अध्याय ८ वा - श्लोक ४० ते ५२

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


किं स्वप्न एतदुत देवमाया किंवा मदीयो बत बुद्धिमोहः ।
अथो अमुष्यैव्ब ममार्भकस्य यः कश्चनौत्पत्तिक आत्मयोगः ॥४०॥

जरी म्हणों हे स्वप्नावस्था । तरी यथापूर्व व्रज सभोंवता । परी बाळका वदनीं अपूर्वता । दिसे तत्त्वतां ब्रह्माम्ड ॥८४॥
जरी म्हणों हे माया वैष्णवी । तरी कां मज ऐशी इतरां न गोंवी । मायामय तें देखिजे सर्वीं । ना कोणी पूर्वीं न वदेची ॥४८५॥
कीं माझीच मोहें व्यापिली बुद्धि । म्हणोनि न देखे यथाविधि । पात्र झाली अन्यथा बोधीं । देखे त्रिशुद्धि विपरीत ॥८६॥
जैसें आपुलेंचि दर्पणीं मुख । आभासें आपणाची सन्मुख । तैसें बाळकावदनीं देख । विश्व अशेख मज भासे ॥८७॥
तरी हा बाळ भावूं मुकुर । बिंबिलें म्हणों चराचर । तरी यामाजीं व्रजेंशीं श्रीधर । आणि मज मी अपर दिसतसें ॥८८॥
आणीकही एकी परीं । बिंबाप्रतिबिंबामाझारीं । विपरीत असोन सन्मुख करी । ते कुसरी एथ नाहीं ॥८९॥
एथ सबाह्य सारिखें जग । न फुटे वितर्कासी मार्ग । बिंबप्रतिबिंब जैसें पृथग । तैसा विभाग एथ नाहीं ॥४९०॥
स्वप्नसंभ्रम मायाभ्रम । अथवा सवबुद्धिविभ्रम । इत्यादि वितर्कीं न कळे वर्म । मग विराम पावली ॥९१॥
मग म्हणे हें अवघें कोडें । उगवूं जातां गोंवी पडे । मी भ्रमलें हें कदा न घडे । पुत्राकडे हें वर्म ॥९२॥
माझा पुत्र हा श्रीकृष्ण । याचाचि हा ऐश्वर्यगुण । बोलिला गर्गाचार्य ब्राह्मण । भविष्यखूण हे याची ॥९३॥
नारायणसमो गुणी । तुझा पुत्र हा चक्रपाणि । ते हे याची अतर्क्य करणी । अंतःकरणीं ओळखिली ॥९४॥
याचा स्वाभाविक हा आत्मयोग । उत्पन्नकाळींचा हा प्रसंग । कोणी न चले वितर्कमार्ग । हा अव्यंत ईश्वर ॥४९५॥
राक्षसीचा पिऊनि पान्हा । वांचला तैं हा होता तान्हा । ते राक्षसी मुकली प्राणा । कैसेनि कोणा न तर्के ॥९६॥
कंटाळोनि याचिया रडा । मंचकीं निजविला कानवडा । लाथा हाणोनि मोडिला गाडा । कथिला पोंवाडा लेंकुरीं ॥९७॥
तैसाचि खेळवितां गोठणीं । झाला गुरुतर पर्वताहूनि । भारें दडपितां ठेविला धरणीं । नेणें करणी मी याची ॥९८॥
अवचित उदेला चक्रवात । त्यामाजीं घेऊनि गेला दैत्य । तोचि पावला अधःपात । हा अक्षत निजयोगें ॥९९॥
जांभईमिसें येणें वदनीं । ऐसेंचि ब्रह्मांड दाविलें नयनीं । याचे मायेची हे करणी । म्यां निजमनीं ओळखिली ॥५००॥
ऐसे नाना तर्कवितर्क । करूनि निश्चय केला एक । आदिपुरुष हा निष्टंक । वृथा अर्भक मी मानीं ॥१॥

अथो यथावन्न वितर्कगोचरं चेतोमनःकर्मवचोभिरंजसा ।
यदाश्रयं येन यतः प्रतीयते सुदुर्विभाव्यं प्रणताऽस्मि तत्पदम् ॥४१॥

ईश्वर तो हा मम नंदन । जो परमात्मा पूर्ण चैतन्य । ऐसें निश्चया आणून । पाहे विवरून त्यावरी ॥२॥
जैसा ऐश्वर्ययोग आहे । तैसा तर्कासि गोचर नोहे । चित्त चकित होऊनि राहे । शुद्धि न लाहे मनबुद्धि ॥३॥
जें या जगाचें अधिष्ठान । ज्याचेनि इंद्रियसमूह सज्ञान । जग प्रकाशे जेणेंकरून । ज्यापासूनि जग भासे ॥४॥
बुद्ध्यादिवृत्तित्वें अविभक्त । ज्यास्तव जग हें प्रतीतिगत । परी तें वास्तव तर्कातीत । मी वंदित तत्पद ॥५०५॥
क्रियेसहित करणवृत्ति । कायिक कर्मांची अभिव्यक्ति । तेणें नये जें प्रतीति । अतर्क्य स्थिति जयाची ॥६॥
चित्तेंसहित जें कां वाचे । श्रमतां वाच्य नोहे साचें । ज्ञेय ज्ञान ज्ञानेंद्रियांचें । त्यासि ज्याचें अज्ञत्व ॥७॥
असो अवितर्क्य ऐसें खरें । तरी कैसें तत्पद या निर्धारें । अभिवंदिलें नमस्कारें । कोण्या विचारें तें ऐका ॥८॥
सुदुर्विभाव्य पदें येणें । अचिंत्य म्हणोनि वाखाणणें । नटके कोणेही धारणे । अध्येय म्हणणें या हेतु ॥९॥
प्रपंच जैसा प्रतीतिगत । हें अचिंत्य अनुभवातीत । ऐसें विवरूनि इत्थंभूत । उपसंहारीत वितर्का ॥५१०॥
ऐसा अचिंत्य जरी होय । तरी मायादि तदन्वय । जीव संसृतिहेतु होय । त्या अभिप्रायें संहारी ॥११॥

अहं ममासौ पतिरेष मे सुतो व्रजेश्वरस्याखिलवित्तपा सती ।
गोप्यश्च गोपाः सहगोधनाश्च मे यन्माययेत्थं कुमतिः स मे गतिः ॥४२॥

नंद जो हा व्रजाधिपति । त्याची वित्तपा मी सती । सकळ कुटुंब माझे हातीं । व्रजसंपत्ति हे माझी ॥१२॥
माझा पुत्र हा श्रीकृष्ण । गोपी गोपाळ माझे स्वजन । माझीं गोधनें माझें सदन । हें जें अज्ञान अहं मम ॥१३॥
ज्याच्या अबोधें ऐशी कुमति । ज्ञानी अविद्या जीसि म्हणती । ते निरसी जो चिन्मूर्ति । परमगति तो माझी ॥१४॥
परमगतीचें कारण । तोचि हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण । पुत्रमोहें मी अज्ञान । करीं घर्षण मूर्खत्वें ॥५१५॥
वदनीं ज्याचे ब्रह्मांडकोटी । तो म्यां नवमास धरिला पोटीं । ऐशी अश्लाध्य मिरवीं गोठी । कुमति खोटी हे माझी ॥१६॥
मग आत्मानुभवें स्तब्ध राहे । ब्रह्मान्वयें विश्व पाहे । मोहभ्रमाची विराली त्राय । फावली सोय स्वसुखाची ॥१७॥
तंव विचारी चक्रपाणि । आत्मस्थितीं राहिल्या जननी । अवतारचरित्रसंपादणी । मग कोठून संपादे ॥१८॥

इत्थं विदिततत्त्वायां गोपिकायां स ईश्वरः । वैष्णवीं व्यतनोन्मायां पुत्रस्नेहमयीं विभुः ॥४३॥

ऐशी विदिततत्त्वा माता । ब्रह्मस्थिति बाणली आणतां । कृष्ण मायेचा नियंता । काय करिता जाहला ॥१९॥
श्रीकृष्ण ईश्वरांचा ईश्वर । जाणोनि गोपीचा साक्षात्कार । मग वैष्णवी मायेचा पदर । मोहपर पांघुरवी ॥५२०॥
विस्तारितांचि वैष्णवी माया । ब्रह्मस्थिति गेली लया । मोहभ्रमें कवळूनियां । पुत्रस्नेहा अनुसरली ॥२१॥

सद्यो नष्टस्मृतिर्गोपी साऽऽरोप्यारोहमात्मजम् । प्रवृद्धस्नेहकलिलहृदयाऽऽसीद्यथा पुरा ॥४४॥

ब्रह्मसाक्षात्कारस्मृति । ज्ञानी पूर्णस्थिति जे म्हणती । ते हारपोनि गेली परौति । पडली भ्रांति मायेची ॥२२॥
कृष्ण लाघवी विश्वव्यापी । आपुला ऐश्वर्ययोग लोपी । तत्काळ नष्टस्मृति गोपी । अंकीं आरोपी आत्मजातें ॥२३॥
स्वात्मस्मृति नष्ट झाली । मोहभ्रमाची निद्रा आली । विश्वाकारें स्वप्नभुली । देखों लागली यथापूर्व ॥२४॥
अंकीं घेऊनि आत्मजातें । स्नेहें जाकळिलेंनि चित्तें । यथापूर्व प्रेमभरतें । भरलें पुरतें मानसीं ॥५२५॥
वदनपद्म कुरवाळून । दिधलें सप्रेम चुंबन । हृदयीं धरिला आलिंगून । समाधान पावली ॥२६॥
कैसें योगमायेचें बळ । ब्रह्मांडाएवढें ढिसाळ । वदनीं देखोनि त्यासी बाळ । मानी तत्काळ यशोदा ॥२७॥
जैसा आपुलालिया भावी । दर्शनें श्रमोनि गोसावी । निर्धारिला जो यशोदा तेंवि । मानी लाघवी पुत्रत्वें ॥२८॥

त्रय्या चोपनिषद्भिश्च सांख्यायोगैश्च सात्वतैः । उपगीयमानमाहात्म्यं हरिं साऽमन्यताऽऽत्मजम् ॥४५॥

त्रयीविद्यार्थप्रतिपादक । इंद्र म्हणती मीमांसक । उपनिषद्बोधें वेदांतिक । निष्कलंक ब्रह्म म्हणती ॥२९॥
सांख्य पुरुष म्हणती ज्यासी । म्हणती परमात्मा योगाभ्यासी । भक्त भवगंत म्हणती ज्यासी । सर्व देशीं सर्वगत ॥५३०॥
ऐशा महत्त्वें दर्शनीं । ज्याचा महिमा गाती मुनि । त्यासी यशोदा पुत्र मानी । जे माया मोहनी वैष्णवी ॥३१॥
ब्रह्मादिकांचा झाला गुरु । दास्य करी स्वयें शंकरु । तो झाला यशोदेचें लेंकरूं । मायापदरु घालूनी ॥३२॥
ध्याना आणिती सनकादिक । तो नंदासि म्हणे जनक । बाळलीलेचें कौतुक । दावी सम्यक् क्रीडोनी ॥३३॥
ऐसें ऐकोनि निरूपण । परीक्षितीचें अंतःकरण । प्रेमभावें कळवळून । करी प्रश्न शुकासी ॥३४॥

राजोवाज - नंद: किमकसद्ब्रह्मन् श्रेय एवं महोदयम् । यशोदा च महाभागा पपौ यस्याः स्तनं हरिः ॥४६॥

अहो जी योगचूडामणि । नंदें कोण्या पुरश्चरणीं । प्रसन्न केला चक्रपाणि । जो बालक्रीडणीं तोषवी ॥५३५॥
कोण तप कोण यज्ञ । कोण व्रत कोण दान । कोण्या पुण्यें श्रीभगवान । फेडी ऋण क्रीडोनी ॥३६॥
ज्यासि वंदिती देवत्रय । तो श्रीकृष्ण झाला तनय । ज्या पुण्यां हा महोदय । तें कोण श्रेय आचरला ॥३७॥
आणि यशोदेचें कोण पुण्य । जें पुत्र होऊनि श्रीभगवान । करी सप्रेम स्तनपान । बळें रिघोनि उत्संगीं ॥३८॥
मायाअघटिघटनापटीं । तेही देखों न लाहे दृष्टीं । त्यासि धर्षी घेऊनि यष्टि । धांवे पृष्ठीं यशोदा ॥३९॥
कोण भाग्य यशोदेचें । कोण सुकृत श्रीनंदाचें । जें ध्येयध्यान विधिहरांचें । तें बाळक ज्यांचें लडिवाळ ॥५४०॥
सुतपापृश्नि अकल्मष । ज्यांचा स्वमुखें श्रीपरेश । तृतीयाध्यायीं तपोत्कर्ष । वदला विशेष प्रकटोनी ॥४१॥

पितरौ नान्वविदेतां कृष्णोदारार्भकेहितम् । गायन्त्यद्यापि कवयो यल्लोकशमलापहम् ॥४७॥

तया तपाचिया उत्तीर्णा । प्रसन्न झाला त्रैलोक्यराणा । रूप दावूनि कथिल्या खुणा । परी तीं या क्रीडणा न देखती ॥४२॥
श्रीकृष्णाचें बालचरित । जें उदार त्रैलोक्यांत । श्रवणमात्रें शमलपर्वत । भस्म करीत श्रोत्यांचें ॥४३॥
अद्यापि ज्ञानसंपन्न गाती । श्रीकृष्णाची बाळकीर्ति । त्यांचें दास्य करिती मुक्ति । जे ऐकती सद्भावें ॥४४॥
वसुदेवदेवकीचिया डोळां । अप्राप्त कृष्णाची बाळलीला । तो नंदयशोदा भोगिती सोहळा । त्यांचा आगळा महोदयो ॥५४५॥
तरी कोण पुण्य तयांचे गांठीं । ऐशी आशंका माझिये पोटीं । हे तुज विदित अवधी गोठी । समर्थ सृष्टीं तूं वक्ता ॥४६॥
ऐकोनि सप्रेम नृपाचा प्रश्न । आनंदला व्यासनंदन । तेणें उल्हासें करी कथन । सावधान तें ऐका ॥४७॥

द्रोणो वसूनां प्रवरो धरया सह भार्यया । करिष्यमाण आदेशान् ब्रह्मणस्तमुवाच ह ॥४८॥

शुक म्हणे गा कुरुभूषणा । श्रोतयांमाजी विचक्षणा । करूं जाणसी सप्रेमप्रश्ना । अंतःकरणा निवविसी ॥४८॥
श्रोता प्रश्नाचें नेणें अंग । तैं वक्त्याचा मनोभंग । संवादसुखाची न चढे सीग । मोडे मार्ग बोधाचा ॥४९॥
यालागीं तुझिया श्रोतेपणा । वाटे कुरवंडावें प्राणा । ऐशिया श्रवणनिरूपणा - । पुढें ठेंगणा अपवर्ग ॥५५०॥
तरी ऐकें गा कौरवप्ति । प्रार्थिला देवकीनें श्रीपति । कीं माझे सदनीं तव उत्पत्ति । कंसाप्रति न कळों दे ॥५१॥
तिची पुरवावया आर्ति । सुप्रसन वरदमूर्ति । होऊनि स्वमुखें बोधिली युक्ति । गोकुळाप्रति न्यावया ॥५२॥
आणि नंदयशोदेचा भाव । जाणे सर्वज्ञ श्रीकेशव । देवकीपोटीं अभिप्राव । तोचि स्वयमेव स्फुरविला ॥५३॥
एरव्हीं देखोनि प्रभूची मूर्ति । महिमा जाणोनि केली स्तुति । मग कंसभयाची खंती । कां पां चित्तीं उरवी ॥५४॥
परी हें प्रभूचें सर्व करणें । देवकीच्या अंतःकरणें । वर मागोनि कंसाभेणें । गोकुळा येणें याचिलें ॥५५५॥
यालागीं देवकी वृष्णिपाळा । नाहीं फावली बाळलीळा । नंदयशोदा दैवें डोळां । तो सोहळा भोगिती ॥५६॥
नंदयशोदेचें पूर्वपुण्य । काय म्हणोनि केला प्रश्न । तरी ययाचें प्रतिवचन । सावधान अवधारीं ॥५७॥
विधि हर सुरवर आणि धरणी । विष्णु स्तवितां भूभारहरणीं । प्रसन्न होऊनि चक्रपाणि । वरदवाणी आज्ञापी ॥५८॥
मी अवतरेन वृष्णिकुळीं । देवीं जन्मावें भूमंडळीं । तदनुसार देवता सकळी । ब्रह्मा ते काळीं आज्ञापी ॥५९॥
तैं वसूंमाजी प्रवर द्रोण । त्याची भार्या धरा जाण । त्यांहीं प्रार्थिला चतुरानन । विनीत होऊनि सद्भावें ॥५६०॥

जातयोर्नौ महादेवे भुवि विश्वेश्वरे हरौ । भक्तिः स्यात्परमा लोके ययांऽजो दुर्गतिं तरेत् ॥४९॥

तुझिये आज्ञेप्रमाणें स्वामी । अवश्य जन्म धरूं भूमीं । परी बाळलीला आमुचे सद्मीं । देखो आम्ही सप्रेमें ॥६१॥
आज्ञेप्रमाणें बल्लवयाती । आम्ही जन्म पावल्या क्षितीं । सप्रेम द्यावी प्रभूची भक्ति । जेणें दुर्गति निस्तरों ॥६२॥
दुःखहर्ता जो श्रीहरी । जो विश्वाचें रक्षण करी । त्याची परमभक्ति अव्यभिचारी । वसो अंतरीं तव वरें ॥६३॥
जये भक्तीचिये नौके । बैसोनि भवाब्धि निस्तरों सुखें । बाधों न शकती अनेक दुःखें । भवजल नखें न स्पर्शों ॥६४॥

अस्त्वित्युक्तः स भगवान् व्रजे द्रोणो महायशाः । जज्ञे नंद इति ख्यातो यशोदा सा धराऽभवत् ॥५०॥

ऐसा विरंचि प्रार्थिला । शुद्ध भावें संतोषला । तथास्तु म्हणोनि वर वोपिला । आनंद झाला दंपती ॥५६५॥
मग तोचि द्रोण भूमंडळीं । जन्म पावला बल्लवकुळीं । धरा देवी प्रेमागळी । झाली वेल्हाळी यसोदा ॥६६॥
महायशा हें संबोधन । अभीष्ट पावला म्हणऊन । पोटीं जन्मला भगवान । ख्यात म्हणून तिहीं लोकीं ॥६७॥

ततो भक्तिर्भगवति पुत्रीभूते जनार्दने । दंपत्योर्नितरामासीद्गोपगोपीषु भारत ॥५१॥

ब्रह्मयाचेनि वरदानें । पुत्र झालेनि जनार्दनें । नंदयशोदेचिया मनें । सप्रेमभजनें कवळिजे ॥६८॥
आत्मा सर्वांसि प्रियकर । हा तो परमात्मा जगदीश्वर । गोप गोपी प्रेमादर । धरूनि तत्पर या हेतु ॥६९॥
आणि हरिप्रिय करावयाकरणें । सुरस्त्रियांहीं गोपिका होणें । त्यामाजी इयें दोघें जणें । अत्यंत भजनें अथिलीं ॥५७०॥
उदक सर्वांचें जीवन होय । परी मीना वियोगचि न साहे । तैशी गोप गोपीहूनि मोहें । पुत्रस्नेहें कळवळती ॥७१॥

कृष्णो ब्रह्मण आदेशं सत्यं कर्तुं व्रजे विभुः । सहरामो वसंश्चक्रे तेषां प्रीतिं स्वलीलया ॥५२॥

कृष्णपरमात्मा श्रीभगवान । ब्रह्मयाचें आशीर्वचन । सत्य करावया लागून । म्हणवी नंदन नंदाचा ॥७२॥
स्वसामर्थ्यें सदोदित । ज्याचें ऐश्वर्य अव्याहत । विभु बाळत्वें क्रीडत । रामासहित गोकुळीं ॥७३॥
बाळलीला नानापरी । करूनि पितरांचे अंतरीं । सप्रेम भक्ति वर्धन करी । स्नेह वरिवरी पसरूनि ॥७४॥
ज्या मोहें पश्वादि योनि । स्नेहें गुंतती स्वसंतानीं । घेऊनि बाळकाची अवगणी । नंदसदनीं तो क्रीडे ॥५७५॥
यालागीं यशोदेच्या पोटीं । कल्पांतींही क्रोध नुठी । कृष्णापराधाचिया गोठी । प्रीति मोठी ऐकावया ॥७६॥
कृष्ण अपराध करी गाढे । यशोदेपोटीं संतोष वाढे । त्याचें कारण हें तुजपुढें । कथिलें निवाडें कुरुवर्या ॥७७॥
पुढिले अध्यायीं निरूपण । यशोदेचें प्रेमगहन । पहावया श्रीभगवान । करी विंदान तें ऐका ॥७८॥
तये कथेचिया श्रवणीं । पुण्यश्लोकांसी आमंत्रणीं । भगवद्गुणामृतभोजनीं । नाहीं वाणी स्वसुखाची ॥७९॥
अद्वैतसुखाचे अमरावती - । माजि एकनाथ अमरपति । विज्ञानवज्र घेऊनि हातीं । भेददुर्मतिविच्छेत्ता ॥५८०॥
चिदानंदचिंतामणी । स्वानंदसुरतरुउद्यानीं । गोविंदकृपामंदाकिनी । अमृतवाहिनी भवहंत्री ॥८१॥
तये सांठवणेसि पात्र । केला द्यार्णव स्वतंत्र । ग्रंथमिषें सुखें सन्मात्र । श्रोते पवित्र साधिती ॥८२॥
तया श्रीमद्भागवता । अष्टादशसहस्रगणिता । परमहंसाची संहिता । परमामृतप्रापक ॥८३॥
महापुराण हें प्रसिद्ध । त्यामाजि हा दशमस्कंध । शुकपरीक्षितिसंवाद । अध्याय विशद अष्टम ॥८४॥
इतिश्रीमद्भागवते महापुराणेंऽष्टादशसहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां नामकरणबालक्रीडाविश्वरूपदर्शनमहोदयकथनं नामाष्टमोऽध्यायः ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोकसंख्या ॥५२॥ ओंवीसंख्या ॥५८४॥ एवं संख्या ॥६३६॥ ( आठ अध्याय मिळून ओवीसंख्या ५००८)

आठवा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP