अध्याय १२ वा - श्लोक ११

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


इत्थं सतां ब्रह्मसुखानुभूत्या दास्यं गतानां परदैवतेन ।
मायाश्चितानां नरदारकेण साकं विजर्‍हुः कृतपुण्यपुंजाः ॥११॥

ऐशा अनेक अनुकारगति । दाऊनि वत्सप क्रीडा करिती । जेणेंशीं तो जगत्पति । विविध शरिती उमजोनि ॥६१॥
त्यांतें स्मरोनि व्यासतनय । होऊनि अंतरीं आनंदमय । रायासि सांगे सविस्मय । श्लोकाद्वयें सप्रेमें ॥६२॥
ब्रह्मात्मबुद्धीनें ब्रह्मवेत्ते । ब्रह्मानुभवैक सुखाचें भरतें । भरूनि क्रीडती अभेदचित्तें । पूर्णावस्थे जेणेंशीं ॥६३॥
केवळ ब्रह्म तें सन्मात्र । तत्सुख प्रकाशी चिन्मात्र । अभेद अनुभव अभेदसार । निर्विकार जे ठायीं ॥६४॥
तेजें स्वप्रकाश परमसुख । कृष्ण वत्सप द्विधा वेख । धरूनि सुकृतपुंजात्मक । क्रीडे निःशंक तेणेंशीं ॥१६५॥
ऐशी ब्रह्मनिष्ठांप्रति । अंतरीं बाणोनि स्वप्रतीति । हृदिस्थेंशीं क्रीडा करिती । ते वत्सप म्हणिजती पुण्यपुंज ॥६६॥
आतां प्रेमळ भगवद्भक्त । प्रेमोत्कर्षें आत्मानुरक्त । सर्वोपचारीं अर्चूनि नाथ । होती सनाथ स्वानंदें ॥६७॥
तेचि द्विविध अर्चनपरी । पारमार्थिकीं कां बाह्याकारीं । दोन्ही विशद न होतां चतुरीं । केंवि निर्धारीं भजिजेल ॥६८॥
सत्य हित जो न बोधी । वरिवरि परमार्थ प्रतिपादी । विश्वासतां त्याचे शब्दीं । स्वहितसिद्धि मग कैंची ॥६९॥
मूर्खाप्रति प्रतिमा देव । बांधूनीं भजनासि केला ठाव । त्यामाजी मुमजावितां वास्तव । केवि निर्वाह स्वहिताचा ॥१७०॥
भक्तियोगें मनोजय । अभेद भगवत्प्राप्ति होय । बाह्यार्चनें हा अभिप्राय़ । साधे काय विचारा ॥७१॥
मनें कल्पिलें चराचर । तेथील अनेक द्रव्योपचार । अर्पून होती अर्चनपर । सामान्य नर भेदज्ञ ॥७२॥
विष शर्करा नाना केंणी । दुकानीं एकाग्र मांडी वाणी । कीं लेख्यलेप्यादि शिल्पकरणी । तेंवि बाह्यार्चनीं एकाग्र्य ॥७३॥
ज्यानें न होतां चित्तशुद्धि । बाह्यभजनीं भेद बाधी । मन पकडलें प्रपंचोपाधि । देहबुद्धि लऊनी ॥७४॥
पत्र गंध पुष्प धूप । पूजाद्रव्यें । इयें अमूप । अनसुट धरूनि अर्चनरूप । मन संकल्प वाढवी ॥१७५॥
अनुच्छिष्ट घेतां जळ । भिजती आपुले करतळ । पुष्पें प्रार्थितां परिमळ । सेविती तत्काळ स्वघ्राण ॥७६॥
एवं सर्वोपचारसमृद्धि । पूजका अर्पिती पूजाआधीं । तेणें सारितां अर्चनविधि । ते वृथा शाब्दी अनुच्छिष्ट ॥७७॥
आणि पत्रीं ब्रह्मा पुष्पीं हरि । फळीं केवळ त्रिपुरारि । यांची हत्या अर्चकांशिरीं । ग्रंथांतरीं हे वार्ता ॥७८॥
असो सचेताचेनि नाशें । अचेत पूजूनि संतोषें । हेंही दिसे अनारिसें । भेदज्ञ पिसें आचरे ॥७९॥
मन मोकलूनि संसारीं । देव पूजिती बाह्योपचारीं । तेचि निषेधिली भेदकपरी । हें वर्म चतुरीं जाणिजे ॥१८०॥
येर पत्र गंध पुष्प फळ । म्हणाल निषेधिलें केवळ । तरी हा मना़चा अवघा खेळ । तें मन पांगुळ जैं होय ॥८१॥
सप्रेम वेधें विरतां मन । प्रवृत्तिनिवृत्तीमाजीं भजेन । सबाह्य अंतरीं अभेद जाण । कृष्णार्पण सद्भावें ॥८२॥
मनःसंकल्प प्राणसंचार । सप्रेम ज्ञानेंद्रियांचा आदर । सनेम कर्मेंद्रियांचा आचार । अर्चनप्रकार इतुकाची ॥८३॥
तरी ज्यासि म्हणती भक्तियोग । जो अनन्यभक्तिमार्ग । स्वमुखें अर्जुना श्रीरंग । सांगे सुभग समरंगीं ॥८४॥
योग म्हणिजे मनोजय । बाह्य भजनें तो केंवी होय । यालागीं चित्तशुद्धीचा उपाय । ध्यानें अन्वय साधितां ॥१८५॥
योगा वेगळें नावरे मन । हेंचि भक्तियोगाचें लक्षण । मनबुद्धीसी कृष्णार्पण । अभेदध्यानें अभ्यासें ॥८६॥
मय्येव मन आधत्स्व । बुद्धी पाववी माझाची ठाव । मजमाजि वससी भो पांडव । हें बोधी केशव निःसंशय ॥८७॥
ये तु सर्वाणि कर्माणि । अर्पिती मत्पर होऊनि । येणें अनन्ययोगें करूनी । मजलागूनि उपासिती ॥८८॥
क्रियेपासूनि कर्मेंद्रियें । विषयापासूनि ज्ञानेंद्रियें । स्वचेशःटांपासूनि चेष्टेंद्रियें । मनीं समाये अनुच्छिष्ट ॥८९॥
संकल्प न फुटतां अंतर । सोळा कळांसि षोडशोपचार । कृष्णीं अर्पूनि निर्विकार । होती साचार सद्भक्त ॥१९०॥
प्रपंचीं उच्छिष्ट होऊं न देतां । मन बुद्ध्यादिकां समस्तां । अर्पूनि सर्वोपचारता । कृष्णात्मकता साधिली ॥९१॥
मनचि करितां कृष्णार्पण । पावले उपचार संपूर्ण । सहजीं सहज अभेदभजन । प्रेम सज्जन न जाणती ॥९२॥
ज्याचेनि प्रकाशें पृथगात्मत्व । करणवृंदा बोधकसत्त्व । परदैवत तें परमतत्त्व । तेणें सनाथत्व मानिती जे ॥९३॥
चित्तें भिनले मज माझारीं । त्यांसीं तारिता भवसागरीं । होईन अर्जुना मी लौकरीं । म्हणे श्रीहरि गीतेंत ॥९४॥
बांधोनि कोंडिला प्रवाहठाय । तैं तुंबोनी पाणि गगना जाय । तेंवि मनचि रोधितां विषय सोय । मग हळुहळूं होय आत्मसंस्थ ॥१९५॥
मनें कल्पिला संसार । जागृतिद्वारां तो साचार । तें मन करितां निर्विकार । भवसागर हरपला ॥९६॥
न क्षाळितां मनोमळ । तोंवरि तोचि भवाचें मूळ । तें मन केलिया निर्मळ । उरे केवळ चिन्मात्र ॥९७॥
शर्करा पेरितां न निघे मोड । उंसही गोड परी होय झाड । बाह्यभजनें मना सुरवाड । केंवी भवमोड करपेल ॥९८॥
सीमा लंघूनि आपटाशमी । यत्नें आणिती विजयादशमीं । सुवर्ण म्हणोनि ठेविती सद्मीं । परी जाण उद्यमीं अयोग्य ॥९९॥
तेंवी धातुपाषाणीं निष्ठावंत । होऊनि म्हणती ते हा जगन्नाथ । परी मोल करूनि घेती विकत । तैं मन मूर्च्छित नोहे कीं ॥२००॥
ध्यानें मनाचे तुटतां मळ । तैं तें होय नितांत निर्मळ । विषयविरागें भजनशीळ । सप्रेमळ श्रीकृष्णीं ॥१॥
जन्मांतरसहस्रेषु । तपोध्यानसमाधिसोसु । करितां मानसा निर्दोषु । प्रेमा विशेषु तैं कृष्णीं ॥२॥
येणें भक्तियोगाभ्यासें । शोधूनि जिंकिलीं निजमानसें । अभेद झाले भेदग्रासें । ते सबाह्य पिसे सप्रेमें ॥३॥
संत सद्गुरु सर्वोत्तम । अभेदभजनीं ज्याचें प्रेम । न्यून पूर्ण सम विषम । अनेक नेम निरसला ॥४॥
ऐसें बाह्यदास्यीं निरत । ज्याचें श्रीकृष्ण परम दैवत । तेणेंचि ते पुण्यवंत । प्रेमें क्रीडती वयस्य ॥२०५॥
ऐसा भक्तांसि प्रतीयमान । क्रीडती तेणेंसीं अभिन्न । आतां मायाश्रितालागुन । कैसा भगवान भासला ॥६॥
देव तिर्यगादि मानव । मायाश्रित हे अवघे जीव । त्यांसीं भासला वासुदेव । केवळ बल्लव मानवक ॥७॥
तेणेंसी तें सुकृतपूज्य । सख्यें विहरती बल्लवात्मज । केवढा भाग्याचा विजयध्वज । अपूर्व चोज हें राया ॥८॥
एरव्हीं योगियां दुर्लभ । तो हा बल्लवार्भकां सुलभ । हा श्लोकोक्त अर्थलाभ । श्रोते स्वयंभ परिसोत ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP