अध्याय ३ रा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - बहिरन्तः पुरद्वारः सर्वाः पूर्ववदावृताः । ततो बालध्वनिं श्रुत्वा गृहपालाः समुत्थिताः ॥१॥

राया कृष्णगमनापूर्वीं । द्वारें पिहित सर्वत्र सर्वीं । तैशी यथापूर्व आघवीं । माया लावी कपाटें ॥३२॥
महाद्वारादि बहिर्द्वारें । कारागारादि अभ्यंतरें । मध्यें पण्यवीथी चौबारें । पूर्वानुसारें अडकिलीं ॥३३॥
पलायितांचीं जैशीं निलयें । कां मूर्च्छागताचीं सर्वेंद्रियें । भास्करेंवीण कुशेशयें । तेणें न्यायेंच नुघडती ॥३४॥
एथ नवल न कीजे भूपा । सदनाबाहेर नेलिया दीपा । माजील प्रकाश पावे लोपा । मग होय सोपा अंधकारा ॥३५॥
तैसा परमात्मा होतां दूरी । मायाच स्वयंभ भरली घरीं । टाळी बैसली इंद्रियद्वारीं । वाट विचारीं चालेना ॥३६॥
ऐशीं लागलिया कपाटें । तव बाळें किंकाळी मारिली नेटें । रक्षण होतें क्रूर मोठें । कडकडाटें चेयिलें ॥३७॥
ऐकोनि रुदित बालध्वनि । होते कारागृहरक्षणीं । अवघे उठिले तत्क्षणीं । मनीं दचकोनी साशंक ॥३८॥

ते तु तूर्णमुपव्रज्य देवक्या गर्भजन्म तत् । आचख्युर्भोजराजाय यदुद्विमः प्रतीक्षते ॥२॥

एक रक्षणीं सावधान । शस्त्रास्त्रादि सांभाळून । एक वातवेगें धांवून । नृपा कथन करूं गेले ॥३९॥
राजद्वारींच्या रक्षकां । पूर्वीच आज्ञा ऐशी देखा । जे कारागारींचिया वार्त्तिकां । न कीजे शंका प्रवेशीं ॥४०॥
द्वास्थीं उघडितां सवेग खिडकी । पुढें धांवती दूत दुडकी । रायापाशीं तडकाभडकीं । गोष्टी थोडकी बोलिले ॥४१॥
म्हणती राया भोजपति । अष्टमगर्भाची प्रसूति । झाली तुमचिये भगिनीप्रति । सेवेसि विनति जाणविली ॥४२॥
ज्याच्या भयें अतिउद्विग्र । अहोरात्र तुमचें मन । तो हा अष्टम गर्भ म्हणून । केलें निवेदन सेवेसी ॥४३॥
ऐसें सवेग जाऊनि दूतीं कथिलें भोजरायाप्रति । ते देवकी अष्टमगर्भप्रसूति । उद्विग्रचित्तीं ज्यालागीं ॥४४॥
उद्विग्न होऊनि प्रतीक्षा करी । त्याची वार्त्ता कथिली हेरी । ऐकोनि दचकला अंतरीं । म्हणे हा वैरी प्रत्यक्ष ॥४५॥

स तल्पात्तूर्णमुत्थाय कालोऽयमिति विहूवलः । सूतीगृहमगात्तूर्णं प्रस्खलन्मुक्तमूर्धजः ॥३॥

दचकोनि उठिला सत्वर । कोपें झाल अत्यंत क्रूर । न सांवरितां स्वशरीर । अतिसत्वर निघाला ॥४६॥
उठिला मंचकापासून । धांवतां पडला अडखळोन । मुकुट गेला गडबडून । केश सुटून विखुरले ॥४७॥
पुढें धांवला मोकळे केशीं । आला प्रसूतिमंदिरासी । दूत धांवती चौपाशीं । शस्त्रास्त्रांशीं सन्नद्ध ॥४८॥
गगनवाणीचा वृत्तांत । ऐकोनि होतों साशंकित । आजि याचा करीन घात । मग निवांत पहुडेन ॥४९॥
ऐसा मंदिरीं संचरला । जैसा कृतांत खवळला । देवकी विनवी तये वेळां । तें नृपाळा अवधारीं ॥५०॥

तमाह भ्रातरं देवी कृपणा करुणं सती । स्नुषेयं तव कल्याण स्त्रियं मा हन्तुमर्हसि ॥४॥

देवकी म्हणे कंसाप्रति । दादा ऐकें एवढी विनंती । अनाथ येत्यें मी काकुळती । कल्याणमूर्त्ति तूं राया ॥५१॥
तुझी धाकुटी मी बहिणी । तुवां आपुलिये प्राणरक्षणीं । आम्हां घालूनिया बंधनीं । दुःखश्रेणी भोगविल्या ॥५२॥
बाळें मारिलीं सकोमळ । तया दुःखाचे कल्होळ । आठवितां मन व्याकुळ । सदा तळमळ करितसें ॥५३॥
तुझा चुकवाचा कालमृत्यु । मनीं धरूनि हाचि हेत । पुत्रशोकाचें आवर्त्त । म्यां अद्भुत सोशिलें ॥५४॥
परमदीन मी दुःखित । तूं बंधु स्नेहाळ करुणावंत । माझें एवढें पुरवीं आर्त्त । म्हणुनि प्रार्थित घाबरी ॥५५॥
तुवा ऐकोनि गगनवाणी । प्रवत्तलासि माजेह हननीं । स्त्रीवधाच्या पापाचरणीं । कंटाळोनि सोडिलें ॥५६॥
जेव्हां होतें गर्भिणी । ते काळींही अंतःकरणीं । तुवां पाहिलें विचारूनि । पापकरणी न केली ॥५७॥
आतां तेंचि पुन्हा आलें । तुवां पाहिजे विचारिलें । मज दीनेतें सुखी केलें । वायणें बोलें दयाळा ॥५८॥
हननीं अयोग्य तुझी स्नुषा । न करीं स्त्रीवधअघोरदोषा । बालहत्या करितां यशा । नराधीशा मूकसी ॥५९॥
आठवा नोहे हे आठवी कुमारी । म्हणोनि सहसा इसी न मारीं । पुत्र नव्हे मा त्याचें समरीं । भय अंतरीं आगविसी ॥६०॥
माझी कन्या तुझी स्नुषा । योग्य नव्हेसि हननदोषा । एवढी रक्षूनि घेईं यशा । वाक्य सहसा न मोडीं ॥६१॥

बहवो हिंसिता भ्रातः शिशवः पावकोपमाः । त्वया दैवनिसृष्टेन पुत्रिकैका प्रदीयताम् ॥५॥

अग्निसमान बहुत बाळ । तुवां मारिले होऊनि काळ । तुज हा शब्द नाहीं केवल । दैव सबळ प्रेरक ॥६२॥
आतां एवढी कनिष्ठ प्रजा । मज देईं गा भोजराजा । एकुलती हे आत्मजा । दादा तुझा प्रसाद ॥६३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP