गोकुलं सर्वमावृण्वन् मुष्णंश्चक्षूषि रेणुभिः । ईरयन्सुमहाघोरशब्देन प्रदिशो दिशः ॥२१॥

सर्वगोकुळा भंवतीं भवरी । देतां गोकुळ पडिलें फेरीं । धुळी घालूनि नेत्रद्वारीं । केलीं घाबरीं व्रजवाई ॥२९०॥
डोळा नुघडवे कोणासी । दृष्टि चोरून नेली ऐशी । सर्व बैसलीं आंधळीं तैशीं । कोणी कोणासी न देखती ॥९१॥
रेणु दाटले नेत्रकमळीं । मुखामाजीं भरल्या धुळी । मुखें झांकोनि स्थळोस्थळीं । बैसले सकळी व्रजवासी ॥९२॥
अतिकर्कश शब्द कराळ । उठतां कोंदलें दिग्मंडळ । तेणें भयभीत प्राणि सकळ । पडिले व्याकुळ दशदिशा ॥९३॥

मुहूर्तमभवद्गोष्ठ रजसा तमसावृतम् । सुतं यशोदा नापश्यत् स्वयं न्यस्तवती यतः ॥२२॥

वाळुका उडती अंतराळीं । सूर्यमंडळ कवळी धुळी । सूर्यप्रभेतें झांकोळी । पडिला गोकुळीं अंधार ॥९४॥
गोरजें दाटलें व्रजपुर । आवर्ती पडिलें चराचर । वृक्ष मोडूनि झाले चूर । प्राणी समग्र त्रासले ॥२९५॥
संपत्तिभ्रूभंगगरुडाकारें । उटजें गगनीं घेती फेरे । पक्षियांचे मोडले थारे । फिरती समग्र तृणप्राय ॥९६॥
वस्त्रें फिटोनि गेलीं गगना । कित्येक विकळ नग्नांगना । उघडीं बोडकीं करिती रुदना । त्यांची गणना कोण करी ॥९७॥
वातें वाळू गगनीं भडके । सडसडाटें अंगीं सडके । त्रासती उघडे आणि बोडके । उडती फडके आंगाचे ॥९८॥
मुहूर्त म्हणजे घटिकाद्वय । धूलिध्वांतें गोकुळीं भय । वर्तलें जैसा महाप्रलय । प्रकट होय अकाळीं ॥९९॥
ऐशियेही प्रलयकाळीं । धैर्यें बाळातें सांभाळी । तंव तो न देखे वनमाळी । ठेविले स्थळीं यशोदा ॥३००॥
आरतीपरती चांचपडी । बाळालागोनि हांक फोडी । डोळां पडलीसे झांपडी । दृष्टि उघडी करवेना ॥१॥
ऐसेचि सर्वही व्रजपुरवसी । पीडा पावले यशोदेसरसी । कोणी नोळखती कोणासी । पांसुवर्षीं त्रासले ॥२॥

नापश्यत्कश्चनाऽऽत्मानं परं चापि विमोहितः । तृणावर्तनिसृष्टाभिः । शर्कराभिरुपद्रुतः ॥२३॥

कोणी आपणासीच न पाहे । तेथ परांची गोष्टी काय । कोणी कोणाची न लाहे । शुद्धि मोहें व्यापिलें ॥३॥
यमुनारेती नगरमाती । उकरडे उडोनि गगना जाती । तृणावर्तें केली ख्याति । प्राणी कांपति उपद्रवें ॥४॥
नाकीं तोंडीं धुळी भरे । प्राणी जाहले घाबरे । विचार कोणातें न स्फुरे । परस्परें अनोळख ॥५॥

इति खरपवनचक्रपांसुवर्षे सुतपदवीमबलाऽविलक्ष्य माता ।
अतिकरुणमनुस्मरंत्यशोचद्भुवि पतिता मृतवत्सका यथा गौः ॥२४॥

ऐसें तृणावर्ताचें पवनचक्र । व्रजीं फिरतां परम वक्र । तारकासुरें त्रासिला शक्र । तैसें समग्र त्रासले ॥६॥
पांसुवालुकावृष्टि होतां । ऐसा वळसा व्रजीं वर्ततां । पुत्र ठेविले ठायीं नसतां । झाली माता व्याकुळ ॥७॥
बाळकाची न लक्षे वाट । दुःखें झाला हृदयस्फोट । मग पिटोनिया ललाट । करी बोभाट आक्रोशें ॥८॥
जैशी मृतवत्सका वाय । हंबरडा हाणोनि बोभाय । हृदय फुटोनि मोकली धाय । म्हणे काय करूं आतां ॥९॥
मज निर्दैवेसी नीलमणि । अमूल्य लाधला वृद्धपणीं । दुर्वातसंस्कारें झडपोनि । नेला हिरोनि हातींचा ॥३१०॥
अनापत्यें दुःखें शिणलें । अल्पसुकृतसेजे पहुडलें । स्वप्नीं सुपुत्रफळ लाधलें । तें हारपलें विघ्नोदयीं ॥११॥
चक्रवात हा तस्कर । पुत्रसुखाचें मम मंदिर । फोडून इंद्रनीलभांडार । हरोनि अनंत खोंचिलें ॥१२॥
दुर्दिन आले गे साजणी । सुनीलप्रभेचा लोपला तरणि । मनोविश्रांति हृत्पद्मिनी । झाली सुकोनि मुकुलित ॥१३॥
अरे बाळका प्राणसखया । कोठें गेलासी पुत्रराया । मज पाषिणीची अक्षतकाया । दुःख भोगावया वांचली ॥१४॥
आतां चुंबिलें तुझें वदन । पुसिलें नयनींचें अंजन । नाहीं दिधलें स्तनपान । कैसें प्राक्तन फूटलें ॥३१५॥
कुंतलप्रभा भ्रमरा लोपी । त्यावरी म्यां लेवविली टोपी । कोठूनि दुर्वात उदेला पापी । अमृतवापी डहुळिली ॥१६॥
जेव्हां मजवरी पडिला भार । तेव्हांच दचकलें अंतर । ऐसें जाणतें कातर । तरी कां दूर मी करितें ॥१७॥
ऐशी नाना परी विलपणीं । अबला आक्रंदे गौळणी । मृतवत्सका धेनु तान्ही । तैशी धरणी लोटली ॥१८॥

रुदितमनुनिशम्य तत्र गोप्यो भृशमनुतप्तधियोऽश्रुपूर्णमुख्यः ।
रुरुदुरनुपलभ्य नंदसूनुं पवन उपारतपांसुवर्षवेगे ॥२५॥

कार्य साधूनि चक्रवात । गगनीं प्रवेशला तो दैत्य । तेणें धुळोरा गगना आंत । भरे भ्रमत गरगरां ॥१९॥
जैसा सुरद्रुम वाढे सरळ । कीं गगनस्तंभ अतिविशाळ । कीं प्रलयरुद्रें रोंविला शूळ । ब्रह्मांडगोळपर्यंत ॥३२०॥
ऐसा उपरम पावल्या वात । पांसुवृष्टि झाली शांत । झडझडाटें कर्कश ध्वनित । तें निवांत राहिलें ॥२१॥
एवढी चक्रवातें थोरी । केली गोकुळीं आपापरी । ते उपशमली महामारी । पाहती घाबरीं प्राणियें ॥२२॥
ऐसें वारूनि गेलियां विघ्न । यशोदेचें आक्रंदन । अकस्मात होतां श्रवण । आल्या धांवोनि गोपिका ॥२३॥
हाहाकारें आक्रंदती । हृदयें पिटोनि विलपती । दाही दिशा शुद्धि करिती । गति न लभती बाळकाची ॥२४॥
यशोदेच्या पडोनि गळां । कित्येक विलपिती व्रजबाळा । कित्येकी पिटिती कपाळा । पडिल्या व्याकुळा सशोका ॥३२५॥
हृदयें तापलीं करुणास्वरें । रुदतां अश्रु नेत्रद्वारें । ढळती तयांच्या पाझरें । भिजलीं अंबरें नेणती ॥२६॥
असो गोपिकांचा हा शोक । आक्रंदती व्रजींचे लोक । पशुपक्षियां झालें दुःख । सर्वां समत्व हरिविरहें ॥२७॥
आतां बाळकाचें हरण । करूनि गेला दुष्ट पवन । तये कथेचें निरूपण । सावधान परियेसा ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP