रुदंतं सुतमादाय यशोदा गृहशंकिता । कृतस्वस्त्ययनं विप्रैः सूक्तैः स्तनमपाययत् ॥११॥

उलथूनि शकट पडिला दुरी । अक्षत बाळ पर्यंकावरी । रुदतां देखोनि घाबरी । दोहीं करीं उचलिला ॥४१॥
भूतप्रेतपिशाचवारें । किंवा पीडिजे शनैश्चरें । राहुकेतुगुरुभास्करें । वक्रें अतिचारें पीडिजे ॥४२॥
ऐशी ग्रहशंका मानूनि मनीं । ब्राह्मणांच्या लागली चरणीं । शांतिसूक्तें विघ्नशमनीं । पुत्ररक्षणीं प्रार्थिले ॥४३॥
रक्षोघ्नें सूक्तें मंत्रघोष । केलें स्वस्त्ययन बाळकास । बैसोनि मग सावकाश । स्तनपानास दीधलें ॥४४॥
नेणोनि हरिचरितप्रभाव । मग ते करिती रक्षणोपाव । मिळोनि अवघेचि बल्लव । म्हणती दैव नंदाचें ॥१४५॥

पूर्ववत्स्थापितं गोपैर्बलिभिः सपरिच्छदम् । विप्रा हुत्वाऽर्चयांचक्रुर्दध्यक्षतकुशांबुभिः ॥१२॥

मग गोपाळ मिळूनि बलिष्ठ । शकलें करूनि एकवट । यथापूर्व स्थापिला शकट । गोरसघट सांठविले ॥४६॥
ब्राह्मणांच्या मंत्रघोषें । ग्रहशांति पुत्रोद्देशें । हवन करवूनि संतोषें । मग शकटास पूजिलें ॥४७॥
दधिअक्षतकुसुमें कुश । जलादि उपचार निर्दोष । शकट पूजोनि सावकाश । बलिदानास अर्पिलें ॥४८॥
सायुधसशक्तिदिग्देवता । समाष सदीप बलि तत्त्वता । अर्पूनि कल्याण इच्छी सुता । यशोदा माता स्नेहाळ ॥४९॥
इंद्रादि अष्टदिशा बलिदान । करूनि केलें द्विजपूजन । त्यांच्या मुखें आशीर्वचन । विघ्नोपशमनें प्रार्थिलें ॥१५०॥
आस्तिक्यबुद्धि सविश्वास । मनीं मानिला परमोल्हास । म्हणे तपोधनांचे हे आशिष । सहसा फोस न होती ॥५१॥

येऽसूयानृतदंभेर्ष्याहिंसामानविवर्जिताः । न तेषां सत्यशीलानामाशिषो विफलाः कृताः ॥१३॥

शुक म्हणे गा यशोधना । विश्वास न बाणे ज्याचिया मना । सफलत्व त्याचिया आचरणा । नाहीं नाना साधनीं ॥५२॥
तीर्थीं विश्वास ज्यासि नाहीं । ते यात्राधांवणी वृथा पाहीं । तपोविश्वास नसतां देहीं । कीकटमहि सत्क्षेत्र ॥५३॥
अविश्वासिया देवताबुद्धि । भजन कल्पांतीं नेदी सिद्धि । जरी तो आचरे नानाविधि । ते त्या बाधी परतोनि ॥५४॥
सुवर्णपाषाणें फुटली डोई । पाषाणक्रियेसी पडिला मही । सुवर्णविश्वास बाणल्या देहीं । मग दुःख तेंही सुख वाटे ॥१५५॥
तेंवि तीर्थव्रतादि नाना कष्ट । अविश्वासें दुःख श्रेष्ठ । सविश्वासें फल अभीष्ट । सुख यथेष्ट उपजवी ॥५६॥
दैवज्ञ सांगती मुहूर्त प्रश्न । विश्वासहीना सर्व शून्य । विश्वास धरितां विप्रवचन । सफळ पूर्ण विघ्न हरी ॥५७॥
सद्गुरूसी रिघोनि शरण । महावाक्यार्थ केला श्रवण । भजनीं विश्वास नसतां पूर्ण । जन्ममरण चुकेना ॥५८॥
गुरुवाक्येंचि मोक्ष होय । वृथा दास्य करणें काय । ऐसा जयासी संशय । नरका जाय तो प्राणी ॥५९॥
स्तनापासूनि प्राप्त दुग्ध । गायपोषणें मानी खेद । सौंदर्य मात्र सुरतप्रद । येर दुःखद स्त्री ओझें ॥१६०॥
चरणांगुष्ठीं वर्ते तीर्थ । भोजनाचा वृथा स्वार्थ । असो हे अर्थाचे अनर्थ । ग्रंथ किमर्थ वाढवूं ॥६१॥
सविश्वासें काथामेथा । घेतां निरसोनि जाय व्यथा । वैद्यें ठकिलें जठरस्वार्था । हें मानिल्या वृथा रससिद्धीं ॥६२॥
इत्यादि दृष्टांतेंकरून । फळे विश्वासें साधन । तैसें विप्रांचें आशीर्वाचन । सफळ जाण विश्वासें ॥६३॥
सद्भावें जो सविश्वासी । भजनें देव भेटे त्यासी । देवां भक्तां प्रीति सरसी । मग विघ्नांसि नुरणूक ॥६४॥
एवं तीर्थीं क्षेत्रीं देवीं द्विजीं । मंत्रीं दैवज्ञीं भेषजीं । ज्यासी भवना नुपजे दुजी । सुखसमाजीं तो बैसे ॥१६५॥
तीर्थक्षेत्रदेवब्राह्मण । भवरोगहर्ता गुरु दैवज्ञ । हे पाहतां भिन्नभिन्न । इतुकीं अभिन्न जे ठायीं ॥६६॥
ऐसे महंत तपोधन । असूया अनृत दंभ अभिमान । ईर्ष्या हिंसादि सर्व दुर्गुण । ज्यांपासून निरसले ॥६७॥
असूयेचें इतुकें रूप । सद्गुणीं करूनि दोषारोष । निंदेसारिखें महापाप । आपोआप मग जोडे ॥६८॥
जारां जारस्त्रियांची रति । चोरां परांची धनसंपत्ति । निंदकांचे तोंडीं माती । सुखाची प्रपति नसतांही ॥६९॥
समुद्रीं जैशीं सकळ तीर्थें । सत्यामाजीं सकळ व्रतें । तैशीं निंदेमाजीं समस्तें । महादुष्कृतें नांदती ॥१७०॥
आपणासहित पूर्वज सकळ । वृद्धिसम वेंधे कुळ । नरकामाजीं बुडे केवळ । निंदाशीळ झालिया ॥७१॥
ऐशी असूया न शिवे ज्यासी । तोचि तपोधनाचा राशि । त्याच्या पादस्पर्शें दोषी । महापापासी नाशिती ॥७२॥
ब्रह्मांडांतील पातक पूर्ण । भूत भविष्य वर्तमान । अनृतगर्भी नांदे जाण । सत्य भाषण त्या नाशी ॥७३॥
जो नातळे असत्यासी । तो परब्रह्माचि मनुष्यवेषी । उपमा आणीक नाहीं त्यासी । वेदशास्त्रांसी धुंडितां ॥७४॥
दंभ म्हणजे औडंबरी । आंत नसोनि दावी वरिवरी । जेंवि वेश्यांची सामग्री । बाह्य साजिरी लावण्यें ॥१७५॥
विष भक्षूनि अमृत म्हणे । तो स्वेच्छा कवळिया मरणें । तेंवि दंभाचेनि शहाणपणें । स्वहित नेणे पापिष्ट ॥७६॥
अंतरीं दुःखाचिया कोटी । वरिवरि सांगे ज्ञानगोठी । घालूनि टोपी माळा कंठीं । लोकहाटी मिळवितो ॥७७॥
सुकृत तप तीर्थ वाखाणी । केल्या व्रताची सांगे कहाणी । ज्ञान विकूनि महत्त्व आणी । भिक्षेलागूनि टोंकत ॥७८॥
राजद्वारीं भीड फार । श्रीमंतांसि करी आदर । द्रव्यसाधनीं तत्पर । व्याग्व्यापार ज्ञानादि ॥७९॥
येणें परमार्थाची हानि । सर्वसाधनीं पडे घाणी । दंभें तरला ऐसा कोणी । नाहीं श्रवणीं ऐकिला ॥१८०॥
ऐसा दंभ दवडूनि दुरी । निर्दंभ साम्राज्य स्वीकारी । सफळ तयाची वैखरी । सर्व नरसुरीं इच्छिजे ॥८१॥
ईर्ष्या म्हणजे सापत्नभाव । वरिवरि साधुत्वें लाघव । माजीं द्वेषा दिधला ठाव । जैसा घाव अंतरींचा ॥८२॥
मुखदाक्षिण्यें अतिनिर्मळ । मागें एकमेकांचें कुटिळ । पैशून्योक्तीची तळमळ । लागे हळहळ परस्परें ॥८३॥
एके अन्नमानप्राप्तीसाठीं । पडे बहुतांची जेथ गांठी । ज्ञात्यांमाजीं द्वेष उठी । ईर्ष्या खोटी ते ऐसी ॥८४॥
ऐसे ईर्ष्योसि तिळांजळि । देऊनि सुखाचे सुकाळीं । ईर्ष्यारहित सर्वकाळीं । स्वानंदमेळीं क्रीडती ॥१८५॥
तयांच्या दर्शनें स्पर्शनें । होती तीर्थादिकें पावनें । विश्व तारिलें त्यांच्या पुण्यें । सकळ भाषणें तयांचीं ॥८६॥
भूतमात्रीं देखोनि दुःख । ज्याचे अंतरीं वाटे सुख । तोचि जाणावा हिंसक । हिंसादोष तो पोषी ॥८७॥
प्राणिमात्रीं दुःख देणें । याचि नामें हिंसा म्हणणें । ते निरसिली दयाळूपणें । सफळ साधनें तयांचीं ॥८८॥
आतां अभिमान कैसा कायी । तरी जो ज्ञानियांसि बांधोनि पायीं । फिरतां नाचवी ठायींठायीं । त्याची नवाई काय सांगों ॥८९॥
अभिमान प्रतापी दुर्मद । चाळी ज्ञानियांसी दृढ । लोकत्रयीं बांधोनि विरुद्ध । ऐश्वर्यपद भोगितसे ॥१९०॥
जेणें रुद्र जिंकिला समरीं । धरूनि घातला तोडरीं । मग आपुले पदवीवरी । अहंकारीं स्थापिला ॥९१॥
अभिमान जिंकावयालागुनी । रुद्र बैसला पै श्मशानीं । काम जाळूनि समरांगणीं । घाव निशाणीं घातला ॥९२॥
तंव तो अभिमान महाबळी । रुद्र आणोनि आज्ञेतळीं । त्रिपुरासुराची करवी होळी । आणि रांगोळी जालंधराची ॥९३॥
ब्रह्मयासी विश्व बंदी । अभिमानें तो घातला बंदीं । विश्वाभिमानी स्थूळ पदीं । जागृत बोधीं स्थापिला ॥९४॥
भरूनि अभिमानाचें वारें । विष्णूसि लाविलें फेंपरें । म्हणोनि दैत्यांच्या संहारें । आविष्कारे घडिघडी ॥१९५॥
मत्स्य मी म्हणोनि अभिमान धरी । बळेंचि शंखापुरा मारी । कूर्मपणें भरे भरीं । मंदरगिरि पृष्ठीं घे ॥९६॥
क्षणैक उमजे सावधपणें । विश्वांतरात्मा आपण म्हणे । सवेंचि झडपितां अभिमानें । धर्मरक्षणें वावडे ॥९७॥
डुकरा ऐशी दे मुसांडीं । बळें हिरण्याक्षा हाणोनि पाडी । दह्री स्वर्गाची उतरडी । घालोनि बुडीं दंष्ट्राग्र ॥९८॥
उमजोनि म्हणे मी सर्वगत । तंव अभिमानाचा फेरा येत । खांबींच प्रकटे गुरगुरित । घोंटी रक्त दैत्याचें ॥९९॥
कांहीं सावध होऊनीया राहे । निरभिमानें लाथही साहे । तंव विश्वरक्षणें संचार होय । मग देह खर्वाचें ॥२००॥
सांडूनि व्यापकपणाचें तुक । नीच होऊनि मागे भीक । घेऊनि छळणाचा कलंक । होय रंक नीचाचां ॥१॥
अहंकाराचें वारें उतरे । आपण अद्वैत ऐसें स्मरे । तंव भक्तममतेचें येतां घुरें । अभक्तमारें वावडे ॥२॥
करूनि सुदर्शनकुर्‍हाडी । क्षत्रियवंश जाळी तोडी । आत्माराम हे विसरोनि गोडी । राक्षसकोडी संहारी ॥३॥
आत्माराम  पूर्णब्रह्म । अभिमान लावी त्या आश्रमधर्म । भोगवी वनवासादि श्रम । म्हणवी ब्रह्महत्यारा ॥४॥
परब्रह्मासी प्रायश्चित्त । ऐसें अभिमानाचेम कृत्य । सर्वसाक्षी तो दुष्कृत । नसतां लावित स्त्रियेसी ॥२०५॥
स्वाभिमानें लोकापवाद । चुकवावया निरपराध । वनीं वनितेसि ओपी खेद । जो अभेद जगदात्मा ॥६॥
माझी दारा माझें गेह । माझा पुत्र मित्र गोत्रसमूह । नाचे अभिमानें घेऊनि मोह । जो निःसंदेह निर्गुण ॥७॥
तैजसाभिमानें विष्णु शेवटीं । लिंगहिरण्यगर्भमठीं । कोंडूनि घातला वैकुंठीं । न सुटे मिठी अद्यापि ॥८॥
झांकूनि निर्विकल्पपटीं । अंतःकरणक्षीराब्धिपोटीं । निद्रा करी दाटोदाटी । जो जगजेठी परमात्मा ॥९॥
नारद झडपिला जातांजातां । झाला नलकूबरा शापिता । दुर्वासअंबरीषांची काय कथा । कीं धरिली व्यथा कौशिक ॥२१०॥
जेव्हां मजवरी दांत खाय । तैं मी जनकाचें स्मरें पाय । निर्लज्ज हरिकीर्तन गाय । केवळ गाय म्हणोनि ॥११॥
राजा म्हणे योगेश्वरा । जेणें लोळविल्या एवढ्या धुरा । कोणीतरी या सामोरा । समरीं पुरा उरलासे ॥१२॥
शुक म्हणे ऐकें राया । ऐशी दुर्धर कथिली माया । अभिमानाच्या पुशिलें ठाया । त्या रोगियां अवधारीं ॥१३॥
आदिनारायणाच्या प्रतापें । एवढा अभिमान चळीं कांपें । जडभरताच्या भेणें लपे । जनकें दापें दापिला ॥१४॥
ऋषभदेवाचे जे कुमार । नवहीजण महाशूर । तयांच्या स्मरणें अहंकार । उभें शरीर टाकितो ॥२१५॥
कदर्य होऊनि संन्यासी । तोडरीं घाली अभिमानासी । प्रर्‍हादाचे मोकळ्या केशीं । अहर्निशीं पद झाडी ॥१६॥
अनसूयेचा वरद कुमार । दत्तात्रेय दिगंबर । ज्याचा करितां नामोच्चार । अहंकार विरे उभा ॥१७॥
ऐसे निरभिमान जगजेठी । राया असती कोट्यानुकोटी । विसरले देहात्मरहाटी । त्यांच्या गोठी कोण करी ॥१८॥
राजा अभिमान त्रिभुवनीं । त्याचे शत्रु निरभिमानी । राया भेणें त्यांची कोणी । कीर्ति वदनीं न वदती ॥१९॥
जिहीं सांडिला अभिमान । ते जीतचि मरोनि ठेले जान । जैसे मृत्पिंड पाषाण । सचेतन असतांची ॥२२०॥
उपाधीवरूनि जाणती लोक । कीर्ति तितुकी सोपाधिक । जे कूटस्थ निरूपाधिक । कोणा ठाउक ते होती ॥२१॥
राजा म्हणे योगेश्वरा अभिमान नागवी ज्ञानियां चतुरां । कोणे युक्तीं ऐसें करा । मम विचारा माजिवडें ॥२२॥
येरव्हीं अभिमान अज्ञानियां । नाडी ऐसें येतें प्रत्यया । तरी या छेदूनि संशय । योगिराया प्रबोधीं ॥२३॥
परिसोनि आशंका सखोल । शुक म्हणे राया ऐकें बोल । श्रवणसुखाची हृदयीं ओल । देखोनि डोल मज येती ॥२४॥
राया अज्ञान गाढमूढ । आत्मप्रकाश नेणें गूढ । जे सुषुप्ती उमाणी दगड । स्वयें पडिपाड करूनि ॥२२५॥
तेथ अभिमान करील काय । कोठें आशंकेसी ठाय । स्वप्रकाश विपरीत होय । तोचि ठाव अभिमाना ॥२६॥
ईश्वर म्हणोनि आविष्कारे । तंव कवळिजे अहंकारें । परंतु स्वप्रत्यया न विसरे । म्हणोनि थारे पूर्णत्वें ॥२७॥
तोचि प्रकाश अविद्योपाधी । कवळोनि आणिला जीवबुद्धी । तेथ अभिमानशत्रु बाधी । देहबुद्धी पांघुरवी ॥२८॥
विपरीत करूनि आत्मज्ञान । बळेंचि देह म्हणवी जाण । ऐसा प्रतापी अभिमान । तें व्याख्यान हें केलें ॥२९॥
मी आत्मा हें ओळखिलें । तेव्हांचि विपरीत ज्ञान शमलें । ऐसे सज्ञान दाटुले । ते नाडिले अभिमानें ॥२३०॥
नेणोनि कालवी शेण माती । त्याची कोणा न वाटे खंती । बळेंची विष्ठा चिळसी दातीं । धरवी हातीं अभिमानें ॥३१॥
ऐसा अभिमान महाबळी । बळेंचि सज्ञानासि छळी । तो घातला पायांतळीं । धन्य भूतळीं ते योगी ॥३२॥
एवं असूया अनृत दंभ । ईर्ष्या हिंसा अभिमान क्षोभ । जो हीं जिंकोनि स्वयंभ । तपोलाभ संग्रही ॥३३॥
ऐसे सात्यशीळ पूज्यपाद । त्यांहीं दिधलें आशीर्वाद । विफल न होती हा अनुवाद । निर्विवाद ध्रुव मानी ॥३४॥
ऐसा पूर्ण विश्वास मनीं । परम स्नेहाळ यशोदा जननी । कल्याणार्थ विघ्नशमनीं । अभिषेचनीं प्रवर्ते ॥२३५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP