तं दृष्ट्वा सहसोत्थाय देहः प्राणमिवागतम् । प्रीतः प्रियतमं दोर्भ्यां सस्वजे प्रेमविह्बलः ॥२१॥

वसुदेव सामोरा देखोन । नंद उठिला खडबडोन । मृताप्रति येतां प्राण । देह चेतन ज्यापरी ॥१३॥
परमप्रियकर प्राणसखा । बहुतां दिवसां भेटला देखा । प्रेमें आलिंगितां लेखा । तेथींच्या सुखा न करवे ॥१४॥
प्रेमें विव्हळ दोहीं बाहीं । नंदें आनंदें कवळितां पाहीं । स्नेह समरसे माजीं दोहीं । भेद कांही न थरेची ॥२१५॥

पूजितः सुखमासीनः पृष्ट्वानामयमादृतः । प्रसक्तधीः स्वात्मजयोरिदमाह विशांपते ॥२२॥

वसुदेवासी रम्यासन । नंदें पूजिला सन्मानून । सादर स्वस्थानीं बैसून । करी प्रश्न वसुदेव ॥१६॥
क्षेम पुसिजे ब्राह्मणासि । कुशल पुसावें क्षत्रियांसि । अनाभय वैश्ययातीसी । आरोग्य शूद्रासि पुसावें ॥१७॥
आदरेंकरून अनामय । नंदासि पुसे मारिषातनय । पुत्रस्नेहें कवळिलें हृदय । वचन काय बोलिला ॥१८॥
बालकापरी प्रजाजन । रक्षी परीक्षिति आपण । यालागीं विशांपति म्हणोन । व्यासनंदन संबोधी ॥१९॥

दिष्ट्या भ्रांतः प्रवयस इदानीमप्रजस्य ते । प्रजाशाया निवृत्तस्य प्रजा यत्समपद्यत ॥२३॥

वसुदेव म्हणे बंधुराया । नंदा ऐकें प्राणसखया । परमाश्चर्यें हे दैवमाया । भाग्या तुझिया न वर्णवे ॥२२०॥
वाळले वृक्षीं लागलीं फळें । कीं कोरडे खडकीं निघालीं जळें । तैसें तुज हें दैवबळें । संतान झालें गतवयीं ॥२१॥
आजि तुझा हा वृद्धापकाळ । संतानआशा निरसली सकळ । प्रजाहीन देह विकल । दैव केवळ हें तुझें ॥२२॥
तुम्हांसि पुत्रलाभ झाला । आम्हांसि आनंद उचंबळला । चंद्रीं देखोनि सोळा कळा । जेंवि लोटला क्षीराब्धि ॥२३॥

दिष्ट्या संसारचक्रेऽस्मिन्वर्त्तमानः पुनर्भवः । उपलब्धो भवानद्य दुर्लभं प्रियदर्शनम् ॥२४॥

चक्र म्हणिजे भ्रमणशीळ । मेघें निघे जें सिंधुजळ । सरितामार्गें पावे मेळ । नोहे निश्चळ पळभरी ॥२४॥
निशि वासरें सूर्यभ्रमण । कीं अजपाचक्रीं भ्रमे प्राण । तेंवि संचित प्रारब्ध क्रियमाण । येणें भ्रमणें भवचक्रा ॥२२५॥
ऐशिया संसारचक्रीं आजी । दुर्लभ भेटी आम्हांसि तुझी । पुनर्जन्म हा उपमा दुजी । ब्रह्माम्डामाजीं दिसेना ॥२६॥
संसारचक्रीं वर्त्तमान । असतां दुर्लभ प्रियदर्शन । पुन्हा भेटे पावल्या मरन । तैसेंचि जाण तव भेटी ॥२७॥

नैकत्र प्रियसंवासः सुहृदांचा चित्रकर्मणाम् । ओघेन व्यूह्यमानानां प्लवानां स्रोतसो यथा ॥२५॥

कर्मप्रारब्धें विचित्र गति । प्रियांची एकत्र नोहे वसति । वियोग घडे सुहृदआप्तीं । होय अमाप्ति संयोगा ॥२८॥
प्राणप्रिया बल्लवपति । सुखकर सुहृदां एकत्र वसति । न घडे घडे अप्रियप्राप्ति । अदृष्टगति ऐशी ही ॥२९॥
प्लवें बोलिजे तृणकाष्ठें । सरिताओघें वाहतां नेटें । दैवयोगें पडती विपटें । जैशीं द्वयतटें पावती ॥२३०॥
तैशा आपदा आणि संपदा । योगवियोग तोषखेदा । ऐक्यभावें । असतां सुहृदां । पावती भेदा दुर्दैवें ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP