यदासीत्तदपि न्यूनं तेनान्यदपि संदधे । तदपि द्व्यंगुलं न्यूनं यद्यदादत्त बंधनम् ॥१६॥

तेंही दोन अंगुलें न्यून । देखोनि जोडी त्यांसि अन्य । ऐशीं जोडितां संपूर्ण । नोहे बंधन कृष्णासी ॥२७०॥
दांवीं आटलीं समस्त । दोन अंगुळें न्यून होत । ऐशी यशोदा झाली श्रांत । न पडे अनंत बंधनीं ॥७१॥

एवं स्वगेहदामानि यशोदा संदधत्यपि । गोपीनामुत्स्मयंतीनां स्मयंती विस्मिताऽभवत् ॥१७॥

एवं स्वकृतें स्वगेहदांवीं । मायानिर्मित आघवीं । अवलंबूनि कृष्ण गोंवी । परी पडे उणीवी द्व्यंगुलें ॥७२॥
नामरूप इतुकेंचि उणें । एरव्हीं वेंठे पूर्णपणें । सरलीं घरचीं गोबंधनें । तेव्हां शीणें दाटली ॥७३॥
मग गोपिका इंद्रियवृत्ती । यशोदामायेतें हांसती । शब्द ठेविसी आम्हांप्रति । तुजही श्रीपति नावरे ॥७४॥
गोपिका हांसती खदखदां । झाली विस्मित यशोदा । तयांमाजी तेही प्रमदा । पावोनि मोदा हांसतसे ॥२७५॥
माया मोही चराचरा । त्या मायामोहनी श्रीधरा । बांधितां भूलली सुंदरा । पारावारा उमजेना ॥७६॥
वामहस्तें कडियेवरी । कौटाळूनि धरी हरि । तो अनेक दामांभीतरीं । कोणेपरी न सांठवे ॥७७॥
नाहीं वाढला थोरला । नाहीं लांब रुंद झाला । जैसा तैसाचि संचला । काय नवल सांगों या ॥७८॥
कृष्णैश्वर्ययोगबळें । भूलले यशोदेचे डोळे । प्रत्यक्ष परब्रह्म हें न कळे । झालीं विकळ इंद्रियें ॥७९॥

स्वमातुः स्विन्नगात्राया विस्रस्तकबरस्रजः । दृष्ट्वा परिश्रमं कृष्णः कृपयाऽऽसीत्स्वबंधने ॥१८॥

तथापि भक्तियोगाचें बळ । जेणें आकळिला अनाकळ । तेणें कळवळिला गोपाळ । माता व्याकुळ देखोनि ॥२८०॥
धरितां धांवतां शिणली फार । सुटोनि गेला कबरीभार । तुटले कंठींचे सुमनहार । घर्में गोपाळ पाझरे ॥८१॥
आपुली माता शिणली फार । देखोनि तिचा तो श्रमभर । कृपेनें द्रवला कृपासमुद्र । झाला तत्पर स्वबंधनीं ॥८२॥
ईश्वरेंसहित अवघें विश्व । कृष्णतंत्र हा दाविला भाव । बांधतां विसरली सर्व । दावी उणीव द्व्यंगुलें ॥८३॥
शिवविरिंच्यादि सर्वदेव । नेणती कृष्णाचें लाघव । तेथ भक्ति प्रेमभाव । करी नवलाव तो ऐका ॥८४॥

एवं संदर्शिता ह्यंग हरिणा भक्तवश्यता । स्ववशेनापि कृष्णेन यस्येदं सेश्वरं वशे ॥१९॥

परीक्षिती शुकाचार्य । कोमलामंत्रणें कथी आश्चर्य । भक्तियोगाचें अगाध वीर्य़ । आणि गांभीर्य कृष्णाचें ॥२८५॥
द्व्यंगुल उणीवेच्या संकेता - । माजी प्रकटिली स्वतंत्रता । सेश्वर विश्व स्ववश असतां । भक्तवश्यता स्वीकरी ॥८६॥
जैसा वाढला नदीसी पूर । पुन्हा वोहटे तो सत्वर । तैसा संबंधनप्रकार । स्वयें श्रीधर प्रकाशी ॥८७॥
यशोदा जंव बांधों जाय । तंव दांवें एक आगळें होय । तें काढूनि पुन्हा पाहे । तैसेंचि होय दूसरें ॥८८॥
जें जें दांवें अधिक झालें । तें तें सोडूनि टाकिलें । एका प्रेमें बंधन केलें । कृष्णा आणि उखळातें ॥८९॥
दृढ प्रेमाच्या घेऊनि दोरा । उखळीं बांधिलें दामोदरा । काष्ठा पाषाणा भीतरा । प्रेमनिर्धारा आकळे ॥२९०॥
ईश्वरेंसहित जग ज्या वश्य । तो भक्तीं बांधिला हृषीकेश । दृढ भक्तीचा प्रेमपाश । सविश्वास तुटेना ॥९१॥
ज्याच्या कटाक्षमोक्षणें । चराचरांचें होणें जाणें । त्यासि बंधनभर्त्सनादि घर्षणें । लागे साहणें भक्तांचें ॥९२॥
सर्वगतत्वें पळों गेला । अगोचरत्वें लपोनि ठेला । अविभक्तबोधें तो आकळिला । प्रकट केला सद्भावें ॥९३॥
सर्वभूतदयेचा पाश । खंडूं नेणेचि हृषीकेश । दृश्यामाजी स्वप्रकाश । सदय पुरुष आकळी ॥९४॥
प्रेमपाशें अनेक भक्तीं । बळेंचि आकळिला श्रीपति । त्यांमाजी यशोदेची गति । अगाध शक्ति वदवेना ॥२९५॥

नेमं विरिंचो न भवो न श्रीरप्यंगसंश्रया । प्रसादं लेभिरे गोपी यत्तत्प्राप विमुक्तिदात् ॥२०॥

यशोदाप्रेम सांगतेक्षणीं । सात्त्विकें कवळिला बादरायणि । ज्ञप्ति गेलि उपरमोनि । शब्द वदनीं चांचरला ॥९६॥
थरकोनि रोमांच राहिले उभे । पुलकही तदनुसंक्षोभें । बाष्प स्वेद उभय अंभें । त्वग्भू कोंभें कोंभैली ॥९७॥
मंद मारुत मुंजाटवीं । तेंवि वेपथु तनु डोलवी । नुठे रसज्ञे उठवाठेवी । पडली गोंवी श्वासाची ॥९८॥
तेणें निरूपणाची वाट । न चले देखोनि घडघडाट । परीक्षितीचा दाटला कंठ । पडिला चाकाट प्रज्ञेतें ॥९९॥
प्रमेयामृताच्या एके ताटीं । श्रोतृत्व वक्तृत्व पृथक् पाटीं । बैसोनि जेवितां पडिली मिठी । अनुभव न घोंटी रसज्ञा ॥३००॥
भुलोनि गेली गोडिसेपणा । स्वादु न चोजवितां थकली रसना । प्रमेय प्राशितां उभय कर्णां । अंतःकरणा उपरम ॥१॥
जाणो प्राणांसी मिष्टता । फावली म्हणोनि चंचलता । दूरी करूनि त्या एकांता । भोगी स्वतः नैश्चल्यें ॥२॥
मन होऊनियां उन्मन । चाखे तेथींचें रुचिकरपण । बुद्धि झांकोनि विचारनयन । झाली लीन स्वानंदीं ॥३॥
एवं सात्विकाष्टकें स्पष्ट । श्रोते वक्ते एकनिष्ठ । प्रमेयानुभवीं एक वाट । केले प्रविष्ट स्वानंदीं ॥४॥
बळें नेले त्यां सुटिका न घडे । स्वेच्छागामी स्वसुखें क्रीडे । आवडे तैसा उपौढ पौढे । न बौहुडे बहुडे स्वसत्ता ॥३०५॥
कीं मादक द्रव्यांचा अभ्यासी । भोगी तदुदित आनंदासी । मूर्च्छा जाकळी अनभ्यासी । तेंवि नृपासी अनुमजु ॥६॥
तेथ शुकें पूर्व परामर्ष । करूनि विलंबें सांडिला श्वास । नेत्र पुसोनि हर्षोत्कर्ष । पोटीं अशेष जिरविला ॥७॥
मौळ स्पर्शोनि अमृतहस्तीं । केला सावध परीक्षिति । कोण्या निरूपणें विश्रांति । फावली हे सांग पां ॥८॥
मग फावली जे स्वसुखावस्था । वारंवार कवळी चित्ता । ते ये अपूर्व आतौता । विस्मयामृता आस्वादी ॥९॥
जैशी भूमिका गतायाता । कीं अभुक्तभुक्ता मुग्धा वनिता । तेंवि पावोनि शक्तिपाता । उमजूं चित्ता ये नये ॥३१०॥
ऐसा सुखसिंधूमाझारी । हेलाविती स्वानंदलहरी । तंव आचार्यवाक्यें धरूनि करीं । आणिला तीरीं श्रवणाचे ॥११॥
राया सेवितां अळुमाळ । जया दमाचें रसाळफळ । नोहे देहाचा सांभाळ । ब्रह्मांडगोळसमवेत ॥१२॥
तो हा स्वानंदकल्पतरु । होईं सेवनीं सादरु । ऐसे अनेक चमत्कारु । ज्याचा विस्तारु पाहतां ॥१३॥
मग म्हणे जी योगिराया । मौळें कुरवंडूनि पायां । यशोदाप्रेम श्रवणालया । वसवावयाः प्रवर्ता ॥१४॥
कुरुचक्रचूडावतंससुमना । ऐकें परिक्षिति सज्ञाना । यशोदेची भाग्यतुलना । तुळितां कोणासम नोहे ॥३१५॥
ऊर्ध्व अंतःकरण मन । अधश्चित्त आणि अभिमान । बुद्धि प्रभूचें नाभिस्थान । जेथें जनन विधीचें ॥१६॥
बुद्धि प्रभूचा नाभिदेश । तो पद्मनाभ हृषीकेश । तेथ जन्मोनियां विखनस । नाभिदेश वसवी जो ॥१७॥
पद्मयोनि पद्मासन । समष्टीचा सृजनाभिमान । औरस प्रभूचा नंदन । सदा अभिन्न नाभिस्थ ॥१८॥
तयासी विश्वाभिमानी केलें । सृजनकर्मीं संस्थापिलें । स्थळू आकारीं गोंविलें । परी प्रेमाची ठेविलें चोरूनि ॥१९॥
ग्लानि सांगतां धरित्री । तैं तो क्षीरसिंधूचिये तीरीं । पुरुषसूक्तें स्तवन करी । न लाहें नेत्रीं देखोंही ॥३२०॥
विरंचीची ऐशी दशा । ये अवतारीं केला पिसा । पात्र झाला तो उपदेशा । तें नरेशा मग सांगों ॥२१॥
पद्मा सेवी पादपद्मा । समर्यादतेची परम सीमा । येरव्हीं विलसे भोगकामा । सर्वोत्तमा सर्वांगीं ॥२२॥
वक्षःस्थळीं वामदेशीं । कमला वाहे हृषीकेशी । दक्षिणांगीं श्रीवत्सासी । मध्यदेशीं कौस्तुभ ॥२३॥
जे सगुण निर्गुण उभय भोगा । नेणे अभिन्नभिन्न भागा । परी हा प्रेमा तये जोगा । न करूनि अंगा भुलविली ॥२४॥
मायामयचि अवघें जग । कां पां लक्ष्मीसी नाहीं लाग । तरी या प्रेमाचा प्रसंग । ऐका सांग दृष्टांतें ॥३२५॥
केतकी सकंटक सकळ । नेणे अंगींचा परिमळ । रस परिणमोनि प्रसवे मुकुळ । आमोद बहळ जग वेधी ॥२६॥
तैशी भ्रामक कोरडी माया । भवजळीं बुडवी जीवात्मया । लटक्या भुलवूनियां विषया । करवी आया गमनातें ॥२७॥
तेथ विशुद्ध सुकृतबहळीं । अभेदभक्ति उगवे कळी । प्रेमानंदाची नव्हाली । सप्रेमळीं सेविजे ॥२८॥
तेंवि रमेसी जें अनोळख । यशोदेसी तें फावलें सुख । सुरवर नेणती शक्रादिक । तो संतोख गवळियां ॥२९॥
शंकर भक्तां शिरोमणि । लेवूनि वानरी अंगवणी । समर्याद तिष्ठे चरणीं । हृदयस्थानीं वसतांही ॥३३०॥
एकमेकांचे अभ्यंतरीं । वृक्षबीजाचिये परी । वाढती मोडती स्वानंदभरीं । परस्परीं अभिन्नत्वें ॥३१॥
तया शंभूतें समाधिसुख । ओपूनि संचलें प्रेम अचुक । यशोदे सवतें केलें देख । जें अनोळख सहचरां ॥३२॥
गरुड शेष सनकादिक । कोण महर्षींचा विवेक । नेणती हा प्रेमोत्कर्ष । नारदप्रमुख देवर्षि ॥३३॥
विमुक्तिदायक जो श्रीकृष्ण । प्रसाद लाभली त्यापासून । ते यशोदे ऐसी न लभती जाण । कमलासन श्रीशंभु ॥३४॥
तरी काय येर वायां गेले । नाते भक्तिभाग्याथिले । परी ये अवतारींचिये लीले - । माजी दाविलें हें चित्र ॥३३५॥
ब्रह्मादिकाम न पडे ठायीं । त्यासी यशोदा कवळी बाहीं । दांवां बांधोनि नाकें दाहीं । काढवी पाहीं स्वसत्ता ॥३६॥
ऐसा कोणीं न बांधिला । अथवा तर्जिला निर्भर्त्सिला । एथ अवघें साहे उगला । तो हा बोलिला उत्कर्ष ॥३७॥
एवं एथींचा हा इत्यर्थ । भक्तिगम्यचि इंदिरानाथ । तोचि प्रकाशी श्लोकार्थ । शुक समर्थ कुरुवर्या ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP