॥१॥
सज्जनमुखें स्वाभाविक । सत्कथाश्रवण सद्विवेक । उमजतांचि पादोन्मुख । प्रेमा निष्टंक उपजला ॥२॥
मग ईहा म्हणिजे चेष्टाजात । कायवाङ्मनोव्यापारजनित । आणि कर्में जे जे यथोचित । ते करिती त्वदर्पित सप्रेमेम ॥३॥
वर्णाश्रमाचारवंत । होऊनि आराधितां भगवंत । अनुग्रहूनि कैवल्य देत । हा वृत्तांत स्मृतीचा ॥४॥
भक्तीवांचूनि वर्णाश्रम । करणें तो तो वृथाश्रम । भक्तिपूर्वक जो स्वधर्म । भजनप्रेम तें अवघें ॥२०५॥
तेंचि ईहादि सर्व कर्म । तुज अर्पिती जे सप्रेम । तो अपणानुक्रम । सोपा परम हरिभजनीं ॥६॥
ईहा म्हणिजे चेष्टाजात । सहज स्थितिसंकल्पसहित । शिंक जांभई अकस्मात । खोकला उचकी स्पंदन ॥७॥
तेही नामस्मरणात्मक । तुज अर्पिती नैसर्गिक । जागृत्स्वप्नसुषुप्त्यात्मक । ईहा सम्यक अर्पणें ॥८॥
कर्म म्हणिजे वेदोदित । गुरूपदिष्ट यथा विहित । नित्यनैमित्तिककामनारहित । चित्तशुद्ध्यर्थ सप्रेमें ॥९॥
अभेदभजनाधिकारसिद्धि । लक्षूनि इच्छिजे चित्तशुद्धि । ओतप्रोत भगवद्बुद्धि । ज्ञान अविरोधि तें कर्म ॥२१०॥
कृष्णप्रीत्यर्थ हा संकल्प । क्रियाकलाप कृष्णरूप । कृष्णीं प्रेमा निर्विकल्प । हें चिद्रूप कर्मफळ ॥११॥
ऐसें ईहादि कर्माचरं । सप्रेम करितां त्वदर्पण । चौथी भक्ति जें वास्तवज्ञान । प्रकटे आपण तव कृपा ॥१२॥
सद्भावेंसी सत्सेवन । सत्संगति सत्कथाश्रवण । श्रवणें प्रकटे अभेदभजन । भजनें ज्ञान प्रकाशे ॥१३॥
तये ज्ञानभक्तींकरून । अभेद आत्मा श्रीभगवान । अपरोक्षबोधें समरसोन । तव निर्वाण पावले ॥१४॥
मायानियंता कैवल्यपति । त्या तुझी परमनिर्वाणगति । निर्विकार ब्रह्मस्थिति । अभेदभक्ति पातले ॥२१५॥
कार्या स्वकारणेंचि प्राप्ति । तेचि त्यांची परमगति । तुज परमात्म्याची परमगति । ते दुर्लभ प्रपति तव भजन ॥१६॥
जें कां दुर्लभ तपःसाधनीं । शास्त्राभ्यसनीं यज्ञाचरणीं । अंजः म्हणिजे सुलभपणीं । अभेदभजनीं ते प्राप्ति ॥१७॥
एवं पंचमश्लोकावधि । संबोधूनि वदला विधि । तो अशेषार्थ यथाविधि । कुशलबुद्धि परिसोत ॥१८॥
यथादृष्ट वर्णूनि ध्यान । संबोधूनि केलें नमन । प्रथम श्लोकीं हें व्याख्यान । वदला दुहिण तैसेंची ॥१९॥
याही रूपाचा संपूर्ण महिमा । जाणों न शकेंचि मी ब्रह्मा । तेथ निर्गुण निरुपमा । कोण गरिम्या जाणाया ॥२२०॥
तृतीय श्लोकींएं विवरण । सज्जनीं वर्णितां तव गुण । तोषती स्वस्थानीं ऐकोन । ते तुजलागून जिंकिती ॥२१॥
चतुर्थ श्लोकींची व्युत्पत्ति । उपेक्षूनी अभेदभक्ति । ज्ञानसाधनीं क्लेश करिती । त्यांसि अंतीं क्लेशफळ ॥२२॥
पंचम श्लोकार्थ केवळ । भक्तीविण ज्ञान विफळ । सर्वार्पणें सप्रेमळ । सुखें कैवल्य पावलें ॥२३॥
एवं भक्तीचें वैशिष्ट्य । विपरीत साधक पावती कष्ट । सगुणनिर्गुणरूपें स्पष्ट । जाणणें दुर्घट विधि वदला ॥२४॥
हरिगुनकथाश्रवणेंचि करून । हरिपद पावती भाविक जन । वांचून सगुण कीं निर्गुण । दुर्बोध जाण सर्वांसी ॥२२५॥
ऐसा बोलोनि विचार । त्यामाजि सगुणचि दुर्बोधतर । तो दो श्लोकीं निर्धार । करी अतःपर परमेष्ठी ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP