अध्याय २ रा - श्लोक ३९ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


न तेऽभवस्येश भवस्य कारणं विना विनोद्रं बत तर्कयामहे ।
भवो निरोधः स्थितिरप्यविद्यया कृता यतस्त्वय्यभयाश्रयात्मनि ॥३९॥

संचित प्रारब्ध क्रियमाण । ऐसें त्रिविध कर्मबंधन । तेणें जीवासि जन्ममरण । कर्माधीन आविद्यक ॥६९॥
तूं मायानियंता पूर्ण । म्हणोनि ईश हें संबोधन । त्या तुज संसारबंधन । मूर्ख कोण मानील ॥७७०॥
मृगजळशैत्यें सूर्य कांपे । पावकप्रतिभे कालाग्नि तापे । स्वच्छायेनें मेरु दडपे । तैं परमात्मा गुंते संसारीं ॥७१॥
तो तूं असंसारी श्रीकृष्ण । तुज कैंचें कर्मबंधन । लीलाविग्रहें क्रीडाचरण । हेंचि कारण तर्किजे ॥७२॥
अनंत भक्तांचा प्रेमादर । नाना दुष्टांचा संहार । क्रीडाविनोद तदनुसार । जगदुद्धार करावया ॥७३॥
अभयाश्रय हें संबोधन । करावया हेंचि कारण । भेद भयाचें जन्मस्थान । तूं अभेद पूर्ण परमात्मा ॥७४॥
तूं अभेद पूर्ण जगदात्मा । तुज नियमन करवे कर्मा । यालागीं नित्यमुक्त या नामा । अभयाश्रय संबोधन ॥७७५॥
तुज जन्मासि नाहीं कारण । हें कायसें प्रशंसन । आधीं जन्म स्थिति आणि मरण । हें मिथ्या जाण आविद्यक ॥७६॥
तुझ्या ठायीं विन्मुखपण । हेंचि अविद्येचें जन्मस्थान । जनन मरण अभिवर्धन । हें करणें जाण तयेचें ॥७७॥
तुझ्या ठायीं सन्मुख सदा । त्यासि नाहीं जन्ममरणांची बाधा । त्या प्रत्यक्ष तुज गोविंदा । संसृतिशब्दा कें वदिजे ॥७८॥
जीवासि जन्मादि वास्तव नाहीं । तें अविद्याकृत मिथ्या पाहीं । तें जैं घडे वस्तूच्या ठायीं । तरी तरणोपायीं कां श्रमिजे ॥७९॥
वास्तवचि जरी जन्ममरण । तरी मग कैंचें निस्तरण । यालागीं ऐसें अप्रमाण । सहसा व्याख्यान न करावें ॥७८०॥
तुझिया नामस्मरणापुढें । अविद्या सकार्य समूळ उडे । जन्ममरण कोणीकडे । मग बापुडें उरेल ॥८१॥
अविद्याभ्रमीं भक्त बुडे । त्यासि तरावयाचिये चाडे । नानावतारपवाडे । केले रोकडे ते ऐकें ॥८२॥
स्वधर्माचें संस्थापन । लोकत्रयपरिपालन । लीलावतार धरिले पूर्ण । ते सुरगण बोलती ॥८३॥

मत्स्याश्वकच्छपनृसिंहवराहहंसराजन्यविप्रविबुधेषु कृतावतारः ।
त्वं पासि नस्त्रिभुवनं च यथाऽधुनेश भारं भुवो हर यदूत्तम वन्दनं ते ॥४०॥

दीपप्रकाशें क्रमिजे राती । तेवीं अविद्येमाजीं श्रुति । ज्ञानप्रकाशें स्वधर्मेपथीं । प्राणी येती आत्मत्वा ॥८४॥
तेथ महामोहशंखासुर । श्रुतिरत्नांचा तस्कर । आश्रयूनि अकूपार । भयंकर लपाला ॥७८५॥
विश्वीं झाला हाहाकार । लोपला वर्णाश्रमयज्ञाचार । भंगला धर्माचा विचार । अधर्म थोर दाटला ॥८६॥
तैं मत्स्यरूप धरूनि हरि । शंख मारूनि वाहसी करीं । विश्व रक्षिलें सदाचारीं । धर्मा करी एकछत्र ॥८७॥
कूर्मरूपें श्रीअनंता । पृष्ठभागीं पृथ्वी धरितां । सुकर होऊनि दाढेवरुता । घेसी तत्त्वता भूभार ॥८८॥
हिरण्यकशिपुअहदैत्य । सद्भावप्रर्‍हादा गांजित । सुरवर केले पदच्युत । दुःखावर्ती त्रैलोक्य ॥८९॥
दुर्मदस्तंभातें करूनि भग्न । स्वयें प्रकटे सिंहवदन । हिरण्यकशिपु विदारून । स्थापी त्रिभुवन स्वधर्मीं ॥७९०॥
ब्राह्मणभजनभाग्यें बळी । बळेंचि त्रिदशतिं आकळी । निर्जर मिळविले धुळी । असुरां कुळीं आनंद ॥९१॥
देव निर्दैव ब्राह्मणकोपें । बळि सभाग्य भक्तिप्रतापें । ब्राह्मणकृपेच्या साक्षेपें । चळी कांपे कळिकाल ॥९२॥
ब्राह्मणांचे आशीर्वाद । तेंचि लेऊनि कवच विशद । समरींजिंकोनि निर्जरवृंद । विजयानंद बलि पावे ॥९३॥
शुक्र बळीसि करी बोध । देव न टाकिती विरोध । त्यांचा करूनिया शोध । परम सावध असावें ॥९४॥
कल्याण व्हावें आपणासी । ऐशी इच्छा जया मानसीं । तेणें सावध अहर्निशीं । रहाटी ऐशी करावी ॥७९५॥
अतिथि देखोनि ऐकोनि । सन्मानिजे अभ्युत्थानीं । करितां उपेक्षा हेळणी । महाविघ्नीं आतुडवी ॥९६॥
आपुलें आराध्य दैवत । तेथ असावें परम नियत । तेथ दुश्चित्त होतां चित्त । ये अकस्मात अरिष्ट ॥९७॥
मैत्री करावी सज्जनांशीं । सलगी न दावी दुर्जनांशीं । यथोपचारें समयासी । दोहीं ठायीं भजावें ॥९८॥
ईश्वर अथवा नरेश्वर । सेवेसि असावें सादर । तेथें होतां तंद्रापर । नाश सत्वर कार्याचा ॥९९॥
नित्यकर्माचें अनुष्ठान । श्रौत स्मार्त औपासन । यथाकाळीं सावधान । नसतां विघ्न प्रमादें ॥८००॥
देवमनुष्यपितृऋण । अथवा कोणी उत्तम वर्ण । यांचे परिहारीं आपण । सावधान असावें ॥१॥
जन्मकाळापासूनि ग्रह । क्रूर सौम्य दशासमूह । जाणोनि शांतीचा लवलाहो । करितां मोह न धरावा ॥२॥
आणि आपुलें वसतिस्थान । उटज हो कां हेमसदन । निवेशनिर्गमींचें विघ्न । सावधान रक्षावें ॥३॥
नातरी जैसा कोशकीट । सदन रचूनि बळकट । ठेवूं विसरला निर्गमवाट । शेवटीं कष्ट पावला ॥४॥
नातरी जैसा मंदमति । मूषकबाधेचि निवृत्ति । लवणें भरूनि पाया भिंती । केली वरतीं त्रिमाळिकें ॥८०५॥
प्रावट्काळीं पडतां घन । लवण विघरोनि झालें जीवन । त्रिमाळिका होतां पतन । मग यमसदन सकुटुंबा ॥६॥
तैसें न होऊनि बुद्धिमंद । वातवृष्टि आतपभेद । जलाग्नितस्करांचे बाध । सदनीं सावध चुकवावे ॥७॥
मंदिर केलें रत्नखचित । शय्या केली तूळिकायुक्त । दीपक जाळी होतां पतित । अग्नि अद्भुत चेतला ॥८॥
अग्निद्रव्याची सांडण । पेटतां उडोन गेलें सदन । कुटुंबासहित सोहळा पूर्ण । सभाग्य म्हणोनि भोगिला ॥९॥
खचलें विसंचलें पहावें । पडलें झडलें सांभाळावें । नित्य नूतन सांवरावें । सदनीं राहावें यापरी ॥८१०॥
तैसेंचि रोगांचें भांडार । नाशिवंत स्थूलशरीर । म्हणोनि आहारव्यवहार । करितां सविचार असावें ॥११॥
पथ्य भेशज रोगचिकित्सा । सावधपणें कीजे वत्सा । भुलोनि क्षणिकां विषयां तुत्सां । पात्र कुत्सां न व्हावें ॥१२॥
बालपालनीं सावधान । पतनदंशसंरक्षण । यथाकाळीं अन्नपान । निरीक्षण क्रीडेचें ॥१३॥
तैसेंचि कामिनीचें मन । संरक्षावें सावधान । न कीजे गुह्यसंभाषण । दीर्घताडण न करावें ॥१४॥
अशनशयनमनवस्त्राभरणीं । गौरविजे अलंकरणीं । विहरभाषणनिरीक्षणीं । सावधान रक्षावी ॥८१५॥
स्त्रीसि नाहीं स्वतंत्रपण । बालत्वीं पित्राज्ञापालन । भर्त्ताराआज्ञेनें तारुण्य । पुत्राधीन वार्धक्यीं ॥१६॥
येणें नियमें पतिव्रता । नियमें होय स्वतंत्रता । पातक भर्ताराचे माथां । दैत्यनाथा तें ऐक ॥१७॥
पाणिग्रहणें स्वधर्मनेम । अग्निसेवन गृहस्थाश्रम । पंचमहायज्ञ षट्कर्म । कीजे निष्काम सद्भावें ॥१८॥
अतिथिअभ्यागतपूजन । हव्य कव्य विप्रार्चन । मातृपितृदेवार्चन । गुरुपूजन विधियुक्त ॥१९॥
आश्रमत्रयासि आधार । गृहस्थाश्रमचि साचार । म्हणोनि गृहस्थाश्रम थोर । रक्षणपर सर्वांसी ॥८२०॥
वैश्यें दोहावीं गोधनें । क्षत्रियें दोहावीं उभय भुवनें । गृहस्थें आश्रमत्रयपूजनें । सुकृत घेणें दोहोनी ॥२१॥
नित्यनैमित्तिक कर्मांसाठीं । स्त्री बांधोनि घेतली गांठी । तेथ भांबावलिया रहाटी । पापकोटि गृहस्था ॥२२॥
यालागीं परम सावधान । करावें स्त्रीसंरक्षण । रतिकाळीं रतिसेवन । प्रजोत्पादन करावें ॥२३॥
सावधानपणें दासदासी । नियोजावीं निजसेवेसी । दुश्चित असतां अनर्थासि । अकस्मात मिलविती ॥२४॥  
अश्वगजोष्ट्रधेनुमहिषी । इत्यादि पाळिल्या प्राणियांसी । सावधपणें अहर्निशीं । सांभाळासी न चुकावें ॥८२५॥
वृक्षवाटिका वनोपवनें । नानाकृषि देवसदनें । जलाशयादि प्रवाहजीवनें । सावधानें रक्षावीं ॥२६॥
न्यायनीतीचें संरक्षण । आयव्ययाचेम परिज्ञान । राष्ट्रप्रजापरिपालन । सावधान करावें ॥२७॥
गुरूपदिष्ट जे कां विद्या । विवरूनि निरसावी अविद्या । सावध सेवूनि अक्षरा आद्या । जगद्वंद्या भजावें ॥२८॥
सर्व सांगावयाचें कारण । इतुकेंचि एथ महाविघ्न । शत्रुदमनीं विलंबन । असावधान हें मूळ ॥२९॥
आंतरशत्रूंचा करूनि जय । ज्ञानलाभें मोक्षोपाय । बाह्यशत्रूंच्या पराजयें । लोकत्रय साधावें ॥८३०॥
तुवां करोनि प्रताप थोर । समरीं जिंकिलें निर्जर । आतां करीं महासत्र । जेणें अमर नुधवती ॥३१॥
निर्जर करिती तपश्चर्या । हिरोनि घेती लोकत्रया । यालागीं तूंही यज्ञकार्या । असुरराया संपादीं ॥३२॥
ऐसा शुक्रबोधें बळी । यज्ञ करितां भूमंडळीं । आक्रांत देवांचे मंडळीं । श्रीवनमाळी चिंतिती ॥३३॥
तेव्हां होऊनि वामन । मागोनि त्रिपादभूमिदान । केलें बळीसि बंधन । त्रिदशां त्रिभुवन अर्पिलें ॥३४॥
बळि ब्राह्मणभजननिष्ठ । आशीर्वादें महाबलिष्ठ । समरीं हरिहर पावतां कष्ट । योद्धा वरिष्ठ जिणवेना ॥८३५॥
मग मागोनि भूमिदान । केलें कपटें बलिच्छलन । न चले बळीसि आंगवण । ब्राह्मणभजनप्रसादें ॥३६॥
ताक मागोनि धेनु देणें । एक्या सुमनें वन अर्पणें । तैसें केलें श्रीवामनें । द्वाररक्षण बळीचें ॥३७॥
या इंद्राचें भरतां मान । बळीस ओपीन इंद्रासन । जमान होऊनि वामन । द्वार रक्षूनि राहिला ॥३८॥
बळीची भजनभीड मोठी । सुरकार्याचिये संकटीं । बळी छळितां कृपा पोटीं । धरूनि काठी द्वार राखे ॥३९॥
कृतवीर्याचा कार्त्तवीर्य । धेनुलोभें परमान्याय । करूनि मारिला मुनिवय । तपोवीर्यप्रतापी ॥८४०॥
तेव्हां प्रकटोनि परशुपाणि । सहस्रार्जुन मारिला रणीं । करूनि निःक्षत्रिय धरणी । द्विजांलागीं अर्पिली ॥४१॥
आपुल्या पित्यासि जो संहारी । पुत्र सूडें त्यासि मारी । त्याची वृत्ति स्वयें स्वीकारी । परशुधारी तैसाचि ॥४२॥
पितृघाती निर्दाळून । पृथ्वी घेतली आपण । शौनकभृगुवंशा भूषण । तदर्पण भू केली ॥४३॥
भार्गव निर्विकार वितृष्ण - । न्यायें केलें पृथ्वीहरण । न करी औपाधिक शासन । शौनकार्पण या हेतु ॥४४॥
मारूनिया क्षत्रियांचे गण । त्यांचेनि रक्तेंकरूनि तर्पण । पितरांसहित निर्जरगण । जेणें संपूर्ण तोषविले ॥८४५॥
सनकादिकीं करितां प्रश्न । ब्रह्मा धरूनि ठेला मौन । तैं हंसावतारें श्रीभगवान । गुह्यज्ञान प्रबोधी ॥४६॥
ब्रह्मा केवळ रजोगुण । रागलो भतृष्णावरण । पडोनि झालें विपरीत ज्ञान । गुह्य प्रश्न उगवेना ॥४७॥
लीलाविग्रही मराळ - । रूपें अवगला गोपाळ । आत्मसंवेदन बहळ । बोधी निजबाळ विधाता ॥४८॥
निर्जर जिंकोनि रावणें । केलीम निगडीं दृढबंधनें । तैं धराधरधरास्तवनें । अवतार धरणें रघुकुळीं ॥४९॥
भानुकुलीं दशरथसदनीं । वतरोनि पंकजपाणि । केली अलौकि करणी । जे शंकर स्मरणीं स्मरतसे ॥८५०॥
ताटिका मारिली एके बाणें । विश्वामित्राध्वररक्षणें । कोटि राक्षसेंशीं सुबाहुप्राणें । घेऊनि उडविणें मारीचातें ॥५१॥
अहल्या उद्धरिली पदरजस्पर्शें । गौतम पूजिला पूर्णतोषें । त्र्यंबकधनु भंगूनि कीर्त्तिघोषें । ब्रह्मांड यशें ढवळिलें ॥५२॥
रावण केला गर्वहत । राजे केलें लज्जान्वित । सीतास्वयंवरें त्रिजगांत । सुधाजीमूत वर्षला ॥५३॥
भार्गवरामें अवतारशक्ति । वीरश्रीतोषें ओपिली हातीं । रामनामाची हे ख्याति । त्रिजगीं गाती सुरसिद्ध ॥५४॥
निज जनकाचें भाषरक्षण । पाळिलें सापत्नमातृवचन । बंधुकांतेशीं दंडकारण्य । वसवी मुनिजनसहवासें ॥८५५॥
सत्यव्रताच्या रक्षणें । पितृममता त्यजिली जेणें । जटावल्कलभस्माभरणें । तापसपणें विचरत ॥५६॥
वाल्मीकभविष्य प्रमाण । करूनि केलें क्रियाचरण । विराधसादि निर्दाळून । वसतिस्थान पंचवटी ॥५७॥
विरूप केली शूर्पनखी । खरदूषणत्रिशिराप्रमुखीं । समरीं प्राण अर्पूनि सुखी । केली त्रिलोकी निष्पाप ॥५८॥
शूर्पनखीनें वदनानिळ । श्रवणीं फुंकितांचि तत्काळ । रावणालयीं मदनानळ । प्रळयकाळ खवळला ॥५९॥
तेणें करितां सीताहरण । रुक्ममृगत्वें मारीचमरण । जटायूचें उद्धरण । शापमोचन कब्रंधा ॥८६०॥
पंपे भेटला हनुमंत । तेणें सुग्रीववृत्तांत । कथितां श्रीराम करुणावंत । केला सनाथ वरदानें ॥६१॥
वाळिसुग्रीवजन्मकथन । उभयवैराचें कारण । परिसोनिया रघुनंदन । प्रताप गहन दाखवी ॥६२॥
एकबाणें विपट ताळ । छेदूनि दुंदुभिप्रेत । विशाळ । पायें उडवूनि तत्काळ । वाळी प्रबळ खवळिला ॥६३॥
कश्यपवरदमाळे भेणें । वाळी मारिला विमुखपणें । ब्राह्मणवराच्या सन्मानें । आपणा उणें स्वीकेलें ॥६४॥
दाराकुमारीसहित राज्य । पावोनि सुग्रीव झाला पूज्य । पुढें सीताशुद्धीचें काज । वानरपुंज मिळविले ॥८६५॥
यथाविभागें दिशाचक्र । शोधिला भूगोल अवक्र । दधि म्हणोनि मथितां तक्र । न लभेचि सार जानकी ॥६६॥
दक्षिणकाष्ठेशीं एकनिष्ठ । मारुति शोधूनि संतुष्ट । शुद्धि आणूनि हरिले कष्ट । मग चालिले स्पष्ट लंकेसी ॥६७॥
सागर प्रसन्न करितां स्तुति । सन्मुख न होता क्षोभे चित्तीं । भस्म करितां शरणवृत्ति । नम्रगति पातला ॥६८॥
रत्नीं पूजूनि रघुनंदना । कथी नळासी सेतुरचना । करितां रामनामलेखना । शिळा जीवनावरी तरती ॥६९॥
अभित्रबंधु आला शरण । सिंधु उतरूनि वानरसैन्य । सुवेळे जाऊनि रघुनंदन । लंकाभुवन रोधिलें ॥८७०॥
शिष्टाई धाडिला अंगद । साम न मानी बुद्धिमंद । सेना आणि मंत्रिवृंद । महादुर्मद मारिले ॥७१॥
कुंभकर्ण निद्राभरीं । जागवूनि धाडिला समरीं । श्रीरामचिया निर्वाणशरीं । रणचत्वरीं पहुडला ॥७२॥
कुंभकेतादि राजकुमार । अतिकायादि योद्धे थोर । युद्धीं मारूनि वानरभारें । श्रीरामचंद्र तोषविला ॥७३॥
श्रीरामाचिया निर्वाणबाणें । पावले संग्रामीं निर्वाणें । तेव्हां रावणाच्या मनें । पहा अनर्थ मानिला ॥७४॥
इंद्रजितें रावणासी । वारूनि आला संग्रामासी । रामसौमित्रां नगपाशीं । कपिसेनेशीं पाडिलें ॥८७५॥
तैं वातपुत्रें द्रोणाचळ । आणूनि उठविलें वानरदळ । यज्ञ भंगूनि रावणबाळ । सौमित्रवीरें मारिला ॥७६॥
पुढें अहिरावण महिरावण । करूनि अद्भुत आंगवण । चोरूनियां रघुनंदन । पाताळभुवनीं टाकिले ॥७७॥
तेथें प्रवेशोनि मारुति । अहिमहींची केली शांति । विजयघोषें श्रीरघुपति । सुवेळेप्रति आणिला ॥७८॥
शक्ति भेदूनि रावणे । वीरसौमित्र घेतला प्राणें । आजि इंद्रजिताचें उसनें । फिटलें मनें भाविलें ॥७९॥
श्रीराममारणाचिया काजा । करूनि महाकालीपूजा । महामृत्युंजयमंत्रबीजा । जपोनि हवनीं बैसला ॥८८०॥
तंव बिभीषणसुषेणमंत्रें कपि । आणूनि द्रोणाद्रि प्रतापी । लक्षण जीववूनि रावण कोपी । दाराछळणें खवळिला ॥८१॥
दुःखें पातला निर्वाणसमरा । शक्रें श्रीरामा निजरहंवरा । देतां भरला क्रोधभरा । दाढा करकरां खादल्या ॥८२॥
निर्वाणशस्त्रीं करितां युद्ध । विरोधभजनें ध्यानावबोध । चापवाणें ठाणबद्ध । श्रीराम प्रसिद्ध देखिला ॥८३॥
रामरंगें रंगले नेत्र । राम देखती दृश्यमात्र । राममयचि देखे गात्र । प्रेम विचित्र द्वेपाचें ॥८४॥
रामीं भिडतां रामबाणीं । रावण पडला निर्वाणरणीं । पुष्पें वर्षिजे अमरगणीं । विजयध्वनि लागल्या ॥८८५॥
पडिले रावणाचे मौळी । त्यावरी रामायणाच्या ओळी । आश्चर्य देखोनि अमरपाळीं । माथें सकळीं तुकिलें ॥८६॥
वर्षोनि अमृत कृपाघन । रामें उठविलें वानरसैन्य । जानकी आणूनि दिव्यदान । प्रेमालिंगन श्रीरामीं ॥८७॥
फोडिली सुरांची वांदवडी । नव ग्रहांची तोडिली वेडी । रामराज्याची आनंदगुढी । झालें ब्रह्मांडीं एक छत्र ॥८८॥
बिभीषणा लंके राज्याभिषेक । रावणपत्न्यांसि दीर्घ शोक । रामकीर्तींचा विजयघोक । ब्रह्मादिक पठताती ॥८९॥
प्रायश्चित्तार्थ रामेश्वर । स्थापूनि गेला रामचंद्र । ज्याच्या दर्शनें जगदुद्धार । यावच्चंद्र अघशांति ॥८९०॥
भिल्लटीचीं उच्छिष्ट बोरें । अंगीकारिलीं श्रीरामचंद्रें । भरता भेटॊनि प्रेमादरें । अयोध्यापुरा प्रवेशले ॥९१॥
वसिष्ठाज्ञेनें राज्याभिषेक । स्वधर्मसोहळा भोगिती लोक । शंकरहृदयीं भरिला हरिख । नामें त्रैलोक्य धवळिलें ॥९२॥
केलें स्वधर्मसंस्थापन । मारिले अन्यायी दुर्जन । वैकुंठासि अयोध्याभुवन । गेला घेऊनि श्रीराम ॥९३॥
मत्स्य कच्छ वराह हंस । नृसिंह वामन भार्गववेष । क्षात्रवंशीं रामपरेश। रक्षी त्रिजगास अमरेंशीं ॥९४॥
केवळ आम्हांसीच रक्षिलें  ऐसें नाहीं वाखाणिलें । लोकत्रया प्रतिपाळिलें । संस्थापिलें धर्मातें ॥८९५॥
आतां तैसेंचि श्रीपरेशा । गोकुळीं धरूनि गोपवेशा । मारूनि उत्पथां राक्षसां । आम्हां निजदासां रक्षावें ॥९६॥
हेचि विनति यदूत्तमा । दैत्यभारें दाटली क्ष्मा । तो भार - उतरूनिया विश्रामा । मेघश्यामा पाववीं ॥९७॥
ऐसें विनवूनि निर्जरगणीं । सकळही माथे ठेविती चरणीं । मग आश्वासिली देवकी जननी । तें शुकमुनि बोलतो ॥९८॥

N/A

References : N/A
Last Updated : April 25, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP