अध्याय ११ वा - श्लोक ४१ ते ५०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तं वीक्ष्य विस्मिता बालाः शशंसुः साधु साध्विति । देवाश्च परिसंतुष्टा बभूवुः पुष्पवर्षिणः ॥४१॥

हें देखोनि बल्लवबाळ । परम विस्मित झाले सकळ । दैत्य मारिला महा विशाळ । म्हणती गोपाळ भला भला ॥३४॥
संतोष झाला त्रिदशां मनीं । सुमनें वर्षती गगनींहूनी । कृष्णकीर्ति वदती वचनीं । दुंदुभिध्वनि गजरेंशीं ॥२३५॥
ऐसें वत्सासुरमर्दन । व्रजीं बाळकीं केलें कथन । ऐकोनि गोपी गोपगण । विस्मयापन्न जाहले ॥३६॥

तौ वत्सपालकौ भूत्वा सर्वलोकैकपालकौ । सप्रातराशौ गोवत्सांश्चारयंतौ विचेरतुः ॥४२॥

आणीक कोणे एके दिवशीं । रामकृष्ण गोपाळेंशीं । निघाले वत्सें चारावयासी । निजमानसीं सुखभरित ॥३७॥
जे अखिललौकैकपाळक । तिहीं घेऊनि वत्सपवेख । वत्सें चारिती सकौतुक । क्रीडा अनेक दावूनि ॥३८॥
जाळिया सुरसान्नीं भरूनी । गडियांसहित रामकृष्णीं । वनभोजनाचे प्रीतीकरूनी । कंठीं घालूनि वागविल्या ॥३९॥
गोवत्सांच्या पुढें हरि । मागें बलराम मुरारि । नाना क्रीडाकौतुकगजरीं । यमुनातीरीं विचरती ॥२४०॥

स्वं स्वं वत्सकुलं सर्वे पाययिष्यंत एकदा । वत्वा जलाशयाभ्याशं पाययित्वा पपुर्जलम् ॥४३॥

ऐसे सर्वदा क्रीडा करिती । तंव अपूर्व वर्तलें ऐक नृपति । आपुलाल्या वत्सांप्रति । जल समस्तीं पाजितां ॥४१॥
रामकृष्णादि एके दिवशीं । जाऊनि जलाशयापाशीं । जल पाजूनि वांसुरासी । स्वइच्छेशीं ते प्याले ॥४२॥

ते तत्र ददृशुर्बाला महासत्त्वमवस्थितम् । तत्रसुर्वज्रनिर्भिन्नं गिरेः शृंगमिव च्युतम् ॥४४॥

तंव त्या जलाशयाच्या ठायीं । पक्षी एक विशाळदेही । गोपाळ देखोनि अवघेंही । त्रास हृदयीं पावले ॥४३॥
जैसें महागिरीचें श्रृंग । वज्रघातें पावलें भंग । तैसा प्राणी विशाळ अंग । अचळ अभंग बैसला ॥४४॥
त्यासि देखोनि त्रासले गडी । आली बहुतेकां हुडहुडी । वळली एकाची मुरकुंडी । पडली बोबडी मुखासी ॥२४५॥
एक कांपती गदगदां । एक पडताती बदबदां । एक आश्रयिती गोविंदा । भयें अनुवादा न करूनि ॥४६॥
राया म्हणसी तो पक्षी कवण । बकासुरनामा दैत्य जाण । पूतना अघ बक तिघें कठिण । विघ्नदारुण भावंडें ॥४७॥
पूतना मारिली गोकुळीं । तें दुःख स्मरोनि हृदयकमळीं । बकासुरें मांडिली कळी । श्रीवनमाळी ग्रासावया ॥४८॥

स वै बको नाम महानसुरो बकरूपधृक् । आगत्य सहसा कृष्णं तीक्ष्णतुंडोऽग्रसद्बली ॥४५॥

तोचि बकासुर दारुण । कपटें बकाकृति धरून । जैसा बगळा गिळी मीन । तैसा कृष्ण गिळूं आला ॥४९॥
कृष्ण देखोनियां समीप । अकस्मात घालूनि झडप । पतंग गिळूं धांवे दीप । तेंवि सकोप हरि गिळी ॥२५०॥
वज्रपाय तीक्ष्ण तुंड । वेगें पसरूनियां प्रचंड । ज्यामाजीं अवघेंचि ब्रह्मांड । त्याचा पिंड तो ग्रासी ॥५१॥

कृष्णं महाबकग्रस्तं दृष्ट्वा रामादयोऽर्भकाः । बभूवुरिंद्रियाणीव विना प्राणं विचेतसः ॥४६॥

श्रीकृष्णातें ग्रासितां बक । देखोनि रामादिक अर्भक । प्राणेंविण इंद्रियादिक । विकळ अशेख ते तैसे ॥५२॥
रामादि पडिले विचेष्टित । परी राम जाणे तच्चेष्टित । श्रीकृष्ण जैसें अनुष्ठित । अधिष्ठित स्वयें तेंची ॥५३॥

तं तालुमूलं प्रदहंतमग्निवद्गोपालसूनुं पितरं जगद्गुरोः ।
चच्छर्द सद्योऽतिरुषाऽक्षतं बकस्तुंडेन हन्तुं पुनरभ्यपद्यत ॥४७॥

जिव्हा ओष्ठ तालुमूल । गिळितां कृष्ण लागला जाळूं । तेणें बक झाला व्याकुळू । लागला उगळूं कृष्णातें ॥५४॥
कोमळ गौळियांचें बाळ । मानूनि गिळिता झाले खळ । तंव तो केवळ प्रलयानळ । कंठीं इंगळ पोळला ॥२५५॥
जगाचा जनक जो विधाता । त्या विधात्याचा जो पिता । अग्नीमाजीं दाहकसत्ता । ते तत्त्वतां जयाची ॥५६॥
केवळ जैसा प्रलयानळ । तैसा जाळितां कंठनाळ । तेणें बक झाला व्याकुळ । उगळी तत्काळ कृष्णातें ॥५७॥
गिळिला तैसाची उगळिला । अक्षत भूमंडळीं पडला । कोठें नाहीं क्षति झाला । बक क्षोभला पुनरपि ॥५८॥
क्रोधें टोंचूनि तीक्ष्णतुंड । करूं पाहे खंडविखंड । पुन्हा पसरोनि जाभाड । देऊनि झडप वर पडला ॥५९॥

तमापतन्तं स निगृह्य तुंडयोर्दोर्भ्यां बकं कंससखं सतां पतिः ।
पश्यत्सु बालेषु ददार लीलया मुदावहो वीरणवद्दिवौकसाम् ॥४८॥

बकें मारितां सवेग झडें । श्रीकृष्ण प्रतापमार्तंडें । परमलाघवें स्वदोर्दंडें । धरिलीं जाभाडें निग्रहूनी ॥२६०॥
कृष्णप्रियकर जे संवगडे । कृष्णाभोंवते मागें पुढें । घाबरे पाहती चोहोंकडे । दूरी देव्हडें ठाकूनी ॥६१॥
तीक्ष्ण चंचूचे अधोर्ध भाग । निग्रहूनि धरितां बक । करी प्राणातें तगबग । लागवेग चालेना ॥६२॥
पक्ष झाडि फडफडाटें । रोंवूं धांवे नखें तिखटें । सोडवूं पाहे निजमुखवटें । न सुटे हटें कष्टतां ॥६३॥
कृष्णीं पडलिया वज्रमिठी । कैंची तेथूनि पुढती सुटी । द्वेषें मैत्रें पडल्या गांठी । लटक्या गोष्टी सुटकेच्या ॥६४॥
कंसाचा जो प्राणसखा । कृष्णें धरितां तया बका । पाहतां निर्जरांचिया हरिखा । ब्रह्मा लेखा करूं न शके ॥२६५॥
अवघे गोपाळ पाहतां क्षितीं । गगनीं विमानीं निर्जरपंक्ति । सर्वां देखतां कृष्णेंहातीं । बक निघातीं चिरियेला ॥६६॥
जैशी निर्ग्रंथी तृणाची काडी । बाळ स्वलीला चिरूनि सांडी । तेंवि चंचूची जाभाडी । उघडूनि फाडी भक्तपति ॥६७॥
चिरूनि केलीं दोन्ही शकलें । लटिकें कपट हरपोनि गेलें । असुरदेह विशाळ पडिलें । देखिलें तें सुरनरीं ॥६८॥

तदा बकारिं सुरलोकवासिनः समाकिरन्नंदनमल्लिकादिभिः ।
समीडिरे चानकशंखसंस्तवैस्तद्वीक्ष्य गोपालसुता विसिस्मिरे ॥४९॥

तेव्हां सकल निर्जरगणीं । नंदनवनींच्या दिव्य सुमनीं । वृष्टि केली गगनींहुनी । नानास्तवनीं स्तविताती ॥६९॥
नाना सूक्तीं जयजयकारीं । स्तवनीं स्तविताती बकारि । पुष्पवृष्टि करिती शिरीं । वाद्यगजरीं उत्साहें ॥२७०॥
पवण पटह ढक्का शंख । अनेक दुंदुभि गोमुख । तंव वितंत तौर्यत्रिक । वाद्यें अनेक गर्जती ॥७१॥
ऐसें देखोनि पशुपबाळ । कृष्णापाशीं मिळाले सकळ । देखोनि दैत्यदेह विशाळ । विस्मय केवळ मानिती ॥७२॥

मुक्तं बकास्यादुपलभ्य दारका रामादयः प्राणमिवविन्द्रियो गणः ।
स्थानागतं तं परिरभ्य निर्वृताः प्रणीय वत्सान् व्रजमेत्य तज्जगुः ॥५०॥

बकें गिळिला होता कृष्ण । तो त्याचिया मुखापासून । मुक्त झाला दैवेंकरून । आम्हां लागून सांपडला ॥७३॥
इंद्रियवर्ग येतां प्राण । स्थानीं स्थानीं सचेतन । कीं अवर्षणीं वर्षतां घन । अवनि सतृण टवटवी ॥७४॥
तेंवी रामादि वत्सपाळ । कृष्णा देखोनि उताविळ । आलिंगिती सप्रेमळ । सुखकल्लोळ पावती ॥२७५॥
मग वत्सें एकवटूनि । अवघीं पाजूनिया पाणी । वत्सें सहित वृंदावनीं । येऊनि वदनीं हे गाती ॥७६॥
व्रजीं सांगती वत्सपाळ । बळ पक्षियां अतिविशाळ । तेणें येऊनि तत्काळ । कृष्ण घननीळ ग्रासिला ॥७७॥
पुन्हा उगळूनि टाखिला क्षिती । मारूं पाहे चंचुघातीं । चंचू धरोनि दोहीं हातीं । टाकी श्रीपति चिरूनी ॥७८॥
कृष्णावरी उमलली फुलीं । पाउसाची सरी वरिखली । आणि वाजंत्रें वाजिन्नलीं । व्योमगर्भीं विचित्रें ॥७९॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP