अध्याय ३ रा - श्लोक १९ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


मुनि भौमानि भूतानि यथा यान्त्यपयान्ति च । नायमात्मा तथैतेषु विपर्येति यथैव भूः ॥१९॥

आत्मनिश्चयें जें राहिलें । तेंचि आत्मनिष्ठ ज्ञानी भलें । मायाविकारें कालवलें । तें आतुडलें सुखदुःखा ॥८७॥
सदैव एकरूपता नाहीं । षड्विकार कथिले पाहीं । तेही देहादिकांचेच ठायीं । आत्म्यासि कांहीं नातळती ॥८८॥
देहचि पावती यातायाती । देहचि व्यवहारीं प्रवर्त्तती । देहींच कर्माची उत्पत्ति । कर्में भोगिती देहचि ॥८९॥
जैसे मृत्तिकेचे होती घट । लहान थोर वक्र नीट । उत्तम मध्यम कनिष्ठ । कर्मकटकट पृथक्त्वें ॥१९०॥
एके ठायीं होय उत्पत्ति । देशदेशांतरा पावती । कोठील कोठें पडे माती । एक वसती स्वस्थानीं ॥९१॥
एकें पंचामृतांचीं पात्रें । एकें लेपती विष्ठामूत्रें । तैसेंचि प्रारब्धें विचित्रें । कर्मसूत्रें देहाचीं ॥९२॥
एथ श्रोतीं केला प्रश्न । मृद्धटाचें प्रारब्ध कोण । केव्हां कुंभारें केलें लेखन । निढळीं जाण घटाचे ॥९३॥
ऐशी आशंका विटाळसी । रिघोनि श्रोत्यांच्या मानसीं ।  श्रवणसुखाचे पंक्तीसी । विटाळासी कालवी ॥९४॥
तयांसि प्रायश्चित्त जाण । आशंकानिवृत्तितीर्थीं स्नान । विष्णुस्मरणाचें आचमन । सबाह्य पावन सहजेंची ॥१९५॥
मग प्रेमामृतभोजनीं । अधिकार झाला शुद्धपणीं । टाळी पिटिली श्रोतृजनीं । हें ऐकोनि सद्भावें ॥९६॥
तरी अविद्याकामकर्म । कालमर्यादेचा नम । होतां चहूंचा संगम । होय परिणाम जन्माचा ॥९७॥
प्रारब्ध सरे तों देह राहे । देह पडे तों प्रारब्धक्षय । देहाचरणें गोचर होय । प्रारब्ध काय कैसें तें ॥९८॥
सर्वत्र वायूचा संचार । वृक्ष हालोनि करी गोचर । पूर्व पश्चिम कीं उत्तर । हा निर्धार तैं कळे ॥९९॥
म्हणोनि देहभोगानुसारं । प्रारब्ध निर्धारिजे चतुरें । वाचूनि कपाळींचीं अक्षरें । वांचूनि खरेंन चोजवे ॥२००॥
एक वर्तती दैवज्ञ । त्यांसही भोगचि प्रमाण । भोग न घडतां अप्रमाण । भविष्य जाण तयांचें ॥१॥
एवं कथिलें जें प्रारब्ध । तेंही म्हणिजेल त्रिविध । काल कर्म संकल्प भेद । त्याचे विशद जाणावे ॥२॥
भूमि दंडसूत्रमानें । मोजिजे काल सूर्यभ्रमणें । तैसेंचि प्रारब्ध त्रिविध जाणणें । काळें कर्में संकल्पें ॥३॥
मीमांसक म्हणती कर्मफळ । चार्वाकादि म्हणती काळ । ऐसे विसंवादिये केवळ । नेणोनि शीळ दैवाचें ॥४॥
तरी कोणासि कर्म प्रधान । कालप्रधान ते कवण । संकल्पप्राधान्याचें लक्षण । विचक्षण परिसोत ॥२०५॥
जैसें त्रिगुणात्मक चराचर । परी प्रधान गुणांचा उच्चार । तिहींवीण पदार्थमात्र । नाहीं स्वातंत्र एक गुणीं ॥६॥
परी दोन्ही सामान्यत्वें रहाती । तेथ एकचि पावे अभिव्यक्ति । तैशीच प्रारब्धव्युत्पत्ति । जाणिजे श्रोतीं विवेकें ॥७॥
सचेतन अचेतन । ऐसा द्विविद भेद जाण । चराचराची सांठवण । यांतचि पूर्ण जाणावी ॥८॥
चहूं खाणींच्या जीवकोटी । कर्म बांधिलें त्यांचिये गांठी । जन्ममरणादि रहाटी । कर्मपरिपाठी भोंवतीं ॥९॥
लेप्यालेख्य शिल्पोद्भव । मृत्पाषाणधातु सर्व । अष्टधा प्रकृतीचे अवयव । त्यां कालसंभव प्रारब्ध ॥२१०॥
उत्तम काळीं देव घडिला । युगानुयुगीं महिमा चढला । कनिष्ठकाळींचा विघडिला । दुष्टीं फोडिला तत्काळ ॥११॥
कोणी एक आशंका करिती । एकेचि काळीं सहस्रमूर्ति । प्रतिष्ठिल्या त्यांची कीर्ति । समान व्यक्ती कां न पावे ॥१२॥
ये आशंकेचें निरसन करावयालागीं जाण । कालसूक्ष्मत्वाचें कथन । सावधान परियेसा ॥१३॥
दोन्ही सहस्र दोन्ही शतें । दोन्ही योजनें अधिक तेथें । निमेषार्धें भास्कररथें । गगनपंथें चालिजे ॥१४॥
तेथ लूतातंतू इतुका पंथ । जेव्हां लंघी गभस्तिरथ । तितुक्यामाजीं त्रिकाळ होत । उत्तम मध्यम कनिष्ठ ॥२१५॥
दोन्ही तीरें मध्यें ओघ । जैसे गंगेचे तीन्ही भाग । लूतातंतूचे विभाग । त्रिधा अव्यंग तैसेचि ॥१६॥
इतुकी सूक्ष कालगति । म्हणोनि दैवें भिन्न होती । स्थूलमानें कर्मप्रवृत्ति । दैवज्ञ वदती त्रिकाळ ॥१७॥
एवं कालजनित प्रारब्धभेद । अचेतनीं निर्विवाद । येरां कर्मांगत्वें काल फलद । ऐसें कोविद जाणति ॥१८॥
देशकाल द्रव्य पात्र । स्वाधिकार यथासूत्र । विविधोपचारही स्वमंत्र । कर्मतंत्र अवघें हें ॥१९॥
मनुष्ययोनीसी हा विचार । इतर योनि कर्मतंत्र । कैशा म्हणाल तो प्रकार । ऐका सादर होऊनि ॥२२०॥
संचित प्रारब्ध क्रियमाण । मनुश्यालागीं हें प्रमाण । इतरा योनीसि द्विविध जाण । नाहीं क्रियमान तयासी ॥२१॥
अचेतनां कालोद्भव । तेंचि निर्दिष्ट त्यांचें दैव । संचितक्रियमाणासि ठाव । नाहीं स्वयमेव तयांतें ॥२२॥
तरी संचित कैसें कवण । प्रारब्धाचें काय लक्षण । कैसें जाणिजे क्रियमाण । तें विचक्षण परिसोत ॥२३॥
अनादिसिद्ध स्वसंकल्पें । माया विरूढे चराचररूपें । तेव्हांचि त्रैविध्य हें जोपे । संस्काररूपें कर्माचे ॥२४॥
जेव्हां भासला रज्जु सर्प । तयाचिसवें उपजला कंप । डोंबा गव्हाळा इत्यादि रूपें । स्थूळ अल्प अवघेचि ॥२२५॥
खांदिया पल्लव मूळें शेंडे । एकलें वटबीज अवघें वाढे । तेचि अभिवृद्धि पुढें पुढें । करोनि वाडे ज्यापरी ॥२६॥
तैसें प्रथम स्फुरणीं चराचर । विरूढोनि वाढलें स्विस्तर । पुढें अभिवृद्धिप्रकार । कर्मविचारमूलत्वें ॥२७॥
संचित लिंगदेहीं थोर । स्थूल प्रारब्धें उभार । उपजे स्थूलाच्या आचारें । तेंचि खरें क्रियमाण ॥२८॥
कणिंग खंडिची भरली घरीं । त्यांत जेविला शेरभरी । त्या जेवणें त्या बाजारीं । निष्क चारी मिळविले ॥२९॥
चहूं निष्कांचे चार्‍ही द्रोण । धान्य केलें जें निर्माण । तयासि बोलिजे क्रियमाण । होय उत्पन्न क्रियेनें ॥२३०॥
कणंगीमधील संचित शुद्ध । भोजन केलें तें प्रारब्ध । त्यावरी मिळविलें जें विविध । क्रियमाण बुध तें म्हणती ॥३१॥
संचितीं मिलविजे क्रियमाण । त्यांतील अष्टांश काढून । प्रारब्धाचें उभारण । कीजे जाण मानवीं ॥३२॥
तो मानवी देह जंव पडे । तोंवरी क्रियमाण जें जें घडे । तुल्य करितां मागें पुढें । पाप पुण्य समसाम्य ॥३३॥
जरी सुकृतचि अधिक होय । तरी स्वर्गलोकयात्रे जाय । पुण्य सरे तोंवरी राहे । साम्यें मग ये माघारा ॥३४॥
पुढती मनुष्ययोनि पावे । प्रारब्ध अष्टांग संभवे । देह पडे तंव आघवें । घडे क्रियमाण पूर्ववत ॥३५॥
पुन्हा तुळितां तुळाधार । पाप झालिया अधिकतर । तिर्यग्योनि कारागार । पावोनि अघोर भोगावे ॥३६॥
पुण्यक्षयार्थ स्वर्गादि भुवनीं । पापक्षयार्थ पश्वादियोनीं । यालागीं क्रियमाण दोहीं स्थानीं । नाहीं बुधजनीं निगदिलें ॥३७॥
कालप्रारब्ध अचेतासि । लिंगदेहचि नाहीं त्यांसि । यालागीं संचितक्रियमाणांसि । नाहीं तयासि द्योतिलें ॥३८॥
संकल्प प्रारब्धाचें रूप । भक्तिप्रेमाचा साक्षेप । पूर्ण करावया सकृप । सत्यसंकल्प अवतरे ॥३९॥
कर्मसंस्कार नसतां पदरीं । भक्तानुग्रह विग्रह धरी । तैशीच संपादणीही करी । निर्विकारी निर्गुण ॥२४०॥
रामें वनवासीं रडावें । भार्गवा मातृहनन घडावें । अथवा नग्नवेषें बडबडावें । किंवा हिंडावें दिग्वसनी ॥४१॥
ऐसे अनेक अवतार । तयासि भक्तानुग्रह हेतुमात्र । अयोनिसंभव दिव्य शरीर । कर्मसंस्कार नातळे ॥४२॥
वितर्कास डावलावाया । म्हणाल आडरान घेतलें वायां । आशंकानिवृत्ति करूनिया । आलों पायां वोळगें ॥४३॥
एवं प्रारब्ध कालजनित । तैसें घटाचें विचेष्टित । भूमि त्यामाजीं निवांत । चेष्टारहित आत्मत्वें ॥४४॥
तैसेचि देह घटापरी । होती जाती कर्मफेरीं । आत्मा तेथ निर्विकारी । प्रतिशरीरीं न भेदे ॥२४५॥
एकरूप एक स्थानीं । वयें स्नेहें समाधानी । देह न राहती काळीं कवणीं । दैवाधीनपणीं परिभ्रमती ॥४६॥
तैसा आत्मा निर्विकार । कर्तृकरणादिकां अगोचर । नेणें कर्म ना संस्कार । निराकार सर्वगत ॥४७॥
जेंवि अंगींचा रोग हरोनि जाय । आरोग्य देहींचे देहीं लाहे । तें परोक्षत्वें गोचर नोहे । तेंवि जो आहे अपरोक्ष ॥४८॥
नातरी सुषुप्ति सरलिया पाठीं । प्राज्ञपरामर्ष हातवटी । मनबुद्ध्यादि करिती गोष्टी । नेणोनि पोटीं चेइरा ॥४९॥
ना तो व्युत्पन्न परोक्षवादी । ग्रंथ पाहूनि अनुभव साधी । अपरोक्ष स्वात्मप्रत्ययसिद्धि । नेणे शुद्धि आंधळा ॥२५०॥
एरव्हीं तुरीय साक्षित्वा होऊनिया पर । आणि विषयपर्यंत गोचर । स्वप्रकाशें चराचर । मिथ्या साचार ज्यामाजीं ॥५१॥
कालत्रयीं अबाधित । आत्मा एकरूप रूपातीत । आदिमध्यान्तरहित । सर्वातीत सर्वही ॥५२॥
त्यासि नाहीं होणें जाणें । कर्मसंस्कार ना भोगणें । ऐसें विवेकें जो जाणे । शोक करणें त्या नाहीं ॥५३॥
तुम्ही विचारसुधाराशि । काय सांगावें तुम्हांसि । सूर्यापुढें उजळिजे दशी । माझी तैशी वल्गना ॥५४॥
हृदयीं आत्मविचारदीप उजळे । तैं शोकभ्रांतीचें ध्वांत पळे । एक विचारदीप दवडूनि डोळे । होती आंधळे असतांही ॥२५५॥
तया अविवेकियाचिया कथा । अल्पैकें वृष्णिनाथा । जे विपरीतज्ञानें अचूक व्यथा । पैं सर्वथा भोगिती ॥५६॥
अज्ञानाश्रयें संसार । न सरे दुःखाचा सागर । अपथ्यशीळा जीर्णज्वर । नेदी अंतर ज्यापरी ॥५७॥

यथाऽनेवंविदो भेदो यत आत्मविपर्ययः । देहयोगवियोगौ च संसृतिर्न निवर्त्तते ॥२०॥

जैसा आत्मा वास्तव आहे । तैसा नेणोनि भेद वाहे । देह आत्मत्वें जो पाहे । महामोहें कवळिला ॥५८॥
माझा तुझा देह भिन्न । ऐसें रूढ विभेदभान । मग चराचर अभिमान । कंवटाळून नाचवी ॥५९॥
मान होतां हर्ष वाढे । अपमान देखोनि दुःखें रडे । आप्तवियोगविरहें बुडे । न निघे कडे भवडोहीं ॥२६०॥
पुत्रकलात्रादि स्वकीय मानी । योगवियोगें लाभहानि । मानूनि अविद्येच्या स्वप्नीं । ओरडोनि वोसणे ॥६१॥
देहासवें जन्मलों म्हणे । संतोष मानी देहपणें । देहपणें जिणें मरणें । योनि भोगणें अनेक ॥६२॥
तेथ कर्मजनित अनेक दुःखें । भोगूनि मी मी म्हणे मुखें । शत्रु मित्र रागद्वेषें । भोगी अवशें दुर्योनि ॥६३॥
ऐसा अपार अज्ञानसिंधु । कैसेनि सरे न होतां बोधु । यालागीं तेचि अगाध साधु । जे आत्म अभेद जाणती ॥६४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP